Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

पत्नीच्या खुनाबद्दल पतीला जन्मठेप
वाशीम, ९ जुलै / वार्ताहर

कारंजा (लाड) येथील आरोपी फकिरा रामदास मसनकर यास पत्नीच्या खुनाबद्दल जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एस. गुळवणी यांनी जन्मठेप व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नागोराव लसनकार यांची यांची मुलगी शारदा हिचे लग्न फकिरासोबत आठवर्षापूर्वी झाले. तिला तीन मुले होते. फकिरा काहीच कामधंदा करत नव्हता. त्यास दारूचे व्यसन होते. पैशासाठी फकिरा नेहमीच शारदास मारहाण करत होता. पैसे दिले नाही तर तो शारदास माहेरी पाठवत होता.

डोनेशनविरुद्ध विद्यार्थी सेनेने महाविद्यालयाला ठोकले कुलूप
अकोला, ९ जुलै/ प्रतिनिधी

विद्यार्थिनीला प्रवेश देण्यासाठी डोनेशनची मागणी केल्याबद्दल विद्यार्थी सेनेने अकोला शहरातील एलआरटी महाविद्यालयाला गुरुवारी कुलूप ठोक ले. डोनेशन न घेता प्रवेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अर्चना गायकवाड अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एलआरटी महाविद्यालयात गेली. प्रवेश देण्यासाठी तिला पाच हजार रुपये डोनेशनची मागणी करण्यात आली.

सिंचन विहिरींच्या यादीची फेरतपासणी करण्याचे आदेश
बुलढाणा, ९ जुलै / प्रतिनिधी

जलपूर्ती सिंचन विहिरी संदर्भात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आल्या आहेत. ही यादी जाहीर केल्यानंतर ज्या नावावर संशय व्यक्त केल्या जात आहे, अशा नावांची स्वतंत्र यादी बनवून त्यांची पुनर्तपासणी करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत दिले.

पोटदुखे-पुगलिया गट पुन्हा एकमेकांसमोर
बाळासाहेब थोरात आज चंद्रपुरात
चंद्रपूर, ९ जुलै / प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी काँग्रेस पक्षनिरीक्षक व राज्याचे कृषी मंत्री बाळासाहेब थोरात उद्या, शुक्रवारी येथे येत असल्याने लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील पुगलिया-पोटदुखे गट पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

माहिती अधिकाराने भ्रष्टाचाराचे उच्चाटन -अण्णा हजारे
यवतमाळ, ९ जुलै / वार्ताहर

स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही गुंडगिरी व भ्रष्टाचार संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. भ्रष्टाचार संपवण्यासाठी माहितीचा अधिकार हे शस्त्र आहे. त्याचा दुरुपयोग न करता प्रत्येकाने सदुपयोग केल्यास तीन वर्षात भ्रष्टाचाराचे उच्चाटण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी येथे केले. बचत भवनात आयोजित सभेत अण्णा हजारे बोलत होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धारणी शाखेसमोर शेतकऱ्यांच्या रांगा
निरीक्षक नसल्यामुळे व्यवहार ठप्प
धारणी, ९ जुलै / वार्ताहर
येथील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धारणी शाखेत निरीक्षक नसल्यामुळे बँकेचे सर्व आíथक व्यवहार ठप्प झाले असून आदिवासी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. पावसाअभावी पेरणीला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेसमोर रांगा लागलेल्या आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बँकेचे आर्थिक व्यवहार डबघाईस आलेले असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. महिन्याभरापूर्वीच गेडाम यांची बँक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, काही वादामुळे त्यांची एका महिन्यातच बदली झाली. त्यांच्या जागेवर तिवसा येथून गणेश यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांना निवृत्तीला अवघे सहा महिने राहिल्याने ते मेळघाटात यायला तयार नाहीत. आदिवासी शेतकऱ्यांचे हाल होत आहे. तालुक्यातील तेरा विविध कार्यकारी सोसायटय़ांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्यात येते. गेल्यावर्षी बँकेचा आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू होता. बँकेचे संचालक विनाकारण वाद वाढवून बँकेच्या कामात अडथळे आणत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकरी बँकेच्या आवारात गर्दी करीत आहेत. बँक व्यवस्थापन आणि संचालकात सुरू असलेला वाद मिटवून नवीन बँक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.

