Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

खासगी मालकीचे साठ टँकर पालिका ताब्यात घेणार
कारवाईला आज सुरुवात
पुणे, ९ जुलै / प्रतिनिधी
शहरातील पाणीटंचाईवर तातडीची उपाययोजना म्हणून महापालिका प्रशासनातर्फे खासगी मालकीचे साठ टँकर ताब्यात घेण्याची कारवाई उद्या (शुक्रवार) पासून सुरू केली जाणार असून नागरिकांना हे टँकर मोफत उपलब्ध करून दिले जातील. याबरोबरच प्रत्येक वॉर्डमध्ये पाच बोअर घेण्याची योजनाही शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे.

जलतरण तलावातील पाण्यावर र्निबध घालण्याची गरज
विशेष प्रतिनिधी
पुणे, ९ जुलै

पुण्यातील पोहण्याच्या तलावांना कूपनलिकांप्रमाणेच (बोअिरग) महापालिकेकडूनही काही प्रमाणात पाणीपुरवठा होत असून, सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात महापालिकेच्या पाण्यावर र्निबध घालण्याची गरज स्पष्ट झाली आहे. पुण्यात महापालिका, तसेच काही खासगी संस्थांचे तलाव आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठय़ा गृहरचना संस्थांमध्येही त्यांचे स्वत:चे तलाव आहेत. या तलावांना प्रामुख्याने बोअिरगचे पाणी वापरले जाते. मात्र काही प्रमाणात महापालिकेच्या पाण्याचा वापरही तलावांमध्ये होताना दिसतो.

बेकायदा सावकारी करणारे दोन करोडपती जेरबंद
पिंपरी, ९ जुलै / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड परिसरात बेकायदा सावकारी धंदा करणाऱ्या दोघा करोडपतींना पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांच्या आदेशावरून अटक करण्यात आली. त्यांच्या घरावर व कार्यालयांवर छापे टाकून लाखोंची मालमत्ता जप्त करण्यात आली.

स्वबळावर लढलो नाही तर काँग्रेस संपेल!
जिल्हाध्यक्ष भन्साळींवर शरसंधान
पुणे, ९ जुलै / खास प्रतिनिधी
‘आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी न करता काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी. तसे शक्य नसल्यास मैत्रिपूर्ण लढतींना तरी संमती द्यावी नाहीतर जिल्ह्य़ातील काँग्रेस संपेल! ’ ..जिल्ह्य़ातील निष्ठावंत काँग्रेसजनांनी अशा शब्दांत पक्षाच्या दुबळ्या अवस्थेचे चित्र निवडणूक निरीक्षकांसमोर बेधडकपणे मांडले.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा कधी काळी बालेकिल्ला होता..
पुणे, ९ जुलै / प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कधी काळी बालेकिल्ला होता. आता मात्र काँग्रेसची ताकद येथेही वाढली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी आज पुण्यात येऊन राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. ठिकठिकाणी केलेल्या चुकीच्या आघाडय़ा दुरुस्त करा आणि काँग्रेसबरोबर राहा, असेही ऐकवायला दलवाई यांनी कमी केले नाही.

आरोपीच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी सतरा जणांना अटक
दत्तवाडी खून प्रकरण
पुणे, ९ जुलै / प्रतिनिधी
माजी नगरसेविकेच्या मुलाच्या खुनातील मुख्य आरोपीच्या घरात घुसून तोडफोड केल्याच्या आरोपावरून दत्तवाडी पोलिसांनी सतरा जणांना अटक केली. सिंहगड रस्त्यावरील लक्ष्मीनारायण टॉवर्समध्ये काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात दहा हजार नावे दुबार
निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची तक्रार
पिंपरी, ९ जुलै / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातील यादीत तब्बल दहा हजार मतदारांची नावे दुबार असल्याची तक्रार शिवसेनेतर्फे निवडणूक विभागाकडे आज करण्यात आली. नगरसेविका सीमा सावळे यांनी त्याबाबतचे निवेदन मतदार नोंदणी अधिकारी अशोक मुंडे यांना दिले.ही नावे वगळण्याची मागणी त्यांनी केली आहे.

चिंचवडला जकात चुकवून आणलेले ५० लॅपटॉप पकडले
साडेपाच लाख रुपये दंड
पिंपरी, ९ जुलै / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भरारी पथकास चिंचवड स्टेशन येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामात जकात चुकवून आणलेले ४८ लॅपटॉप आढळून आले. त्यांना साडेपाच लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पालिकेचे मुख्य जकात अधीक्षक अशोक मुंडे यांनी ही माहिती दिली.

