Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

रेल्वे स्थानकांवरील कडक सुरक्षेमुळे घबराट
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

 

चर्चगेट, अंधेरीसह शहरातील अन्य प्रमुख स्थानकांवरील सुरक्षा आज अचानक कडक करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. येत्या ११ जुलै रोजी पश्चिम रेल्वेतील बॉम्बस्फोटांना तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक वाढविल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र गुप्तचर विभागाने काही स्थानकांवर घातपाती कारवायांची शक्यता वर्तविल्याने पोलिसांना ही कारवाई करावी लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट व अंधेरी या दोन स्थानकांची रेल्वे पोलिसांनी आज सकाळी कसून तपासणी केली. सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झडतीही घेण्यात येत होती. रेल्वे स्थानकांवर कानाकोपऱ्यात रायफलधारी पोलीस व आरपीएफचे जवान तैनात दिसत होते. बॉम्बशोधक पथकांनाही या दोन्ही स्थानकांवर पाचारण केल्याची बोलले जाते. मात्र रेल्वे पोलिसांकडून त्याला दूजोरा मिळाला नाही.
पश्चिम व मध्य रेल्वेवरील सीएसटी, दादर, मुंबई सेंट्रल, बोरिवली, ठाणे आदी प्रमुख स्थानकांवर नेहमीपेक्षा कडक सुरक्षा होती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचे हे बदललेले चित्र पाहून प्रवाशांच्या मनात शंकेची पाल चुकचूकत होती. त्यातच गुप्तचर विभागाने चर्चगेट व अंधेरीसह मुंबईतील सात स्थानकांवर घातपाती कारवायांचा इशारा दिल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखविल्याने प्रवाशांमध्ये आणखीनच घबराट पसरली. त्यावर ११ जुलैच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेत वाढ केल्याचे स्पष्ट करून, रेल्वे पोलिसांनी अन्य चर्चाना पूर्णविराम दिला. मात्र पोलिसांकडून सकाळी अंधेरी स्थानकाबाहेर बराच वेळ प्रवाशांना स्थानकावर जाण्यास अटकाव का करण्यात येत होता, हा प्रश्न अनुत्तरित आहे.