Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

‘स्थायी’च्या सभापतिपदी संजय गाडे
‘महिला व बालकल्याण’ युतीकडे
नगर, ९ जुलै/प्रतिनिधी
महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक संजय गाडे विजयी झाले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी भाजपच्या सोनाबाई शिंदे व उपसभापतिपदी शिवसेनेच्या सीमा ठाकर यांना चिठ्ठीद्वारे संधी मिळाली.
मनपातील सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या गोटात असलेल्या किरण उनवणे यांनी ऐनवेळी विरोधी सेना-भाजपकडे उडी घेतली. त्यामुळे महिला बालकल्याण समितीत सत्ताधारी आघाडी व विरोधी युती यांचे समान संख्याबळ झाले. मतदानही समान झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली.

पैसे उकळण्यासाठी काविळीचे बनावट लसीकरण
साई सोशल ट्रस्टच्या नावाखाली भोंदूगिरी
नगर, ९ जुलै/प्रतिनिधी
ग्रामस्थांकडून पैसे उकळण्यासाठी ‘कावीळ ब’च्या शिबिरात भोंदू डॉक्टरांनी बनावट लसीकरण केल्याचा प्रकार उघड झाला. ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उघड झाला असला, तरी फसवणूक करणाऱ्या दोघा बनावट डॉक्टरसह तिघेजण मात्र पसार झाले. जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आज जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आसाराम खाडे यांचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधत कारवाई करण्याची मागणी केली.

मालमोटारीची स्कूटरला धडक;पिता व कन्येचा जागीच मृत्यू
राहाता, ९ जुलै/वार्ताहर

भरधाव मालमोटारीची स्कूटरला समोरून धडक बसून महाविद्यालयीन विद्यार्थिनी व तिचे वडील दोघेही जागीच ठार झाले. आज दुपारी अडीचच्या सुमारास लोणी-संगमनेर रस्त्यावर लोणीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हा अपघात घडला. मालमोटारीला समोर लटकलेली विद्यार्थिनी व स्कूटर तब्बल एक किलोमीटर चालकाने फरफटत नेली. संतप्त नागरिकांनी मालमोटारचालकास पकडून बेदम चोप दिला.

बहुरंगी लढतींविषयी पाथर्डीत उत्सुकता
पाथर्डी, ९ जुलै/वार्ताहर

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर प्रथमच होणारी विधानसभेची निवडणूक मातब्बर उमेदवारांमुळे तिरंगी, चौरंगी की पंचरंगी होते, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.पुनर्रचनेत तालुक्यातील तीनपैकी पाथर्डी व टाकळीमानूर मंडळांचा समावेश शेवगाव, तर करंजी मंडळाचा समावेश राहुरी मतदारसंघात झाला. त्यामुळे मतदारांचा हिरमोड झाला. मात्र, नव्या मतदारसंघात तालुक्यातील प्रस्थापित नेते रिंगणात उतरणार असल्याने सध्या मतदारसंघ विभाजनाचा विषय बाजूला ठेवून लढतीबाबत चर्चेवर भर दिला जात आहे.

शिक्षकांची बदली होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्धार
वाडेगव्हाण, ९ जुलै/वार्ताहर

पारनेर तालुक्यातील कडूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दर्जा घसरला असून, या बाबत संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकले. दरम्यान, शिक्षण विभागाचा कोणीही अधिकारी न फिरकल्याने आजही शाळा बंद ठेवण्यात आली.

जिल्हा बँकेच्या राहाता शाखेचे दि. १२ला उद्घाटन
विखेविरोधी वादाला नवे निमित्त!
राहाता, ९ जुलै/वार्ताहर
विखे विरुद्ध इतर सर्व या जिल्ह्य़ातील राजकारणाला दिवसागणिक नवे वळण लागत आहे. आता जिल्हा सहकारी बँकेच्या राहाता शहरातील नवीन शाखा कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे नवे निमित्त या वादाला लाभले आहे. रविवारी (दि. १२) हे उद्घाटन होणार आहे. आपल्याला विश्वासात न घेताच बँकेने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे शिक्षणमंत्री तथा बँकेचे संचालक राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

पाणीकपातीचे नियोजन करण्याच्या सूचना
धरणांचे क्षेत्र कोरडेच
कोपरगाव, ९ जुलै/वार्ताहर
नाशिक जिल्ह्य़ातील धरणांच्या क्षेत्रात पाऊसच नसल्याने धरणांमधील पाणीसाठे अल्प झाले आहेत. त्यामुळे पावसाळा असूनही पाणीटंचाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत पाणीपुरवठा कसा करायचा, याचे नियोजन पाटबंधारे खात्याकडून सध्या सुरू आहे.

‘अत्याचारित मुलीच्या सांगण्याप्रमाणेच फिर्याद’
नगर वासनाकांड खटला
नगर, ९ जुलै/प्रतिनिधी
अत्याचारित मुलीची फिर्याद लिहून घेताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले नाही. मुलीने सांगितल्याप्रमाणेच फिर्याद घेतली, असे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक रणजीत अभिनकर यांनी आज न्यायालयात सांगितले. येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्यासमोर नगर वासनाकांडाची सुनावणी सुरू आहे.