अरविंद शिंदे यांचा सत्कार
बुलढाणा, ९ जुलै / प्रतिनिधी
शिक्षणाधिकारी अरविंद शिंदे यांनी शाळा विकास प्रकल्पाची जिल्ह्य़ात प्रभावी अंमलबजावणी करून बुलढाणा जिल्हा विदर्भात गुणवत्ता विकासात प्रथम क्रमांकावर आणलेला आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य बलदेव चोपडे यांनी येथे काढले.श्री शिवाजी सभागृहात सेवानिवृत्तीबद्दल अरविंद शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी व पशुसंवर्धन सभापती नंदकिशोर बोरे, समजा कल्याण सभापती बाबुराव मोरे, प्रश्न. नरेंद्र खेडेकर, विनोद वाघ, दत्ता शेळके, विश्वास नागरे, सी.आर. राठोड, अशोक राऊत, भानुदास राऊत उपस्थित होते.या वेळी शाल, श्रीफळ भेटवस्तू व प्रबोधनात्मक पुस्तके देऊन अरविंद शिंदे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.संचालन प्रशांत खाचणे यांनी केले तर के.जे. बावस्कर यांनी आभार मानले.

शिक्षकांनी ज्ञानार्जन करावे -डॉ. जाजू
चिखली, ९ जुलै / वार्ताहर
आजच्या स्पर्धात्मक युगात तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरिता सर्व शिक्षकांनी स्वत:चे ज्ञानार्जन अविरतपणे सुरू ठेवावे, असे आवाहन डॉ. बी.एन. जाजू यांनी केले.
अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारणेत शिक्षकांची भूमिका’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रश्नध्यापक डॉ. बी.एन. जाजू यांनी विद्यार्थ्यांचा कल संशोधनाकडे वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त केली.महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. संतोष आगरकर यांनी महाविद्यालयातील विविध तांत्रिक उपक्रमांचे विवेचन केले. तंत्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवी मान्यवरांचे व्याख्यान, चर्चासत्र यापुढेही नेहमी सुरू ठेवण्याचे आश्वासन प्रश्नचार्यानी दिले.

कुहीत मुकुल वासनिक यांचा सत्कार
कुही, ९ जुलै / वार्ताहर
केंद्रीय मंत्रीपदावर नेमणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच येथे आलेल्या मुकुल वासनिक यांचा कुही ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी वासनिक यांनी गावातील समस्यांबाबत आस्थेने चौकशी केली.सरपंच गोविंद लेंडे यांनी शाल, श्रीफळ देऊन वासनिक यांचा सत्कार केला. उपसरपंच ज्ञानेश्वर खराबे यांनीही स्वागत केले. आमदार राजेंद्र मुळक यांचेही ग्रामपंचायततर्फे स्वागत करण्यात आले. राजू येळणे यांनी प्रश्नस्ताविक केले. नागपूर-नागभीड हा नॅरोगेज मार्ग ब्रॉडगेज होणे ही अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी एन.एम. खाडे, धनराज तळेकर, भाऊराव लेंडे, विकास कटारे, विवेक खराबे, मोरेश्वर लेंडे, सुरेश येळणे, महेंद्र भालोटिया, अफझलखाँ पठाण, सूर्यमणी वासनिक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.समस्या व प्रश्नांचा अभ्यास करून सतत पाठपुरावा करतो, त्यामुळे कुही गावाच्या व तालुक्याच्या समस्या आता नक्कीच मार्गी लागतील, अशी ग्वाही मुकुल वासनिक यांनी दिली. आभार गुलाबराव तलमले यांनी मानले.

