Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

प्रादेशिक

साधा डाळभातही सामान्यांच्या आवाक्याबाहेर!
समर खडस, मुंबई, ९ जुलै

‘दाल रोटी खाओ.. प्रभू के गुण गाओ’ हे ज्वारभाटा या सिनेमातील गाणे खूप लोकप्रिय झाले होते. डाळ आणि चपाती हा सर्वसामान्य माणसांचा आहार असल्याचे या गाण्यातून स्पष्ट होते. मात्र हीच डाळ भविष्यात ९० रुपये किलोपर्यंत पोहोचेल याचा अंदाज गीतकारांना नसावा. अन्यथा ‘सरकारके गुण गाओ तो महंगी दाल रोटी खाओ’, असे शब्द गीतकाराच्या
लेखणीतून उतरले असते. कारण मुंबईच्या घाऊक बाजारात तुरीची डाळ ८५ रुपये किलो तर किरकोळ बाजारात ९० रुपये किलो झाली असून येत्या १५ दिवसांमध्ये तांदळाच्या किमतींमध्येही प्रचंड तेजी येण्याची शक्यता व्यापाऱ्यांना वाटते आहे.

वीज कायदा २००३ मध्ये वीजनिर्मिती कंपन्यांच्या दरांवर नियंत्रणाची तरतूदच नाही?
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

ग्राहकाला मध्यवर्ती ठेवून वीज कायदा २००३ अस्तित्वात आणण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी या कायद्यात कोठेही वीजनिर्मिती करणाऱ्या संस्थांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची तरतूद नसल्याने किंवा त्याबाबतचे अधिकार संबंधित राज्यांच्या नियामक आयोगांना देण्यात आलेले नसल्याने अशा संस्था सर्रास मोठय़ा प्रमाणावर नफेखोरी आणि काळाबाजार करीत असल्याचे मत वीजक्षेत्रात व्यक्त केले जात आहे.

महसूलमंत्र्यांमुळे गेलेल्या जमिनी पुन्हा सरकारजमा!
अजित गोगटे, मुंबई, ९ जुलै

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गेल्या दोन सरकारांमधील महसूलमंत्र्यांनी दिलेले पूर्णपणे बेकायदा निकाल उच्च न्यायालयाने रद्द केल्याने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हातून गेलेली सुमारे १० हेक्टर जमीन प्राधिकरणास परत मिळाली आहे. प्राधिकरणासाठी १९७० च्या दशकात संपादित केलेल्या एकूण २४०० हेक्टर जमिनीपैकी काही भूखंड तब्बल तीन दशकांनंतर आरक्षणातून वगळून ते मूळ मालकांना परत करण्याचे बेकायदा निकाल देण्याचा अनिष्ट पायंडा आता मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांनी २००२ मध्ये प्रथम पाडला.

हायकोर्टाचा आदेश
गावकऱ्यांना आधी पाणी, वीज द्या; मगच दिघी बंदर सुरु करा

मुंबई, ९ जुलै/प्रतिनिधी

रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराचा विकास करणाऱ्या मे. दिघी पोर्टस् लि. या कंपनीने येत्या सहा महिन्यांत गावकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि वीज पुरवावी आणि या गोष्टींची पूर्तता केल्याखेरीज बंदरविकासाचे काम पूर्ण झाले तरी कंपनीस बंदराचा प्रत्यक्ष वापर सुरु करता येणार नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. दिघी कोळी समाज मुंबई रहिवासी संघाने केलेली जनहित याचिका निकाली काढताना मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार व न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

मंगळवारपासून प्राध्यापक बेमुदत संपावर
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन द्यावे तसेच १९९१ ते १९९९ या कालावधीत भरती झालेल्या शिक्षकांना मान्यता देऊन त्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा करावा या दोन मागण्यांसाठी राज्यातील सर्व महाविद्यालये व १० विद्यापीठांतील प्राध्यापक १४ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

निवृत्त विक्रीकर अधिकाऱ्याच्या मुदतवाढीला आव्हान
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

निवृत्तीला आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात येऊ नये असे अंतरिम आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी सरकारी पातळीवर केली जात नसल्याचे दिसून येत आहे. विक्रीकर विभागातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला देण्यात आलेल्या मुदतवाढीला आता उच्च न्यायालयातच आव्हान देण्यात आले आहे.

कॉंग्रेस उमेदवारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी
काँग्रेसची निवडणूक प्रचार मोहीम आणि निवडणुकांचे निकाल हे लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२३ (३)चा भंग करणारे आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या पाच याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.

