Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वैद्यकीय शिक्षकांचे राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र सावंगीत
वर्धा, ८ जुलै / प्रतिनिधी

 

वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवर उभारण्यात आलेल्या आठ केंद्रांपैकी ग्रामीण भागातील एकमेव केंद्राचे मेघे अभिमत विद्यापीठात नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय) दिल्लीतर्फे देशात आठ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
उर्वरित सात महानगरात ही केंद्र असून सावंगीचे प्रशिक्षण केंद्र हे ग्रामीण भागातील एकमेव केंद्र आहे, अशी माहिती या केंद्राच्या समन्वयक प्रश्न. डॉ. सुनीता वाघ यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.
सावंगीच्या दत्ता मेघे अभिमत विद्यापीठातील प्रशिक्षण केंद्र साधनसामुग्री, तज्ज्ञ मार्गदर्शक व सुविधांमुळे अव्वलस्थानी ठरेल, असा विश्वास या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवास आधुनिक अध्यापन प्रणालीची जोड मिळाली तर हे क्षेत्र कौशल्यपूर्ण शिक्षकांमुळे समाजात उत्कृष्ट डॉक्टर घडविण्याचे एक मूलभूत साधन ठरेल, असेही ते म्हणाले.
संस्थेचे कोषाध्यक्ष सागर मेघे यांनी प्रशिक्षण केंद्रास सर्व त्या सुविधा पुरविण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी एमसीआय.च्या डॉ. शुभा गाडे, समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, अधिष्ठाता डॉ. व्ही.के. देशपांडे, उपअधिष्ठाता डॉ. ए.जे. अंजनकर, तंत्रविभागप्रमुख डॉ. नरेंद्र सामल, डॉ. रामजी सिंग व डॉ. अनुपमा गुप्ता आदी उपस्थित होते. डॉ. दीप्ती वाघमारे व डॉ. अंशुला देशपांडे यांनी संचालन केले.