Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भंडारा जिल्ह्य़ात ४० कोटी ६१ लाखांचे पीक कर्ज वाटप
भंडारा, ८ जुलै / वार्ताहर

 

भंडारा जिल्ह्य़ात ४० कोटी ६१ लाख ३८ हजार रुपयांचे कर्ज वाटण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खरीप हंगामाच्या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्य़ात १ लाख ८१ हजार ८३५ हेक्टर क्षेत्र हे भात पिकासाठी प्रस्तावित असून आतापर्यंत ६० ते ६५ टक्के नर्सरीची लागवड झाल्याचे त्यांनी सांगितले. ५ हजार १०१ हेक्टरमध्ये आवत्या पद्धतीने भाताची लागवड करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. पीक कर्जाच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले, पीक कर्ज वाटपाचे जिल्ह्य़ाचे उद्दिष्ट १९४.४२ लाखाचे असून आतापर्यंत ४० कोटी ६१ लाख ३८ हजार ऐवढे पीक कर्ज वाटण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून ६ कोटी ७१ लाख ५८ हजार तर सर्वाधिक पीक कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ३१ कोटी ५५ लाख तसेच ग्रामीण बँकेच्या माध्यमातून २ कोटी ३४ लाख ९२ हजार ऐवढे कर्ज वाटण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँक यांच्या माध्यमातून झालेले पीक कर्जाचे वितरण याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
आतापर्यंत १८ हजार ७९३ सभासदांनी कर्ज घेतले असून शासकीय अनुदान आणि कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांशी तुलना करता कर्ज घेण्याचे प्रमाण केवळ १० टक्के आहे.
२००६-०७ या वर्षात २ हजार रुपये हेक्टरी यानुसार १६ कोटी ६१ लाखांचे अनुदान वाटण्यात आले तर २००८-०९ या वर्षातील ४ हजार रुपये हेक्टरी या प्रमाणे ७१ कोटी ३० लाख ५६ हजार एवढे अनुदान जिल्ह्य़ाला प्रश्नप्त झाले असून ७३ टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले असल्याचे ते म्हणाले.
आगामी काळात पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्ण तयारी असून प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी तंटामुक्त गाव समितीच्या संदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक सुरेश सागर यांनी चालू वर्षात जिल्हा मूल्यांकन समितीकडून मोहिमेत सहभागी झालेल्या १९३ गावांची तपासणी करण्यात आली असून १६२ गावे पात्र ठरल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी पुरस्कार मिळवणाऱ्या १२ तंटामुक्त गावांपैकी १० गावे पुन्हा यावर्षी पात्र ठरत असल्याचे सांगून बाहेरून येणाऱ्या मूल्यांकन समितीचा कार्यक्रम १० ते २५ जुलै या दरम्यान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस निवासी जिल्हाधिकारी पंकज चौबळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र पोयाम, जिल्हा कृषी अधिकारी शिंदे आदी उपस्थित होते.