Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

तिरुपती सभागृहाचे बांधकाम झाले नियमितह्ण
नगरपालिकेने निर्णय फिरवला
बुलढाणा, ८ जुलै / प्रतिनिधी

 

पोलीस कवायत मैदान ते जिल्हा न्यायालय या रस्त्यावरील तिरुपती मंगल कार्यालय सभागृहाचे काही बांधकाम अवैध असल्यामुळे ते पाडण्यात यावे, अशी नोटीस बजावणाऱ्या नगरपालिकेत याबाबत घुमजाव करीत अवैध बांधकाम नियमानुकूल केले आहे.
अवैध बांधकाम नियमानुकूल करताना नियमानुसार दंडात्मक कारवाई केली का? तसेच कार्यालयाने पार्किंगची व्यवस्था केली नसल्यामुळे त्याबाबत नगरपालिकेने काय कारवाई केली? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून मिळाली नाहीत. जयस्तंभ चौक ते न्यायालय मार्गावर दुतर्फा असलेली लघु व्यावसायिक टपरीधारकांची अतिक्रमणे राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्ताने हटवण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. टपरीधारकांना नोटीस बजावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी गेले असता टपरीधारकांनी नोटीस घेतल्या नाहीत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात यावे, अशी विनंती टपरीधारकांनी केली होती परंतु, प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. अतिक्रमणे उठवू नका, अशी मागणी संबंधित टपरीधारकांनी दुसऱ्यांदा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी सांगितले की, आम्ही नोटीस द्यायला गेलो त्या अतिक्रमण धारकांनी घेतल्या नाहीत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी काय आदेश देतात, त्यानंतरच पुढील कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले. टपरीधारकांचे अतिक्रमण हटवण्याच्या प्रश्नावर संबंधित परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. तिरुपती मंगल कार्यालयाचे अवैध बांधकाम बुलढाणा नगरपालिका नियमानुकूल करून शकते, तर मग गरीब टपरीधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल का होत नाहीत? असा सवाल टपरीधारकांनी प्रशासनाला विचारला आहे.तिरुपती सभागृह नियमित करण्याच्या नगरपालिकेच्या निर्णयास राहुल भिनानाथ तारे यांनी विरोध दर्शवला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे अधिकारी टपरीधारकांना हटवण्याची मोहीम हाती घेतात परंतु, सभास्थानी जाण्याच्या मार्गात तिरुपती मंगल कार्यालय ही अनाधिकृत इमारत रस्त्याच्या मधोमध उभी असून ती कशी नियमिती होऊ शकते, असे सवाल त्यांनी केली आहे.