Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

श्रेयवादातून दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपली
ताकारी - म्हैसाळला जल आयोगाच्या मान्यतेचा मुद्दा
सांगली, ९ जुलै / गणेश जोशी
सांगली जिल्ह्य़ातील दुष्काळी भागाला वरदायी ठरणाऱ्या ताकारी व म्हैसाळ योजनेला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळविण्याच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात जोरदार जुगलबंदी गुरुवारी रंगली. बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर जलसंपदा मंत्री अजित पवार हे सांगली जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आज आले होते. कृष्णा तीरावरील पूर संरक्षक भिंतीच्या पायाभरणी कार्यक्रमापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते सुरेश पाटील यांच्या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमापर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

वाठारच्या दारू दुकान बंदीबाबत सोमवापर्यंत निर्णय होणार
कोल्हापूर, ९ जुलै / विशेष प्रतिनिधी

वाठार येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासंदर्भात मतदान प्रक्रियेचा अवलंब करण्याविषयी सोमवापर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित करावे. सोमवारी जर निर्णय मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करू शकता असा विश्वास जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिल्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देवून वाठार दारू दुकान प्रश्नी उभारलेले आंदोलन सोमवापर्यंत स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती आंदोलकांच्या वतीने देण्यात आली.

टेंभूचे उर्वरित काम आठवडय़ात- अजित पवार
इस्लामपूर, ९ जुलै / वार्ताहर

टेंभू योजनेचे उर्वरित काम येत्या सात दिवसात पूर्ण केले जाईल व केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्याहस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी बोरगाव (ता. वाळवा) येथे बोलताना केली. आघाडी सरकारने मराठवाडा- विदर्भाचा अनुशेष भरून काढला व टेंभू योजनेसाठी १३५ कोटी, म्हैसाळसाठी १०० कोटी व ताकारी योजनेसाठी ४५ कोटी रूपयांचा निधी दिला असल्याचे सांगतानाच अजित पवार यांनी गेला महिनाभर पावसाने ओढ दिल्याने चिंता करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले.

विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा अर्थसंकल्प- चंद्रशेखर टिळक
सातारा, ९ जुलै/प्रतिनिधी

देशाचे अर्थकारण समाजकारण सक्षम व्हायचे असेल तर अंतर्गत व बाह्य़ संरक्षण व्यवस्था भक्कम असावी लागते त्याचे गांभीर्य ठेवण्याऐवजी विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे काम केंद्रीय अर्थमंत्री प्रणवकुमार मुखर्जी यांनी अर्थसंकल्पाद्वारे केले असल्याची खंत एन.एस.डी.एल. मुंबईचे वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रसिद्ध अर्थविश्लेषक चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केली व अर्थसंकल्प अर्थहीन होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

मोरे, शिंदे, तारळेकर, एकसंबेकर, अशोक पाटील यांना ग्रंथ पुरस्कार
कोल्हापूर, ९ जुलै / विशेष प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी दादासाहेब मोरे, डॉ. विश्वनाथ शिंदे, प्रश्न. मीरा तारळेकर, अशोक पाटील आणि सुहास एकसंबेकर यांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या प्रश्न.चंद्रकुमार नलगे व पत्रकार विजय चोरमारे यांच्या समितीने ही निवड केली.

पाणी संघर्ष परिषदेचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
तीन ऑगस्टला मोर्चा
आटपाडी, ९ जुलै / वार्ताहर
पाणी योजनांना ए. आय. बी. पी. मधून निधी देण्यात यावा, या मागणीसाठी पंतप्रधानांना शिष्टमंडळ पाठविण्याचा व १३ दुष्काळी तालुक्यात दि. ३ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्याचा अन्यथा विधानसभा निवडणुकीनंतर तीव्र संघर्ष उभारण्याचा इशारा आटपाडी येथील पाणी संघर्ष परिषदेद्वारे देण्यात आला.सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्य़ातील १३ दुष्काळी तालुक्यांची पाणी संघर्ष परिषद आटपाडी येथील भवानी विद्यालयाच्या मैदानावर झाली.

