Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

संपावरील डॉक्टरांना नोटीसा
* रुग्णसेवा कोलमडली
* मेयोतील आरोग्य सेवा सुरळीत
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच असल्याने आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली. त्यातच आज औषधी निर्मातेही संपावर गेल्याने औषध वितरणासाठी परिचारिकांचे सहकार्य घेण्याची वेळ मेडिकल प्रशासनावर आली. मेयोतील निवासी डॉक्टर संपावर गेले नसल्याने येथील आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे. दरम्यान, येत्या चोवीस तासात कामावर रुजू व्हावे अन्यथा कामावरून कमी करण्यात येईल, अशी नोटीस संपावर गेलेल्या डॉक्टरांना पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन योजनांचा समावेश?
*वर्धामार्गावर लंडन-स्ट्रीट * वॉर्ड विकासासाठी स्वतंत्र निधी * नगरसेवकांचा निधी १० लाख
नागपूर, ९ जुलै/ प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात अनेक नवीन योजनांचा समावेश राहण्याची शक्यता असून त्यात वर्धामार्गावर लंडन-स्ट्रीटचे निर्माण, वॉर्ड विकासासाठी स्वतंत्र निधी आणि नगरसेवकांच्या निधीत वाढ आदींचा समावेश राहण्याची शक्यता आहे. नवा अर्थसंकल्प हा आयुक्तांच्या प्रस्तावित अर्थसंकल्पापेक्षा २०० कोटींनी अधिक राहणार आहे. सध्या महापालिकेला २००९-१० या वर्षाच्या अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष पुढील आठवडय़ात हा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.

‘द्विलक्षी’च्या आणखी ४०५ जागांवर प्रवेश
नागपूर, ९ जुलै/ प्रतिनिधी

केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीसाठी आज द्विलक्षी (बायफोकल) अभ्यासक्रमाच्या ४०५ जागांवर प्रवेश दिल्याने आतापर्यंत एकूण ८८६ प्रवेश देण्यात आले आहेत. प्रवेशाचा आजचा दुसरा दिवस होता. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या एकूण २,५५० जागा आहेत. त्यापैकी ४८१ जागांवर काल बुधवारी तर आज ४०५ जागांवर प्रवेश देण्यात आल्याने एकूण प्रवेशांची संख्या ८८६ झाली आहे. अजून १,६६४ जागा रिक्त आहेत.

दहा पाटबंधारे प्रकल्प मार्गी
मोहन अटाळकर

गेल्या दोन दशकांपासून अमरावती जिल्ह्य़ाच्या सक्रिय राजकारणात स्वतंत्र ठसा उमटवणारे मोर्शीचे आमदार हर्षवर्धन देशमुख यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सिंचनावर अधिकाधिक भर देऊन मोर्शी-वरूड भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या तीन वर्षात दहा पाटबंधारे प्रकल्प मार्गी लागले आणि बाराच्यावर कोल्हापुरी बंधारे तसेच लघु पाटबंधारे प्रकल्पांना मंजुरी मिळाली. १९९० मध्ये हर्षवर्धन देशमुख अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यांचा राजकीय प्रवास हा खाचखळग्यांनी भरलेला ठरला. एकवेळ त्यांना काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीपदाची संधीही मिळाली. गेल्या निवडणुकीत त्यांनी जनसुराज्य शक्ती या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली.

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा नियम कागदावरच!
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी

पाणी म्हणजे जीवन.. ते जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासन नेहमीच करीत असते. आताच्या संकटाच्या काळात तरी नागपूरकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन जलतज्ज्ञांनी पुन्हा एकदा केले आहे. दिवसेंदिवस पाण्याची कमतरता जाणवणार हे लक्षात घेऊन पालिकेने ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’चा नियम केला. याची अंमलबजावणी न करणाऱ्या इमारतींना प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले होते. तत्कालीन आयुक्त लोकेशचंद्र यांनी ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ची व्यवस्था करणाऱ्या इमारतींना, सोसायटय़ांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.

भारतीय भाषा संमेलनाचे आज उद्घाटन
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीतर्फे दुसरे तीन दिवसीय सर्व भारतीय भाषा संमेलन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.

