Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

घडामोडी
नागपूर
नासक्या दह्य़ासह पचवल्या अळ्याही!

 

ऐन सणावारांचा आरंभकाळ तोंडावर आलेला असतानाच नागपुरात अलीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून एक जळजळीत सत्य उघडकीस आणले आहे. त्यामुळे सणावारांची चाहूल आणि त्यानिमित्ताने घराघरातून पसरणाऱ्या पंचपक्वानांच्या घमघमाटाने आतापासूनच पाणावलेली तोंडे काहीशी शिसारी आल्यागत झाली आहेत.
अलीकडेच शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने घाट रोडवरील दोन शीतगृहांवर छापे टाकून तब्बल ३६ लाख रुपये किमतीचे साडे आठ हजार पिंप दही जप्त केले. वर्षभरापासून ठेवलेल्या या दह्य़ात अक्षरश: अळ्या पडलेल्या आढळून आल्या. यामुळे साऱ्या नागपूरकरांचे डोळे खाडकन् उघडले. आजवर आपण असे शीतगृहांमध्ये वर्ष, सहा सहा महिने गंजलेल्या पिंपामधले अळ्या असलेले दही चवीने ओरपत होतो, या कल्पनेनेच त्यांची पोटे डचमचळू लागलेली आहेत. परंतु, यासोबतच या छापासत्रामुळे समस्त नागरिकांच्या प्रत्यक्ष जीवाशीच खेळणाऱ्या एका टोळीचा छडा लागला, याचे समाधानही नागपूरकरांना आहे. हे असेच सुरू राहिले असते तर आपणही डोळेझाकपणे असले दूषित दही मिटक्या मारत ओरपत आनंदाची ढेकर देत राहिलो असतो, या समाधानाची किनार त्याला आहे.
प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण भारतातून नागपुरात मोठय़ा प्रमाणावर दही आणून वर्ष-सहा महिने घाट रोडवरील दोन शीतगृहांमध्ये साठवून ठेवले जाते. साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दह्य़ाचे उत्पादन अधिक असते म्हणूनच कमी किमतीत ते मोठय़ा प्रमाणात खरेदी करून साठवून ठेवले जाते. हे दही शीतगृहांमध्ये ठेवून नंतर वर्षभर ग्राहकांना विकले जाते, अशी माहिती या खात्याच्या मुंबईतील अधिकाऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी नागपुरात येऊन गुप्तपणे सारी चौकशी केली. घाट रोडवरील राजलक्ष्मी कोल्ड स्टोरेज आणि नागपूर कोल्ड स्टोरेज या कारखान्यांवर पाळत ठेवून माहिती गोळा केली. या कारखान्यांमधून १५ किलो वजनाच्या टिनाच्या पण गंजलेल्या पिप्यांमधून हे साठवलेले दही शहरात वितरित केले जाते, याची खातरजमा करून तसे वरिष्ठांना कळवले. मुंबईहून अन्न व औषध निरीक्षक के.जी. गोरे आणि वेदपाठक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या दोन्ही कारखान्यांवर छापे मारून अखेरीस साडे आठ हजार पिंप दही म्हणजे ३६ लाख रुपयांचा हा दूषित माल जप्त केला. जुलैमधील नागपंचमीपासून तशी सणावारांना सुरुवात होते. त्या निमित्तानेही हे दही मोठय़ा प्रमाणावर नागपूरकरांच्या घशाखाली उतरवले जाणार होते.
या अधिकाऱ्यांनी जेव्हा या शीतगृहांवर छापे टाकले तेव्हा अळ्या वळवळत असलेल्या या दह्य़ांचे पिपे एकजात गंजलेले होते. शीतगृहातील वातावरण इतके गलिच्छ आणि दरुगधीयुक्त होते की, या छापेसत्रातील काहींना उलटय़ा झाल्या. या छापेसत्राने संबंधित व्यापारी वर्तुळातही कमालीची खळबळ माजली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. या पिप्यांवर ना उत्पादनाची तारीख होती, ना ते नागपुरात कोठून आले, याचा उल्लेख.
