Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अमरावतीत चोरटय़ांचा धुमाकूळ
अमरावती, ८ जुलै / प्रतिनिधी

 

शहरात सध्या चोरटय़ांनी धुमाकूळ घातला असून गेल्या २४ तासात एका टाटा सुमोसह २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहरबाबा कॉलनीत राहणारे पंकज बबनराव देशमुख यांनी त्यांची टाटा सुमो (एम.एच. २७, एच ५५३२) घरासमोर पार्क करून ठेवली होती. रविवारी रात्री चोरांनी ही टाटा सुमो चोरून नेली. १ लाख ४० हजार रुपये किमतीचे वाहन चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
चोरीची दुसरी घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. लक्ष्मीनगर भागात राहणारे हरिश्चंद्र नारायण पराते हे रविवारी रात्री घराला कुलूप लावून टेरेसवर झोपले असताना चोरांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोळा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, सोन्याची बांगडी आणि ५७ हजार रोकड असा ७२ हजार २०० रुपयांचा ऐवज पळवला.
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरणनगर येथे राहणाऱ्या शुभांगी अनुप भावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल सायंकाळी त्यांच्या घरात चोराने प्रवेश करून स्टीलच्या डब्यात ठेवलेले तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. त्याची किंमत ४० हजार रुपये आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे नोंदवले असून चोरांचा शोध सुरू केला आहे.