Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

सुरक्षा करिअरमधील परिसंवादाला लक्षणीय प्रतिसाद !
ठाणे/प्रतिनिधी - २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याने अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा अधोरेखित झाला. घराच्या उंबरठय़ापासून सुरू होणाऱ्या सुरक्षेच्या समस्येने जीवनाच्या प्रत्येक पावलावरील सुरक्षेचे संदर्भ बदलून टाकले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही प्रशिक्षित व्यक्तींची मागणी प्रचंड वाढली आहे. सुरक्षा क्षेत्रात तरुणांना उच्च प्रतीच्या करिअरचे नवे दालन उघडण्यासाठी ‘झायकॉम’ व इस्रायलची आयएमआय अकादमी यांनी येथे आयोजित केलेल्या सुरक्षा करिअरमधील परिसंवादाला ठाण्यातील पालक आणि युवा वर्गाचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. दैनिक ‘लोकसत्ता’ या उपक्रमाचे माध्यम प्रश्नयोजक आहे.सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व आणि प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची वाढती मागणी लक्षात घेऊन झायकॉम व आयएमआय अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षा व्यवस्थापनातील पद्धती आणि तंत्रज्ञानाविषयी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी ‘अ‍ॅडव्हान्स्ड सिक्युरिटी ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट’ (एएसटीएम) ही शैक्षणिक संस्था मुंबईत सुरू करण्यात आली आहे.

धामणी धरण कोरडे, तर तानसात फक्त चार टक्के पाणीसाठा
ठाणे/प्रतिनिधी - गतवर्षाच्या तुलनेत आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडल्याने मुंबईत ३० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. पावसाची ही परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास मुंबईबरोबर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल. आता विक्रमगडमधील धामणी धरण कोरडे पडले असून तानसा धरणात फक्त ३.८७ टक्के एवढाच पाणी साठा उरला आहे.

ठाण्यात उभारले राज्यातील पहिले महिला बचत गट केंद्र
ठाणे/प्रतिनिधी

साडेतीन हजार महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या महिला बचत गटच्या भव्य इमारतीचे उद्घाटन १२ जुलै रोजी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. हे बचत गट केंद्र महिला व बाल कल्याण समितीमार्फत चालविले जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक प्रताप सरनाईक यांनी महापौरांच्या उपस्थितीत दिली.
वर्तकनगरमधील सुविधा भूखंडावर कोरस कंपनीतर्फे महिला बचत गट केंद्राची दोन मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्या मोबदल्यात कंपनीला महापालिका टीडीआर देणार आहे.

कल्याण रेल्वे टर्मिनस ही काळाची गरज
आनंद परांजपे यांची लोकसभेत आग्रही मागणी
ठाणे/प्रतिनिधी
अगोदर ठाणे आणि आता कल्याण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना खासदार आनंद परांजपे यांनी आपल्या दुसऱ्या इनिंगची दमदार सुरुवात करताना रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत ठाणे-कल्याणसह मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली. आम आदमीसाठी ममतादीदींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही तरतुदींची प्रशंसा करतानाच परांजपे यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांकडे दीदींनी लक्ष न दिल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

पालिकेची जागा संस्थेला दान
महासभा, स्थायी समिती अंधारात
डोंबिवली/प्रतिनिधी
पालिकेची डोंबिवलीतील रेतीबंदर काळूनगर येथील १ हजार ८२७ फुटाची जागा परमाणू अणू विभागाला आरोग्य सेवेसाठी देण्याच्या मालमत्ता विभागाच्या निर्णयाबद्दल लेखा परीक्षकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे ही मालमत्ता कोणत्या तत्त्वावर या संस्थेला दिली आहे, असा प्रश्न जाणकार नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे.

बाजार समितीचे २४ गाळे तहसीलदारांकडून सील
शहापूर/वार्ताहर: शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेले २४ गाळे व्यावसायिक परवानगी न घेता बांधल्याने जमीन शर्तीचा भंग झाल्याचा ठपका ठेवून तहसीलदारांनी या गाळ्यांना सील ठोकले आहे. महसूल विभागाने तब्बल १२ वर्षांनंतर ही कारवाई केल्याने बाजार समिती प्रशासन अवाक् झाले आहे. बाजार समितीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी १९९६-९७ साली मुंबई-आग्रा महामार्गालगत गोठेघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत समितीच्या मालकी जागेत २४ गाळे बांधून भाडय़ाने दिले.

आता शिवसेनेचीही आपत्कालीन यंत्रणा
ठाणे / प्रतिनिधी

पावसाने अद्याप दडी मारली असली तरी, वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत मुंबई-ठाणे परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. त्यावेळी २६ जुलै २००५ सारखी पूरस्थिती उद्भवल्यास पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. या यंत्रणेबरोबर आता शिवसेनेने पर्यायी आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. येत्या पावसाळ्यात कुठेही पूर आला, पाणी शिरले, इमारत कोसळली, रस्त्यात झाड पडले, अशी कोणतीही आपत्ती आल्यास शिवसेना हेल्पलाईन २५३४३२३२ वर नागरिकांना संपर्क साधता येईल.

