Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

विविध

लोकसभेत मुंडेंचा सवाल
राज्याचे नऊ केंद्रीय मंत्री काय करीत आहेत?

नवी दिल्ली, ८ जुलै/खास प्रतिनिधी

केंद्रात महाराष्ट्राचे नऊ मंत्री असूनही रेल्वे अर्थसंकल्पात राज्याला काहीही मिळालेले नाही. महाराष्ट्राचे मंत्री दिल्लीत करतात तरी काय, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आज लोकसभेत केला. महाराष्ट्रात तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत, याचे केंद्रातील महाराष्ट्राच्या मंत्र्यांना विस्मरण झाले की काय, असा चिमटाही त्यांनी घेतला.

केम्ब्रिज विद्यापीठात उभारणार वनस्पतीविषयक संशोधन केंद्र
डॉ. सिद्धीविनायक बर्वे, केम्ब्रिज, ८ जुलै

डार्विन महोत्सवाच्या निमित्ताने केम्ब्रिज विद्यापीठात वनस्पती विषयक जागतिक स्तराचे संशोधन केंद्र उभारणार असल्याची घोषणा डार्विन महोत्सवाचे संयोजक व केम्ब्रिज बोटॅनिकल गार्डनचे संचालक डॉ. जॉन पार्कर यांनी केली. इंग्लंडमधील केंम्ब्रिज विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘डार्विन महोत्सव’ या वैज्ञानिक परिषदेस विद्यापीठाचे ३४ वे कुलगुरु व मानववंशशास्त्रज्ञ डॉ. अ‍ॅलिसन रिचर्डस् यांच्या भाषणाने प्रारंभ झाला. जगाची वैचारिक संकल्पना बदलून टाकणाऱ्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताचे जनक चार्लस डार्विन यांच्या द्विजन्मशताब्दी व उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला यावर्षी १५० वष्रे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘बर्गर किंग’ची जाहिरात बदलण्याची अमेरिकेतील भारतीय समुदायाची मागणी
वॉशिंग्टन, ८ जुलै/ पी.टी.आय.

अमेरिकेतील फास्ट फूड साखळीमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘बर्गर किंग’ने हिंदूू देवतेचा अनादर करणारा भाग आपल्या जाहिरातीमध्ये आणल्यामुळे ही जाहिरात तातडीने बदलण्यात यावी अशी मागणी अमेरिकेतील हिंदू समुदायाच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या संघटनेने केली आहे. बर्गर किंगने स्पेनमधील आपल्या मुद्रीत जाहिरातीमध्ये मांसयुक्त बर्गरवर हिंदूंमध्ये दैवत समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी मातेला बसवलेले दाखविले आहे. त्यावर ‘पवित्र खाद्य’ अशा आशयाचे स्पॅनिश वाक्यही देण्यात आले आहे. हे हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारे असल्यामुळे बर्गर किंगने तातडीने ही जाहिरात मागे घ्यावी अशी मागणी अमेरिकेतील हिंदू संघटनेने केली आहे.

दहशतवादाला पाकिस्ताननेच जन्माला घातले ; झरदारी यांची कबुली
इस्लामाबाद, ८ जुलै/पी.टी.आय.

काही महत्त्वपूर्ण अल्पकालीन उद्दीष्टय़े पूर्ण करण्यासाठी पाकिस्ताननेच दहशतवादाला जन्म दिला. दहशतवाद्यांची निर्मिती आणि पोषण पाकिस्तानमध्येच झाले, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दिली. एखाद्या पाकिस्तानी नेत्याने अशी कबुली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काल रात्री वार्तालाप करताना झरदारी यांनी पाकिस्ताननेच दहशतवादाला खतपाणी घातल्याचे मान्य केले. मात्र ९/११च्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर दहशतवादाचे भूत पाकिस्तानच्याच मानगुटीवर बसले असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या खासदार बैठकीकडे देवरांची पाठ
नवी दिल्ली, ८ जुलै/खास प्रतिनिधी

केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीचा दरवर्षीचा उपचार आज दिल्लीत पार पडला. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही धड होमवर्क न करता बैठकीसाठी पोहोचलेल्या राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री चव्हाण यांनी खासदारांना महाराष्ट्राच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. संसदीय परिसरात झालेल्या या बैठकीत केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या २४ विषयांवर चर्चा झाली.

