Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

ठाकरेंकडून संरक्षणाचा खर्च वसूल करा!
राष्ट्रवादीची मागणी
नवी दिल्ली, ९ जुलै/वृत्तसंस्था

 

वरुण गांधी यांना संरक्षण देण्यास विरोध दर्शवितानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांकडून त्यांच्या संरक्षणासाठी होणारा खर्च वसूल केला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने आज केली. सोनिया आणि प्रियांका गांधी यांच्याकडून मात्र हा खर्च वसूल करू नये, असेही राष्ट्रवादीचे मत आहे!
भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी भडक भाषण करून गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण पुरविण्यास आमचा विरोध आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते देवीप्रसाद त्रिपाठी यांनी वार्ताहरांना सांगितले.
जे घटनात्मक पदे सांभाळत आहेत अशांनाच संरक्षण द्यावे, अशी पक्षाची भूमिका आहे, असेही ते म्हणाले. आजकाल विधिमंडळ वा संसदेत निवडून येणाऱ्या प्रत्येकालाच आपल्याला संरक्षण हवे, असे वाटू लागते. ही प्रथा थांबली पाहिजे, असे ते म्हणाले. दिल्ली पोलीस दलाचे एक चतुर्थाश बळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या संरक्षणासाठीच राबत आहे. सामान्य माणसावर हा अन्याय आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
शरद पवार यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पाठिंबा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून त्यांच्यावरील संरक्षणाचा खर्च वसूल करावा, असेही ते म्हणाले. सोनिया आणि प्रियांका गांधी यांच्याकडूनही हा खर्च वसूल करावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे काय, या प्रश्नावर उत्तर देताना कोलांटउडी मारत ते उद्गारले की, त्यांची बाब वेगळी आहे!
दरम्यान, हिंमत असेल तर शिवसेनाप्रमुखांची सुरक्षा हटवून दाखवा असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या घटनात्मक पदाचा मुद्दा उपस्थित करून त्रिपाठी यांनी ही मागणी केली आहे. मग प्रियंका वडेरा, रॉबर्ट वडेरा, राहुल गांधी यांच्याकडे कोणते घटनात्मक पद आहे. त्यांचीही सुरक्षा हटवा असे राऊत यांनी पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.