Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

कॉंग्रेस उमेदवारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

 

काँग्रेसची निवडणूक प्रचार मोहीम आणि निवडणुकांचे निकाल हे लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२३ (३)चा भंग करणारे आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या पाच याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय मतदाता मंचचे सहसंयोजक अनिल गचके यांनी या बाबत आज पत्रकार परिषदेत सांगितले की, काँग्रेसचा जाहीरनामा हा जातीयवादी असून अल्पसंख्य समाजाला झुकते माप देणारा आहे. त्यामुळे तो घटनेच्या १४, १५, १६ आणि ३० (१) या कलमांचा भंग करणारा आहे. देशाची घटना सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान मानते. त्याचप्रमाणे धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ आदी निकषांवर कोणत्याही तऱ्हेचा भेद करण्यास प्रतिबंध करते. घटनेतील सदर कलमे बंधनकारक असून ते नागरिकांना दिलेले वैयक्तिक अधिकार नाहीत, या बाबींवर याचिकेमध्ये भर देण्यात आला आहे, असेही गचके यांनी सांगितले.
याचिकेमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील शब्दयोजना तसेच त्यामध्ये अल्पसंख्यकांना (मुस्लिमांना) देण्यात आलेली आश्वासने ही निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी आहेत. मते मिळविण्यासाठी जात अथवा जातीय भावनांच्या आधारे कोणतेही आवाहन करता येणार नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरुद्ध मंचने यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. मात्र या प्रकाराविरुद्ध सनदशीर मार्गाने दाद मागण्याचे मार्ग संपल्याने मंचाचे पदाधिकारी आणि हितचिंतकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतून निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांची निवडणूक रद्दबातल ठरवावी, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे, असे गचके यांनी सांगितले.