Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मेळघाटातील चिमुकल्यांनी घडवले अभिनय कौशल्याचे दर्शन
वर्धा, ८ जुलै / प्रतिनिधी

 

नागरी व सुसंस्कृत जीवनापासून कोसो दूर असलेल्या मेळघाटातील हिंदी-कोरकुभाषी चिमुकल्यांनी बालनाटय़ प्रशिक्षणात सहभागी होतानाच आपल्या अभिनय कौशल्याचे दर्शन घडविले.
दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या नाटय़संस्थेच्या सहकार्याने अध्ययन भारती व चिल्ड्रन्स थिएटर अकादमीच्यावतीने बालनाटय़ प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच येथे झाली. सावंगीच्या दत्ता मेघे सभागृहात या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी एनएसडी (दिल्ली) च्या बालमंच विभागाचे प्रमुख अमिताभश्रीवास्तव महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विभूतीनारायण राय व माजी नगराध्यक्ष सुनीता ईथापे आदी उपस्थित होते.
विदर्भातील ११६ मुलामुलींनी यात भाग घेतला. या प्रशिक्षणात बालनाटय़ अभियनातील प्रमुख आकर्षक ठरले ते मेळघाटातील जंगलात बागडणारी मुले. एकूण कोरकू बोलणाऱ्या २२ चिमुरडय़ांचा यात सहभाग होता. त्यांनी आपल्या निसर्गदत्त अभिनयाचे दर्शन घडवित रसिकांची मने जिंकली.
उद्घाटनानंतर रोमिओ ज्युलिएट, ईदगाह व एक होती म्हातारी ही तीन नाटके सादर झाली. सर्व बालकलाकारांना प्रमाणपत्रे देण्यात आली. नाटय़प्रशिक्षक रसिका आगाशे, हॅप्पी रणजीत व गौरी देवले यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. प्रशिक्षणाचे संचालन संजय इंगळे तिगावकर हरीश ईथापे, गौरी देवले यांनी केले.