Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

धापेवाडय़ात विठ्ठल दर्शनासाठी भक्तांची गर्दी
सुनील केदारांच्या हस्ते महापूजन
कळमेश्वर, ८ जुलै / वार्ताहर

 

विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे बुधवारी विठ्ठल दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली. सकाळी ७ वाजता आमदार सुनील केदार यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा विठ्ठलनामाच्या गजरात पार पडली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त सचिव विठ्ठल भड (गुरुजी), सरपंच गोविंदा शेटे, पंचायत समिती सभापती अ‍ॅड. प्रकाश टेकाडे, अशोक धोटे, मातीखाये, डॉ. राजीव पोतदार, पंचायत समिती सदस्य दिलीप धोटे, बाबाराव कोठे, अरुण नंदनवार आदी उपस्थित होते. निमंत्रित केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग, भाजपचे प्रदेश अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पाठ फिरवली.
देवस्थानचे पुजारी भास्कर सेनाड यांनी आमदार सुनील केदार यांना महापूजेसाठी मंत्रोपचाराद्वारे सहकार्य केले. देवस्थानच्यावतीने भक्तांचे स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थानच्यावतीने सचिव भड गुरुजी यांनी आमदार सुनील केदार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सुनील केदार यांनी विठ्ठलाकडे राज्यासह मतदारसंघातील जनतेला सुखी, समाधानी व वैभवसंपन्न जीवन जगण्यासाठी साकडे घालून धापेवाडय़ाचा विकास करण्याचे आश्वासन दिले. चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल मंदिराच्या परिसरात टाळ, मृदंग व दिंडय़ा पताकांसह विठ्ठलनामाच्या गजरात भक्तांनी पावसात फुगडय़ा खेळल्या. बाहेरून येणाऱ्या भक्तांची कोलबास्वामी शाळा व इतरत्र निवासाची व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. प्रशासनाने धापेवाडा यात्रेत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली. ठिकठिकाणी लसीकरणाची व्यवस्था, फिरते रुग्णालय, शुद्ध पाण्याचा पुरवठा आदींबाबत अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेतल्याचे दिसून आले. यात्रेप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा ताफा तैनात होता. पोलीस अधीक्षक छगन वाकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी भादिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पंढरपूर येथे विठ्ठलाची महापूजा दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते तसेच विदर्भाचे पंढरपूर असलेल्या धापेवाडा येथे महापूजेचा मान पालकमंत्री यांचा असतो परंतु, अनेक वर्षापासून आघाडी शासनातील पालकमंत्री धापेवाडय़ाच्या विठ्ठलाकडे पाठ फिरवत आले आहेत हे विशेष!