राजभाषा मराठी
डॉ. के.रा. जोशी

नागपुरात दुसरे भारतीय भाषा संमेलन होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. त्याचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याद्वारा व्हावयाचा आहे. भारत स्वतंत्र होऊन साठाहून अधिक वर्षे लोटली पण, या स्वराज्यात स्वभाषांचे स्थान मात्र आपण योग्य तसे निर्माण करू शकलो नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. अलीकडे तर इतर क्षेत्राबरोबर शिक्षणात विदेशी इंग्रजीचा असा काही भडिमार सुरू झाला आहे की, अगदी शिशुवर्गापासून इंग्रजी व इंग्रजी माध्यमाचा वापर धडाक्याने वाढत आहे. इंग्रजी ही नुसती भाषा नाही तर तिच्या माध्यमातून समाजाच्या वागण्या-बोलण्यावर, वेषभूषेवर, विचारसरणीवर एकूण भारतीय जीवनपद्धतीवर विपरीत व घातक परिणाम होत आहे.

शिक्षक भारतीचा १४ जुलैला संप
४ ऑगस्टपासून बेमुदत संप
नागपूर, ९ जुलै/प्रतिनिधी
शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारतीच्या वतीने येत्या १४ जुलैला लाक्षणिक संप करण्यात येत असून, ४ ऑगस्टपासून बेमुदत संप करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आली आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना राज्य सरकारने शिक्षकांवर मोठा अन्याय केला आहे. त्यांना केंद्रीय वेतन श्रेणी नाकारण्यात आली आहे. एचआरए आणि टीए मध्ये कोणतीही वाढ दिली नाही.

कमलापूरची आश्रमशाळा गुरुदेव सेवा आश्रमकडे सोपवण्याची मागणी
२७ जुलैपासून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी
अहेरी तालुक्यातील कमलापूर या गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आदिवासीसाठी सुरू केलेली ‘गुरुदेव आश्रमशाळा’ गुरुदेव सेवा आश्रमकडे सोपवावी असे सरकारचे आदेश असतानाही माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम या आश्रमावर कब्जा करून बसले आहेत. आत्राम यांच्याकडून या आश्रमशाळेचे सर्व अधिकार काढून घ्यावे, या मागणीसाठी येत्या २७ जुलैपासून आझाद मैदानात व मंत्रालयासमोर गुरुदेव सेवा आश्रमाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती मंडळाचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण नारखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सफाई कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापण्याचा निर्णय
* राज्यातील ४० लाख कामगारांना दिलासा
* आमदार फडणवीसांनी मिळवले आश्वासन
नागपूर, ९ जुलै/प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून असंघटित क्षेत्रात असलेल्या सफाई कामगारांना राज्य सरकारने दिलासा देत या क्षेत्रातील सर्व कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या या निर्णयामुळे आता राज्यातील ४० लाख कामगारांना दिलासा मिळणार आहे.

‘३१ डिसेंबर’ चित्रपटासाठी रविवारी अभिनयाची चाचणी
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी

विदर्भातील कलावंतांना संधी मिळावी या उद्देशाने राईट व्हिजन इंटरनॅशनल फिल्म या संस्थेतर्फे ‘३१ डिसेंबर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून येत्या १२ जुलैला हिंदी मोरभवन सभागृहात ऑडिशन घेण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख प्रभाकर सुखदेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजकारण आणि दहशतवाद या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे लेखन प्रभाकर सुखदेवे यांनी केले आहे. सिद्धार्थ, व्हिवान आणि लक्की हे तीन सैनिक व राजकीय नेते दादासाहेब पाटील यांच्यात उडालेला संघर्ष हे चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण नागपूर, अमरावती व मुंबईला करण्यात येणार आहे. सुखदेवे यांनी यापूर्वी कलाकार्ज व अमोल पालेकरांसोबत ‘कृष्णकली’ या मालिकेत काम केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, गोविंद नामदेव व सचिन खेडेकर भूमिका करणार असून सिद्धार्थ जाधव यांनीही संमती दर्शविली आहे. सहभूमिकेसाठी विदर्भातील कलावंताना या चित्रपटात संधी मिळणार असून त्यासाठी हिंदी मोरभवनच्या सभागृहात १२ जुलैला अभिनयाची चाचणी घेण्यात येणार आहे. दिग्विजय जिचकार सहनिर्माता म्हणून काम पाहणार आहेत.