कल्याण-वांगणीदरम्यान चार वीकेण्ड ट्रॅफिक ब्लॉकचे
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी
डीसी-एसी परिवर्तन कामासाठी मध्य रेल्वेवरील कल्याण-वांगणी स्थानकांदरम्यान येत्या शनिवारपासून दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक करण्यात येणार आहे. हा ब्लॉक २ ऑगस्टपर्यंत दर शनिवार-रविवारी होणार आहे. येत्या ११ जुलैपासून या विशेष ट्रॅफिक ब्लॉकला सुरुवात होईल. ११-१२, १८-१९, २५-२६ जुलै आणि १-२ ऑगस्ट रोजी पहाटे ३.५५ ते ५.२५ या वेळेत हा ब्लॉक होईल. ब्लॉकच्या काळात १६ उपनगरी लोकल रद्द होणार आहेत. तसेच उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी सिकंदराबाद एक्स्प्रेस, बंगलोर-दादर एक्स्प्रेस, चेन्नई-दादर एक्स्प्रेस, सिद्धेश्वर आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाडय़ांना काही स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.
ट्रॅफिक ब्लॉकमुळे रद्द होणाऱ्या लोकलची यादी
कर्जत-सीएसटी (पहाटे ३.४०, ४.३०, ४.५२ आणि ५.१६), अंबरनाथ-सीएसटी (पहाटे ३.५१, ४.४७ आणि ५.४७), कल्याण-सीएसटी (सकाळी ८.४१) आणि डोंबिवली-सीएसटी (स. ८.३६), सीएसटी-अंबरनाथ (प. ५.०५, ५.३२ आणि ६.२०), ठाणे-कर्जत (प. ५.१९), सीएसटी-कर्जत (स. ६.५०), सीएसटी-डोंबिवली (स. ७.०९) आणि दादर-सीएसटी (सकाळी ७.४८).

सात तरण तलावांचा पाणीपुरवठा तोडला;
सेना नेत्यांच्या तलावांवर मात्र मेहेरनजर
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पालिकेने पाणीपुरवठय़ांवर अनेक र्निबध लादले आहेत. त्यानुसार आज शहरातील काही जलतरण तलावांचा पाणीपुरवठा तोडण्यात आला. मात्र शिवसेना नेत्यांच्या क्लबना मात्र अभय देण्यात आले. पाणीकपात करण्यासाठी हॉटेल, जलतरण तलावांना कमी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार आज सात जलतरण तलावांचा पाणीपुरवठा तोडण्यात आला. तसेच ३० उद्यानांचा पाणीपुरवठाही कमी करण्यात आला. पाणी गळती होणाऱ्या १५७ ठिकाणी पालिकेच्या जलखात्यातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन गळती थांबविण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर आणि आमदार सुभाष देसाई यांचे क्लब असून या क्लबमध्ये जलतरण तलाव आहेत. या तलावांचा पाणीपुरवठा मात्र तोडण्यात आलेला नाही. याबाबत मुख्य जलअभियंता एस. एस. कोर्लेकर यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे कोणाचा पुरवठा तोडला आणि कोणाचा नाही ते सांगता येणार नाही, मात्र पालिका नियमानुसार काम करणार आहे.

अजूनी रुसून आहे..!
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

मुंबईला आज सायंकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपले असले तरी तलाव क्षेत्रात मात्र पावसाने पाठ फिरवली. तुलसी, मोडकसागर तलाव क्षेत्रात फक्त एक मिलिमीटर तर अप्पर वैतरणा क्षेत्रात १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तानसा, विहार तलाव क्षेत्रात पावसाची कोणतीही नोंद झाली नाही. दरम्यान, तलावांच्या क्षेत्रात येत्या आठ दिवसांत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी पालिकने सुरू केली आहे. तलाव क्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. याचे पडसाद आज पालिका सभागृहातही उमटले. पाणीकपातीबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार सुनील प्रभू यांनी केली तर राजहंस सिंग यांनीही याला पाठिंबा दिला. चर्चेला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त अनिल डिग्गीकर यांनी वेळ आल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी पालिकेने केली असल्याचे सांगितले.

नवी मुंबईतील सिडकोच्या हद्दीतही आजपासून १० टक्के पाणीकपात
मुंबई, ९ जुलै / प्रतिनिधी

तलावक्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने, नवी मुंबईतील सिडकोतर्फे पाणीपुरवठा होत असलेल्या क्षेत्रात उद्या १० जुलैपासून १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडकोतर्फे पाणीपुरवठा होत असलेल्या नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खासघर व द्रोणागिरी या विभागांसाठी ही पाणी कपात लागू असेल. या पाणी कपातीच्या पाश्र्वभूमीवर पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन सिडकोने नागरिकांना केले आहे.नवी मुंबईतील उर्वरीत क्षेत्रात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नवी मुंबई महापालिका यांनी आधीच १० टक्के पाणी कपातीची घोषणा केली आहे.