Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गोंदियात खोळंबल्या
गोंदिया, ८ जुलै / वार्ताहर

 

जिल्ह्य़ात खरीप हंगामाला उशिरा सुरुवात झाली असून पावसाच्या हुलकावणीने भात पिकाची पेरणीसह रोवणीसुद्धा खोळंबल्या आहेत. अद्यापपर्यंत ३६ टक्के पेरण्याही झाल्या नाहीत. खरीप हंगामात भात पीक, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आदी पीक १ लाख ७९ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येणार असून भात पिकाची रोवणी १ लाख ७२ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर होणार आहे.
त्या दृष्टिकोनातून भात नर्सरी ११ हजार १८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे व त्याची टक्केवारी ६४ आहे. पावसाच्या अनियमिततेने भात पिकाच्या लागवडीला उशीर झाला असून यावर्षी दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पावसाच्या हुलकावणीने २५ टक्के उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्य़ात आजपर्यंत रोवणीला अद्यापही सुरुवात झालेली नाही, अशी माहिती कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.खरीप हंगामाच्या भात पीक रोवणीला साधारणत: जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरुवात होते पण, हा काळही आता पावसाअभावी लोटत चालला आहे.
ही परिस्थिती बघून जिल्ह्य़ातील काही शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून ८५४ हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकलेल्या आहे. त्यामध्ये देवरी ५० हेक्टर, सडक अर्जुनी तालुक्यात ३०० हेक्टर, अर्जुनी मोरगाव तालुक्यात ५०४ हेक्टरचा समावेश आहे. ४२०० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवडीचे उद्दिष्ट असून फक्त ४०० हेक्टर क्षेत्रावर सडक अर्जुनी तालुक्यात तू लावण्यात आली आहे. उर्वरित कोणत्याही तालुक्यात मात्र तू पिकांची लागवड झाली नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. याशिवाय तीळ एक हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत २० हेक्टर क्षेत्रावर तीळ पीक लावण्यात आले आहे. त्यामध्येही फक्त सडक अर्जुनी तालुक्यात ५०० हेक्टर पैकी २० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे तर उर्वरित तालुक्यात तीळ पीक लागवड झालेली नाही. सोयाबीन पिकांसाठी १०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून तेही फक्त अर्जुनी मोरगाव तालुक्यात हे पीक घेण्यात येते. फक्त २ हेक्टर क्षेत्रावरच सोयाबीन लावण्यात आले आहे. एकंदरित भात पिकाची पेरणी ११ हजार ८५ हेक्टर क्षेत्रावर तर इतर पिकांची पेरणी १ हजार २७६ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. याची टक्केवारी ०.७० एवढीच आहे. याप्रकारे आकडेवारीचा विचार केल्यास ज्याअर्थी भात पिकासह इतर घेण्यात येणाऱ्या पिकांच्या पेरण्या आजपर्यंत तरी पूर्ण झाला नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.