Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

महापौरांच्या राजीनाम्याच्या मागणीने वातावरण तापले
अकोला, ८ जुलै / प्रतिनिधी

 

आयुक्तांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिकेतील विरोधी पक्षगटाच्या सदस्यांनी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अकोला महापालिकेतील आयुक्त आणि महापौरांमधील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. अमरावतीला पार पडलेल्या घरकुल योजनेच्या बैठकीनंतर हे मतभेद विकोपास गेले. घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत आयुक्त अपयशी ठरले, असा आरोप महापौरांचा आहे. तर महापौरांनी शिवीगाळ करणे अयोग्य आहे. त्यांनी दमदाटीही केली आणि अंगावरही धावले. यामुळे जिवाला धोका असल्याचे आयुक्त कु र्वे यांनी म्हटले आहे. महापौरांनी हे सर्व आरोप नाकारले आहेत. महापालिकेतील भाजप-शिवसेना या विरोधी गटाच्या सदस्यांनी या मुद्यावर महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महापौरांच्या दबावतंत्राचा अनुभव याआधीही अनेक कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आयुक्तांना शिवीगाळ करून त्यांनी कळस केला आहे. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीमाना द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते हरिभाऊ काळे यांनी केली आहे. तर आयुक्तांचा अपमान के ल्याबद्दल शासनाने महापौरांवर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासाठी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले.
मंगळवारी दिवसभर काम बंद ठेवून या घटनेचा कर्मचाऱ्यांनी निषेधही केला. या प्रकारानंतर प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे उघड झाले आहे. शहरातील विकास कामांना यामुळे अनेक दिवसांपासून ग्रहण लागले आहे. लेखाधिकारी संजय राठी यांच्या आत्महत्येनंतर अकोला महापालिकेत यायला अनेक अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. अकोला महापालिकेतील पदाधिकारी आणि सदस्यांसाठी ही आत्मचिंतन करण्याची बाब असल्याची टीका नागरिक करू लागले आहेत.