Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

सरकारची कोलांटउडी!
रस्ते-पुलांना नावे देण्याचा स्वत:चाच आदेश धुडकावला

संदीप प्रधान
मुंबई, ९ जुलै

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ फेब्रुवारी २००० रोजी आदेश काढून रस्ते व पुलांना यापुढे कोणत्याही मान्यवरांचे नाव देण्यास मनाई केलेली असतानाही मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गाला यशवंतराव चव्हाण यांचे तर वर्सोवा-नरिमन पॉइंट सागरी सेतूला राजीव गांधी यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेला दाखवण्याजोगे एकही काम नावावर नसलेल्या राज्यातील सरकारने हेतुपुरस्सर नामकरणाचा वाद निर्माण करून भावनिक राजकारण करण्याकरिता स्वतचेच आदेश धाब्यावर बसवले आहेत.

‘मनसेची स्थापना केवळ उद्धवविरोधासाठी’
श्वेता परुळकर शिवसेनेत दाखल
मुंबई, ९ जुलै/प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना मराठी माणसाच्या हिताकरिता केलेली नसून उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या द्वेषापोटी विरोधातून केलेली आहे, अशी टीका राज यांच्या एकेकाळच्या खंद्या समर्थक व मनसे महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्वेता परुळकर यांनी केली आहे. परुळकर यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज ‘मातोश्री’वर भेट घेतली व शिवसेनेत प्रवेश केला.

ठाकरेंकडून संरक्षणाचा खर्च वसूल करा!
राष्ट्रवादीची मागणी
नवी दिल्ली, ९ जुलै/वृत्तसंस्था
वरुण गांधी यांना संरक्षण देण्यास विरोध दर्शवितानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांकडून त्यांच्या संरक्षणासाठी होणारा खर्च वसूल केला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने आज केली. सोनिया आणि प्रियांका गांधी यांच्याकडून मात्र हा खर्च वसूल करू नये, असेही राष्ट्रवादीचे मत आहे!

संप मागे घ्या; अन्यथा चर्चा नाही
सरकारचा मार्डला झटका
मुंबई , ९ जुलै /खास प्रतिनिधी
विद्यावेतनवाढीच्या मागणीसाठी मंगळवारपासून हजारो रुग्णांना वेठीस धरणाऱ्या ‘मार्ड’च्या निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला तरच यापुढे चर्चा होऊ शकेल, अशी स्पष्ट भूमिका शासनाने घेतली आहे. ‘मार्ड’ने आपला संप उद्यापर्यंत मागे न घेतल्यास ‘इस्मा’ कायद्याखाली या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. रुग्णांच्या जीवावर शिकणाऱ्या निवासी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे प्रवेश रद्द करावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

सत्ताधारी नेत्यांच्या हेव्यादाव्यांमुळे नव्या महाविद्यालयांच्या मान्यतेला विलंब!
संतोष प्रधान
मुंबई, ९ जुलै

बारावीचा निकाल लागून महिना उलटला तरी सत्ताधारी आघाडीतील नेत्यांचे दबावाचे राजकारण, अंतर्गत हेवेदावे यामुळे नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेचा प्रश्न अद्यापही सुटू शकलेला नाही. यंदा १५० नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीने घेतला असला तरी कोणत्या नेत्याच्या संस्थेचा यादीत समावेश करायचा यावर एकमत होत नसल्याने नवीन महाविद्यालयांची यादी जाहीर होण्यास विलंब लागत आहे.

दहशतवाद्यांना घडवायचा होता माहिमपर्यंत घातपात?
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

कामा रुग्णालयात दहशतवादी अजमल कसाबच्या सापडलेल्या बॅगेतून मलबार हिल ते माहीम हा मार्ग दर्शविणारे दोन नकाशे मिळल्याची साक्ष आज रुग्णालयाचा पंचनामा करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष बारोटे आणि पंच साक्षीदार शेख नजीमुद्दीन निहारुद्दीन यांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर दिली. या नकाशांमुळे कसाब आणि त्याच्या साथीदाराचे मुख्य लक्ष्य हे मलबार हिलच होते किंवा त्यांना दुसऱ्या टप्प्यात माहिमपर्यंत घातपात घडवायचा होता, असे सूचित होत असल्याची चर्चा न्यायालयात उपस्थितांमध्ये होती.

