Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

जीवन दर्शन
पांडुलिपींची आगारे
जगात सर्वात जास्त हस्तलिखित ग्रंथांची संख्या इस्लामी पुस्तकांची आहे. मागील चौदा शताब्दीपासून अनेक कारणांमुळे कोटय़वधी ग्रंथ उद्ध्वस्त करण्यात आले; परंतु इस्लामच्या उदयकाळातील प्रारंभी पाचशे वर्षे असे होते की, त्यात शंभरहून अधिक थोर शास्त्रज्ञ जन्माला आले. त्यांनी एक हजारहून अधिक अशा वस्तूंचा शोध लावला. ज्या आजतागायत जशाच्या तशा जगाच्या प्रत्येक माणसाच्या वापरात आहेत. या शास्त्रज्ञांनी त्याच्या आविष्कारांवर शोधग्रंथ लिहिले. बगदादमध्ये खलिफा हारून रशीद याने ‘बैतुल हिकमत’ (विज्ञान गृह) ची स्थापना केली.

 

इस्लामी विद्वानांनी केवळ यूनानी (ग्रीस) च्या ग्रंथांचेच भाषांतर केले नाही. त्यांनी इराण, रोम आणि भारतीय ग्रंथांचा अरबी भाषेत अनुवाद करून दुर्लक्ष आणि कालबाहय़ होण्यापासून वाचविले. मुस्लिम शास्त्रज्ञांनी सुरुवातीपासूनच लिखाणाकरिता शास्त्रशुद्ध शैलीचा स्वीकार केला. त्यांचे अधिकतर ग्रंथ विज्ञानावर आधारित होते. वैद्यकशास्त्र, गणित, भूमिती, खगोल विज्ञान, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र इत्यादी त्यांच्या लिखाण आणि संशोधनाचे खास विषय होते. मिस्र (इजिप्त)चे राज्यपाल हजरत अम्र बिनल आस यांनी विज्ञानाविषयी लिखाणाला अधिक प्रोत्साहन दिले.
या पांडुलिपीत जे विषय हाताळण्यात आले आहेत, त्यांची शैली, प्रस्तुतीकरण इत्यादी बाबी जागतिक दर्जाच्या आहेत. या हस्तलिखितांची सर्वाधिक संख्या म्हणजे २,२३,८१४ तुर्कस्तानात, दोन लाख इराण आणि १,१६,२०४ इजिप्तमध्ये आहे. अमेरिकेत ३०,६३०, इंग्लंडमध्ये ४५,४७७, उजबेकिस्तान ३९,७४४, फ्रान्समध्ये ७३६, जर्मनीत २४,०१३, पाकिस्तानात ८८,४३१, तर चीनमध्ये यांची संख्या १६९३ इतकी आहे. एकशेचार राष्ट्रांत एकूण १५,४८,०१७ पांडुलिपी २१८८ ग्रंथालयांतून उपलब्ध आहेत.
अनीस चिश्ती

कुतूहल
अतिनील किरणे
अतिनील किरणांच्या वेधातून कोणत्या गोष्टींची माहिती मिळते?

अतिनील किरणांची तरंगलांबी दृश्य प्रकाशलहरींच्या तरंगलांबीपेक्षा अधिक असते. अतिनील प्रकाशलहरी या वातावरणाच्या वरच्या थरातील ओझोन वायूत शोषल्या जात असल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे अतिनील किरणांचा अभ्यासही प्रामुख्याने उपग्रहांद्वारे केला जातो. अतिनील खगोलशास्त्राची सुरुवात इ.स. १९६२ साली ‘ऑर्बिटिंग सोलर ऑब्झर्वेटरी’ या अमेरिकन उपग्रहाद्वारे झाली. या उपग्रहाने सौरप्रभेच्या अतिनील किरणांचा प्रथमच वेध घेतला. या उपग्रहाद्वारे सूर्याचे १५ वर्षे निरीक्षण केले गेले. यानंतर अवकाशात सोडण्यात आलेल्या विविध उपग्रहांनी सूर्यमालेतील ग्रह, धूमकेतू, तसेच आकाशगंगेतील तारे, आंतरतारकीय वायू व धूळ, त्याचप्रमाणे दीर्घिका, किंतारे यासारख्या आकाशगंगेबाहेरील स्रोतांचा अतिनील किरणांच्या माध्यमातून वेध घेतला.
इ.स. १९७८-९६ या काळात कार्यरत असणाऱ्या ‘इंटरनॅशनल अल्ट्राव्हॉयोलेट एक्स्प्लोरर’ या उपग्रहाने विविध स्रोतांच्या सुमारे १,०४,००० वर्णपटांची नोंद केली आहे. आंतरतारकीय वायूतील बहुसंख्य अणूंच्या आणि आयनांच्या अवशोषण रेषा अतिनील तरंगपट्टय़ात आढळून येतात. या वायूची रासायनिक जडणघडण, तसेच त्याची गती यांचा अभ्यास या निरीक्षणांतून करता येतो. अतिनील वर्णपटांतून ग्रहांवरील वातावरणाविषयीही माहिती मिळते. मंगळाच्या वातावरणातील हायड्रोजनच्या रेणूंच्या अस्तित्वाचा शोधही अतिनील वर्णपटातून लागला. अतिनील किरणांच्या निरीक्षणातूनच हॅली, तसेच धूमकेतूच्या संपूर्ण रचनेची, तसेच त्यांच्या रासायनिक जडणघडणीची माहिती मिळाली आहे. सौरवाऱ्याप्रमाणेच उष्ण ताऱ्यांमधूनही वाऱ्याच्या स्वरूपात आयनिभूत कण सतत बाहेर पडत असतात. या कणांच्या अतिनील उत्सर्जन रेषांच्या अभ्यासातून या वाऱ्याचे स्वरूप, तसेच ताऱ्याच्या उत्क्रांतीविषयी अनुमान काढता येते. उष्ण ताऱ्यांभोवती असलेल्या तेजोमेघांच्या उत्सर्जन वर्णपटावरून त्यातील कार्बन व इतर मूलद्रव्यांचे प्रमाण समजू शकते. दीर्घिकेच्या अतिनील वर्णपटावरून तिच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराचे वस्तूमानही मोजणे काही वेळा शक्य होते.
वर्षां चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२ दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिन विशेष
जी. ए. कुलकर्णी