पंढरपूपर्यंत तेरा हजार वारक ऱ्यांवर औषधोपचार
कै. रामचंद्र भिसे गुरुजी वैद्यकीय प्रतिष्ठानचा उपक्रम
बारामती, ९ जुलै/वार्ताहर
येथील कै. रामचंद्र भिसे गुरुजी वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमती सोनिया राजीव गांधी फिरता दवाखान्याच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील देहूपासून पंढरपूपर्यंत पायी चालणाऱ्या १३ हजार वारकरऱ्यांची मोफत तपासणी करून औषधोपचार केले.

सर्व दोषींना फाशीच व्हायला हवी होती - राहुल भोसले
हनुमंत भोसले खून प्रकरण
दौंड, ९ जुलै/वार्ताहर
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती हनुमंत भोसले यांच्या खून प्रकरणी चौदा जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची सजा झाली असली तरी सर्व आपोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती अशी अपेक्षा हनुमंत भोसले यांचे चिरंजीव राहुल भोसले यांनी व्यक्त केली.

अडसूळ यांचा उद्या सत्कार
पुणे, ९ जुलै/प्रतिनिधी
बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने येत्या ११ जुलै रोजी युनियनचे अध्यक्ष आनंद अडसूळ यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.बँक एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष सुरेश जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सलग चौथ्यांदा अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाल्याबद्दल हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अध्यक्ष तर एकनाथ ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे जगताप यांनी सांगितले. यावेळी बँक एम्प्लॉईज युनियनचे प्रदीप पाटील, शिरीष फडतरे उपस्थित होते.

उरळीकांचन येथे ‘यशस्विनी’ महिला केंद्र सुरू
पुणे, ९ जुलै/प्रतिनिधी
बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशनतर्फे ग्रामीण समाजातील वंचित महिलांसाठी ‘यशस्विनी’ महिला प्रशिक्षण केंद्र उरळीकांचन येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात महिलांना ८ महिने निवासी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये पहिल्या दोन महिन्यांत संगणकाचा मूलभूत सराव व उद्योजकतेचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.त्यानंतरच्या पाच महिन्यांच्या कालावधीत पशुधन व्यवस्थापन, शेतीवर आधारित व्यवसाय, फळ, धान्य व दूध प्रक्रिया, स्वयंसहाय्यता गट बांधणी व व्यवस्थापन इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते आणि एक महिना विविध संस्थांबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव, असे या प्रशिक्षणाचे स्वरुप आहे. या निवासी प्रशिक्षण केंद्राची तिसरी बॅच ३ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.

गुंतवणूकदारांसाठी मोफत कार्यशाळा
पुणे, ९ जुलै/प्रतिनिधी
शेअरबाजारात सामान्य गुंतवणूकदारांना फ्युचर्स ट्रेडिंग, ऑप्शन्स ट्रेडिंगची माहिती सविस्तर मिळावी यासाठी मनियोग टेक्निकल सव्र्हिसेसच्या वतीने मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता बी. जे. वैद्यकीय मैदानासमोर नेहरू मेमोरियल सभागृहात ही कार्यशाळा आयोजित केली आहे. ११ जुलै रोजी एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजता मराठा चेंबर्स सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेस येणाऱ्यांना पंधरा दिवस मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यशाळेच्या ठिकाणी अर्ज भरून देणे आवश्यक आहे. कार्यशाळेसाठी नावनोंदणी करण्यासाठी ९४२२६५२४६४ या क्रमांकावर नाव नोंदवावे.

ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणीतून बिंदुमाधव जोशी यांना वगळले
पुणे, ९ जुलै/प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासून सातत्याने कार्यरत असलेल्या बिंदुमाधव जोशी यांना पंचायतीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची राष्ट्रीय स्तरावरची वार्षिक सभा नुकतीच औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीत २००९ ते २०११ या तीन वर्षांसाठी ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नागपूरचे राजाभाऊ पोफळी यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तर दिल्ली येथील सोमनाथ खेडेकर हे राष्ट्रीय महामंत्री व औरंगाबादचे अरुण देशपांडे सचिवपदी बिनविरोध निवडून आले आहेत. या कार्यकारिणीतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे १९७४ च्या ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासून सतत पदाधिकारी असणारे बिंदुमाधव जोशी यांना या वर्षीच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. मावळत्या कार्यकारिणीत ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय संरक्षक म्हणून ते कार्यरत होते.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ‘रिअॅलिटी शो’
पुणे, ९ जुलै/ प्रतिनिधी
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे बारावी पास झालेल्या गुणवान व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘अप’ या शैक्षणिक रिअॅलिटी शोचे आयोजन करण्यात आले आहे. या शोमध्ये प्रत्येक विद्याशाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला व्यावसायिक पदवी प्राप्त करण्यासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी आज ही माहिती पत्रकाद्वारे कळविली आहे. संस्थेच्या दंत, औषधनिर्माण, संगणकशास्त्र, विधी, हॉटेल मॅनेजमेंट, फिजिओथेरपी, आर्किटेक्चर या महाविद्यालयात व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी या रिअॅलिटी शोमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रवेश दिला जाईल व त्याला शंभर टक्के शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. या शोमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून पहिल्या फेरीत पाच गुणवान विद्यार्थी जातील. शोची ही निवडप्रक्रिया चार जुलै रोजी आझम कॅम्पस येथे होणार आहे. शोची अंतिम फेरी ११ जुलै रोजी होईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी १०८००२३३३३२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

