Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९


नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पाऊस उघडला खरा, पण काळ्या ढगांनी आकाशात दाटी केल्याने वातावरण कुंद झाले होते. गोदाकाठावरून तर या कृष्णमेघांची छाया अधिकच गडद दिसत होती. छाया : विवेक बोकील

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव सुरूच
प्रतिनिधी / नाशिक

उत्तर महाराष्ट्रात आपले अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करण्याचा श्रीगणेशा करणाऱ्या मान्सूनने गुरुवारी पुन्हा एकदा ‘ब्रेक’ घेतला असून गेल्या तीन ते चार दिवसापासून घडणाऱ्या या घडामोडींमुळे सध्या पावसाचा जणू लपंडाव सुरू असल्याची अनुभूती येत आहे. नाशिकसह धुळे, व नंदुरबार जिल्ह्य़ात पावसाने उघडीप घेतल्याच्या परिणामी आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.

घंटागाडी फसवणूकप्रकरणी ठेकेदाराच्या चौकशीचे निर्देश
गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी होणार : गृह राज्यमंत्री

प्रतिनिधी / नाशिक

नाशिक महापालिकेतील घंटागाडी कामगारांची फसवणूक करून त्यांच्या नावे घंटागाडय़ा खरेदीसाठी बेमालूमपणे कोटय़वधीचे कर्ज उचलल्याप्रकरणी रामराव पाटील चौधरी या ठेकेदाराची गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नसीम खान यांनी दिली. पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी नसीम खान यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पालिका स्थायी समिती सभेत आयुक्तांच्या कार्यशैलीवर टीकेची झोड
प्रतिनिधी / नाशिक

महापालिकेचे प्रभारी आयुक्त विलास ठाकूर हे केवळ आपल्या सोयीचे विषय कार्योत्तर मंजुरीसाठी पाठवत असून नागरिहिताच्या कामांना त्यांनी दुय्यम स्थान देण्याची परंपरा कायम ठेवल्याचा आरोप करत गुरूवारी आयोजित स्थायी समितीची सभा सदस्यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीचा निषेध करून तहकूब करण्याचा निर्णय घेतला. पालिका आयुक्तांना शह देण्यासाठी यापुढील काळात त्यांच्या विषयांना मंजुरी दिली जावू नये म्हणून सभा वारंवार तहकूब करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सदस्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रभारी आयुक्तांविरोधातील लढा अधिकच तीव्र स्वरूप धारण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रभारी आयुक्त महापालिकेत जेवढे दिवस गैरहजर राहिले, तेवढे दिवस त्यांच्या वेतनात कपात करावी, असे पत्र लेखा विभागाला दिले जाणार असल्याचे स्थायीच्या सभापतींनी सभा तहकूब झाल्यानंतर सांगितले.

टेन्शन = दहावी
तसं तर आजकाल अगदी दुसरी, तिसरीची छोटी छोटी मुलं, आईला सांगतात ‘आई मला टेन्शन आलंय’, तेव्हा मजा वाटते ऐकायला. पण आता तर मला असं वाटायला लागलंय ती मुलं दहावीची तयारी करत असतात. नाही तर त्यांना काय करायचंय टेन्शन?
या वर्षीच्या दहावीच्या मुलांची मस्तच तारांबळ उडवलीये या प्रशासनाने किंवा व्यवस्थेने म्हणुया. एकटय़ा प्रशासनाला क्रेडीट दिलं, तर पुन्हा नवा घोळ करतील. सगळ्यांचा बरोबरीचा वाटा आहे. खरच अगदी दहावीची शाळा सुरू झाल्यापासून पहिल्याच महिन्यापासून सगळी गडबड सुरू झाली.

‘मायको फोरम’ च्या वेलीवर कविवर्य सुर्वे वाचनालयाचे फुल
आपण समाजाचे काही तरी देणं लागतो, सामाजिक बांधिलकी जपणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजणारे अगदी बोटावर मोजण्याइतके दिसतात. अशा विचारांनी प्रेरित झालेल्या मंडळींनी एकत्र येत नाशिकमध्ये ‘मायको एम्प्लॉईज फोरम’ संस्थेची स्थापना केली. संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले. ‘कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय’ हा त्यापैकीच एक. सुर्वेंच्या नावाने वाचनालय, ही कल्पनाच अफलातून.

वेतनश्रेणीप्रश्नी औषध निर्मात्यांचे धरणे आंदोलन
नाशिक, ९ जुलै / प्रतिनिधी

शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या औषध निर्मात्यांच्या वेतनश्रेणीतील अन्याय दूर करण्यासाठी शासकीय-निमशासकीय औषधनिर्माता संघटनेच्या स्थानिक शाखेच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. या आंदोलनात शासकीय आरोग्य सेवेतील जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाबरोबर नाशिक महापालिका, जिल्हा परिषद व प्राथमिक आरोग्य केंद्रातील शेकडो औषधनिर्माता सहभागी झाले होते.