अक्कलकोटला पाण्याचा दोन दिवसाआड पुरवठा
अक्कलकोट, ९ जुलै/वार्ताहर

पावसाने पाठ फिरविल्याने अक्कलकोटवर पाणीटंचाईने संकट कोसळले असून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन योजना आहेत. भीमा नदीवर हिरळी पाणीयोजना, हालचिंचोळी जलाशय, बोरीनदीवरील सांगवी योजना अशा तीन योजना असून त्यातील पाणीसाठा कमी झाला आहे. नगरपरिषदेने पाणीटंचाई पाहता दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून नगराध्यक्षा भाग्यश्री मोरे यांनी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

औषध निर्मात्यांचे धरणे
कोल्हापूर, ९ जुलै / विशेष प्रतिनिधी
सहाव्या वेतन आयोगात औषधनिर्माता संवर्गास ९३०० - ३४,८०० प्रश्नरंभक वेतनश्रेणी लागू करावी, संपूर्ण सेवाकाळात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने कुंठितता घालवण्यासाठी पदोन्नतीच्या संधी उपलब्ध कराव्यात तसेच ३० खाटांच्या रूग्णालयात पूर्ववत दोन पदे कायम करून एकूण पदाच्या १० टक्के रजा राखीव पदे निर्माण करण्यात यावीत या मागण्यांसाठी गुरूवारी औषधनिर्मात्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले होते. महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय औषध निर्माता संघटनेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष अविनाश जोशी, कार्याध्यक्ष एम.एस.पाटील, एम.के.चौगुले यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी महावीर उद्यानापासून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर औषध निर्मात्यांनी शासनाच्या अन्यायी धोरणावर टीका करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले.

वर्गात बसू न दिल्याने शाळेत तोडफोड; दोन विद्यार्थ्यांना अटक
इचलकरंजी, ९ जुलै / वार्ताहर
वर्गात बसू न दिल्याच्या कारणातून शाळेची मोडतोड केल्याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गावभाग पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास तात्यासाहेब मुसळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये घडली. इचलकरंजी येथील तात्यासाहेब मुसळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये वाणिज्य विभाग यंदापासून दुपारच्या सत्रात भरत आहे. त्यामुळे ते वर्ग सकाळच्या सत्रात भरावेत असे निवेदन विद्यार्थ्यांनी प्रश्नचार्य निमणकर यांना दिले होते. यातील दोघे आज कॉलेजला गेले. त्यावेळी वर्गशिक्षिका ढिगळे यांनी त्यांना वर्गात येण्यास मज्जाव केला. त्यामुळे चिडलेल्या दोघांनी कॉलेजचा नोटीस बोर्डाची तसेच चेअरमनच्या दालनाच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या प्रकाराने काही काळ शाळेत तणाव निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची तक्रार बाबासाहेब महादेव काळे यांनी गावभाग पोलिसांत दिली आहे.

आराध्ये स्मृत्यर्थ कुमार गंधर्व संगीत महोत्सव आज
सोलापूर, ९ जुलै/प्रतिनिधी
येथील हिराचंद नेमचंद वाचनालय आणि सृजन सांस्कृतिक या संस्थांच्या वतीने कै. नानासाहेब आराध्ये यांच्या स्मृत्यर्थ येत्या १० जुलै रोजी पं. कुमार गंधर्व संगीत महोत्सव आयोजिला आहे.
हि. ने. वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटर येथे १० रोजी सायंकाळी ६.३० वाजता या महोत्सवात पंडित कुमार गंधर्व आणि विदुषी वसुंधरा कोमकली यांची कन्या कलापिनी कोमकली यांची शास्त्रीय संगीताची मैफल आयोजिल्याची माहिती जयंत आराध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचे डेका अ‍ॅनिमेशन व ईशानी हर्बल हे प्रश्नयोजक आहेत. येत्या १० जुलैला या संगीत महोत्सवाचे पहिले पुष्प कलापिनी कोमकली यांच्या गायनाने गुंफले जाणार आहे. गेल्या काही वर्षापासून खंडित झालेला हा संगीत महोत्सव पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे श्री. आराध्ये यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जयंत राळेरासकर, दत्ता गायकवाड, सुनील गुरव, प्रदीप आराध्ये, अमोल चाफळकर हे उपस्थित होते.

