Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

व्यापार - उद्योग

अभ्युदय बँकेचीही नऊ टक्के स्थिर दराने गृह कर्ज योजना
व्यापार प्रतिनिधी: सार्वजनिक क्षेत्रातील वाणिज्य बँकांच्या धर्तीवर पुढील दोन वर्षे व्याजाचा दर स्थिर नऊ टक्के ठेवून अभ्युदय सहकारी बँकेने विशेष गृह योजना जाहीर केली आहे. सहकार बँकिंग क्षेत्रात नऊ टक्के हा व्याजाचा दर सर्वात निम्नतम असून, श्रमिक व मध्यमवर्गीयांना आकर्षित करणाऱ्या व परवडण्याजोग्या या योजनेला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसादाची अपेक्षा बँकेने व्यक्त केली आहे.

वाढीव ‘व्हॅट’पायी राज्याचे १७५ कोटींचे महसुली नुकसान
‘महाराष्ट्र मोबाइल ट्रेड असोसिएशन’चा कयास

व्यापार प्रतिनिधी: मोबाइल हँडसेट्सवर मूल्य वर्धित कर (व्हॅट)चा दर चार टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांवर नेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह राज्यातील विविध भागातील तब्बल २५ हजार मोबाइल फोन्सच्या किरकोळ विक्रेत्यांनी आज मुंबईत विक्रीकर कार्यालयावर दणदणीत मोर्चा नेला. वाढीव ८.५ टक्के व्हॅट त्वरित मागे घ्यावा हे मागणी करणारे निवेदन याप्रसंगी विक्रीकर आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळाकडून सादर करण्यात आले.

बासमतीव्यतिरिक्त तांदूळ निर्यातीवरील बंदी न उठविण्याची मागणी
व्यापार प्रतिनिधी: बासमतीव्यतिरिक्त अन्य तांदळाच्या निर्यातीस मान्यता देऊन नवीन निर्यात आणण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेस देशभरातील विविध संस्थांनी विरोध दर्शवला. तांदळाची निर्यात खुली करण्याचा अर्थ ७०० दशलक्षाहून अधिक गरीब भारतीयांना पुरेसे अन्न मिळवण्याच्या हक्कांवर गदा आणणे असा होईल, असे या संस्थांचे म्हणणे आहे.

व्यापार-संक्षिप्त
भारतीय पर्यटकांसाठी डिस्नेचा नवा नजराणा- ‘डिस्नेपार्क्‍स डॉट इन’

व्यापार प्रतिनिधी: जगभरातील हाँगकाँग, पॅरिस येथील डिस्नेलँड रिसॉर्ट्स तर अमेरिकेतील फ्लोरिडा येथील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट आणि कॅलिफोर्नियातील डिस्नेलँड रिसॉर्ट तसेच डिस्ने क्रुझ लाइन या स्वप्नवत असणाऱ्या ठिकाणांची सहल हा पर्यटकांसाठी आयुष्यभर स्मरणात राहावा असा अनुभवच म्हणता येईल. या सर्व स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘डिस्ने डेस्टिनेशन्स इंटरनॅशनल’ने खास भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारताला वाहिलेले वेबस्थळ 'www.disneyparks.in' (डिस्नेपार्क्‍स डॉट इन) नावाने सुरू केले आहे. सर्व डिस्ने स्थळांविषयी इत्थंभूत तपशील व सहलीचे संपूर्ण नियोजन या वेबस्थळाच्या साहाय्याने पर्यटकांना करता येईल.

ग्लोडाइन टेक्नोसव्‍‌र्हचा १:१ बोनस अंतिम लाभांश ४२ टक्के
व्यापार प्रतिनिधी: टेक्नॉलॉजी इंफ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस क्षेत्रातील प्रख्यात ग्लोडाईन टेक्नोसव्‍‌र्ह लिमिटेड कंपनीने ३१ मार्च २००९ रोजी समाप्त वित्तीय वर्ष व चतुर्थतिमाहीचे एकत्रिकृत लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यानुसार मागील संपूर्ण वित्तीय वर्षांत कंपनीने ६३ टक्के वाढीने रु. ५०१.२ कोटी उत्पन्न मिळवलेआहे. ग्लोडाईन टेक्नोसव्‍‌र्ह कंपनीने या उत्पन्नावर तब्बल ९२ टक्के वाढीने रु. ७७.८४ कोटी एकत्रिकृत करोत्तर नफा कमावला आहे. परिणामी कंपनीची वर्षभरातील प्रतिसमभाग मिळकत (ईपीएस) रु. ३७.३४ वरून रु. ७०.५४ झाली आहे. कंपनीचा वार्षिक ढोबळ नफासुद्धा ८६ टक्के वाढून रु. १०५ कोटी झाला आहे. उत्कृष्ट आर्थिक उन्नती साध्य झाल्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येकी रु. १० दर्शनी मूल्याच्या समभागावर रु. ४.२ अंतिम लाभांश जाहीर केला आहे. तसेच भागधारकांना १:१ बोनस देण्याची शिफारस केली आहे.