राष्ट्रीय विमा योजनेच्या प्रस्तावासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी

खरीप हंगामाकरता राज्यात राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय विमा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्ह्य़ातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असून या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना भाग घेता येतो. शेतकऱ्यांच्या सर्वसाधारण जादा पीक संरक्षित रक्कम (सरासरी) उत्पन्नाच्या १५० टक्केपर्यंत विमा उपलब्ध आहे. या योजनेत पेरणीपासून ते कापणीपर्यंत संरक्षण राहील. या योजनेत अल्प व अत्यल्प भूधारकांना विमा प्रिमियममध्ये १० टक्के एवढीच सबसिडी देण्यात आलेली आहे. बिगर कर्जदाराला पीक विमा प्रिमियम रक्कम बँकेत भरण्याची अंतिम मुदत पेरणीपासून एक महिन्याच्या आत किंवा ३१ जुलै २००९ यापैकी जे आधी असेल त्या तारखेपर्यंत भरता येईल. मुदतीनंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. सविस्तर माहितीकरता तालुका कृषी अधिकारी कार्यालय व नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदची निदर्शने
शिक्षण सेवकांना वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी

शिक्षण सेवकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १९९९ पासून शिक्षक सेवक योजना लागू केली असून राज्यात शालेय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग, नगर परिषद इत्यादी माध्यमातून चालणाऱ्या हजारो शाळांमध्ये शिक्षण सेवक कार्यरत आहेत. शिक्षण सेवकाला आजही तीन ते पाच हजार मानधनावर काम करावे लागत आहे. शिक्षण सेवकाला सहावा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही त्यामुळे त्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दीपक गोखले, दिलीप सुरकार, रंजना कावळे, सुदाम काकपुरे, सतीश भारत, तुलाराम मेश्राम, सुनील कोल्हे, मोतीराम अंबाडकर, ओंकार श्रीखंडे, ओमप्रकाश नाल्हे, अनिल गजभिये, श्रीकांत आगरकर आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

कामठी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला हवा
जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी
कामठी विधानसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसने उमेदवार उभा करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली. गेल्या दोन निवडणुकांपासून हा मतदारसंघ आघाडीतील मित्रपक्ष रिपब्लिकन पक्षाकडे आहे. यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. तसेच, सध्या भाजपचे आमदार असले तरी आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे रिंगणात असतानाही अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना उल्लेखनीय मते मिळाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच निष्ठेने काम केले आहे. या पाश्र्वभूमीवर हा मतदारसंघ आता काँग्रेसने घ्यावा आणि स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली. मुकुल वासनिक यांच्याकडेही शिष्टमंडळाने अशीच मागणी केली आहे, हे विशेष. शिष्टमंडळात माजी आमदार देवराव रडके, प्रदेश सरचिटणीस हुकुमचंद आमधरे, कामठीचे नगराध्यक्ष शकुर नागाणी, हुकुमचंद सिरिया, अंकुश बावनकुळे, प्रमोद मानवटकर, पुरुषोत्तम शहाणे, प्रेमलाल पटेल, बाबा महल्ले, सेवादलाचे इम्तियाज, राजकुमार गेडाम, नजिम कुरेशी, तुषार दावानी, भगवंतराव रडके, युवराज शहाणे, मेघराज गिऱ्हे, शेषराव ढेंगरे, मुश्ताक ठेकेदार, अहफाज अहमद, भाऊ मडके, नाना पुरोहित, गणेश घुले, नाना वाघ, कमलेश लोखंडे, बाबा ठाकरे आणि उमेश गिरी आदींचा समावेश होता.

पावणे आठ लाखांची भेसळयुक्त सुपारी जप्त
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी

अन्न व औषधे प्रशासनाच्या पथकाने कामठी मार्गावरील एका सुपारी व्यापाऱ्यावर छापा टाकून भेसळयुक्त सुपारी असल्याच्या शंकेवरून पावणे आठ लाख रुपयांचा मालजप्त केला. अन्न व औषधे प्रशासन राज्यमंत्री नसीम खान यांच्या खाजगी सचिवाच्या सूचनेवरून विभागाच्या पथकाने गुरुवारी नागपुरात ही तिसरी कारवाई केली. सुपारी व्यापारी राजू अण्णा यांचे कामठी मार्गावर गोदाम आहे. भेसळयुक्त माल त्यांच्याकडे असल्याची माहिती अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या पथकाला राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव शेख यांनी दिली. त्याआधारे विभागाचे निरीक्षक ए.एस. आठवले यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात हलक्या दर्जाची सुपारी असल्याचे पथकाच्या निदर्शास आले. पथकाने तात्काळ सर्व माल जप्त करून त्याचे नमुने परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवले, अशी माहिती सूत्रांनी दिली. तीन दिवसांपूर्वी नागपुरातील शीतगृहांवर छापे टाकून अळ्या असलेले दही जप्त करण्यात आले होते. त्याच दिवशी पाच लाख रुपयांची सुपारी जप्त केल्यानंतर आता परत तशीच कारवाई झाल्याने असा व्यापार करणाऱ्यांना धडकी भरली आहे.

मेडिकलमध्ये ‘स्वाईन फ्लू’चा आणखी एक संशयित रुग्ण
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आज स्वाईन फ्लूचा एक संशयित रुग्ण दाखल करण्यात आला. गेल्या एक महिन्यामध्ये मेडिकलमध्ये दाखल करण्यात आलेला स्वाईन फ्लूचा हा चौथा संशयित रुग्ण आहे. चिन्ना बोमया नागेली असे या रुग्णाचे नाव असून तो आंध्रप्रदेशातील करीमनगर येथील रहिवासी आहे. गेल्या तीन वर्षापासून नोकरीनिमित्त तो दुबई येथे राहत आहे. करीमनगर येथे जाण्यासाठी आज पहाटे २.३० वाजता तो विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याची तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याने घशात त्रास व अंगात ताप असल्याचे सांगितले. त्याला लगेच मेडिकलमध्ये पाठवण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतले.त्याच्या रक्ताचे आणि थुंकीचे नमुने घेण्यात आले असून ते पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. यापूर्वी अकोला, दुर्ग आणि भोपाल येथील संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्या रक्त आणि थुंकीच्या नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आल्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

चंडीपुराच्या बालरुग्णावर डॉ. माने यांच्याकडे उपचार सुरू
नागपूर, ९ जुलै/ प्रतिनिधी

शहरात चंडीपुरा आजाराचा एक संशयित बालरुग्ण आढळला असून त्याच्यावर बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद माने यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेने महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. प्रतीक हाडके (७ वर्षे) असे या बालकाचे नाव असून तो नारी येथील रहिवासी आहे. ताप आल्याने त्याला ३ जुलैला डॉ. मिलिंद माने यांच्याकडे उपचारासाठी आणले होते. ६ जुलैपर्यंत त्याच्यावर बाह्य़रुग्ण विभागात उपचार करण्यात करण्यात आले, मात्र तो उपचाराला काहीही प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले. लक्षणांवरून चंडीपुरा हा मेंदूज्वर झाला असावा असा संशय आल्याने डॉ. मिलिंद माने यांनी त्याला ७ जुलैला रुग्णालयात दाखल केले व तसा औषधोपचार सुरू केला. या औषधोपचाराला तो प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. त्याच्या रक्ताचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल दोन दिवसात येण्याची शक्यता आहे.नारी येथे चंडीपुराचा रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली. लगेच आज आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नारी येथे जाऊन फवारणी केली. तसेच या रोगास कारणीभूत असणाऱ्या ‘सॅण्डफ्लाय’ माशीचाही शोध घेण्यात आला. परंतु न सापडल्याने या परिसरात ही माशी नसल्याचा दावा मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

एमफक्टोचे १४ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन
नागपूर, ९ जुलै/ प्रतिनिधी