‘हॉर्टिकल्चर’ प्रशिक्षण
भंडारा, ९ जुलै / वार्ताहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे जि. पुणे यांच्यामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध युवकांसाठी ‘हॉर्टिकल्चर’ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये आधुनिक दर्जाचे फळबाग, फुलबाग, फुलशेती, हरितगृह बांधणी, व्यवस्थापन, विपणन या विषयावर मार्गदर्शन व प्रश्नत्यक्षिकांचा समावेश राहणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसांचा असून हे प्रशिक्षण २ ते ६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.प्रशिक्षणादरम्यान निवास, भोजन व प्रशिक्षण साहित्य मोफत पुरवण्यात येणार आहे. पुणे येथे प्रशिक्षणाला येण्याजाण्याचा खर्च प्रशिक्षणार्थ्यांना स्वत: करावयाचा आहे. प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ४५ वर्षे या वयोगटातील असावे. इच्छुक उमेदवारांनी वरील कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी, राजगोपालाचारी वॉर्ड, मुस्लिम लायब्ररी चौक, सहयोग रुग्णालयाच्या मागे, भंडारा येथील कार्यालयात सादर करावेत, असे कळवण्यात आले आहे.

वन कामगारांचा अर्धनग्न मोर्चा
खामगाव, ९ जुलै / वार्ताहर

वन कामगार कृती समितीच्यावतीने येत्या १५ जुलैला मुंबई येथे वन कामगारांचा अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेमध्ये पाच वर्षे सेवा केलेल्या कामगारांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघणार आहे. दादर ते मंत्रालय मुंडण करून अर्धनग्न अवस्थेत शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. प्रत्येक पुरुषांनी घरूनच मुंडण करून यावे, असे आवाहन मधुकर अंभोरे यांनी केले आहे.

नाईकांच्या विदर्भात शेतकरी आत्महत्या विषण्ण करणाऱ्या परिसंवादातील सूर
वर्धा, ९ जुलै / वार्ताहर
हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी संस्कृतीस दिलेले वळण एक प्रगतीचे साधन ठरले. मात्र, याच विदर्भपुत्राच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या जगभरात गाजत आहे. ही विषण्ण करणारी बाब दूर करण्यासाठी नाईकांच्या कृषी विचारांना नव्या पिढीने समजून घ्यावे, असे आवाहन वक्तयांनी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित परिसंवादात बोलताना व्यक्त केले.वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वसंतराव नाईक यांची जयंती पक्षकार्यालयात साजरी करण्यात आली. प्रश्नरंभी नाईक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशांक घोडमारे यांनी याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री पदाच्या काळात वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्यास उजाळा दिला. जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण गांधी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मेघे, पालिका उपाध्यक्ष शब्बीर तुरक, पदाधिकारी विठ्ठलराव खेकडे, विजय मुळे, विकास खोडके, विद्या सोनटक्के, सरोज किटे, यांचीही यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी प्रशांत भाजीपाले, विनायकराव तेलरांधे, विजय डहाके, विनायक बोंडे, डॉ. जयस्वाल, मनोहर गायकवाड उपस्थित होते.

अण्णा हजारे यांची आज कारंज्यात सभा
कारंजा-लाड, ९ जुलै / वार्ताहर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारंजा येथे शुक्रवार, १० जुलैला कार्यकर्त्यांचा मेळावा महेश भवनात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ‘लोकजागृती व लोकशिक्षण’ या विषयावर अण्णा हजारे यांचे व्याख्यान होणार आहे.अध्यक्षस्थानी गजानन हरणे राहणार आहेत. या मेळाव्यात शैलेश पिसाळकर, दत्ता आवारी, अशोक दसरे, भगवान जगताप, कालिदास पवार, वाशीम जिल्हाध्यक्ष अविनाश पसारकर, उपाध्यक्ष विजय काळे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा भगत आदी उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठय़ा संख्येत उपस्थित राहून हजारे यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्याम सवाई यांनी केले आहे.

तेली महासंघाचा ब्रह्मपुरीत मेळावा
ब्रह्मपुरी, ९ जुलै / वार्ताहर

ब्रह्मपुरी तालुका तेली समाज महासंघाचा मेळावा येत्या २ ऑगस्टला येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. सतीश कावळे व सचिव जगदीश मेहेर यांनी दिली. या मेळाव्यात ब्रह्मपुरी तालुका तेली समाज महासंघाच्या वतीने १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.ज्या विद्यार्थ्यांनी १०वी मध्ये ७५ टक्के आणि १२ वी मध्ये ७० टक्के गुण प्रश्नप्त केले आहेत. तसेच जे विद्यार्थी १० व १२ वीत तालुक्यात प्रथम क्रमाकांना उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी दूरध्वनी क्र. ९८९०९१७२०५, ९४२१७२३५९२, ९४२३११७२५२ संपर्क साधावा, असे ब्रह्मपुरी तालुका तेली समाज महासंघाचे सचिव जगदीश मेहेर यांनी कळवले आहे.

