Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दरोडेखोरांनी सव्वादोन लाख पळवले
भंडारा, ८ जुलै / वार्ताहर

 

कोंढा-कोसला येथील लांबट ज्वेलर्समध्ये दरोडा टाकून २ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व १० हजार रुपये रोख दरोडेखोरांनी लुटून नेले.
एक वर्षापूर्वी याच दुकानात चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, नोकरांच्या समयसूचकतेमुळे हा प्रयत्न फसला होता. यावेळी मात्र दरोडेखोर पूर्ण तयारीनिशी आले असावेत व ही सराईत गुन्हेगारांची टोळी असावी, असा पोलिसांचा संशय आहे. अडय़ाळ पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. कोंढा बसस्थानकाजवळ लांबट ज्वेलर्स हे दुकान आहे. रात्री १ वाजताच्या दरम्यान दरोडेखोरांनी शटर तोडून दुकानातील सोन्या-चांदीचे विक्रीसाठी ठेवलेले सामान तसेच तिजोरी फोडून तेथील सोन्याचा ऐवज चोरून नेला. दरोडेखोरांनी चारचाकी गाडी आणली होती. रात्रीला २ ते ३ वाजताच्या दरम्यान कोंढा येथील बसस्थानकाजवळ संशयास्पद स्थितीत लाल रंगाची ही गाडी थांबली होती. त्या गाडीत सात ते आठ लोक होते, रात्रीला पाऊस येत असल्याने त्यांना हटकले असता ते निघून गेले, असे गस्त घालणाऱ्या गोरख्याने पोलिसांना सांगितले. रात्री ३ वाजता तो लांबट ज्वेलर्स दुकानाकडे गस्त घालण्यास गेला असता दुकान फोडले असल्याचे दिसले, असेही त्याने सांगितले.या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार भानुप्रताप मडावी यांच्यासह सकाळी श्वानपथक दाखल झाले. अडय़ाळ पोलीस ठाण्यात दुकान मालक अशोक लांबट यांच्या तक्रारीवरून गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. २ लाख २० हजार रुपयांच्या ऐवजामध्ये दरोडेखोरांनी ३ किलो चांदी व सोन्याची नथ, गहाण ठेवलेल्या चांदीच्या तोरडय़ा, चांदीचे कडे, पाटल्या व नगदी १० हजार रुपये लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.