Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गडचिरोली जिल्ह्य़ात मेंदूज्वराचे थैमान
* ९ जणांचा मृत्यू, ३२ संशयित रुग्ण
* २ रुग्णांच्या रक्तात चंडीपुराचे विषाणू
गडचिरोली, ८ जुलै / वार्ताहर

 

जिल्ह्य़ात २६ जूनपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत मेंदूज्वराने ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मेंदूज्वराचे संशयित ३२ रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील दोन बालकांचा याच रुग्णालयात मेंदूज्वराने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्य़ात पावसाचे आगमन होताच आजारांची लागण झाली आहे. तापाच्या रुग्णांची रुग्णालयांमध्ये झपाटय़ाने वाढ झालेली आहे. तापाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये प्रश्नमुख्याने १५ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या जास्त आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात ६ जुलैपर्यंत १४८ तापाचे रुग्ण दाखल झाले असून मेंदूज्वराचे संशयित ३२ रुग्ण आढळून आले आहेत. उपचारादरम्यान गडचिरोली जिल्ह्य़ातील २ रुग्ण व चंद्रपूर जिल्ह्य़ातील ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे. सर्व संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीकरिता पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून आतापर्यंत २ रुग्णांच्या रक्तनमुन्यात चंडीपुरा विषाणू आढळून आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राठोड यांनी सांगितले.
मेंदूज्वराच्या संशयित रुग्णांपैकी चार रुग्णांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्य़ात मेंदूज्वराने घातलेले थैमान व मृतांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. जिल्ह्य़ात साथीच्या आजाराचे गांभीर्य पाहून येथील जिल्हा रुग्णालयात बालकांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार त्यांना वेगवेगळ्या वॉर्डात ठेवून उपचार केले जात आहे. रुग्णालयात साथ रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच असून आरोग्य विभाग आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.
रुग्णालयात उपचारादरम्यान मेंदूज्वराने ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालयाच्या प्रशासनाने केला आहे. मात्र, उपचारादरम्यान ७ जणांचा मृत्यू झालेला आहे. यात आरमोरी तालुक्यातील नरोटी येथील आकाश मोरेश्वर चल्लेलवार, गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील रजत भास्कर गोवर्धन, देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील गोशिया नजिर शेख, गडचिरोली येथील रूपक धात्रक, अनुधन आदे, चंद्रपूर जिल्ह्य़ातील उपरी येथील तृप्ती श्रीकृष्ण सातपुते, व्याहाड येथील सौरभ वसंत शेंडे यांचा समावेश आहे.
दरम्यान, चामोर्शी तालुक्यात मेंदूज्वराने आणखी दोन बालकांचा बळी घेतल्याने मेंदूज्वराच्या बळीची संख्या ९ वर पोहोचली आहे. चामोर्शी येथील अंजली राजू दुर्गे (६) तसेच भेंडाळा येथील धनश्री सेलोकर (५) यांचा मेंदूज्वराने मृत्यू झाला आहे. अंजलीचा चंद्रपूर येथे तर धनश्रीचा नागपूर येथे मृत्यू झाला. ही दोन बालके आजाराने दगावल्याची कबुली तेथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
जिल्हाकाऱ्यांकडून रुग्णांची पाहणी
जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी ७ जुलैला गडचिरोली जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तापाची लागण झालेल्या रुग्णांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकाच्या दालनात आरोग्य विभागाचे अधिकारी व नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची शहराच्या स्वच्छतेसंबंधी बैठक घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अरुण राठोड, निवासी शल्यचिकित्सक डॉ. एन.एम. वानखेडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी इंगळे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शहरात व ग्रामीण भागात करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. पालिकेच्या क्षेत्रात तुंबलेल्या नाल्या तातडीने साफ करणे, शहरात मोठय़ा प्रमाणात असलेल्या मोकाट डुकरांना तात्काळ पकडून शहराबाहेर स्थलांतरित करणे, मोकाट गुरे-ढोरे यावरही बंदी आणून संबंधित मालकांकडून दंड वसूल करणे, ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सरपंचांची सभा आयोजित करून गुरांचे गोठे साफ करणे, जेथे सॅन्ड प्लॉच आढळतो तेथे बी.एस.सी. पावडर फवारणी करणे, डस्टींग करणे इत्यादी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या असून साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी सर्व जनतेने स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन केले.