Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दहशतवाद्यांना घडवायचा होता माहिमपर्यंत घातपात?
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

 

कामा रुग्णालयात दहशतवादी अजमल कसाबच्या सापडलेल्या बॅगेतून मलबार हिल ते माहीम हा मार्ग दर्शविणारे दोन नकाशे मिळल्याची साक्ष आज रुग्णालयाचा पंचनामा करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष बारोटे आणि पंच साक्षीदार शेख नजीमुद्दीन निहारुद्दीन यांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर दिली. या नकाशांमुळे कसाब आणि त्याच्या साथीदाराचे मुख्य लक्ष्य हे मलबार हिलच होते किंवा त्यांना दुसऱ्या टप्प्यात माहिमपर्यंत घातपात घडवायचा होता, असे सूचित होत असल्याची चर्चा न्यायालयात उपस्थितांमध्ये होती.
दरम्यान, कसाबच्या बॅगेतून सापडलेले नकाशे हे मलबार हिल ते माहीम हा सागरी मार्ग दर्शविणारे आहेत, असा दावा अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केला. दहशतवादी कराचीहून मुंबईला येताना केवळ जीपीएस व्यवस्थेवर अवलंबून नव्हते, तर त्यांनी सागरी मार्गाचा नकाशाही स्वत:सोबत ठेवला होता, हे यातून स्पष्ट होत असल्याचे सांगत या नकाशांद्वारे सर्व दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत दाखल झाल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा आपण न्यायालयात सादर केल्याचा दावाही त्यांनी केला.
बारोटे आणि शेख यांच्यासह ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या कसाब व अबू इस्माईलच्या ‘फुटेज’च्या सीडीचे पंच साक्षीदार प्रभाकर यादव यांचीही आज साक्ष नोंदविण्यात आली. २६/११च्या रात्री कसाब आणि अबू इस्माईलने कामा रुग्णालयात हल्ला केला होता. तेथून पळून जाताना कसाबची बॅग रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या गच्चीवर राहिली होती. पंचनाम्याच्यावेळी ही बॅग जप्त करताना त्यातून मलबार हिल ते माहीम हा मार्ग दाखविणारे दोन छापील व रंगीत नकाशे मिळाले. याशिवाय कोनमापकाच्या पट्टय़ाही सापडल्या, असे बोराटे आणि शेख यांनी आपल्या साक्षीत सांगितले. मात्र त्यांनी हे नकाशे कुठल्या मार्गाचे होते हे स्पष्ट केले नाही. कामा रुग्णालय आणि कसाबच्या बॅगेतून मिळून असे एकूण ३८ वस्तू जप्त करण्यात आल्याचेही त्या दोघांनी सांगितले. अबू इस्माईलकडून सीएसटी ते मलबार हिल या मार्गाचा नकाशा मिळाला होता, तर कसाबच्या बॅगेतून मलबार हिल ते माहीम हा मार्ग दाखविणारा नकाशा मिळाल्याने त्यांचे मुख्य लक्ष्य मलबार हिलच होते किंवा त्यांना माहिमपर्यंत घातपात घडवायचा होता का, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, कामा रुग्णालयाचा दुसरा पंचनामा करताना या प्रकरणात साक्ष नोंदविण्यात आलेल्या दोन साक्षदारांनाच पंच करण्यात आले असल्याचा प्रकार कसाबचे वकील अब्बास काझ्मी यांनी न्यायालयात उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बारोटे यांनी भरत वाघेला व संदीप वाघेला घटनेचे साक्षीदार असल्याची माहिती पंचनामा करताना आपल्याला नव्हती, असे स्पष्ट करून अ‍ॅड. काझ्मी यांचा प्रयत्न फोल ठरवला.