धार्मिक परीक्षा बोर्डातील प्रवचनासाठी मोफत बससेवा
नगर, ९ जुलै/प्रतिनिधी

चातुर्मासानिमित्त धार्मिक परीक्षा बोर्ड येथे सुरू असलेल्या प्रवीणऋषीजी यांच्या प्रवचनाला उपस्थित राहता यावे, यासाठी उपनगरातील भाविकांच्या सोयीसाठी आनंद ट्रॅव्हल्सतर्फे विनामूल्य बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवचनांसाठी सावेडी उपनगरातून मोठय़ा संख्येने भाविक येतात. त्यांच्यासाठी ही सोय करावी, अशी सूचना श्रीवर्धमान स्थानकवासी जैन सकल महासंघाच्या वतीने ट्रॅव्हल्सचे संचालक ईश्वर धोका यांना करण्यात आली होती.ही बस दररोज सकाळी साडेआठ वाजता वैदूवाडी येथून निघून सावेडी जकात नाका, परिचय हॉटेल, लेबर कोर्ट, दिल्ली दरवाजा, अमरधाम, टिळक रस्तामार्गे धार्मिक परीक्षा बोर्ड येथे येते. प्रवचन संपल्यावर ही बस याच मार्गाने भाविकांना सोडते. भाविकांनी मोफत बससेवेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मोबाईल ९४२२०८४७८१, ९३२५११५००५वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रा. पं. सदस्यास धमकी;सरपंचावर गुन्हा दाखल
खर्डा, ९ जुलै/वार्ताहर

येथील ग्रामपंचायत सदस्य व महिला काँग्रेसच्या जामखेड तालुकाध्यक्ष ज्योती गोलेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरपंच व भाजपचे तालुका सरचिटणीस राम भोसले, ग्रामविकास अधिकारी आर. एम. काळे यांच्यासह पाचजणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोलेकर यांनी या संदर्भात पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावच्या दलित वस्तीत झालेल्या काँक्रीट रस्ते व गटार कामाची माहिती जि. प.कडून मागितली होती. त्याचा राग धरून सरपंच भोसले, ग्रामविकास अधिकारी कळे, उपअभियंता गायकवाड, ठेकेदार बाळू धोत्रे व कांतिलाल डोके यांनी आपणास दुकानात येऊन ‘आमच्या कामात लुडबूड करू नका, नाहीतर तुम्हाला संपवून टाकू’, अशी धमकी दिली. दरम्यान, राजकीय वैमनस्यातून आपणावर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.

‘मुळा’च्या पेमेंटमुळे ऊसउत्पादकांना दिलासा
नेवासे, ९ जुलै/वार्ताहर
मुळा सहकारी साखर कारखान्याने सन २००८-०९ हंगामाचे सेकंड पेमेंट व त्यापूर्वीच्या हंगामाचे फायनल पेमेंट मिळून ७ कोटी रुपयांची रक्कम दिल्याने परिसरातील ऊसउत्पादकांना दिलासा मिळाला आहे. या हंगामामध्ये काही ऊसउत्पादकांनी उसाची अन्यत्र विल्हेवाट लावली होती. त्यांचे पेमेंट बँकेत वर्ग झाले नव्हते. अशा शेतकऱ्यांनी कारखान्याचे अध्यक्ष यशवंतराव गडाख यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या. कारखान्याने जादा ऊस असतानाही तोटा सहन करून या शेतकऱ्यांचा ऊस गळितास घेतला होता. मात्र, ऊसटंचाईच्या काळात त्यांनी ‘मुळा’ला उसाची नोंद देऊनही तो अन्य कारखान्याला दिला. यापुढे नोंदलेला ऊस मुळा कारखान्यालाच देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे अन्यत्र विल्हेवाट लावणाऱ्या सर्वच ऊसउत्पादकांचे फायनल व सेकंड पेमेंट संबंधित ऊसउत्पादकांच्या बँकखात्यावर वर्ग करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

औषध निर्माता, मिश्रकांचे न्याय्य वेतनश्रेणीसाठी धरणे
नगर, ९ जुलै/प्रतिनिधी

सरकारी आरोग्य सेवेतील औषध निर्मात्यांना (गट क) सहाव्या वेतन आयोगात अन्यायकारक वेतनश्रेणी दिल्याच्या निषेधार्थ शासकीय-निमशासकीय औषध निर्माता, मिश्रक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शैक्षणिकदृष्टय़ा उच्च अर्हता प्राप्त असूनही, तसेच जबाबदारी, जोखमीचे पद असून, औषध निर्मात्यांना निम्न स्वरुपाची वेतनश्रेणी देण्यात आली, अशी तक्रार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या संवर्गास प्रारंभिक वेतन ९ हजार ३०० - ३४ हजार ८०० लागू करावे, हकिम समितीच्या शिफारशीप्रमाणे पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, एकूण १० टक्के राखीव पदे निर्माण करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.संघटनेचे अध्यक्ष सॅमसन तेलधुते, उपाध्यक्ष नानासाहेब बनसोडे, सरचिटणीस रमेश तनपुरे, विकास गिते, सुषमा महातेरकर, प्रकाश भंडारी, एस. एन. सुकाळकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

