Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या
औरंगाबाद, ९ जुलै/प्रतिनिधी

पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने अटकेनंतर अवघ्या दोनच तासांनंतर पोलीस कोठडीतील स्वच्छतागृहात आत्महत्या केली. सिडको पोलीस ठाण्यात आज सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सुरेश रामभाऊ धनेधर (वय ४०, ताजनापूर, तालुका खुलताबाद) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरेश धनेधर याला अटक केली. तो साडेचार वाजता कोठडीतील स्वच्छतागृहात गेला.

कवीच्या तोंडून उमगला शब्दांच्या पलीकडला अर्थ!
सुहास सरदेशमुख
उस्मानाबाद, ९ जुलै
माडज. कर्नाटकच्या सीमेलगतचे उमरगा तालुक्यातील गाव. गावातल्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षक कविता शिकवीत होते. ‘पडझड मोहल्ल्याची’ ही कविता. कवी अजीम नवाज राही यांची मोहल्ल्यातील दैनंदिन जीवनाचे विषण्ण आणि अंतर्मुख करणारी कविता.
मोहल्ल्याच्या सोशिकतेच्या तळाशी
धक्कादायक घटनांचे धागेदोरे
बंड पुकारणाऱ्यांना चिरडल्याच्या गाथा.

वसतिगृहांची मान्यता काढण्याच्या हालचाली
गणेश कस्तुरे
नांदेड, ९ जुलै

राजकीय कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी खिरापतीप्रमाणे, नियम डावलून वाटण्यात आलेली वसतिगृहे अडचणीत सापडली आहेत. राज्यातील अनेक वसतिगृहांची मान्यता काढण्याच्या हालचाली पुण्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या संचालक कार्यालयाने सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जिल्ह्य़ातील ६० वसतिगृहांचा यात समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वदूर दमदार पाऊस
औरंगाबाद, ९ जुलै/प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरीपाठोपाठ आज दिवसभर शहराता संततधार पाऊस झाला. सायंकाळी सव्वाचार ते साडेपाच या कालावधीत शहरात मुसळधार पाऊस झाला. आजच्या पावसाने सारेच सुखावले. शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे.जिल्ह्य़ात सर्वत्र सोमवारपासून पावसाळी ढग दाटून येत होते; पण बरसत नव्हते. अधूनमधून काही भागात तुरळक पावसाच्या सरी झाल्या तरी शेतकरी पेरणीसाठी बियाणे घेऊन शेतात पोहोचून पेरणी न करताच परतत होता. आजच्या पावसाने शेतकऱ्याच्या जिवात जीव आला आहे.

नांदेड जिल्ह्य़ात ६० टक्के पेरण्या पूर्ण
नांदेड, ९ जुलै/वार्ताहर

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात तिसऱ्या दिवशीही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. प्रश्नरंभीची दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने खोळंबलेल्या खरीप हंगामातील ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मृग आणि आद्र्रा नक्षत्रांत समाधानकारक पाऊस न झाल्याने सारेच चिंतेत होते. जिल्ह्य़ामध्ये गेल्या तीन दिवसांपासून बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांना गती आली आहे. सुमारे ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरिपात कापूस, सोयाबीन, तीळ, भूईमूग, सूर्यफुल, ज्वारी, मूग, उडीद आदी पिके मोठय़ा प्रमाणावर घेतली जातात. जिल्ह्य़ात आजपर्यंत १४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

‘कलर्स’चा वर्धापनदिन विद्यार्थ्यांसोबत साजरा
औरंगाबाद, ९ जुलै/प्रतिनिधी

‘कलर्स’ वाहिनीने छोटे मियांची स्टार कलाकार व विजेती सलोनी दाईनीव त्या कार्यक्रमाचे परीक्षक राहुल महाजन यांनी गुरू तेगबहादूर इंग्रजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत पहिला वर्धापनदिन साजरा केला. ‘छोटे मिया’ व ‘छोटे मिया बडे मिया’ची विजेती सलोनी दाईनी व परीक्षक राहुल महाजन यांनी औरंगाबादमध्ये आपल्या श्रोत्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘कलर्स’ वाहिनीचे विपणन प्रमुख रमीत अरोरा यांनी यावेळी कलर्सच्या यशाचे श्रेय श्रोत्यांना दिले.

