Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

संप मागे घ्या; अन्यथा चर्चा नाही
सरकारचा मार्डला झटका
मुंबई , ९ जुलै /खास प्रतिनिधी

 

विद्यावेतनवाढीच्या मागणीसाठी मंगळवारपासून हजारो रुग्णांना वेठीस धरणाऱ्या ‘मार्ड’च्या निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला तरच यापुढे चर्चा होऊ शकेल, अशी स्पष्ट भूमिका शासनाने घेतली आहे. ‘मार्ड’ने आपला संप उद्यापर्यंत मागे न घेतल्यास ‘इस्मा’ कायद्याखाली या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. रुग्णांच्या जीवावर शिकणाऱ्या निवासी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे प्रवेश रद्द करावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, निवासी डॉक्टरांनी मात्र हेकेखोरपणे आपला संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री राजेश टोपे, आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, वैद्यकीय शिक्षण सचिव भुषण गगराणी, वित्त खात्याचे प्रधान सचिव विद्याधर कानडे तसेच वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. वासुदेव तायडे आणि सहसंचालक डॉ. प्रवीण शिनगरे यांच्याबरोबर निवासी डॉक्टरांची आज सायंकाळी चर्चा झाली. यावेळी आपल्या मागण्यांवर चर्चा होऊ शकते, मात्र पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा विचार करून संप मागे घ्या, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. मात्र निवासी डॉक्टरांनी आपल्याला दिल्लीप्रमाणे ३५ हजार ते ४५ हजार विद्यावेतन मिळावे, हा हेका कायम ठेवत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला.
निवासी डॉक्टरांना शिकविणाऱ्या अध्यापकांपेक्षा जास्त वेतन मिळण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासांठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे केईएम, शीव, नायर, जे.जे.सह प्रमुख रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेवर मोठा ताण आला आहे. या संपामुळे रुग्णांचे अतोनात हाल सुरू झाले असून डॉक्टरांवर हल्ला झाल्यास अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची जशी तरतूद आहे त्याचप्रमाणे रुग्ण दगावल्यास आता निवासी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीने जोर धरला आहे. ‘मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने २००२ सालापासून आत्तापर्यंत १२ वेळा संप पुकारला असून त्यापैकी चारदा विद्यावेतनासाठी संप केला आहे.
मार्डच्या संपात नागपूर, अकोला, धुळे आणि कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर सामील नसून पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहा विभागातील निवासी डॉक्टरांनीही या संपाला विरोध दर्शवला आहे.