आकार व थोरात यांचा सत्कार
कोपरगाव, ९ जुलै/वार्ताहर
साईतीर्थ कराटे असोसिएशनच्या भीमा आकार व सतीश थोरात या प्रशिक्षणार्थीचा संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने अमित कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भीमा आकार याने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत ७५ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावून ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे, तर सतीश थोरात याने ५४ किलो वजनगटात राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याची तिसऱ्या आशियाई इनडोअर गेम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावेळी के. बी. पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य आर. ए. कापगते, प्रा. व्ही. बी. झळके, प्रा. साहेबराव दवंगे, साईतीर्थ कराटे असोसिएशनचे प्रमुख सुदर्शन पांढरे उपस्थित होते.

कर्मचारी महासंघाची उद्या शिर्डीत बैठक
राहाता, ९ जुलै/वार्ताहर
सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी (दि. ११) शिर्डीत आयोजित करण्यात आली आहे.राज्य सरकारी कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत सरकारने ठेवलेल्या त्रुटी व प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. शिर्डीतील साईनाथ मंगल कार्यालयात ही बैठक होईल. बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष मुकुंद पालटकर, उपाध्यक्ष रणजितसिंह रजपूत, सरचिटणीस सुभाष गांगुर्डे व साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

नवीन रोहित्रासाठी शिवसेनेचे उपोषण
मिरजगाव, ९ जुलै/वार्ताहर

गावठाण हद्दीत नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसाचे उपोषण केले. पंचायत समिती सदस्य प्रतिभा लिंगडे यांच्या नेतृत्वाखाली केलेले हे उपोषण रोहित्राचे काम तीन दिवसांत सुरू करून पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सुटले. गावठाणातील सर्व सहा रोहित्रांवर प्रमाणापेक्षा जास्त भार आल्याने गावचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होतो. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी गावचा बराच भाग अंधारात असतो. कर्जतचे सहायक अभियंता यांनी खळगाव वेशेत रोहित्रास मंजुरी असून, त्याचे काम लगेच सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.

‘मनसे’च्या प्रयत्नांमुळे महिला कामगाराला भरपाई
नगर, ९ जुलै/प्रतिनिधी

एमआयडीसीतील युनिव्हर्सल कंपनीत काम करताना झालेल्या अपघातात बोटे गमावणाऱ्या कामगार महिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांमुळे कंपनीतर्फे नुकसानभरपाईपोटी २ लाख १५ हजार रुपयांची भरपाई मिळाली.राजेश्वरी प्रकाश गव्हाणे असे या महिलेचे नाव आहे. कंपनीचे संचालक निहार भरणे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश त्यांना देण्यात आला. मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ, कामगार सेनेचे चंद्रकांत ढवळे, डॉ. समर रणसिंग,धनंजय सप्तर्षी, अंकुश गर्जे, अनिरुद्ध टाक आदी या वेळी उपस्थित होते.अपघातानंतर कामगार न्याय्य हक्कांपासून वंचित राहतात. अशा कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे लवकरच मदत केंद्र सुरू करणार आहे, असे डफळ यांनी सांगितले.

धनादेश न वटल्याने दंडासह चार महिने कैद
नगर, ९ जुलै/प्रतिनिधी

धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने एका महिलेस चार महिने साधी कैद व ५३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश श्रीमती ए. एस. खडसे यांनी हा निकाल दिला. फिर्यादी वासन ऑटोमोबाईल्सच्या वतीने वकील सुरेश ठोकळ यांनी काम पाहिले. वासन ऑटोमोबाईल्सकडून मनीषा विलास काळे (रा. राशीन, ता. कर्जत) यांनी ट्रॅक्टर व अवजारे उधारीवर घेतली. श्रीमती काळे यांनी दिलेले धनादेश न वटल्याने न्यायालयात दावा दाखल करण्यात आला.न्यायालयाने श्रीमती काळे यांना दोषी धरून चार महिने साधी कैद व ५३ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

राजीव गांधी पतसंस्था फोडून नाणी लांबवली
नगर, ९ जुलै/प्रतिनिधी

पतसंस्थेचे कुलूप तोडून कपाटातील ९५३ रुपयांची नाणी चोरटय़ाने पळविली. हा प्रकार कापूरवाडी येथे घडला. भिंगार ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. कापूरवाडी येथे राजीव गांधी सहकारी पतसंस्था आहे. चोरटय़ाने दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सामानाची उचकापाचक करून ९५३ रुपयांची नाणी चोरून नेली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापक विजय शंकर रसाळ (३० वर्षे, रा. धनगरवाडी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली. तपास हवालदार भताणे करीत आहेत.