पोखर्णी नृसिंहजवळ टेम्पो उलटून ११ प्रवासी जखमी
गंगाखेड, ९ जुलै/वार्ताहर

परभणीहून गंगाखेडकडे येणारा टेम्पो (क्रमांक एमएच २२-७४९) ‘स्टेअरिंग रॉड’ तुटल्याने आज सायंकाळी पोखर्णी नृसिंहजवळ ेउलटून ११ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी नऊ प्रवाशांवर गंगाखेड येथील जिल्हा उपरुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन गंभीर जखमींना परभणीच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तालुक्यातील सिरसम येथील काही गावकरी परभणी येथे तुरुतपीराच्या कंदोरीसाठी गेले होते. तेथून परताना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोखर्णी नृसिंह शिवारात टेम्पोचे स्टेअरिंग रॉड तुटले व तो उलटला. यामधील प्रवासी कृष्णा लक्ष्मण मुंडे (वय २२), नारायण मारोती मुंडे (४०), अशोक राम मुंडे (३०), पार्वती नारायण मुंडे (४०), लक्ष्मण निवृत्ती मुंडे (६२, सर्व राहाणार वडवणी), मनीषा जनार्दन मुरकुटे (वय १०), राजेश्वर माणिक घोडके (वय ३५), सुंदरा शेषेराव मुरकुटे (वय ६०, सर्व रिससम), दत्ता शिवाजी घिसडे जखमी झाले. कृष्णा मुंडे आणि सुंदरा मुरकुटे यांना फ्रॅक्चर झाल्याने त्यांना परभणीला पाठविण्यात आले.

‘बँक कर्मचाऱ्यांनी सातत्य टिकवावे’
बीड, ९ जुलै/वार्ताहर
स्पर्धात्मक युगात नागरी बँकांसमोर बरीच आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सातत्य टिकवावे, असे आवाहन पुणे येथील प्रशिक्षक दिलीप पुरंदरे यांनी केले.द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्य़ातील सर्व नागरी सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. बालाजी मंदिर सभागृहात झालेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री. पुरंदरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सत्यनारायण लोहिया उपस्थित होते. श्री. पुरंदरे म्हणाले की, सध्या स्पर्धेच्या युगात नागरी बँकांसमोर अनेक आव्हाने आहेत. सातत्य टिकवून या आव्हानांचा सामना करता येऊ शकतो. बँक व्यवहारातील अनेक विषयांबाबत त्यांनी माहिती दिली. या वेळी ओमप्रकाश जाजू, संचालक अशोककुमार ओझा, प्रदीप मंत्री आदी उपस्थित होते.

‘मराठी माणसाचे तारणहार राज ठाकरेच’
बीड, ९ जुलै/वार्ताहर
मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याची आणि महाराष्ट्राला वैभवशाली, स्वाभिमानी राज्य करण्याची धमक केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्यातच असल्याचा दावा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश महाजन यांनी केला.आडस येथे मनसेच्या शाखेचे उद्घाटन श्री. महाजन यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगीरथ बियाणी, संघटक रेखा फड आदी उपस्थिती होती. श्री. महाजन म्हणाले की, सत्ताधारी आघाडी सरकार गेल्या साठ वर्षापासून मूलभीत प्रश्न सोडविल्याचे सांगून राजकारण करत आहे. महाराष्ट्राला वैभवशाली व स्वाभिमानी राज्य करण्याची धमक केवळ पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आहे.

पहिल्या पत्नीकडून पैसे न मिळाल्याने दुसरे लग्न; गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, ९ जुलै/वार्ताहर
माहेराहून ५० हजार रुपये न आणल्यास दुसरे लग्न करण्याची धमकी देऊन तालुक्यातील कासारवाडी (रामेवाडी) येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. संबंधिताने दुसरे लग्नही केले. पहिल्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर सात जणांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. कासारवाडी येथील भास्कर बाबुराव भद्रे याच्यासोबत मानवत तालुक्यातील वझूर येथील उद्धव शिवराम व्हावळे यांची मुलगी मायावती हिचे दहा वर्षापूर्वी लग्न झाले. सासरची मंडळींनी मायावतीचा माहेराहून ५० हजार रुपये आणण्यासाठी छळ सुरू केला. भास्कर भद्रे गोविंद सूर्यवंशी यांच्या मुलीबरोबर दुसरे लग्न केले व मायावतीला घराबाहेर काढले. मायावती हिने सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून भास्कर भद्रे, सासरा बाबुराव, सासू रंभाबाई व नणंद वत्सला चोपडे यांच्यासह दुसरी पत्नी पूजा, तिचे वडील गोविंद सूर्यवंशी, इंदुबाई सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोहा परिसरात पाऊस
लोहा, ९ जुलै/वार्ताहर
परिसरात काल रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. रात्रभर ंपावसाच्या सरी कोसळत होत्या. जागोजागी पाण्याचे डबके साचले. आज सायंकाळीही पावसाने जोरदार हजेरी लावली.
खरिपाच्या पेरण्यांना काल सुरुवात झाल्यानंतर रात्रीच्या पावसाने शेतकरी सुखावला. दिवसभर पेरणीची लगबग शेतात पाहावयास मिळाली. आज दुपारी ३.३० वाजल्यापासून भीजपाऊस सुरू झाला.काही वेळ जोरदार पडल्यामुळे शहरातील नाल्या भरून वाहिल्या. या पावसामुळे खरिपाच्या पेरणी पूर्णत्वास जाणार आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी याचा मोठा आधार झाला आहे.

रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला
जालना, ९ जुलै/वार्ताहर
रानडुकराने केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला. अंबड तालुक्यातील गोंदी येथे काल हा प्रकार घडला. गोंदी येथील शेतकरी तुकाराम अण्णासाहेब जाधव (वय ३५) उसाच्या शेतात काम करीत असताना अचानक आलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. रानडुकराने त्यांच्या हाताचे व पोटाच्या बाजूचे लचके तोडून पळ काढला. जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मरकड, वनरक्षक एन. एम. घोळवे यांनी मदत करून जाधव यांना उपचारासाठी औरंगाबादच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले.

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला
नळदुर्ग, ९ जुलै/वार्ताहर
अणदूर येथे राष्ट्रीय महामार्गावरील मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांच्या शेतातील केळीच्या बागेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सडलेलल्या अवस्थेत आढळला. मजूर पांडुरंग चव्हाण आज सकाळी केळीच्या बागेत मशागतीसाठी फिरत असताना त्यास मृतदेह आढळला. मृताच्या अंगावर काळ्या रंगाची पँट व पोपटी सदरा आहे. त्याचे वय अंदाजे ४५ वर्षे असून शरीर सडल्याने ओळख पटत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कुलवाडी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच संजय हांडगे यांनी पोलिसांच्या मदतीने मृतावर अंत्यसंस्कार केले.

जालना जिल्हा बँकेच्या निषेधार्थ भा.ज.प.ची निदशने
जालना, ९ जुलै/वार्ताहर
शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने केली. तत्पूर्वी भा.ज.प.च्या जिल्हा कार्यालयापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बबन लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जिल्ह्य़ाच्या विविध भागांतून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.भा.ज.प.ने या वेळी पुढील मागण्या केल्या - सहकारी सोसायटय़ांची गटवारी रद्द करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेची खाती मध्यवर्ती बँकेत उघडावीत, दत्तक गावांत समप्रमाणात कर्ज वाटप करावे, राज्य पातळीवरील निर्णयाप्रमाणे सर्व बँकांनी नवीन पाचशे ते सातशे सभासदांना कर्ज वाटप करावे, पीक विम्याच्या पैशांचे वाटप त्वरित करावेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज देताना हेतूपुरस्सर अडवणूक होत असल्याच्या निषेधार्थ काल जिल्ह्य़ातील कुंभार पिंपळगाव, घनसावंगी आणि तीर्थपुरी या गावांतील बँकेच्या शाखांसमोर धरणे धरण्यात आले होते.

