Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

वृत्तान्त इफेक्ट
प्रांताधिकाऱ्यांनी घेतला तलाठय़ांचा मार्गदर्शन वर्ग

वार्ताहर / अमळनेर

तालुक्यातील तलाठय़ांच्या गलथान कारभाराविषयी ‘उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त’मधून वृत्त प्रकाशित होताच प्रांताधिकारी डॉ. अर्जुन चिखले यांनी त्याची दखल घेत तलाठय़ांनी कामकाज कसे करावे, याविषयी मार्गदर्शन वर्ग घेतला.

..आता पतसंस्था चालकही आक्रमक
२० जुलैपासून कार्यालयांना टाळे लावण्याचा इशारा

वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच सहकारी पतसंस्थांच्या ठेवीदारांनी पैसे परत मिळविण्यासाठी आंदोलनांची मालिका सुरू केली असतानाच येथील पतसंस्था चालकांनीही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पतसंस्थांना दीर्घ मुदतीचे कर्ज अर्थात पॅकेज द्या, थकबाकी वसुलीसाठी मार्ग काढा आदी मागण्यांसाठी २० जुलैपासून पतसंस्थांना कुलूप ठोकणार व मुख्यमंत्र्यांकडे चाव्या सोपविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जमिनीच्या तंटय़ातून महिलेचा खून
शहादा / वार्ताहर

धडगाव तालुक्यातील पठाली येथे वनअधिकाराच्या तंटय़ातून जेरमीबाई मोरे (६२) या वृद्धेचा खून करण्यात आला. केवळ पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच वृद्धेचा बळी गेला, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.


नांदेड येथे आयोजित नवव्या राज्यस्तरीय वरिष्ठ इनडोअर क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या नाशिक संघाचा कर्णधार आशीर्वाद पवारचा नाशिक एन. जी. ओ. फोरमतर्फे सत्कार करताना समन्वयक मुक्तेश्वर मुनशेट्टीवार. समवेत राजाभाऊ जाधव, अविनाश पाटील, डॉ. रत्नाकर पवार आदी.


धुळे शहरात एकीकडे पावसाचे स्वागत होत असताना महापालिकेचे अमोघ ‘कर्तृत्व’ही पावसामुळे उघडे पडण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक रस्त्यांची वाताहात झाली असून एखादा खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार दुसऱ्या खड्डय़ात जाऊन पडत आहेत. महापालिकेने पावसाळ्याआधीच रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. छाया : मनेश मासोळे

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून सावरकर स्मारकाची पाहणी
भगूर / वार्ताहर

नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. व्ही. गमे यांनी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन स्मारकातील चित्रप्रदर्शनांची पाहणी केली. सावरकरांनी १९१० मध्ये सुटकेसाठी फ्रान्सच्या समुद्रात जहाजातून उडी मारली होती. या घटनेची आजपासून शताब्दी सुरू होत आहे. या पाश्र्वभूमिवर अतिरिक्त जिल्हाधिकारी गमे व निफाडचे उपविभागीय अधिकारी पी. एम. बोरुडे यांनी सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी सावरकर यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन त्यांनी स्मारकातील दुसऱ्या दालनात उभारण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनांची पाहणी केली. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी स्वागत केले. त्यानंतर गमे यांनी बलकवडेंच्या नागरी पतसंस्थेला भेट दिली. पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक दीपक बलकवडे, मुख्याधिकारी डॉ. मेनकर, पालिकेचे मुख्य लिपीक लक्ष्मण टोपले, चेतन बलकवडे, काशिनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

अत्यल्प पावसामुळे शेतकरी हवालदिल
हरसूल / वार्ताहर

पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरसूल परिसरात आतापर्यंत पावसाने अल्प हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी जूनमध्ये परिसरात दमदार पाऊस होतो. भात, नागली, वरई पिकांची लावणी करून शेतकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना होत असत. परंतु यंदा अद्याप लावणीलाही सुरूवात झालेली नाही. चिंचपाडा, चिखलपाडा, तोरंगण, निरगुडे आदी गावांमध्ये तर बिकट परिस्थिती आहे. हरसूल, ठाणापाडा खरशेत, ओझरखेड, मूलवड या परिसरातील शेतकऱ्यांसाठी एकाही लोकप्रतिनिधीने शासन दरबारी समस्या मांडल्या नसल्याची खंतही व्यक्त केली जात आहे. पाणी टंचाईग्रस्त गावातील टँकरही बंद करण्यात आल्याने निसर्गाबरोबर त्र्यंबक पंचायत समितीही अन्याय करीत असल्याने टंचाईग्रस्त गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

बोरीसमधील बांधकामातील गैरव्यवहार
चौकशीस ग्रामपंचायतीची तयारी
धुळे / वार्ताहर

तालुक्यातील बोरीस येथे बांधण्यात आलेल्या महिला कार्यशाळा इमारत बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तयार आहोत, मात्र राजकीय द्वेषाने प्रेरीत होऊन पत्रक काढणाऱ्यांवर कसा विश्वास ठेवणार, असा सवाल ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील यांनी पत्रकान्वये केला आहे. सदर बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा फक्त वैयक्तिक द्वेषापोटी केला जात आहे. बोरीस येथे बांधण्यात आलेल्या कार्यशाळा इमारतीच्या बांधकामाची चौकशी शासनाने करून त्यात दोषी आढळल्यास योग्य त्या कारवाईस आपण तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.