शिक्षक-पालक संघाने केले गुणवंतांचे सत्कार
पुणे, ९ जुलै / प्रतिनिधी
महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक-पालक संघाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. शिक्षक-पालक संघाने प्रथमच एकत्रितरीत्या हा उपक्रम राबविला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे माजी संचालक डॉ. अरविंद कुलकर्णी होते. ‘आपलं घर’ संस्थेचे विश्वस्त विजय फळणीकर, शाश्वत हॉस्पिटलचे डॉ. पुष्कराज करमरकर, शाळेच्या प्राचार्या अनुराधा गोखले, उपप्राचार्य भिकन चौधरी, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष संजय वाल्हेकर, शैला खराडे या वेळी उपस्थित होते.या वेळी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी, त्यागाची भूमिका असल्याशिवाय मनुष्य मोठा होत नाही असे मत व्यक्त केले. या प्रसंगी बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गौरी देशमुख हिचा सत्कार करण्यात आला.

पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की
पुणे, ९ जुलै / खास प्रतिनिधी
वारजे येथील मुठा उजवा कालव्यावरील अतिक्रमणांना नोटीस बजावण्यासाठी गेलेले पाटबंधारे कर्मचारी रवींद्र जगताप यांना तेथील टपरीधारकांनी आज धक्काबुक्की केली. या प्रकरणी वारजे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल एकास अटकही करण्यात आली.खडकवासला धरणातून कृषी महाविद्यालयाला पाणी देण्यासाठी उजवा कालवा बांधण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत कृषी महाविद्यालयाचे पाणी बंद करण्यात आले. वारजे तसेच लगतच्या भागात मोठी वस्ती झाल्याने कालवा बुजवून त्यावर पालिकेने रस्ते तयार केले. या रस्त्यांवर रहदारी वाढल्याने हळूहळू पाटबंधारे खात्याच्या जागेत अतिक्रमणेही झाली. वारजे जकातनाका भागातील कालव्याच्या रस्त्यावर बेकायदा टपऱ्यांना नोटीस देण्यासाठी जगताप गेले होते. त्यावेळी टपरीधारकांनी त्यांना अर्वाच्च शिवीगाळ व धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर जगताप यांनी वारजे पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. त्यानंतर धक्काबुक्की करणाऱ्या सोपान मिराजदार याला पोलिसांनी अटक केली.

भुशी धरणात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू
लोणावळा, ९ जुलै / वार्ताहर
वर्षांविहाराकरिता लोणावळा परिसरात मित्रांसमवेत फिरावयास आलेला मुंबईतील तरुण दिनेश रामसुख यादव (वय २२, रा. दहिसर, मुंबई) यांचा भुशी धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भुशी धरण परिसरात मित्रांसमवेत गेलेला दिनेश हा धरणाच्या उथळ पाण्यातून चालताना अचानक खोलगट भागात पाय गेल्याने पाण्यात पडला व बुडू लागला. त्याच्या दोन मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याची दमछाक झाल्याने व पोटात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दिनेश हा कांदिवली येथील ठाकूर कॉलेजमध्ये बीएएमएसच्या शेवटच्या वर्षांत शिकत होता. भुशी धरणात बुडून मृत्यू पावण्याची या आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे.

