Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

व्यक्तिवेध

मुघल सम्राट शहाजहानने दिल्लीत उभारलेल्या जामा मशिदीचे सैयद अब्दुल्ला बुखारी बारावे इमाम होते. शहाजहानची मशीद म्हणून तिथे असणारे इमाम ते शाही इमाम ठरले. वास्तविक सैयद अब्दुल्ला बुखारी यांनी आपले हे ऐतिहासिक शाही इमाम पद १४ ऑक्टोबर २००० रोजी सोडून आपले चिरंजीव सैयद अहमद बुखारी यांच्याकडे सुपूर्द केले. सैयद अब्दुल्ला बुखारींनी आपले इमामपद त्यांचे वडील सैयद हमीद बुखारी यांच्याकडून घेतले, पण त्यापूर्वी काही काळ हमीद बुखारींचे सहायक या नात्याने त्यांनी काम

 

पाहिले. सैयद अब्दुल्ला बुखारी यांनी शाही इमामपद सोडले, तरी ते शेवटपर्यंत शाही इमाम म्हणूनच ओळखले गेले. दिल्लीच्या जामा मशिदीला मोठा इतिहास आहे. प्रारंभी ही मशीद ‘मस्जिद जहाँनुमा’ म्हणून ओळखली जात होती. पाचवा मुघल सम्राट शहाजहान याने ६ ऑक्टोबर १६६० रोजी या मशिदीची कोनशिला बसवली. ती आजही मशिदीच्या तळमजल्यावर पाहायला मिळते. या मशिदीच्या उभारणीत त्या काळात सहा हजार कामगार आणि बांधकाम विषयातले तज्ज्ञ कारागीर होते. त्या वेळी खडी फोडणाऱ्या आणि दगडकाम करणाऱ्याला १ पैसा रोज मिळे, तर कारागिराला २ पैसे रोज मिळत. एवढय़ा भव्य मशिदीच्या इमामपदावर तिला शोभणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती व्हावी, असा शहाजहानचा प्रयत्न होता. आताच्या उझबेकिस्तानमध्ये असणाऱ्या बुखाराकडे शहाजहानची नजर वळली. त्या काळी बुखारा हे मुस्लिम समाजाचे शैक्षणिक केंद्र मानले गेले होते. शहाजहानने बुखाराच्या सुलतानाला पत्र लिहून गुणवान पवित्र व्यक्तीला इमामपदासाठी पाठवून द्यावे, अशी विनंती केली. त्यानुसार बुखाराच्या सुलतानाने सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी यांना त्या वेळी शहाजहानबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीला पाठवून दिले. तेव्हापासून बुखारी घराणे हेच इथले पदसिद्ध इमाम बनले. परवा ज्यांचे निधन झाले ते सैयद अब्दुल्ला बुखारी हे अतिशय रोखठोक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले गेले. सैयद अब्दुल्ला बुखारी यांचा जन्म राजस्थानात संभारमध्ये झाला. दिल्लीतून सीनिअर केंब्रिज उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी अब्दुर रब या मदरशात ‘दर्स ए निझामी’ हे धार्मिक शिक्षण घेतले. मुस्लिमांना स्वतंत्र आवाज देताना वादग्रस्त विधाने करावी लागली तरी हरकत नाही, असे ते मानत आणि ती करायची त्यांची अशी एक खासियत होती. मुस्लिम समाजावर कुठेही अन्याय झाला तरी त्यावर त्यांची प्रतिक्रिया तातडीने व्यक्त होत असे. दिल्लीत आणीबाणीच्या काळात झोपडय़ा पाडायचा उपक्रम हाती घेतला गेला, तेव्हा मुस्लिमांना वेचून त्यांच्या झोपडय़ांवर बुलडोझर फिरवला गेला, असे त्यांचे म्हणणे होते. आणीबाणी संपुष्टात आली, तेव्हा शाही इमाम म्हणून त्यांनी जगजीवनराम यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. जगजीवनराम यांची त्यांच्याशी जाहीर मैत्री होती. त्या वेळी सिंडिकेट काँग्रेस, समाजवादी, जनसंघ आणि स्वतंत्र या पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या जनता पक्षालाही मग त्यांनी पाठिंबा दिला. सैयद अब्दुल्ला बुखारी पत्रकारांशीही मनमोकळेपणाने गप्पा मारत. ‘अमुक पक्षाला पाठिंबा किंवा विरोध’ यासारखी त्यांची निवेदने नेहमीच वादग्रस्त ठरत. आपल्या मनाप्रमाणे जनताही मतदान करील ही त्यांची भाबडी समजूत होती आणि त्याबद्दल त्यांना पुरेशी कल्पनाही होती. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मुस्लिम समाजाला उद्देशून होणारे त्यांचे संबोधन मार्मिक आणि सुस्पष्ट असे. मुस्लिम समाजात त्यांना मान होता, त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर मीना बझार, चाव्री बझार, लाल कुआँ, दर्यागंज, उर्दू बझार, तुर्क मार्केट, तुर्कमान गेट या भागांत दुखवटा पाळण्यात आला. ८ जुलै १९७३ पासून ते शाही इमामपद सांभाळत आले होते. चिरंजिवांकडे इमामपद सोपवताना, आपण अनेक कारस्थानांना सामोरे गेलो, पण मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यापासून आपण कधी परावृत्त झालो नाही असे ते म्हणाले होते. आपल्याप्रमाणे चिरंजिवांना कितपत यश मिळेल, याविषयी साशंकताही व्यक्त केली होती. त्याचा अर्थ त्यांच्या चिरंजीवांनी ओळखला असावा.