गुरुदास आबाजी कुलकर्णी मराठी साहित्य जगतात ‘जी.ए.’ या नावाने ओळखले जात होते. त्यांचा जन्म बेळगावात १० जुलै १९२३ रोजी झाला. महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरील धारवाड जिल्हय़ात इंग्रजीची प्राध्यापकी करणाऱ्या जी.एं.चे ग्रीक आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते. परिणामी लेखनाची सुरुवात या भाषांतील साहित्यांच्या अनुवादानेच झाली. १९७० ते १९८० च्या दशकात त्यांच्या लघुकथांनी मराठी साहित्य जगतात खळबळ माजवली. ‘निळा सावळा’, ‘पारवा’, ‘हिरवा रावा’ आणि ‘रक्तचंदन’ हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह.
त्यांच्या कथांचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. त्यातील पहिला भाग हा सामाजिक वास्तवाचे चित्रण, तर दुसरा कल्पनेच्या विश्वात रमणारे लेखन. ‘काजळ माया’ यातील कथांतून त्यांचा कल्पनाविस्तार फुलतो. त्यांच्या समकालीन लेखकांनी त्यांच्या साहित्यावर जरा टीका केली असली तरी त्यांच्या कथेचे स्वतंत्र अस्तित्व मात्र मान्य केले.
जी.ए. लोकांमध्ये फारसे मिसळत नसत. इतकेच काय तर साहित्याचे मेळावे, प्रसिद्धी यापासून ते नेहमीच चार हात दूर असत. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. ११ डिसेंबर १९८७ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
शैलेशची मुलाखत
नुकतीच पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शैलेशने दोन ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले होते. त्याला खात्री होती की, दोन्ही ठिकाणी आपण मुलाखतीत उत्तीर्ण होऊन निवडले जाऊ. आपण उत्तम मार्क मिळवले आहेत. सचोटी, इमानदारी, कष्ट करण्याची वृत्ती आणि बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत. मग आपण कसे फेटाळले जाऊ?
एका नोकरीच्या मुलाखतीचा निकाल जाहीर झाला. शैलेशला उत्तम पगारावर नोकरी मिळाली. दुसऱ्या मुलाखतीचा निकाल पाहून मात्र त्याला धक्का बसला. त्याची निवड झाली नव्हती. त्याला अपात्र ठरवले गेले होते. शैलेश अस्वस्थ झाला. मुलाखतीला आपण कोणता पोषाख घातला होता, आत चालत कसे गेलो, नमस्कार कसा केला, त्यांनी सांगितल्यावर बसलो का आधीच बसलो, ते त्याने आठवून पाहिले. त्यात काय बदल करायला हवा त्याचा विचार केला. सगळे प्रश्न आठवून त्यांची उत्तरे तपासून पाहिली. सामान्यज्ञानाची पुस्तके अभ्यासली.
काही दिवसांनी त्या कंपनीची जाहिरात दिसल्यावर शैलेशने पुन्हा अर्ज केला. मुलाखतीला गेल्यावर समोर पाहतो तो तेच लोक पुन्हा मुलाखत घेण्यासाठी होते. त्यापैकी एकाने शैलेशला विचारले, ‘अरे तरुण माणसा, तू यापूर्वी मुलाखतीला आला होतास ना? मला चांगले आठवतेय, तुला मुलाखतीच्या वेळी मी प्रश्न विचारले होते.’ शैलेश नम्रपणे म्हणाला, ‘होय सर. मी यापूर्वी इथे मुलाखतीसाठी आलो होतो. आपली आठवण बरोबर आहे. पण त्यावेळी मला निवडले गेले नाही. मी यापूर्वी का निवडला गेलो नाही याचा विचार मी केला आहे. त्यात सुधारणा करून अधिक चांगल्या प्रकारे तयारी करून मी आत्मविश्वासाने आलो आहे. आपण माझी मुलाखत घ्यावी अशी विनंती आहे.’ मुलाखत झाली. तुला निकाल कळवला जाईल, असे शैलेशला मुलाखत घेणाऱ्यांपैकी एकाने सांगितले. शैलेश म्हणाला, ‘सर, निकालात जर मला निवडले गेले नाही तर मी पुन्हा अर्ज करेन. माझी निवड होईपर्यंत मी प्रयत्न करत राहीन. स्वत:मध्ये अधिकाधिक सुधारणा करून परत येत राहीन.
शैलेशला निवडले गेले. तो येऊन अधिकाऱ्यांना भेटला. त्यांचे आभार मानून आदबीने तो म्हणाला, ‘आपण माझी निवड केलीत याबद्दल धन्यवाद! मला उत्तम नोकरी आहे. मी इथे काम करू शकणार नाही. पण सर, अपयश स्वीकारणे मला पटत नाही म्हणून मी पुन्हा मुलाखतीस आलो. माझी योग्यता माझ्या नजरेत मला सिद्ध करायची होती. स्वत:साठीच!
आयुष्यात कधी हार मानायची नसते. पुन:पुन्हा प्रयत्न केल्यास आपण आपल्याच नजरेत स्वत:ची प्रतिमा उंचावू शकतो.
आजचा संकल्प : मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com