महाराष्ट्रातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षक महाराष्ट्र प्रश्नध्यापक महासंघाच्या (एमफक्टो) निर्देशानुसार १४ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाबरोबरच्या एमफक्टोची चर्चा फिसकटली असून संघटनेने शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध करीत हे आंदोलन पुकारले आहे. प्रश्नमुख्याने नेट-सेट पात्रता परीक्षा महाराष्ट्रातील प्रश्नध्यापकांवर चुकीच्या पद्धतीने लादण्याचा शासनाचा प्रयत्न हाणून पाडणे व सहाव्या वेतन आयोगाने शिफारस केलेली सुधारित वेतन श्रेणी प्रश्नध्यापकांना लागू करण्यासंबंधी हे आंदोलन असून राज्यातील सर्वच शिक्षक यात सहभागी होणार आहेत. शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात उच्च शिक्षण मंत्र्यांना व शिक्षण सचिवांना एमफक्टोने वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सुद्धा निवेदन देण्यात आले असून त्याचा काहीच उपयोग न झाल्याने बेमुदत काम बंदचा बडगा उभारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर व विद्यार्थ्यांच्या अभ्यावर दूरगामी परिणाम होतील, असा इशारा एमफक्टोचे सरचिटणीस एकनाथ कठाळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून दिला आहे.

ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय
नागपूर, ९ जुलै/प्रतिनिधी
महापालिकेच्या आरोग्य विभागातील २५ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांपैकी सतराच कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले असून उर्वरित कर्मचारी अजूनही नियमित होण्याची वाट पाहात आहेत. मात्र, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असून, कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप वार्ड सुधार कृती समितीचे अध्यक्ष असंघ रामटेके यांनी येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे. १८० रुपये रोजीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला महिन्यातील २० दिवसच काम मिळते त्यामुळे बाकीच्या दिवसांचे काय असा प्रश्न पडतो. रोज सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत बिकट परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदाही गणवेश मिळत नाही. तर, भर पावसाळय़ात रेनकोटशिवाय नाल्या, गटारे, ड्रेनेज व घाण साफ करावी लागते. या कर्मचाऱ्यांना विमा किंवा भविष्यनिर्वाह निधीसुद्धा नाही. १५ वर्षांपासून ऐवजदारीमध्ये कामे करूनही त्यांना कायम करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी वार्ड सुधार कृती समितीने केली आहे.

मोबाईल चोरी प्रकरणी दोन तरुणांना अटक
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी

शुक्रवारी झालेल्या मोबाईल चोरी प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून त्यापैकी एक व्यवसाय व्यवस्थापनाचा विद्यार्थी आहे. विशाल नारायण उराडे (रा़ मनीषनगर) व महेश राजेश कटारे (रा़ गोपालनगर) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रफुल्ल सुधीर अजागिया (रा़ रामनगर ) हा त्याच्या मित्रासह शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास लॉ कॉलेज चौकात गप्पा मारीत बसला असताना त्यांचे दोन मोबाईल व डिजिटल कॅमेरा असा एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केला आणि दोन्ही आरोपींना अटक केली. एक लॅपटॉप, ११ मोबाईल, एक डिजिटल कॅमेरा व २ सोन्याच्या साखळ्या असा एकूण १ लाख ७८ हजार ६०३ रुपयांचा ऐवज जप्त केला़ आरोपी विशाल उराडे हा कॅप्स कॉलेजमध्ये व्यवसाय व्यवस्थापनाचा विद्यार्थी असून तो व आरोपी महेश हे दोघे अट्टल घरफोडे निघाले.

‘डॉक्टरांनी रुग्णांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करावा’
नागपूर, ९ जुलै/प्रतिनिधी
डॉक्टरांनी रुग्णांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. विजय गेडाम यांनी व्यक्त केले. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राद्वारे डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिंतन सभागृहात ‘डॉक्टर्स डे’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य संस्थेचे प्रश्नचार्य डॉ. मनोहर पवार, डॉ. प्रेम कळसाईत उपस्थित होते.प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊनही डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी वेळेचे बंधन न ठेवता रुग्णांवर उपचार करण्याचे कार्य केले. प्रसंगी परिचारिकेचे सुद्धा कार्य त्यांनी केले, अशी माहिती याप्रसंगी डॉ. प्रबीरकुमार दास यांनी दिली. समाजातील सर्वच स्तरावर योग्य उपचार देण्याची गरज असून, डॉक्टरांनी नि:स्वार्थ सेवा करावी, असे आवाहन डॉ. दास यांनी केले. याप्रसंगी सेवानिवृत्त डॉ. प्रेम कळसाईत यांचा सत्कार डॉ. विजय गेडाम यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी ज्योती कन्नाके यांनी केले. डॉ. राहुल कन्नमवार यांनी आभार मानले.

