Leading International Marathi News Daily
गुरुवार, ९ जुलै २००९
  महाराष्ट्राचा आवाज
  समाजाच्या सर्वागीण विकासासाठी‘शिक्षा’
  थर्ड आय
कोण तो शेक्सपिअर?
  ग्रूमिंग कॉर्नर
तुमच्याकडे पर्याय आहेत!
  मेल बॉक्स
  क्रेझी कॉर्नर
दोघांत तिसरा..
आता सगळं विसरा
  दवंडी
अव्यक्त मनासाठी जाहिराती
  लँग्वेज कॉर्नर
नावात काय आहे?
  हेल्थ कॉर्नर
हेल्थीझेन डॉट कॉम
  ब्लॉग कॉर्नर
‘जाहीर’न व्हाव्या अशा ‘जाहिराती!’
  ओपन फोरम
दहावी बोर्डाची परीक्षा हवी की नको?
  नेट कॉर्नर
  फुड कॉर्नर

घरेघरी
एकमेका साहाय्य करु
निर्मला : अरे काय चाललय? काय चिखलात खेळताय? शाळा- कॉलेज नाही वाटतं तुम्हाला? शी! अवतार बघा एकेकाचे! बघवत नाहीये अगदी! चला पळा सगळे घरी आणि स्वच्छ अंघोळ करा बघू..
शरद : ताई, अगं काय झालं? कोणावर ओरडते आहेस?
निर्मला: अरे, बघा नं! काय हैदोसहुल्ला चाललाय चिखलात नुसता.. मोठे लहान काही बघू नका.
शरद: अगं हो! हो! पण त्यात एवढा आरडाओरडा करण्यासारखं काय आहे?

 