गायत्रीचा उलाढालीत १००० कोटींचा टप्पा
व्यापार प्रतिनिधी: गायत्री प्रोजेक्ट्स लिमिटेड या हैदराबादस्थित पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील कंपनीचे ३१ मार्च २००९ रोजी समाप्त वित्तीय वर्षांत ३३.५२ टक्के वाढीने रु. १००४५९.४७ लाख उत्पन्न मिळवले आहे. आधीच्या वित्तीय वर्षांत कंपनीने रु. ७५२३५.६४ लाख उत्पन्न मिळवले होते. अशा प्रकारे कंपनीने प्रथमच उलाढालीचा रु. १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. वित्तीय वर्षांत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३.१५ टक्के वाढ झाली असून कंपनीने आधीच्या वर्षांतील रु. ४००५.२७ लाख नफ्याच्या तुलनेत यंदा रु. ४१३१.७० लाख रु. नफा कमावला आहे. कंपनीची उत्तम आर्थिक प्रगती पाहून संचालक मंडळाने ४० टक्के अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

कॅसिओची ‘एकावर एक’ सवलत
व्यापार प्रतिनिधी: कॅसिओ इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्या मनगटी घडय़ाळांवर ‘एकावर एक’ ही नवीन ग्राहक योजना सुरू केली आहे. कॅसिओ ३९९५ रुपये आणि पुढच्या कोणत्याही घडय़ाळाच्या खरेदीवर एक स्त्रियांसाठीचे घडय़ाळ पूरक म्हणून देत आहे. ग्राहक या सवलतीचा फायदा सर्व मोठय़ा शहरांमध्ये घेऊ शकतील. ही योजना मर्यादित कालावधीपर्यंत असून १५ जुलै २००९ किंवा साठा समाप्तीपर्यंत संपुष्टात येईल.

इनसेक्टिसाइड्स इंडियाचा २० टक्के लाभांश
व्यापार प्रतिनिधी: इन्सेक्टिसाइड्स इंडिया लि.ने आपल्या मार्च २००९ अखेर आर्थिक वर्षांतील कामगिरीची घोषणा करताना, आपल्या भागधारकांना २० टक्के लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २००८-०९ मध्ये रु. २०९.१४ कोटींचा विक्रमी महसूल कमावला असून, तो आधीच्या आर्थिक वर्षांत रु. १४३.३ कोटी होता. म्हणजे महसुलातील वाढ ४६ टक्क्यांनी अधिक आहे. तर कंपनीने निव्वळ नफ्यातही ४६ टक्क्यांची वाढ दर्शविली आहे.

मोफत टॉप-अप पॅकसह ‘सन डायरेक्ट’वर नवीन हिंदी वाहिन्या
व्यापार प्रतिनिधी: अग्रेसर डीटीएच सेवा पुरवठादार ‘सन डायरेक्ट’ने आपल्या विद्यमान ग्राहकांसाठी एक मोफत टॉप-अप पॅकची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील ग्राहकांमध्ये लोकप्रिय असेलल्या विद्यमान ‘नॉर्थ शाइन’ या मूळ पॅकसह ग्राहकांना आता मराठी टॉप-अप (ईटीव्ही मराठी व झी मराठी), गुजराती टॉप-अप (ईटीव्ही गुजराती) आणि हिंदी मूव्ही टॉप-अप (झी सिनेमा) अशा अतिरिक्त वाहिन्या बहाल करणाऱ्या वरीलपैकी एका टॉप-अपची विनाशुल्क निवड करता येईल. त्याचबरोबरीने सहारा वन आणि सहारा फिल्मी या दोन नवीन हिंदी वाहिन्यांची सन डायरेक्टने आपल्या बेसिक पॅकमध्ये भर घातली आहे.

क्वॉलिटी फूड्सचे टर्किश हेझलनट्स
व्यापार प्रतिनिधी: क्वॉलिटी फूड्सने स्नॅक पॅकमध्ये नटलाईट- टर्किश हेझलनट्स दाखल केले आहेत. सर्व सुपर मार्केटमध्ये उपलब्ध असलेले हे अत्यंत स्वादिष्ट असे हेझलनेट्स खारवले व शेकवले गेले असून कधीही खाण्यासाठी उपयुक्त आहेत. हेझलनट हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात आणि त्यात कोणत्याही कोरोनरी रोगांपासून बचाव करण्याची शक्ती असते असेही आता सिद्ध झाले आहे. हेझलनट हे त्यांच्या अत्यंत चवदार फ्लेव्हर आणि उंची आश्वासक गुणांसाठी ओळखले जातात. ते एक अत्यंत चवदार असे फळ आहे कारण त्यातून मोठय़ा प्रमाणावर प्रथिने आणि फायबर, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मिळतात. हेझलनटस् हे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह मोनोन्सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडचा एक सर्वोत्तम स्रोत आहेत आणि त्यातून संचित चरबी अगदी कमी प्रमाणात निर्माण होते.