Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

मुंबई-दिल्ली, नागपूर-दिल्ली ‘दूरांतो’ गाडय़ांची ममतांकडून घोषणा
नवी दिल्ली, ९ जुलै/खास प्रतिनिधी

 

रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी आज महाराष्ट्रातून मुंबई-दिल्ली आणि नागपूर-मुंबई अशा आणखी दोन ‘दूरांतो’ नॉनस्टॉप सुपरफास्ट गाडय़ा सुरु करण्याची घोषणा केली. आज लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ममता बॅनर्जीं यांनी आपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या तरतुदी केल्या याची माहिती दिली आणि तुम्हाला आणखी काय हवे? असा काहीशा संतापाने प्रतिप्रश्न केला. विश्वस्तरीय रेल्वेस्थानकांच्या यादीत गोवा आणि कालिकत यांचा समावेश करण्यात येत असल्याचीही त्यांनी घोषणा केली.
लोकसभेत १३१ सदस्यांनी भाग घेतलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ममता बॅनर्जींनी या घोषणा केल्या. ३ जुलै रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात ममता बॅनर्जी यांनी देशभरात १२ नॉनस्टॉप ‘दूरांतो’ गाडय़ा सुरु करण्याची घोषणा करताना महाराष्ट्राला मुंबई-अहमदाबाद (वातानुकूलित) आणि दिल्ली-पुणे (वातानुकूलित) नॉनस्टॉप गाडय़ा दिल्या होत्या. आज त्यात त्यांनी मुंबई-दिल्ली आणि नागपूर-दिल्ली या दोन नव्या ‘दूरांतो’ गाडय़ांचा समावेश केला. एक महिन्याच्या आत दोन-दोन ‘दूरांतो’ गाडय़ा सुरु करणारल असल्याचे त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात अमरावती-नरखेड नव्या रेल्वेमार्गाला तसेच पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनाला प्राधान्य दिले जात आहे. एमयुटीपीची कामे प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. पनवेल-पेण-रोहा आणि उधाणा-जळगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे कामही शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यात येत आहेत. अन्य रेल्वे प्रकल्पांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाची स्थापना करण्यात येत आहे.महाराष्ट्राला १९ नव्या गाडय़ा मिळाल्या आहेत. पाच गाडय़ांचा विस्तार करण्यात आला आहे आणि चार गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती ममता बॅनर्जींनी दिली. तुम्हाला आणखी काय हवे? एका वर्षांत आम्ही आणखी काय करू शकतो? असे सवाल त्यांनी महाराष्ट्राच्या खासदारांकडे बघून केले. मुंबई रेल्वे विकास महामंडळासाठी आम्ही १००४ कोटींची तरतूद केली आहे. रेक मिळाल्यानंतर उपनगरी रेल्वेचे हळूहळू काम होईल, असे त्यांनी सांगितले. एमयुटीपीअंतर्गत मुंबईतील प्रकल्पांना गती दिली जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.आदर्श रेल्वेस्थानकांच्या यादीत अजनी (नागपूर) आणि दादर या महाराष्ट्रातील स्थानकांचा समावेश करण्याच्या विनंतीची आपण दखल घेतली आहे. याशिवाय नांदेड येथे बहुउद्देशीय संकुलाला मंजुरी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. भारतीय पोलीस पदक विजेत्यांना राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवासात ६० टक्के सवलतीची त्यांनी घोषणा केली. भारतीय कला आणि संस्कृतीला जगभर चालना मिळावी म्हणून कलावंत, चित्रकार, संगीतकार, नृत्य कलावंत, सांस्कृतिक पथकांना दुसऱ्या श्रेणीत ५० टक्के सवलत दिली जात होती. आता ही सवलत राजधानी आणि शताब्दीमध्येही देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. रेल्वे बोर्डाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी, हिंदूी व्यतिरिक्त प्रादेशिक भाषांमध्येही असायला हव्या. स्थानिक संवेदनांचा आदर करायलाच हवा. त्यासाठी आढावा घेऊन फॉम्र्युल्याची घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकांवर जनता भोजन सुरु करण्यावर त्यांनी भर दिला. २०० रुपये तिकीट काढून सामान्य प्रवासी रेल्वे स्थानकावर ६० रुपयांचे बर्गर खाऊ शकत नाही,ोकडे त्यांनी लक्ष वेधले. रेल्वे स्थानकांवर पेयजलाचीही समस्या सोडवावी लागेल, स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.भारतीय रेल्वेने १२,४३० किमीचे नवे रेल्वेमार्ग बनविले, १८,५५४ किमी रेल्वेमार्गांचे मीटरगेजऐवजी ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन केले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ४५ हजार ३६९ किमी रेल्वेमार्गांची भर घातली आहे, असे ममता बॅनर्जींनी सांगितले. रेल्वेने वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग सेंटर सुरु केले तर त्याचा नव्या पिढीला फायदा होईल, असे त्या म्हणाल्या. खासगी सार्वजनिक भागीदारीतून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आयआयटी सुरु करण्याचाही विचार त्यांनी बोलून दाखविला. या आयआयटीमध्ये इतरांना ५० टक्के जागा मिळतील, असे त्या म्हणाल्या. रेल्वेच्या व्यावसायिक योजनांसाठी पद्मश्री अमित मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली फिक्की, सीआयआय आणि विविध राज्यांतील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येत असल्याची त्यांनी घोषणा केली.