Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘मनसेची स्थापना केवळ उद्धवविरोधासाठी’
श्वेता परुळकर शिवसेनेत दाखल
मुंबई, ९ जुलै/प्रतिनिधी

 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना मराठी माणसाच्या हिताकरिता केलेली नसून उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या द्वेषापोटी विरोधातून केलेली आहे, अशी टीका राज यांच्या एकेकाळच्या खंद्या समर्थक व मनसे महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्वेता परुळकर यांनी केली आहे. परुळकर यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज ‘मातोश्री’वर भेट घेतली व शिवसेनेत प्रवेश केला.
श्वेता परुळकर म्हणाल्या की, मनसेला मराठी माणसांचे हित पाहायचे नसून उद्धव ठाकरे यांचे व पर्यायाने शिवसेनेचे नुकसान करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत तेच त्यांनी केले. मनसेत खऱ्या कार्यकर्त्यांला काम करण्याच्या दृष्टीने उत्तेजनात्मक वातावरण नाही. मनसेवर ज्या ज्या मराठी माणसांनी विश्वास टाकला ती तेथील कार्यपद्धती व निर्णय प्रक्रिया यामुळे दुखावली जात आहेत. मनसेमध्ये संघटनात्मक आखणी, नियोजित कार्यपद्धती, पारदर्शकता याचा पूर्ण अभाव आहे. मनसेमधील अशी बरीच नाराज मंडळी माझ्या संपर्कात असून ते योग्यवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील.
श्वेता परुळकर यांना मनसेच्या महिला अध्यक्षपदावरून राज ठाकरे यांनी अलीकडेच तडकाफडकी दूर केले. आपली हकालपट्टी करून शालिनी ठाकरे यांची त्या पदावर झालेली नियुक्ती श्वेता परुळकर यांना वृत्तपत्रातून कळली. पदावरून दूर करण्यापूर्वी आपल्याशी राज यांनी सल्लामसलत करायला हवी होती, असे त्यांचे म्हणणे आहे. ही अलीकडील प्रकाशझोतात आलेली घटना असली तरी यापूर्वी मनसेत झालेला अन्याय व गळचेपी याची माहिती स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचे त्या म्हणाल्या.