फटाक्यांच्या कारखान्यास आग;मदुराईजवळ १६ जण मृत्युमुखी
मदुराई, ८ जुलै/पी.टी.आय.

येथून जवळ असलेल्या वडक्कमपट्टी येथे एका फटाक्याच्या कारखान्यात काल रात्री लागलेल्या भीषण आगीत सोळाजण भाजून मृत्युमुखी पडले, तर पंचवीसहून अधिक गंभीररीत्या जखमी झाले. आगीत आठजण जागीच मरण पावले. अन्य आठजणांचा इस्पितळात नेताना वा नेल्यावर मृत्यू झाला. ही आग एवढी भीषण होती की, अग्निशामक दलाचे आठ बंब सुमारे चार तास झुंज देत होते. रात्री ११ वाजता ही आग आटोक्यात आली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. मृतांमध्ये व जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. मृतांपैकी केवळ दोघांची ओळख पटू शकली. या कारखान्यात मुख्यत: लग्नसमारंभ वा मिरवणुकीत वापरण्यात येणारे आपटबार बनविले जात होते.

अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट मॅकन्मारा यांचे निधन
वॉशिंग्टन, ८ जुलै/पीटीआय

व्हिएतनाम युद्धात महत्वाची भूमिका पार पाडणारे अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट एस. मॅकन्मारा यांचे सोमवारी येथे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. काही काळापासून त्यांची प्रकृती खालावली होती असे त्यांच्या पत्नी डायना यांनी सांगितले. व्हिएतनामच्या युद्धाला त्याकाळात मॅकन्मारा युद्ध असेही संबोधले गेले होते. अमेरिकेच्या पराभवानंतर मॅकन्मारा यांनी त्या काळातील निर्णयांबद्दल पश्चात्तापही व्यक्त केला होता. १९९५ मध्ये त्यांनी आठवणी लिहिल्या. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, व्हिएतनाममधील युद्ध ही आमची चूकच होती. त्या युद्धात अमेरिकेचे ५८ हजार सैनिक मारले गेले होते. अमेरिकेचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी या युद्धाचे धोरण आखले त्याला अमेरिकेत फार विरोध झाला व त्यावेळच्या निदर्शनात त्यांचा मुलगाही सहभागी झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी त्यांना १९६१ मध्ये देशाच्या संरक्षणमंत्रिपदावर नेमले होते. अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्याबरोबरही त्यांनी काम केले.सात वर्षे त्यांनी हे पद सांभाळले होते. त्याअगोदर ते फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष होते. क्युबातील क्षेपणास्त्र पेचप्रसंगही त्यांच्याच कारकिर्दीत घडला होता. मंत्रिपदावर असतानाच त्यांनी अचानक विचार बदलला व ते जागतिक बँकेचे अध्यक्ष बनले. त्यांचा जन्म सॅनफ्रान्सिस्को येथे झाला, त्यांचे शिक्षण बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात झाले. गणित, अर्थशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतलेली होती. दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा ते हार्वर्ड बिझीनेस स्कूल येथे प्राध्यापक होते. १९४३ मध्ये ते लष्कराचे कमिशन्ड अधिकारी बनले. १९८१ मध्ये ते जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले व त्यानंतर त्यांनी अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्याच्या कार्यास वाहून घेतले होते.

