Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना ४ महिने मुदतवाढ
यवतमाळ, ८ जुलै / वार्ताहर

 

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींना चार महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यवतमाळ जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मनोहर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राज्यातील अकोला, वाशीम, गोंदिया, भंडारा, धुळे आणि नंदुरबार या सहा जिल्हा परिषद वगळता उर्वरित सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचा कार्यकाळ २१ सप्टेंबर ०९ ला संपणार होता. हा कार्यकाळ चार महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, शिक्षण व आरोग्य, अर्थ व बांधकाम, समाज कल्याण, महिला व बालकल्याण इत्यादी विषय समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडणुका जानेवारी २०१० मध्ये होतील. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदााधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा आहे. राज्यातील अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, धुळे आणि नंदुरबार या सहा जिल्हा परिषद वगळता उर्वरित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार होता, आता या सर्वाना चार महिने मुदतवाढ मिळाली आहे.
शासनाच्या या निर्णयाचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रीतीला दुधे, उपाध्यक्ष सदबाराव मोहिटे, शिक्षण व आरोग्य सभापती देवानंद पवार, अर्थ व बांधकाम सभापती बाळासाहेब मांगूळकर, समाज कल्याण सभापती रवींद्र हेंडवे, महिला व बालकल्याण सभापती कीर्ती कदम या सर्वानी स्वागत केले आहे.
राज्यात विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमुळे पक्षांतर्गत असंतोष चव्हाटय़ावर येऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांना ‘मुदतवाढ’ देण्यात आली, अशी विरोधकांची प्रतिक्रिया आहे.