दर्यापुरात शिवसेनेचा रास्ता रोको
दर्यापूर, ९ जुलै / वार्ताहर
दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे, केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या पेट्रोल व डिझेल भाववाढीचा निषेध, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आíथक मदत मिळावी, बियाणे आणि खते विक्रेत्यांची मनमानी ताबडतोब बंद करावी, या मागण्यांसाठी शेतकरी सदन चौकात शिवसेनेने शेकडो कार्यकर्त्यांसह ‘रास्ता रोको’ केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई करून त्यांची सुटका केली. आंदोलनामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब हिंगणीकर, तालुका प्रमुख गजू पाटील वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली मधुकरराव तराळ, बापुसाहेब कोरपे, बाळासाहेब टोळे, चंदूभाऊ विल्हेकर, उद्धव नळकांडे, योगेश देशमुख, संजय प्रश्नंजळे, विजय तानरे, विष्णु कुऱ्हाडे, बबन विल्हेकर, किसन खंडारे, राजन देशमुख, सुधीर हुतके, मधुकर पाचे, वीरेंद्रसिंह ठाकूर, श्याम आगरकर, संतोष ठाकरे, दर्शन कदम, बाबाराव खेडकर, दिलीप रहाटे, सुनील डिके, विलास तळोकार, गोविंद ठाकूर, राहुल थुंबर, अजाब डिके, सतीश देशमुख यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी सहभाग घेतला.

डॉ. स्मिता कोल्हेंवर हल्ला; मुख्य आरोपीला अटक
धारणी, ९ जुलै / वार्ताहर
मेळघाटातील वैरागड येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हल्लेखोराला धारणी पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यप्रदेशच्या पाली गावात मंगळवारी उशिरा रात्री अटक केली. शेतीच्या वादातून डॉ. कोल्हे आणि त्यांचे विधिज्ञ अ‍ॅड. मांजरे यांच्यावर २७ जूनला लोखंडी रॉड आणि गावठी रिव्हॉल्वरने शे. मुश्ताक शे. बिसमिला याने हल्ला केला, तेव्हापासून आरोपीने पोलिसांच्या हाती तुरी देऊन मध्यप्रदेशच्या तापी नदीच्या पलीकडे सीमावर्ती भागात पळून गेला होता. त्याला ११ दिवसानंतर पोलिसांनी अटक केली. बुधवारी आरोपीला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश देशपांडे यांच्या न्यायालयात उपस्थित केले असता त्यांनी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हेवर हल्ल्यात वापरण्यात आलेली रिव्हॉल्वर आणि लोखंडी रॉड जप्त करायची असल्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी हवी, असा युक्तिवाद सरकारी वकील पार्डीकर यांनी न्यायालयासमोर केला. शे. मुश्ताकला अटक करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जयवंत वांभारे व फौजदार अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली एस.आर. धंदरे, हे.कॉ. वर्धेकर चव्हाण, योगेश इंगळे, दयाराम लामणे मध्यप्रदेशात गेले होते.

महाराणा प्रतापांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी राष्ट्रपती चिखलीत
चिखली, ९ जुलै / वार्ताहर

सुमारे पाच वर्षापूर्वी स्थापन केलेल्या महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येत्या १७ जुलैला येथे येत आहेत. राष्ट्रपतींच्या आगमनामुळे अनेक रस्त्याचे भाग्य फळफळत आहे. बस स्थानकासमोरून जाणाऱ्या डी.पी. मार्गावरील शेत सव्‍‌र्हे क्रमांक ११२ मधील ७ हजार २८० चौरस फूट क्षेत्र नगरपालिकेने महाराणा प्रताप सेवा व बहुउद्देशीय संस्थेला पुतळ्यासाठी दिले होते. २६ जुलै १९९४ रोजी यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता. जानेवारी २००५ मध्ये महाराणांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी झाली होती. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तब्बल साडेपाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या पुतळ्याचे लोकार्पण होत आहे.