अहमदाबाद विषारी दारूकांड: दोन पोलीस निरीक्षक निलंबित
अहमदाबाद, ८ जुलै/पीटीआय

दारूबंदी लागू असलेल्या गुजरातमधील अहमदाबाद शहरातल्या मजूर गाम भागामध्ये मंगळवारी विषारी दारू प्यायल्यामुळे बळी पडलेल्यांचा आकडा ४३ वर गेला असून या प्रकरणी दोन पोलीस निरीक्षकांना निलंबित तसेच एका पोलीस उपअधीक्षकाची बदली करण्यात आली. तसेच या विषारी दारूकांडाची चौकशी निवृत्त न्यायाधीश नेतृत्वाखालील समितीमार्फत करण्याचे आदेश गुजरात सरकारने दिले. विषारी दारूकांडाप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. या प्रकरणाची चौकशी अहमदाबाद क्राईम ब्रँच करीत आहे.

वरुण गांधी यांना पुरेशी सुरक्षा-पी. चिदम्बरम
नवी दिल्ली, ८ जून / पी.टी.आय.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे भाजपचे युवा नेते आणि खासदार वरुण गांधी यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले. वरुण गांधी यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली नसल्याच्या भाजपचा आरोपही चिदम्बरम यांनी फेटाळला. लोकसभेतील भाजपच्या उपनेत्या सुषमा स्वराज यांनी मंगळवारी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता. वरुण गांधी यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी गृहखात्याकडे रितसर अर्ज दाखल केला होता पण त्याला समाधानकारक तसेच आश्वासक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप स्वराज यांनी केला होता. केंद्रीय गृहमंत्री चिदम्बरम यांनी आज याबाबत उत्तर देताना वरुण गांधी यांच्याकडून आलेल्या अर्जावर २० मार्च रोजी कार्यवाही केल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की या व्यवस्थेचा दर १५ दिवसांनी आढावा घेण्यात येईल.

कोकण वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव केंद्राने दुसऱ्यांदा नाकारला
नवी दिल्ली, ८ जुलै/खास प्रतिनिधी

महाराष्ट्रातील अन्य विभागांच्या तुलनेत मागासलेल्या कोकणाचा विकास करण्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव केंद्र सरकारने दुसऱ्यांदा नाकारला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाचे लेखी उत्तर देताना गृह मंत्रालयाने ही बाब स्पष्ट केली.कोकणाच्या विकासासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याविषयी केंद्र सरकारला महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव मिळाला होता काय आणि हे मंडळ कधीपर्यंत स्थापन होईल, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापनेची शिफारस करणारा प्रस्ताव २० फेब्रुवारी २००५ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी पारित करून केंद्र सरकारकडे पाठविला होता. पण मागासलेपण हे वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचे कारण असू शकत नाही, असे सांगून फेब्रुवारी २००६ मध्ये केंद्राच्या नियोजन आयोगाने हा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दुसऱ्यांदा हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आणि या मुद्यावर पुन्हा केंद्रीय नियोजन आयोगाचे मत मागविण्यात आले. पण आयोगाने पुन्हा असेच उत्तर दिल्यामुळे राज्य शासनाची ही शिफारस नाकारण्यात आली आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय माकन यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

सानियाला धमकाविणारा युवक गजाआड
हैदराबाद, ८ जुलै / पी.टी.आय.

टेनिसपटू सानिया मिर्झा हिला धमकाविणाऱ्या युवकाला पोलिसांनी अखेर गजाआड केले. मोहमद आशरफ असे या युवकाचे नाव असून तो स्थापत्य अभियंता आहे. सानियाचा विवाह एका उद्योगपतीबरोबर निश्चित झाला असून तो रद्द करुन आपल्याशी विवाह करण्यासाठी मोहमद सानियाच्या भ्रमणध्वनीवर सातत्याने संपर्क साधत असे तसेच तसा संदेशही तो नेहमी पाठवित असल्याने सानियाचे वडिल इम्रान मिर्झा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे मोहमदने सानियाच्या घरी जाऊनही इम्रान मिर्झा यांना धमकाविले होते असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.