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे निर्दशने
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन एकता मंचातर्फे युवक आघाडीचे अध्यक्ष नागेश सहारे यांच्या नेतृत्वाखाली झाशी राणी चौकात निर्दशने करण्यात आली.
लोकसभेची निवडणूक संपताच केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेल भाववाढ करून जनतेची आर्थिक पिळवणूक करीत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने बाजारातील दैनंदिनी गरजेच्या वस्तूंच्या भाव वाढलेले आहे. या भाववाढीने सरळ व्यापाऱ्यांचा फायदा होतो मात्र ग्राहकांना विशेषत महिलांना या भाववाढीचा त्रास सहन करावा लागत आहे. या निर्णयाचा यावेळी निषेध करून भाववाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन एकता मंचने केली. यावेळी भीमराव फुसे, सुधीर लांडगे, अशोक नगरारे, अरविंद वाळके, विवेक सहारे, शिरीष फुलझेले, वंदना भगत, रत्ना मेंढे, महानंदा पाटील, सुनंदा रामटेके, अरुणा शेंडे, रविकांत खांडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दादासाहेब लांबट यांना श्रद्धांजली
नागपूर,९ जुलै/ प्रतिनिधी
औद्योगिक कर्मचारी गृहनिर्माण संस्थेच्या सभेत अध्यक्ष दादासाहेब लांबट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. संस्थेने आयोजित केलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष गंगाधर वकील होते. लांबट यांनी केलेल्या सर्वागीण विकासाची संस्थेला नेहमीप्रमाणे उणीव भासत राहील, असे विचार संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आणि लांबट कुटुंबीयांचे सांत्वन केले.

आठवले गटाचे विदर्भातील जिल्हा निरीक्षक जाहीर
नागपूर, ९ जुलै/ प्रतिनिधी

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) मतदारसंघाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. याकरता राज्यातील सर्व जिल्ह्य़ात निरीक्षकांची निवड करण्यात आली आहे. विदर्भातील जिल्हा निहाय निरीक्षकांची सूची जाहीर करण्यात आली असून त्यानुसार भुपेश थुलकर (वर्धा), आर.एस. वानखेडे (नागपूर), भीमराव बन्सोड (भंडारा), पूरण मेश्राम (चंद्रपूर), अ‍ॅड. केशव धाबर्डे (गडचिरोली), अशोक मेश्राम (गोंदिया), ज्योती लांजेवार (अमरावती), माजी आमदार अनिल गोंडाणे (बुलढाणा), नाना रहाटे (यवतमाळ) यांची जिल्हा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
जिल्हा निरीक्षकांनी व जिल्हा अध्यक्षांनी विधानसभा मतदार संघाची चाचपणी करून दोन आठवडय़ात राज्य समितीकडे अहवाल पाठवावयाचा आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली असून पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात, असा बहुसंख्य कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. जिल्हा निरीक्षकांचा अहवाल प्रश्नप्त झाल्यावर त्यानुसार पक्षातर्फे निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

हलबा समाजातील विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण
नागपूर, ९ जुलै / प्रतिनिधी

रिजर्व बँक हलबा कर्मचारी संस्थेतर्फे नुकतेच ओम हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात हलबा समाजातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले. बी.पी. मौंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर, रिजर्व बँकेचे माजी कोषपाल एस.जी. धापोडकर, ओम हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.पी. जाने, सचिव दिनेश गिरी उपस्थित होते. प्रवीण भिसीकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक भास्कर चिचघरे व संचालन नीळकंठ कुंभारे यांनी केले. कोल्हे यांनी आभार मानले.