बालंसंगोपन प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश सुरू
बारामती, ९ जुलै / वार्ताहर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि बालशिक्षण परिषद यांनी विकसित केलेल्या ‘बालसंगोपन आणि शिक्षण प्रमाणपत्र’ शिक्षणक्रमास विद्या प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय, विद्यानगरी, बारामती येथे प्रवेश देणे सुरू आहे. शिक्षणक्रमासाठी प्रवेश पात्रता १२ वी उत्तीर्ण किंवा सेवेत असणाऱ्यांसाठी १० वी पास किंवा नापास. पात्र व्यक्तीस प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश देण्यात येईल. हा शिक्षणक्रम पूर्ण करणारास स्वत:ची बालवाडी, अंगणवाडी, पाळणाघर, किडगार्डन चालवता येईल. तसेच बालसेविका, बालवाडीताईची नोकरी मिळेल. महिला व बालकल्याण क्षेत्रात समन्वयक, पर्यवेक्षक व अधिकारी होण्यास प्राधान्य दिले जाईल. इच्छुकांनी प्रवेशासाठी केंद्र ३० जुलै पूर्वी ९५९५८१६६२१ या भ्रमणध्वनीवर किंवा महाविद्यालयास संपर्क साधावा.

चाकणमध्ये हास्यवाटिका कार्यक्रम
चाकण, ९ जुलै / वार्ताहर

अभिजात ललित कला मंचच्या वतीने चाकण येथे शनिवार ११ जुलै ०९ रोजी प्रसिद्ध विनोदी कलावंत दिलीप हल्ल्याळ यांचा ‘हास्यवाटिका’ हा विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती मंचचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अविनाश अरगडे यांनी येथे दिली. येथील मार्केटयार्ड जवळ असलेल्या मुंगसे हॉस्पिटलमध्ये ११ जुलै ०९ रोजी सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बालपण, तरुणपण व म्हातारपण यांचा अनोखा त्रिवेणी संगम असलेला विनोदी कलावंत दिलीप हल्ल्याळ यांचा हा ‘हास्यवाटिका’ कार्यक्रम रसिकांना खळखळून हसवणारा आहे. त्यांच्या समवेत सारेगम फेमच्या मृदुला मोघे याही सहभागी होणार आहेत. मंचच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. अरगडे, प्रा. शिवाजी एंडाईत, बबनराव सोनावळे यांनी मंचच्या वतीने केले आहे.

दवाखान्यावरील हल्ल्याप्रकरणी दहा जणांना न्यायालयीन कोठडी
जुन्नर, ९ जुलै/वार्ताहर

डॉ. प्रदीप गवळी यांच्या दवाखान्यात घुसून हल्ला केल्याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. जुन्नरचे पोलीस निरीक्षक आर. एन. परदेशी यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले की, धन्वंतरी रुग्णालयात ज्ञानेश्वर दशरथ सदाकाळ या रुग्णाचा १ जुलै रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यास डॉक्टर जबाबदार असल्याचे कारण पुढे करून रुग्णाचे मढ येथील नातेवाईक व स्नेही लोकांनी डॉक्टरांना मारहाण करून रुग्णालयाची मोडतोड केली होती. या प्रकरणी डॉ. प्रदीप गवळी यांनी जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी महेंद्र बाबाजी सदाकाळ, देवराव पाडुरंग मोढवे, दशरथ गणपत सदाकाळ, रंगनाथ बबन पानसरे, राम बबन सदाकाळ, गुलाब यशवंत मस्करे, देवराम बबन मोढवे, आदींवर गुन्हे दाखल करून अटक केली. पोलीस नाईक राहुल घुले, दीपक साबळे, श्री. तळपे, श्री. खिरड या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न केले असे श्री. परदेशी यांनी सांगितले.

‘स्त्रियांची शतपत्रे’चे रविवारी प्रकाशन
पुणे, ९ जुलै / प्रतिनिधी
‘प्रतिमा प्रकाशन’च्या वतीने स्त्रीविषयक ग्रंथांमध्ये डॉ. स्वाती कर्वे यांनी संपादित केलेल्या ‘स्त्रियांची शतपत्रे’ या ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक व संपादक ह. मो. मराठे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. येत्या १२ जुलै रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेत सायंकाळी सहा वाजता हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथाचा परिचय समीक्षक डॉ. कल्याणी दिवेकर करून देणार आहेत, तसेच नाटय़समीक्षक व ‘सकाळ’ चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती
पुणे, ९ जुलै / प्रतिनिधी
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या वतीने डॉ. अंजली जोशी यांना ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था : इतिहास व कार्य’ या संशोधन व लेखन कार्यासाठी शारदा शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. पंचवीस हजार रुपये रकमेची ही शिष्यवृत्ती असून, जुलै-२००९ ते जून-२०११ या कालावधीसाठी आहे.

पिण्याच्या पाण्यात रहाटणीत अळ्या!
पिंपरी,९ जुलै / वार्ताहर

पावसाने दडी मारल्याने पाणीकपातीचा मुकाबला करावा लागणाऱ्या रहाटणीकरांना आता दुषित पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.गुरुवारी सकाळी अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याबरोबरच पाण्यात अळ्या सापडय़ाने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.