वीजचोरी दंड वसुली न झाल्यास स्वतंत्र गुन्हे
आटपाडी, ९ जुलै / वार्ताहर
वीजचोरी रोखण्यासाठी वीज महावितरणने ठोस पावले उचलली असून दंड वसुली न झाल्यास संबंधितांवर पुणे येथील स्वतंत्र पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद केले जाणार असल्याची माहिती वीज महावितरणचे आटपाडी शाखा अभियंता ए. एस. होलमुखे यांनी दिली.आटपाडी व माडगुळे येथील तीनजणांवर वीज चोरीबद्दल कनिष्ठ अभियंता संजय वालटे यांनी पुणे येथे स्वतंत्र पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. ३२ हजार रूपयांच्या वीज चोरीप्रकरणी संबंधितांवर पुणे पोलिसांकडून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. वीज चोरीबद्दल दंड आकारला जात आहे. हा दंड न भरणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात आहे. मिटकी येथे एकावर, आटपाडी येथील काळा मळा परिसरातील दादासो ज्ञानू जाधव, माडगुळे येथील विश्वंबर कुंडलिक पवार व नंदकुमार जोडगे यांच्यावर वीज चोरीप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

सांगलीत रस्त्यांची दुरवस्था
सांगली, ९ जुलै / प्रतिनिधी
स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, असा नारा देत महाआघाडी सत्तेवर आली. परंतु शहरातील रस्त्यांची दुरावस्था तशीच आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साठल्याने बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांच्यातून उद्रेक होऊन बुरूड गल्ली येथे असणारा राज्य मार्ग नागरिकांनी बांबू टाकून बंद केला आहे. त्यामुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत असून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महाआघाडीची सत्ता आल्यावर स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, हा नारा खरा ठरेल, अशी अपेक्षा सर्वच नागरिकांची होती. परंतु शहरातील रस्त्यांवरचे खड्डेही अजून बुजवलेले नाहीत. तानाजी चौकातून पुढे कर्नाळ नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पाय ठेवणेही मुश्किल झाले आहे. या भागातील नागरिकांनी बऱ्याचवेळा महापालिका पदाधिकाऱ्यांना आपली समस्या सांगितली होती. परंतु याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही.

रावळ समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी उदय रावळ
सांगली, ९ जुलै / प्रतिनिधी
सांगली जिल्हा रावळ समाज संघटनेच्या अध्यक्षपदी मिरज येथील उदय शंकर रावळ, तर उपाध्यक्षपदी अरूण काशिनाथ रावळ यांची निवड करण्यात आली.सांगली जिल्ह्य़ातील रावळ समाज संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मिरज येथील मल्लिकार्जुन देवालयात पार पडली. या बैठकीत रावळ समाज संघटनेची बांधणी करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी रावळ समाज एकत्रित व संघटित करण्यासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीत सांगली जिल्हा रावळ समाज संघटनेच्या अध्यक्षपदी मिरज येथील उदय रावळ, उपाध्यक्षपदी अरूण रावळ, खजिनदार म्हणून जयवंत रावळ (कुडताळे), तर सचिव म्हणून कुमार रावळ यांची निवड करण्यात आली. या बैठकीस शंकरराव रावळ, शिवाजी रावळ, तुकाराम रावळ, विजय रावळ, प्रभाकर रावळ, दीपक रावळ व राजेंद्र रावळ यांच्यासह सांगली व मिरज शहरासह कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद पल्ली यांचे निधन
सोलापूर, ९ जुलै / प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद काशीनाथ पल्ली (वय ६२) यांचे गुरुवारी पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका प्रमिला पल्ली व दोन पुत्र असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर पद्मशाली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पल्ली यांनी शहरात पूर्वाश्रमीचा जनसंघ आणि भाजपच्या बांधणीचे कार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केले होते. त्यांनी भाजयुमोचे अध्यक्ष, शहर भाजपचे उपाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले. सोलापूर शहराच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

किसन वीर कारखान्याचा ‘टाटा पॉवर’शी करार
वाई, ९ जुलै/वार्ताहर
येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना आणि टाटा पॉवर ट्रेडिग कंपनीमध्ये वीज विक्रीचा करार करण्यात आल्याची माहिती आ. मदन भोसले यांनी दिली. कारखान्यावर ११३ कोटी रुपये खर्चाचा २२ मेगावॉटचा सहवीज निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पात बगॅस लाकडाचे तुकडे व कोळशावर निर्मिती होणार आहे. यातील पन्नास टक्के वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला आणि बाकीची पन्नास टक्के खासगी पार्टीला विकण्याची तरतूद आहे. याप्रमाणे पन्नास टक्के उर्वरित वीज टाटा पॉवर ट्रेिडग कंपनी मुंबईशी आज करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सहा ते सात वर्षात हा प्रकल्प गुंतवणूक मुक्त होणार असून विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा व्यवस्थापनाचा मानस असल्याचे आ. भोसले यांनी सांगितले.यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक एन. डी. निंबाळकर, टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अमूल चरण, सुनील जोशी, राजेंद्रन नायर उपस्थित होते.

इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्मचे आजपासून मार्गदर्शन केंद्र
सांगली, ९ जुलै / प्रतिनिधी
इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म भरण्याविषयी मार्गदर्शन केंद्र श्री अंबाबाई तालीम संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वानलेसवाडी मिरज येथे दि. १० जुलैपासून सुरू होत आहे, अशी माहिती कॉलेजचे प्रश्नचार्य डॉ. विश्राम बापट यांनी दिली.इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म भरण्याविषयी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेजचे प्रश्नध्यापक उपस्थित असणार आहेत. हे केंद्र सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कॉलेजतर्फे विनामूल्य इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थी व पालकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी दूरध्वनी (०२३३- २२१२९९०) व भ्रमणध्वनी (९४२२४०७५७५, ९४२२०४६८००) येथे संपर्क साधावा.

सांस्कृतिक शिबिरात सोलापूरच्या कुलकर्णीचा सहभाग
सोलापूर, ९ जुलै/प्रतिनिधी
केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या सांस्कृतिक स्रोत तथा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने राजस्थानच्या उदयपूर येथे देशव्यापी शिक्षकांसाठी आयोजित शिक्षण व संस्कृती प्रशिक्षण शिबिरात सोलापूरच्या मॉडर्न प्रशालेतील शिक्षिका अनुराधा कुलकर्णी यांनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षण शिबिरात देशभरातील निवडक ७१ शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील ११ शिक्षकांचा समावेश होता, तर सौ. कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्ह्य़ातून एकमेव प्रतिनिधित्व केले. नव्या पिढीसमोर देशाची महान संस्कृती, सांस्कृतिक वारसा, विविधता याविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. तीन आठवडय़ांच्या या प्रशिक्षण शिबिरात देशातील प्रश्नचीन किल्ले, दुर्ग, महाल, हवेल्या, संगीत वाद्ये, पारंपरिक नृत्य, खेळ, साहित्य, शिल्पकला, वास्तुकला, हस्तकला या विषयांवरही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. या प्रशिक्षण शिबिराचा आपणास अधिक फायदा झाला. या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी निश्चित उपयोगी पडेल, असा विश्वास सौ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

‘जनआंदोलनाच्या नावावर गैरप्रकार चालणार नाहीत’
इस्लामपूर, ९ जुलै / वार्ताहर
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचा कार्यकर्ता असल्याचे भासवून शासकीय अधिकाऱ्यांना काही मंडळी वेठीस धरून वैयक्तिक लाभ उठवित असल्याची तक्रार दस्तुरखुद्द अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास शाखा इस्लामपूरचे शहर अध्यक्ष प्रकाश वाळवेकर व वाळवा तालुका सचिव विलास खोत यांनी केली आहे. संघटनेला बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही देण्यात आला आहे.

कोल्हापुरात आजपासून महिला कस्तुरी महोत्सव
कोल्हापूर, ९ जुलै/विशेष प्रतिनिधी
महिलांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबर महिला शक्तीच्या सर्वागीण गुणवत्तेला एक मुक्त व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या हेतूने कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे दिनांक १० ते १२ जुलै दरम्यान कोल्हापूर महिला कस्तुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर उदय साळोखे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. येथील प्रश्नयव्हेट हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन उद्या शुक्रवारी ज्येष्ठ कार्यकर्त्यां सुधा कांकरिया या करतील. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महापालिका आयुक्त विजय सिंघल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जयश्री भोज, उपमहापौर स्मिता माने, पुढारीचे योगेश जाधव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थान महापौर उदय साळोखे हे भूषविणार आहेत. मुंबईवर अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वीरपत्नींचा गौरवही महिला व बालकल्याणमंत्री मदन पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे.

हुमड जैन समाजाचे मुंबईत अधिवेशन
सोलापूर, ९ जुलै / प्रतिनिधी

फेडरेशन ऑफ हुमड जैन समाजचे अधिवेशन कुंथलगिरी येथे रविवार दि. २९ जुलै रोजी ज्येष्ठ उद्योगपती अरविंद दोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र व कर्नाटकातील हुमड जैन समाजाचे स्त्री-पुरुष उपस्थित राहणार आहेत.