गंगाखेडमध्ये अवैध धंद्यांची चलती; कारवाईबाबत प्रश्नचिन्ह
गंगाखेड, ९ जुलै/वार्ताहर
शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने प्रचंड जोर धरला आहे. शहराच्या सर्व बाजूंच्या मुख्य जागा अवैध व्यावसायिकांनी ताब्यात घेत खुलेआम अवैध व्यवसाय सुरू केल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.शहरात गांजाविक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे कळते. खात्रीलायक वृत्तानुसार, मराठवाडय़ाच्या विविध भागातून गांजा खरेदीसाठी ग्राहक येतात, अशी माहिती आहे. शहराच्या विविध भागांत गांजाविक्रीचे छुपे अड्डेच कार्यरत आहेत. येथील अड्डय़ांवर गांजाची ठोक विक्री होत असल्याने मराठवाडय़ाच्या विविध भागांतून मोठे ठोक ग्राहक येथे गांजा खरेदीसाठी येत असल्याचे कळते. शहरात मटका व्यवसायही तेजीत आहे. छुप्या पद्धतीने चाललेल्या या व्यवसायात अनेक गट सक्रीय असल्याचे कळते. मात्र कारवाईची वेळ आली की विशिष्ट मंडळींनाच धारेवर धरीत कारवाईचा बडगा दाखविण्याचा अर्थपूर्ण दुटप्पीपणाही पोलिसांकडून चालविला जात असल्याचे कळले.पत्त्यांच्या अड्डय़ांनी तर अक्षरश: शहर वेढले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणासह लाखो रुपयांची गुंतवणूक करीत क्लबचालकांनी मोठमोठे हॉलच पत्त्यांच्या अड्डय़ांसाठी भाडय़ाने केल्याचे कळते. ग्राहकांना चार चाकी वाहनांत आणणे व सोडणे इत्यादी सेवाही क्लबचालकांकडून दिली जाते. यावरून या व्यवसायात प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक झाल्याचे स्पष्ट होते.

औषध घेतल्यानंतर महिलेचा बेशुद्ध होऊन मृत्यू
औरंगाबाद, ९ जुलै/प्रतिनिधी
उलटी झाल्याने खासगी डॉक्टरने दिलेले औषध घेतल्यानंतर बेशुद्ध होऊन ३५ वर्षाच्या महिलेचा काल रात्री मृत्यू झाला. मंदाकिनी अनिल पायाळ (रा. एन-८, राणाजी मंगल कार्यालय) असे या महिलेचे नाव आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मंदाकिनी यांना बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उलटी झाली होती. त्यांना नजीकच्या वैद्य हॉस्पिटलमधील डॉक्टरकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते. वैद्य यांनी त्यांना काही औषधी लिहून दिली. त्यात गोळ्यांच्या समावेश होता. वैद्य यांच्या दवाखान्यांत त्यांना दाखल करण्यात आले नव्हते. तपासणीनंतर त्या घरी परतल्या.
रात्री जेवणानंतर त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर लगेचच त्या बेशुद्ध झाल्या. त्यामुळे त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संपकरी डॉक्टरांचा मोर्चा
औरंगाबाद, ९ जुलै/प्रतिनिधी
निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या संपाचा आज दुसरा दिवस होता. सायंकाळी मार्डच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी शासनासोबत वाटाघाटी करत असल्यामुळे सर्वाच्या नजरा तिकडे लागल्या होत्या. दरम्यान आज दुपारी सरकारी रुग्णालयाच्या परिसरात संपकरी डॉक्टरांनी रॅली काढली. संप लवकर न मिटल्यास समांतर अपघात विभाग सुरू करण्याची तयारी असल्याचे संघटनेचे सचिव डॉ. अतुल पोरे यांनी सांगितले. दरम्यान दुसऱ्या दिवशीही संपामुळे रुग्णव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नसल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यावश्यक बाब वगळता अन्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे समजते.

मेयर कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी रहाटकर
औरंगाबाद, ९ जुलै/प्रतिनिधी
अखिल भारतीय मेयर कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी औरंगाबादच्या महापौर विजया रहाटकर यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी एक वर्षासाठी त्या उपाध्यक्षा होत्या. या कौन्सिलवर महाराष्ट्रातून श्रीमती रहाटकर आणि जळगावचे महापौर रमेश जैन असे दोघेच आहेत. कौन्सिल अध्यक्षपदासाठी अलीगढचे महापौर आशुतोष वाष्णेय यांच्या विरोधात जळगावचे महापौर रमेश जैन यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र वाष्णेय यांनी यात बाजी मारली. उपाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा श्रीमती रहाटकर यांची निवड करण्यात आली आहे. जैन कार्यकारी सदस्य आहेत.