मुंबई- दिल्ली ‘नॉनस्टॉप’गाडी
नवी दिल्ली, ९ जुलै/खास प्रतिनिधी

रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी आज महाराष्ट्रातून मुंबई-दिल्ली आणि नागपूर-मुंबई अशा आणखी दोन ‘दूरांतो’ नॉनस्टॉप सुपरफास्ट गाडय़ा सुरु करण्याची घोषणा केली. आज लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ममता बॅनर्जीं यांनी आपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या तरतुदी केल्या याची माहिती दिली आणि तुम्हाला आणखी काय हवे? असा काहीशा संतापाने प्रतिप्रश्न केला. विश्वस्तरीय रेल्वेस्थानकांच्या यादीत गोवा आणि कालिकत यांचा समावेश करण्यात येत असल्याचीही त्यांनी घोषणा केली.
(सविस्तर वृत्त)

रेल्वे स्थानकांवरील कडक सुरक्षेमुळे घबराट
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

चर्चगेट, अंधेरीसह शहरातील अन्य प्रमुख स्थानकांवरील सुरक्षा आज अचानक कडक करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. येत्या ११ जुलै रोजी पश्चिम रेल्वेतील बॉम्बस्फोटांना तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक वाढविल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र गुप्तचर विभागाने काही स्थानकांवर घातपाती कारवायांची शक्यता वर्तविल्याने पोलिसांना ही कारवाई करावी लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पुन्हा एकदा मुसळधार!
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी
मुंबईसह उपनगरांत गुरुवारी संध्याकाळी दोन तासांहून अधिक वेळ कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. विविध कार्यालये सुटण्याच्या ऐनवेळी पडलेल्या पावसामुळे नोकरदारांचे अतोनात हाल झाले. आज दिवसभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून पुन्हा जोर धरला. दक्षिण व मध्य मुंबईसह पश्चिम उपनगरांत बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. सुमारे दोन तास अविश्रांत कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. सखल भागांत नेहमीच्या ठिकाणी पाणी तुंबले. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी झाली. मरीन ड्राईव्हसह दक्षिण मुंबईतील सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीमुळे पाच मिनिटांच्या प्रवासासाठी पंधरा मिनिटांहून अधिक वेळ लागत होता. कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांची पावसामुळे एकच त्रेधातिरपीट उडाली. वाहतूक कोंडीमुळे रस्ते वाहतूक मंदावली, तरी उपनगरी लोकल वेळापत्रकानुसार धावत होत्या. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गाखेरीज उपनगरी प्रमुख रस्त्यांवरही मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

कॉलेज विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकणाऱ्यास अटक
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

भवन्स व सिडनॅहम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अमलीपदार्थ पुरविणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अमलीपदार्थविरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी अटक केली. युसुफ अबू बकर असे त्याचे नाव असून बुधवारी त्याला कालिना येथील मुंबई विद्यापीठाच्या आवारातून १५ ग्रॅम अमलीपदार्थासह अटक करण्यात आली. याप्रकरणी अटक झालेल्या दोन तरुणांकडून बकरचा मोबाइल क्रमांक आधीच मिळाला होता. मात्र तो त्याने बंद ठेवला होता. दोनच दिवसांपूर्वी त्याने मोबाइल पुन्हा चालू केल्याने त्याला अटक करता आली, असे अमलीपदार्थविरोधी पथकाचे अधिकारी मृत्यूंजय हिरेमठ यांनी सांगितले. गेल्या आठवडय़ात मोहित रामचंदानी आणि इफरान बेग या दोघांना भवन्स आणि सिडनॅहमच्या विद्यार्थ्यांना अमलीपदार्थ पुरविल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यांच्याकडून कोकेनही हस्तगत झाले होते. हे दोघेही सध्या जामिनावर सुटले आहेत.

गणपतीनिमित्त कोकण रेल्वेच्या आणखी सहा गाडय़ा
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

गौरी-गणपती सणानिमित्त कोकण रेल्वेने आणखी सहा गणपती विशेष गाडय़ा चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या गाडय़ांची संख्या ५४ होणार आहे.या अतिरिक्त गाडय़ांपैकी तीन गाडय़ा सीएसटीहून १९, २१ आणि २३ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजता सुटतील त्या दुसऱ्या दिवशी दुपारी २.१० वाजता मडगावला पोहोचतील. २०, २२ आणि २४ ऑगस्ट रोजी दुपारी २.२० वाजता या गाडय़ा परतीच्या प्रवासाला निघतील व दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता सीएसटीला पोहोचतील. दोन्ही दिशांच्या प्रवासात या गाडय़ांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, वीर, खेड, चिपळून, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, मदुरे, पेरनेम, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबे आहेत.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी