Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भंडारा जिल्ह्य़ात ३७ टक्के पेरण्या आटोपल्या
भंडारा, ८ जुलै / वार्ताहर

 

भंडारा जिल्ह्य़ात यावर्षी केवळ ३७ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. पावसाने अद्यापही सरासरी गाठली नसून जिल्ह्य़ात आतापर्यंत केवळ १४१.६ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्य़ात एकूण १ लक्ष ८१ हजार ८३५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यात नर्सरीचे सर्वसाधारण १६ हजार ६९ हेक्टर असून केवळ ५ हजार ९६९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या ३७ टक्के पेरण्या झालेल्या आहेत.
मागीलवर्षी आजघडीला ९७ टक्के पेरण्या झालेल्या होत्या. गेल्या वर्षी ७ जुलै २००८ रोजी आवत्या ९७ टक्के, रोवणी पाच टक्के, तूर ६८ टक्के, सोयाबीन ८३ टक्के, नर्सरी ९७ टक्के पेरणी झाली होती. यावर्षी मात्र आवत्या २४ टक्के रोवणी असून तूर १९ टक्के, सोयाबीन ३० टक्के आणि नर्सरी ३७ टक्के पेरणी झालेली आहे.
भंडारा तालुक्यात भात नर्सरीच्या २ हजार ५३७ सर्वसाधारण क्षेत्रापैकी ९०७ पेरणी झाली. पवनी तालुक्यात २ हजार १८७ क्षेत्रापैकी २ हजार १२१, मोहाडी तालुक्यात ३ हजार २३१ क्षेत्रापैकी केवळ ३६, तुमसर तालुक्यात २ हजार ८४३ क्षेत्रापैकी ६२, साकोली तालुक्यात १ हजार ७४५ क्षेत्रापैकी १ हजार ३११, लाखांदूर तालुक्यात १ हजार ८७६ क्षेत्रापैकी ४४४ तर लाखनी तालुक्यात १ हजार ६५० क्षेत्रापैकी १ हजार ९८ क्षेत्रात धान नर्सरीची पेरणी झाली आहे.
लाखांदूर तालुक्यात फक्त २४ टक्के धानाच्या नर्सरी लावण्यात आल्या असून ३४ टक्के आवत्यांची पेरणी झाली आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या माहितीनुसार गेल्या आठवडय़ात तालुक्यातील विविध कृषी केंद्रावरून १६७९ शेतकऱ्यांनी जवळपास २ हजार क्विंटल बियाणांची उचल केली. लाखांदूर तालुक्यात एकूण खरीप पिकाखाली २७ हजार ८७१ हेक्टर क्षेत्र असून यात ओलिताखाली १२ हजार ६७० हेक्टर तर बिना ओलिताखाली ६०८८ हेक्टर असे एकूण १८ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी केल्या जाते. तर आवत्या धानाचे क्षेत्र ७ हजार ५१० हेक्टर असून आतापर्यंत फक्त २ हजार ५८७ हेक्टर क्षेत्रामध्ये आवत्या धानाची पेरणी झालेली आहे. १ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रात इतर पिकांची लागवड केली जाते. यात तूर-सोयाबीन व भाजीपाला पिकांचा समावेश आहे.
लाखांदूर तालुक्यात एकूण रोवणी क्षेत्राच्या दहा टक्के म्हणजे १ हजार ८७८ हेक्टर क्षेत्रात धानाचे पऱ्हे पेरणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत फक्त ४४४ हेक्टर क्षेत्रामध्येच धानाचे पऱ्हे पेरल्या गेले. ज्या ठिकाणी पऱ्हे लावल्या गेले तिथे पावसाअभावी वाढ खुंटली आहे.
तालुका कृषी कार्यालयाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत तालुक्यातील ३ हजार २५९ शेतकऱ्यांना २३५१.३९ क्विंटल धान्य बियाणाचे परमीट वाटप केले. यापैकी या योजनेंतर्गत १ हजार १४७ शेतकऱ्यांनी विविध वाणांचे १४८९.९४ क्विंटल बियाण्यांची उचल केली. यासोबतच एन.सी.सी. अंतर्गत ५०२.५० क्विंटल बियाणे ५३२ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले असून हे सर्व बियाणे अनुदान तत्त्वावर वाटप करण्यात आले आहे.