अरुण कुलकर्णी यांच्या ‘बुजगावणं’ला पुरस्कार
औरंगाबाद, ९ जुलै/खास प्रतिनिधी
कवी अरुण गो. कुलकर्णी यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाला मुंबईच्या साहित्य दरवळ मंचच्या वतीने देण्यात येणारा लोककवी मनमोहन स्मृती काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या १२ जुलैला मुंबईत कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला सिनेनाटय़ कलावंत मोहन जोशी, लेखिका डॉ. सुमन नवलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अरुण कुलकर्णी हे सध्या औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्रश्नधिकरणात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

आरोपीचा सरकारी रुग्णालयात गोंधळ
औरंगाबाद, ९ जुलै/प्रतिनिधी

ठाण्यात जाऊन पोलीस जमादाराला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शासकीय रुग्णालयात गोंधळ घातला. बुधवारी रात्री रुग्णालयातील वार्ड क्रमांक दोनमध्ये ही घटना घडली. गोपाळ शर्मा असे आरोपीचे नाव आहे. शर्मा यास काल अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याने आजारपणाची तक्रार केल्याने त्यांना उपचारासाठी रुणालयातील २ क्रमांकाच्या वार्डात दाखल करण्यात आले होते.रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शर्मा याने अचानक आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यामुळे शेजारचे रुग्ण तसेच तेथे असलेल्या परिचारिका गोंधळल्या. शर्मा याची मागणी काय होती, हेही त्याने कोणाला सांगितले नाही. तो मोठमोठय़ाने आवाज करत होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला शांत केले.दोन दिवसांपूर्वी शर्मा कुटुंबीय तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावरून वाद झाल्याने शर्मा कुटुंबीयांनी ठाणे अंमलदारास शिवीगाळ करून मारहाण केली. यावरून शर्मा कुटुंबातील पाच सदस्यांविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली होती.

पालिका पोटनिवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे अर्ज
नळदुर्ग, ९ जुलै/वार्ताहर
नगरपालिकेच्या प्रभाग सतराच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह पाच उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला उमेदवारच न मिळाल्याने त्यांनी या पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली. नगरसेवक किशोर नळदुर्गकर यांची निवड तीन अपत्याच्या कारणावरून रद्द झाल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. मतदान येत्या दि. २६ला होणार आहे.आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी जी. जी. पवार यांच्याकडे दाखल केले.सध्या संख्याबळ कमी असूनही पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव महिला सदस्य निर्मला गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. आता या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने महिलेला उमेदवारी दिली आहे.

प्रश्नथमिक शिक्षकांचा मंगळवारी लाक्षणिक संप
नांदेड, ९ जुलै/वार्ताहर
प्रश्नथमिक शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी येत्या मंगळवारी (दि. १४) राज्यातील सर्व प्रश्नथमिक शिक्षक लाक्षणिक संप करणार आहे. त्याच दिवशी नांदेड येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.
केंद्रीय शिक्षक, प्रश्नध्यापकांप्रमाणेच राज्यातील सर्व शिक्षकांना सहावा वेतन आयोग जशाचा तसा लागू करावा, १३ मे २००९ रोजीचा भत्त्याविषयीचा निर्णय रद्द करावा, शिक्षणसेवक व वस्तीशाळा शिक्षकांना दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना रद्द करावी या प्रमुख मागण्यांसह आपल्या विविध मागण्यांसाठी प्रश्नथमिक शिक्षकांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे.एक दिवसाच्या लाक्षणिक संपासह जिल्ह्य़ात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मधुकर उन्हाळे यांनी केले आहे.

माजी नगराध्यक्ष चौधरी यांचा काँग्रेसचा राजीनामा
जालना, ९ जुलै/वार्ताहर
माजी नगराध्यक्ष रूपकुमार नेहरूलाल ऊर्फ बबलू चौधरी यांनी काँग्रेसच्या प्रश्नथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कुलवंत यांच्याकडे दिला आहे. ते गेल्या २५ वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते. विधानसभेचा बदनापूर मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी मागील काही महिन्यांपासून या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते बदनापूरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण
गंगाखेड, ९ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील रामनगर (तांडा) महातपुरी येथे दलितांना उपजीविकेसाठी दिलेल्या जमिनीवर (सव्‍‌र्हे क्र. २९४) केलेले अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी ५४ कुटुंबांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. श्री. गौतम ज्ञानोबा डुमने यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन उपोषणास सुरुवात झाली. निवेदनात म्हटले आहे की, ही गायरान जमीन सरकारने १९ सप्टेंबर १९९२ रोजी गायरानधारकांना वहितीसाठी दिली. गावातीलच लालू गोपाळ चव्हाण, गोविंद गोपाळ चव्हाण, प्रभू गोपाळ चव्हाण, रामा आवते, बाबाराव आवते, बालू आवते व पोलीस पाटील बाबू चव्हाण इत्यादी वहितीसाठी अडथळा आणत आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन गायरानधारकांना संरक्षण द्यावे.