गौतमी प्रकाशनतर्फे उद्या ‘नर्मदा परिक्रमा-एक अंतर्यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन
नाशिक / प्रतिनिधी

येथील गौतमी प्रकाशन संस्थेतर्फे कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने भारती ठाकूर लिखीत ‘नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज स्मारक मध्ये होणार आहे. यानिमित्ताने शनिवारी व रविवारी दोन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. प्रकाशन समारंभात कवयित्री डॉ. अरूणा ढेरे यांचे ‘स्त्रियांची अंतशक्ती व त्याचे दिसणारे आविष्कार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. आत्माराम पवार यांचा ‘औषधाची ऐशी की तैसी’ हा मनोरंजनात्मक पण औषधांबाबत जनजागृती करणारा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमास रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गौतमी प्रकाशनच्या निषाद देशमुख यांनी केले आहे.

ग्राहक पंचायतीची तक्रार
भारत गॅसचा दावा दिशाभूल करणारा
नाशिक / प्रतिनिधी

नंबर लावल्यास २४ तासात गॅस सिलींडर घरपोहोच देण्यात येतो, हा भारत गॅसचे विभागीय व्यवस्थापक पी. के. सक्सेना यांनी केलेला दावा ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे, अशी तक्रार नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे विलास देवळे यांनी केली आहे. सिलींडर संपल्यावर भारत गॅस वितरक २१ दिवस ग्राहकास प्रतिक्षा नंबर लावण्यास नकार देतात. त्यानंतर नंबर लावल्यास पाच ते १५ दिवसांनी सिलींडर देण्यात येतो, म्हणजेच दुसरा सिलींडर रिकामा झाला, तरीही सुमारे २० ते ४० दिवसांनी रिफील सिलींडर देण्यात येतो. ग्राहकांनी त्यांच्याकडे दुसरा सिलींडर रिकामा असेल तर त्वरित प्रतिक्षा नंबर लावण्याचा आग्रह धरावा व नंबर लावण्यास नकार दिल्यास लेखी तक्रार करावी, असे आवाहन ग्राहक पंचायतीचे विलास देवळे, अनिल नांदोडे, सुरेश पाटील, शंकर मुळे, सुहासिनी वाघमारे, मधुकर कुऱ्हाडे, नितीन घाटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी ९४२२२६६१३३, ९८८१०८००१३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

संस्कार भारतीतर्फे उद्या कर्तृत्ववान गुरूशिष्यांचा सत्कार
नाशिक / प्रतिनिधी

येथील संस्कार भारतीच्या टिळक समितीतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त उद्या १० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता शहरातील कर्तृत्ववान माता व कन्या तसेच गुरू-शिष्य जोडय़ांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमात प्रारंभी पनवेल येथील सुनीता खरे यांचे ‘गुरू-शिष्य परंपरा’ विषयावर कीर्तन होणार आहे. त्यानंतर डॉ. सुनंदा गोसावी-डॉ. दीप्ती देशपांडे, संजीवनी कुलकर्णी-सुमुखी अथनी, शशीकला वैशंपायन-विद्या ओक यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्कार भारतीच्या टिळक समितीच्या सहसचिव वृंदा गुडसुरकर, सचिव मेघना बेडेकर यांनी दिली. कलारसिकांसाठी हा खास कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमात रसिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या संयोजकांनी केले आहे.

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना कर्ज वाटप
नाशिक / प्रतिनिधी

महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना घर बांधणी, दुरूस्ती व प्लॉट खरेदीसाठी कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप महापौर विनायक पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेतील १६८ जणांना हे पत्र देण्यात आले. यावेळी उपमहापौर अजय बोरस्ते, स्थायी समिती सभापती संजय बागूल, सतीश खडके, आर. एम. बहिरम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कोंडीराम पवार आदी उपस्थित होते. बोरस्ते यांनी अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य असून कर्जाची प्रक्रिया सुटसुटीत असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. महापौर पांडे यांनी कर्जासाठी दलाली मागण्यात येत असल्याच्या गंभीर तक्रारी आल्या असून त्यांची दखल घेण्यात आल्याचे सांगितले. मंजुरी पत्र कर्मचाऱ्यांकडे देऊन त्यांच्या खात्यावर धनादेश दिले जातील अशी प्रथा सुरू करीत आहोत. दादागिरी, दडपशाही सहन करू नका, त्याची तक्रार मांडा, असे आवाहनही त्यांनी केले. भरघोस सानुग्रह देणार असल्याचेही ते म्हणाले.