Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

अटींच्या पूर्ततेबाबतची उपाययोजना गुलदस्त्यात!
प्रसाद रावकर/रेश्मा जठार

‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालया’ (राणीची बाग)च्या आधुनिकीकरण प्रकल्पास केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून ‘अटी सापेक्ष’ मंजुरी मिळाल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले; मात्र बागेच्या आधुनिकीकरणासाठी प्राधिकरणाने घातलेल्या अटींची महापालिका पूर्तता कशी करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पालिकेच्या प्रस्तावित आराखडय़ानुसार आधुनिकीकरणात राणीच्या बागेत मोठय़ा प्रमाणावर फेरबदल अपेक्षित आहेत. त्यातून बागेतील वृक्षसंपदेला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात येताच वृक्षप्रेमींनी पालिकेविरुद्ध ‘हल्ला बोल’ केला; पण पालिकेकडून याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. ‘एकही झाड तोडणार नाही’, एवढेच त्रोटक उत्तर वारंवार देऊन पालिका वेळ मारून नेत आहे. मुंबई महानगरपालिकेने जनतेसाठी १६ मे २००७ रोजी ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालया’च्या आधुनिकीकरणाचा आराखडा प्रदर्शित केला. हा आराखडा तयार करण्याचे काम थायलंडस्थित ‘एचकेएस डिझायनर अ‍ॅण्ड कन्सल्टंट इंटरनॅशनल’ आणि अमेरिकेतील ‘दि पोर्टिको ग्रुप’ला देण्यात आले. ‘डायनॅमिक अर्थ’ या संकल्पनेवर आधारित या योजनेत ‘इंडियन ओशन’ म्हणून मोठा जलाशय साकारण्याचा पालिकेचा मानस होता. प्रदर्शित केलेल्या आराखडय़ावर तो स्पष्टपणे दाखविण्यात आला.

सुरक्षा करिअरमधील परिसंवादाला मिळाला लक्षणीय प्रतिसाद !
प्रतिनिधी

२६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याने अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा अधोरेखित झाला. घराच्या उंबरठय़ापासून सुरू होणाऱ्या सुरक्षेच्या समस्येने जीवनाच्या प्रत्येक पावलावरील सुरक्षेचे संदर्भ बदलून टाकले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही प्रशिक्षित व्यक्तींची मागणी प्रचंड वाढली आहे. सुरक्षा क्षेत्रात तरुणांना उच्च प्रतीच्या करिअरचे नवे दालन उघडण्यासाठी ‘झायकॉम’ व इस्रायलची आयएमआय अकादमी यांनी येथे आयोजित केलेल्या सुरक्षा करिअरमधील परिसंवादाला ठाण्यातील पालक आणि युवा वर्गाचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. दैनिक ‘लोकसत्ता’ या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.

‘फाटक्या’ पालिका प्रशासनामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले!
संदीप आचार्य

अनधिकृत झोपडय़ांमधून राहणारे लक्षावधी परप्रांतीय बेकायदेशीरपणे पाण्याचा भरपूर गैरवापर करीत असताना पाणीकपातीमुळे त्रस्त झालेल्या करदात्या मुंबईकरांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सध्या पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुखवटय़ामागच्या चेहऱ्यांचे चित्रप्रदर्शन!
प्रतिनिधी

प्रत्येक माणूस एक मुखवटा घालून वावरत असतो. हा मुखवटा जगाच्या दृष्टीने वेगळा असतो. मुखवटय़ामागे दडलेला चेहराही वेगळा असतो. कलाकार म्हणून मुखवटय़ामागची माणसे शोधण्याचा प्रयत्न चित्रकार स्वरूप बिश्वास यांनी केला आहे. मानवी जीवनाच्या आविष्काराचे विविध रंग विश्वास यांनी त्यांच्या चित्रांतून उलगडले आहेत. ठाणे कलाभवनमध्ये त्यांनी काढलेल्या, मनाला भिडणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन सध्या कापूरबावडी नाक्यावरील बिग बाझारजवळील ठाणे कलाभवनात भरले आहे. हे प्रदर्शन १८ जुलैपर्यंत असेल. कोलकाताच्या इंडियन कॉलेजमधून डिप्लोमा केलेल्या स्वरूप बिश्वास यांनी लखनौच्या शासकीय महाविद्यालयातून बॅचलर ऑफ फाईन आर्टची पदवी मिळविली. देश-विदेशात अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. ठाण्यात पहिल्यांदाच हे प्रदर्शन होत आहे.

संस्कृत नाटय़स्पर्धा आणि वक्तृत्वस्पर्धा
प्रतिनिधी

‘ऋतायन’ ही संस्कृत प्रेमींची संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभाग यांच्यातर्फे रविवार २ ऑगस्ट रोजी संस्कृत नाटय़स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील मराठी भाषा भवनात महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा गट आणि संस्कृतप्रेमी संस्थांचे गट अशा गटांमध्ये होणार आहे. प्रत्येक गटात सवरेत्कृष्ट नाटय़प्रवेश, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक यांना स्वतंत्रपणे पारितोषिके देण्यात येणार आहे.
तसेच शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय तसेच संस्कृत प्रमींचा खुला गट अशा तीन स्तरांवर ४ व ५ ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २० जुलै असून, अर्ज संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ, रानडे भवन, विद्यानगरी संकुल, सांताक्रूझ (पूर्व), आणि डॉ. किर्ती धोलकिया, सत्यम पॉलिक्लिनिक, १०१ ए, व्हर्टेक्स विकास, सर एम. व्ही. रोड, अंधेरी (पूर्व) या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ९८२०४४५७२६, ९८२१०७३५५६ किंवा ९८६९१०५१७८ वर संपर्क साधावा.

माटुंगास्थित चौकास स्वातंत्र्यसैनिक स्व. महादेवराव नानाजी शिंदे यांचे नाव
प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने माटुंगा रोड येथील चौकाचे स्वातंत्र्यसैनिक स्व. महादेवराव नानाजी शिंदे चौक असे नामकरण करण्याचा समारंभ नुकताच झाला. या वेळी नगरसेवक प्रकाश आयरे, संतोष परब, पंढरीनाथ तामोरे, जनार्दन पाटील, हराळे समाज प्रमुख अरविंदभाई पाटोळे, नागेश पाटील, हरिभाई पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम प्रभाग समितीचे अध्यक्ष हनुमंता नंदेपल्ली यांच्या अध्यक्षतेखाली झाला. स्वातंत्र्यसैनिक महादेवराव नानाजी शिंदे गुरूजी यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेने माटुंगा रोड येथील चौकास त्यांचे नाव देऊन गुरूजींच्या आदर्शवाजाचीच जपणूक केली आहे अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुभसंदेश पाठविला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने स्तुत्य कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. एकनाथ गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे, मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आदी मान्यवरांनी शुभसंदेश पाठविले आहेत.

प्रभाकर भाटलेकर यांचे व्याख्यान
प्रतिनिधी : हितवर्धिनी सभा या संस्थेच्या स्वा. सावरकर वाचनालयातर्फे व्यंगचित्रकार प्रभाकर भाटलेकर यांचे माझा साहित्यचित्र कलाविषयक व्यासंग या विषयावर शनिवार ११ जुलै रोजी व्याख्यनाचे आयोजन करण्यात आले आहे. उमा निळकंठ व्यायामशाळा येथे हे व्याख्यान होणार आहे. संपर्क- २५३८०११२.