Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

साधा डाळभातही सामान्यांच्या आवाक्याबाहेर!
समर खडस, मुंबई, ९ जुलै

 

‘दाल रोटी खाओ.. प्रभू के गुण गाओ’ हे ज्वारभाटा या सिनेमातील गाणे खूप लोकप्रिय झाले होते. डाळ आणि चपाती हा सर्वसामान्य माणसांचा आहार असल्याचे या गाण्यातून स्पष्ट होते. मात्र हीच डाळ भविष्यात ९० रुपये किलोपर्यंत पोहोचेल याचा अंदाज गीतकारांना नसावा. अन्यथा ‘सरकारके गुण गाओ तो महंगी दाल रोटी खाओ’, असे शब्द गीतकाराच्या
लेखणीतून उतरले असते. कारण मुंबईच्या घाऊक बाजारात तुरीची डाळ ८५ रुपये किलो तर किरकोळ बाजारात ९० रुपये किलो झाली असून येत्या १५ दिवसांमध्ये तांदळाच्या किमतींमध्येही प्रचंड तेजी येण्याची शक्यता व्यापाऱ्यांना वाटते आहे.
केवळ तुरीचीच नव्हे तर सगळ्याच डाळी सध्या प्रचंड महागल्या असून चणाडाळ घाऊक बाजारात ३१०० रुपये प्रति
क्विंटल, उडीद डाळ ५००० रुपये प्रति क्विंटल तर मसूर डाळ ५८०० रुपये प्रति क्विंटल झाली असून कष्टकऱ्यांचा प्रथिनांचा स्रोतच यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अरुण कुमार यांनी दिली.
उत्तर भारतात पावसाने मारलेली दडी पाहून व्यापाऱ्यांनी डाळी आणि कडधान्यांची प्रचंड प्रमाणात साठवण सुरू केली असून या महत्त्वाच्या अन्नधान्यांवर मोठय़ा प्रमाणात सट्टा चालत असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या तांदळाच्या किमतींमध्ये मोठी दरवाढ दिसत नसली तरी तांदळाच्या किमती याआधीच मोठय़ा प्रमाणावर वाढलेल्या आहेत. अत्यंत कमी प्रतीच्या तांदळाचा दर १८ रुपये प्रति किलो झाला असून सामान्य नागरिक रोजच्या जेवणात वापरत असलेला मसूरी तांदूळ २५ रुपये किलो आहे. कोलम, आंबेमोहोर, बासमती हे तांदूळ तर सामान्य माणसांसाठी केवळ ‘शोकेस’मधून पाहण्याच्या शोभेच्याच वस्तू झालेल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अन्नधान्यांच्या किमतींवर सरकारने वेळीच नियंत्रण आणले नाही तर तुरडाळीचे दर १०० ते १२५ रुपयांपर्यंत वाढू शकतात. तसेच काही मोठय़ा व्यापाऱ्यांनी सध्या तांदळाचीही साठेबाजी करण्यास सुरुवात केल्यामुळे येत्या १० ते १५ दिवसांमध्ये कमी प्रतीच्या तांदळाच्या किमतीही २५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतात. मासे, मटण, कोंबडी, अंडी या प्रथिनांच्या इतर स्रोतांकडे तर सामान्य कष्टकरी श्रीमंतांच्या ताटातील मेजवानीचे जिन्नस म्हणूनच गेली कित्येक वर्षे पाहतो आहे. त्यात आता तुर डाळीसकट इतरही डाळींची भर पडल्यामुळे दाल-रोटीशिवायच सरकारचे गुण गाण्याची पाळी श्रमिकांवर आल्याची प्रतिक्रिया कामगार वर्गातून उमटते आहे.