निर्मला : काय आहे? चिखलात खेळल्यावर रागवायला नको?
शरद : छे! रागवायचय काय त्यात? खरं तर मलासुद्धा जावंसं वाटतंय..
निर्मला : का . य?
शरद: जावसं वाटतंय म्हणालो मी. गेलोय का? आणि काय गं, ही मुलं इथं चिखलात खेळताहेत म्हणून तुझा आरडा ओरडा चाललाय. मग तिथं गोव्यात जाऊन बघ..
शाल्मली: कोण चाललंय गोव्याला?
शरद : गोव्याला नाही ग चिखलात चाललो आहोत..
शाल्मली: काय? चिखलात?
शरद : अगं म्हणजे बाहेर चिखलात धांगडधिंगा घालणाऱ्या मुलांना पाहून ताईचा मस्तकशूळ उठलाय. म्हणून मी तिला सांगत होतो की, गोव्यात चिखलात खेळायचा खेळ असतो.
निर्मला: इश्श! तुझं आपलं काहीतरीच हं शरद!
शरद: अगं खरंच सांगतोय. चेष्टा नाही करत! परवाच पेपरमध्ये फोटो आले होते. मस्त चिखलात बरबटले होते सगळे! तुम्ही कोणी नाही पाहिलेत ते फोटो?
निर्मला : तू म्हणतो आहेस ती बातमी आणि फोटो मीही पाहिला. पण त्याही पेक्षा त्याच्या शेजारच्या बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं.
शरद : ती कोणती?
निर्मला: आजपासून ३० टक्के पाणी कपात लागू झालीये.
शाल्मली: हं..... इतके दिवस होणार होणार म्हणून बातम्या येत होत्या. आता आजपासून खरोखरच पाणी कपात लागू झाली.
शरद: करणार काय? पावसाचा अजून पत्ता नाही. जुलैचे सुध्दा नऊ दिवस संपले. पण अजून पावसाचा पत्ता नाही. काय होणार आहे यावर्षी कुणास ठाऊक.
शंतनू: हे सगळं आपणच ओढवून घेतलं आहे.
शाल्मली: हो नं. सतत निसर्गाच्या विरोधात जायचा माणसानं जसा विडाच उचलला आहे. निसर्ग तरी कुठपर्यंत माणसाची ही मनमानी सहन करणार?
शंतनू: आणि काय म्हणून सहन करावी? कुठे थांबायचं हे माणसाला कळायला नको?
शाल्मली: माणसाला स्वत:ला कळत नाही म्हणून निसर्गच त्याला वेगवेगळ्या मार्गानं दाखवून देतो. स्वत:ला आवर घालण्याचे संकेत देतो.
शंतनू: करेक्ट. आता पाऊस नाही म्हणून आपल्या तोंडचं पाणी पळालय. तर २६ जुलैला अती वृष्टीचा दणका दिला होता. तो धक्का जबरदस्त होता. त्या वेळी आलेल्या भीषण अनुभवांची आजही उजळणी होत असते.
शाल्मली: हो, पण ते आठवतांना त्यामागची कारणं विसरली गेली आहेत. हे त्याहून भीषण आहे. चुकातून माणसानं शिकावं अशी शिकवण आपल्याला लहानपणापासून दिली जाते. मग तरी का असं होतं?
शतंनू: असं होतं कारण यासाठी आपण जबाबदार आहोत, आपलं काही चुकतय हे स्विकारायचच माणसानं नाकारलय. या सगळ्याला आपण कारणीभूत आहोत, आपण आपल्या हातानं ही परिस्थिती ओढवून घेतली आहे, हेच मुळी त्याला कळत नाही.
निर्मला: कळत कसलं नाही. सगळं कळतय पण वळत नाही, हेच खरं.
शंतनू: तसं म्हणा हवं तर. पण शेवटी परिणाम भीषण आहेत आणि भोगावंही त्यालाच लागतय ना! तरी एवढी बेपर्वाई?
निर्मला: बेपर्वाई हा तर माणसाचा स्थायी भाव होत चालला आहे अलीकडे.
शंतनू: अगदी खरय. पण यात गंमत अशी आहे की प्रत्येक बाबतीत स्वत: बेपर्वा होत चाललेले लोक इतरांच्याकडून मात्र खूप अपेक्षा करतात.
निर्मला : म्हणजे?
शंतनू: म्हणजे असं आत्या, अग, परवा एक दिवस पाऊस आला. सगळीकडे पाणी तुंबलं, गाडय़ा बंद पडल्या ..
निर्मला: हे सगळं व्हायला काय पावसाचा एक थेंबही पुरतो.
शंतनू: हेच. हेच ते. किती सहजी टीका करून जातो आपण. पण त्यांच्याकडे एक बोट दाखवताना आपल्याक़डे असलेल्या तीन बोटांचा आपल्याला का विसर पडतो?
निर्मला: अगबाई, म्हणजे काय त्यांची कामही आपणच करायची काय?
शतंनू: त्यांची कामे त्यांनीच करावीत. पण आपण त्यांना मदत तर करु शकतो का नाही? आपण फक्त त्यांच्याकडून अपेक्षा नाही करु शकत. आज परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की सगळ्यांनी एकत्र आलं तरच तो आटोक्यात येईल.
निर्मला: पण म्हणजे आपण नक्की काय करायचं?
शाल्मली: अगं, करण्याजोग्या किती तरी गोष्टी आहेत. वारंवार त्याबद्दल सांगितलंही जातय आणि तरीही कोणी त्यांच्याकडे लक्षच देत नाहीये.
श्ांतनू: उदाहरणार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या वापरु नका. बेदरकारपणे झाडं तोडू नका. उलट झाडे लावा, झाडे जगवा. शहरातील हिरवाई वाढवा. रेन हाव्‍‌र्हेस्टिंग करा. ट्रेननं हजारो लोक प्रवास करतात. विविध गोष्टी खातात. खाऊन झालं की काय करतात? रॅपर्स बाहेर फेकून देतात. निर्माल्य खाडीत टाकतात. हे असं बाहेर फेकून देणं हा तर आपला आपला जन्मसिध्द हक्क मानतो.
शाल्मली: हाच नाही सगळ्याच वाईट सवयी..
शंतनू: तर हे सगळं बंद व्हायला हवं आणि या वाईट सवयींना आळा बसला तर त्याची प्रशासनाला केवढी तरी मदत होईल..
शाल्मली: ..आणि फायदा आपल्याला होईल.
निर्मला: म्हणजे थोडक्यात आपण सगळ्यांनी एकमेका साहाय्य करु अवघे धरु सुपंथ असं म्हणत तीन बोटांचं भान कायम ठेवायचं. बरोबर?
शाल्मली, श्ांतनू : अगदी बरोबर!
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com