Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भ मोर्चा व मराठवाडा विकास परिषदेचा संयुक्त निर्णय
स्वतंत्र राज्यासाठी जनजागरण मोहीम
यवतमाळ, ८ जुलै / वार्ताहर

 

सर्वागीण विकासासाठी छोटय़ा राज्यांची आवश्यकता असल्याने विदर्भ आणि मराठवाडा ही स्वतंत्र राज्ये व्हावीत, यासाठी जनजागरण मोहीम उभारण्याचा संकल्प विदर्भ मोर्चा आणि मराठवाडा विकास परिषदेच्या शेगाव येथे झालेल्या संयुक्त परिषदेत करण्यात आला, अशी माहिती परिषदेचे मुख्य प्रवर्तक माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार यांनी मंगळवारी येथे दिली.
शेगावच्या मुरारका महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी विदर्भ मोर्चा आणि मराठवाडा विकास परिषद यांची संयुक्त परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाडा निर्मितीच्या दृष्टीने काय करणे आवश्यक आहे, कोणते कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे, छोटय़ा राज्यांची आवश्यकता काय, याबाबत तज्ज्ञांनी विचार व्यक्त केले.परिषदेचे संचालन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले. परिषदेला विदर्भ, मराठवाडा आणि खांदेशातून शंभरावर प्रतिनिधी उपस्थित होत. परिषदेला मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असला तरी स्वतंत्र विदर्भासाठीची चळवळ ही जनसामान्यांची चळवळ होणे जरुरीचे आहे. केंद्रातील काँग्रेस नेतृत्वाखाली डॉ. मनमोहनसिंग सरकारने मनावर घेतले तर एका दिवसात ‘स्वतंत्र विदर्भ’ होऊ शकतो. त्यासाठी राज्याच्या विधिमंडळात ठराव मंजूर होण्याचीही आवश्यकता नाही. मोठय़ा राज्यांमध्ये काही भाग अविकसित राहतो आणि काही भागांचाच विकास होतो हा अनुभव महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश घेत आहेत. या दोन्ही प्रदेशांवर विकासाच्या बाबतीत अन्यायच झाला आहे. हजारो कोटींचा विकासाचा अनुशेष आहे, असे नानाभाऊ एंबडवार म्हणाले. परिषदेत सत्यनारायण शर्मा, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, माजी आमदार हरीश मानधना, गंगाप्रसाद अग्रवाल, अहमद अकबर, बाबा समर्थ, औरंगाबादचे भगवान देशपांडे यांची भाषणे झाली.

‘उर्वरित महाराष्ट्रात’ही विकास नाही
उर्वरित महाराष्ट्रासाठी असलेल्या वैधानिक विकास मंडळामुळे विदर्भाचा विकास होणार नाही, अशी खात्री पटल्याने नेत्यांनी आपापल्या विभागासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळे स्थापन करावी, अशी मागणी केली असून तसे पत्र शासनाला संबंधित विभागातील लोकांनी पाठवले आहे, अशी माहितीही नानाभाऊ एंबडवार यांनी दिली.