बिबटय़ाला पकडण्यासाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले
गंगाखेड, ९ जुलै/वार्ताहर
पालम तालुक्यातील उमरा शिवारात मंगळवारी दोन तरुण बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. या बिबटय़ास पकडण्यासाठी आलेले वनविभागाचे पाच ते सहा सदस्यीय अधिकारी रिकाम्या हाताने परतले. वनविभागाने परभणीचे सहायक वनरक्षक ए. ए. कांबळे, कुंडलिक कातकडे, लक्ष्मण राठोड, एन. डब्ल्यू. मुंडे, दुधारी आदी अधिकाऱ्यांचे पथक बिबटय़ाला पकडण्यासाठी पाठविले होते. या पथकाने बिबटय़ाला पकडण्यासाठी काल उमरा शिवारात पिंजरा लावला होता. तो पिंजऱ्यात न अडकल्याने वनविभागाची पुरती पंचाईत झाली. त्यानंतर मात्र बिबटय़ा अद्यापि पसार झाल्याने हतबल झालेल्या वनविभागाच्या पथकाने आपला गाशा गुंडाळल्याचे कळते.

बचत गटातर्फे नगराध्यक्षांचा सत्कार
तुळजापूर, ९ जुलै/वार्ताहर
साई समर्थ पुरुष व शांभवी महिला बचत गटातर्फे नगराध्यक्ष भारती गवळी यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात बचत गटांच्या सदस्यांना लाभांशाचे वाटप करण्यात आले. श्रीमती गवळी म्हणआल्या की, शहराचा चांगला विकास होईल व शहराचा नावलौकिक वाढेल यासाठी प्रश्नमाणिक प्रयत्न करू. त्यांच्या हस्ते बचत गटाच्या सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रश्न. आश्फाक आतार यांनी केले.श्रीमती गवळी यांचा इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सुनीता डोंगरे व सचिव संजीवनी बेंळवे यांनीही सत्कार केला.

भोकरदन पालिकेतर्फे धरणातील पाण्याचे पूजन
भोकरदन, ९ जुलै/वार्ताहर

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दानापूर येथील जुई धरणात आलेल्या नवीन पाण्याचे नगरपालिकेतर्फे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगराध्यक्ष शेषराव सपकाळ, उपनगराध्यक्ष शेख नजीर व मुख्याधिकारी व्ही. एन. महानवार यांच्या हस्ते आज पूजन करण्यात आले. जुई धरणातील पाणीसाठा एक दिवस पुरण्याइतकाच शिल्लक राहिल्याने शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाला होता. पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे शहरासाठी वीस टँकरची मागणी करून दहा टँकर मंजूर केले होते. तालुक्यात सर्वत्र रविवारी झालेल्या जोरदार पावसाने धरणात तीन फूट पाणी आले. त्यामुळे पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला. या नवीन पाण्याचे विधिवत पूजन आज दुपारी करण्यात आले. या वेळी लेखापाल हरिश्चंद्र आंधळे, श्यामराव दांडगे, सुनील घायवट, नईम खाँ, पंजाब देशमुख, बबन देशमुख, नगरसेवक शफीक काद्री, राजेंद्र देवरे, दिलीप देशमुख, चंद्रकांत पगारे, एजाज शहा उपस्थित होते. या जलपूजनानंतर सायंकाळी तालुक्यात पुन्हा चांगला पाऊस पडला.

रागाच्या भरात जाळून घेतले
औरंगाबाद, ९ जुलै/खास प्रतिनिधी
वैजापूर तालुक्यातील निवृत्ती मोहन धोत्रे (वय २५,रघुनाथपूर वाडी) याने रागाच्या भरात जाळून घेतले. ही घटना बुधवारी रात्री निवृत्ती यांच्या शेतात घडली. निवृत्तीवर उपचार सुरू आहेत.

संगणकाच्या दुकानात चोरी
जिंतूर, ९ जुलै/वार्ताहर

यलदरी मार्गावर असलेल्या ‘पारस कम्प्युटर सेंटर’मधून सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. चोरांनी कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ५० हजार रुपयांचे सहा मॉनिटर चोरून नेले. दुकानमालक सतीश सुभाष मोहारे याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.