अकरावीचे विद्यार्थी मिळविण्यासाठी संस्थाचालकांची धडपड
रमेश पाटील

ठाणे, मुंबई तसेच अन्य शहरांमध्ये अकरावीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना, वाडा तालुक्यातील ३१ माध्यमिक शाळांमधून यावर्षी उत्तीर्ण झालेल्या एक हजार ४७२ विद्यार्थ्यांना तालुक्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांत कला व वाणिज्य शाखेत सहज प्रवेश मिळत आहे. अकरावीसाठी तालुक्यात प्रवेश क्षमता असलेल्या कला व वाणिज्य शाखेतील अनेक जागा सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांत रिक्त असल्याने या रिक्त जागांसाठी विद्यार्थी शोधण्याची वेळ आता शिक्षकांवर आली आहे.

ग्रामस्थांच्या विरोधामुळे वीज प्रकल्पाचे स्थलांतर
भगवान मंडलिक

मूठभर ग्रामस्थांच्या विरोधामुळे डोंबिवली शहराची येत्या दहा वर्षाची विजेची वाढती मागणी पूर्ण करणारा महापारेषण कंपनीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोरोडी किंवा कळवा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या प्रकल्पामुळे मानपाडा येथील प्रीमिअर कंपनीसमोर प्रकल्पासाठी खर्च केलेले जनतेचे २६ कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत. डोंबिवलीतील आमदार, खासदार, नगरसेवक आणि विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी या विषयावर रणकंदन माजविले नाही तर या प्रकल्पाला डोंबिवलीकरांना मुकावे लागणार आहे.

पायलची अभियांत्रिकीची वाट बनली बिकट!
जात पडताळणी कार्यालयाचा गलथानपणा
राजीव कुळकर्णी
कोकण भवन येथील विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील गलथान कर्मचाऱ्यांमुळे इतर मागास प्रवर्गातील एका विद्यार्थिनीला अभियांत्रिकी प्रवेशापासून यंदा वंचित राहावे लागण्याची चिन्हे दिसत असून, सरकारी यंत्रणेच्या या हलगर्जीपणाविरोधात तिचे पालक उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.ठाण्याच्या खोपट भागात राहणारी पायल रवींद्र गुरव ही सेंट जॉन द बाप्टिस्ट ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी असून ती इतर मागास वर्गातील आहे. महाविद्यालयाने तिचा जातीचा दाखला पडताळणीसाठी ७ डिसेंबर २००७ रोजी ठाणे कार्यालयामार्फत (फॉर्म क्र. १८६०) कोकण भवन येथील विभागीय कार्यालयात पाठविला.

ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशीची मागणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींमध्ये मोठय़ा प्रमाणात ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने भ्रष्टाचार सुरू आहे. या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागातर्फे येत्या आठ दिवसात चौकशी सुरू करावी, अन्यथा मनसे कल्याण ग्रामीण विभागातर्फे उग्र आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा मनसेचे कल्याण तालुकाप्रमुख मोरेश्वर भोईर यांनी दिला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी अशोक थूळ यांची भेट घेतली. यावेळी ग्रामीण विकास संघर्ष समितीचे गणेश म्हात्रे, मनसे जिल्हाध्यक्ष अशोक मांडले, इरफान शेख, काका देसाई, भरत जाधव, गजानन पाटील, शरद केदार उपस्थित होते. ग्रामपंचायतींमध्ये विकास कामे करण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारचा निधी येत आहे. पण हा निधी विकासकामांना वापरण्याऐवजी ग्रामसेवक, सरपंच संगनमत करून हडप करत आहेत, अशा तक्रारी ग्रामीण विकास संघर्ष समितीचे गणेश म्हात्रे यांनी केल्या. आपल्याकडे कागदोपत्री पुरावा असल्याचे त्यांनी थूळ यांना सांगितले. ग्रामपंचायतींच्या कारभाराची चौकशी करून ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू करावी अशा मागण्या शिष्टमंडळाने थूळ यांच्याकडे केल्या.

पुंडलिक म्हात्रे यांचे पुत्र बिनविरोध
डोंबिवली/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणारे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे वैभव मोरे यांनी जातीचा दाखला सादर न केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे म्हात्रे यांचे पुत्र दीपेश पुंडलिक म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तिरंगी लढत होणार असून राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या राजेश मोरे यांना मात्र निवडणूक कठीण असल्याचे मानले जाते.

पुरुषोत्तम भातखंडे यांचा अमृतमहोत्सव
बदलापूर/वार्ताहर : येथील आदर्श विद्यामंदिरचे निवृत्त प्रश्नचार्य पुरुषोत्तम कृष्णाजी भातखंडे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त नुकताच ठाणे येथे अमृतमहोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचे आप्तेष्ट, हितचिंतक आणि अभ्यागत मोठय़ा संख्येने उपस्थित होते. भातखंडे यांच्या पत्नी आणि आदर्श विद्यामंदिरातून पर्यवेक्षक पदावरून निवृत्त झालेल्या सुधा भातखंडे यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या धार्मिक विधीनंतर भातखंडे यांची धान्याने तर सौ. भातखंडे यांची वह्यांनी तुला करण्यात आली. हे धान्य आणि वह्या कर्जत येथील आदिवासी विकास संस्थेला दान करण्यात आले. भातखंडे कुटुंबियांचे वार्षिक संमेलन आयोजित करण्यात पुरुषोत्तम भातखंडे यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो.

शेख मेहबूब यांचे निधन
बदलापूर/वार्ताहर
अंबरनाथ येथून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक ठाणे इंटरनॅशनलचे संपादक शेख मेहबूब जनाब यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या अंत्ययात्रेला शहरातील मुस्लिम बांधव, सामाजिक, राजकीय, पत्रकार क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.