दह्य़ासारखा दुग्धजन्य पदार्थ एरवीही घरी विरजण टाकल्यावर तीन-चार दिवस राहिल्यास त्यात अळ्या पडू लागतात. येथे तर वर्षभर त्याचा साठा करण्यात आल्यावर या दह्य़ाचा दर्जा लक्षात यावा. एरवीही अन्नपदार्थातील भेसळीबाबत ग्राहक संघटना कानीकपाळी जनजागृती करीत असताना कुणाही शहाण्या नागरिकाला त्याची किमान दक्षता घ्यावीशी वाटत नाही. संबंधित व्यापाऱ्यांनी तर काही बोध घेण्याचा प्रश्नच नाही. आपल्या पोटावर जर त्यांची पोटे वाढणार असतील तर ते या जनजागृतीकडे बघणार नाहीत. तीन वर्षांपूर्वीही अशाच गलिच्छ दर्जाचे साडे सोळा लाख रुपये किमतीचे दही जप्त करण्यात आल्याची माहिती आता पुढे येत आहे. काही महिन्यांपूर्वी वर्धमाननगरातील एका मसाल्याच्या कारखान्यावर छापे टाकून भुशाची पोती, लोखंडाचा चुरा, कृत्रिम रंग व असलेच भेसळीसाठी बेमालूमपणे वापरले जाणारे पदार्थ जप्त करण्यात आले होते. दुधात आणि दह्य़ाच्या लस्सीत सर्रास आरारोट, तिखट आणि मसाल्यात लाकडाचा रंगवलेला भुसा टाकला जातो, हे माहिती असूनही त्याची खातरजमा आम्ही सुशिक्षित करीत नाही. पावसाळ्याशिवाय वेळी-अवेळी पोटांचे, अतिसाराचे, उलटय़ांचे आजार बळावण्याचे हेही एक कारण असावे, असा संशय आता निर्माण झाला आहे.
हे सारे जनहिताच्या दृष्टीने खरोखर बहुमोलाचेच झाले पण, याच खात्याच्या स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा मागमूस कधीच कसा लागला नाही आणि लागला तर इतके वर्षे हा जनतेच्या जीवावर उठणारा धंदा कसा काय निविघ्नपणे चालू राहिला, याची उत्तरे आता या खात्याने दिली पाहिजेत. त्यासाठी थेट नागपूरऐवजी मुंबईपर्यंत तक्रारी जाव्या आणि तेथूनच सूत्रे हलावी, हे काहिसे अनाकलनीय वाटते. सारे सणवार आणि उत्सव पावसाळा आणि हिवाळ्यात येतात. याच दरम्यान, सणावाराला किमान कढीसाठी तरी दही वरचेवर विकत घेतले जाते. एरवीही नागपुरात स्वागत सोहोळ्यांच्या निमित्ताने मेजवान्या झडतच असतात. हे छापे पडले नसते तर नागपूरकरांवर काय अनर्थ ओढवला असता, या कल्पनेनेच घाबरायला होते. याचा अर्थ, आजवर नागपूरकर असेच दही पचवत आलेले आहेत. ऐन पावसाळ्यात नागपुरातच काय सर्वत्रच गॅस्ट्रो, मलेरिया, अतिसार, चंडीपुरा या मेंदूज्वराने पाय पसरले असतानाच त्यात पुन्हा या असल्या दह्य़ातील अळ्याही तुरुतुरू चालायला लागल्या असत्या. या मोसमातील अलीकडेच झालेल्या जोरदार पावसाने नागपूर महापालिकेचे पावसाळी नियोजन पार कोलमडून गेले आहे. कोलमडून जायला मुळात ते झालेले होते की, पावसासह सारे आराखडे कागदावरच होते, हे कळायला मार्ग नाही.
एरवीही नागपुरात अनेक चौकांमध्ये अशाच गंजलेल्या पिप्यांमधून दह्य़ाची विक्री सर्रास केली जातानाचे दृश्य तसे नेहमीच झालेले आहे. पण, या छाप्याने मात्र साऱ्यांची झोप उडवली, हे मात्र खरे.
चंद्रकांत ढाकुलकर