Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

विशेष लेख

सामाजिक सेतू व्हावा!

 

कित्येक वर्षे होणार होणार म्हणून गाजत असलेला समुद्र सेतू पुरा झाला. लेझरच्या झोतात आणि फटाक्यांच्या आवाजात मोठय़ा झगमगाटात त्याचे उद्घाटनही झाले. राणीचा नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह इतकेच आकर्षक एक नवे आभूषण मुंबईला मिळाले. दूरदर्शनच्या एका वाहिनीने त्याला मुंबईचा रत्नहार म्हटले. या पुलाच्या निमित्ताने रोषणाई झाली, फटाक्यांची सुंदर आतषबाजी झाली. नव्या पुलाबाबत कितीही उलट-सुलट चर्चा झाल्या तरी त्याने मुंबईच्या आकर्षकतेमध्ये भर पडली. याबाबत मात्र सर्वाचे एकमत झाले. सोहळ्याचा, आतषबाजीचा आनंदही सामान्य लोकांना प्रत्यक्ष आणि दूरदर्शनवरून बघायला मिळाला. त्यावेळी साहजिकच अनेकांना सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट सेतू आठवला असेल.
तंत्रज्ञानाचा विचार करता जगप्रसिद्ध गोल्डन गेट पूल हा मुंबईच्या सागरी सेतूचा पूर्वज होय. दोन किलोमीटर रुंदीच्या खाडीवर दगड, लोखंड आणि सिमेंट वापरून पारंपरिक पद्धतीने पूल बांधण्यासाठी १९१६ दहा कोटी डॉलर इतका खर्च लागेल असा अंदाज होता. परंतु जोसेफ स्ट्रॉस या इंजिनीअरने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून केवळ १.७ कोटी डॉलर खर्चामध्ये पूल बांधता येईल असे डिझाइन तयार केले.
स्थानिक प्रशासनाने या पुलाच्या डिझाइनला मान्यताही दिली. परंतु नंतर या पुलाच्या प्रकल्पात नाना प्रकारचे अडथळे उभे राहिले आणि ते दूर करण्यात बारा वर्षे खर्ची पडली. सैन्य आणि आरमार यांनी संरक्षणाच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले. जहाज कंपन्यांना त्यांच्या जहाजांना अडथळे होण्याची भीती वाटत होती. रेल्वे कंपनीला रस्ते वाहतुकीमुळे स्पर्धा निर्माण होण्याची भीती वाटत होती तर प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी नौकांच्या कामगारांना त्यांच्या रोजी-रोटीची चिंता होती.
मोटार उत्पादकांचा मात्र या पूल बांधणीला अर्थातच भक्कम पाठिंबा होता. विविध प्रकारच्या हितगटांचे असे विवाद न्यायालयातही गेले. सर्व अडथळे पार करत १९३३ साली पुलाचे बांधकाम सुरू झाले. परंतु तोपर्यंत पुलाच्या बांधकामाचा खर्च ३.५ कोटी डॉलर्स इतका वाढला. अपेक्षेपेक्षा दुप्पट खर्च करणे स्थानिक प्रशासनाच्या आर्थिक आवाक्याबाहेरचे होते म्हणून भांडवल उभारणी करण्यासाठी प्रशासनाने कर्जरोखे विकून पैसा उभा करण्याचा निर्णय घेतला.
इतके होईतोवर जगात दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहू लागले होते. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या नागरिकांनी कर्जरोख्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी बँक ऑफ अमेरिकाने जोखीम पत्करून सर्व रोखेखरेदी केले आणि पूल बांधण्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिले. अशा तऱ्हेने खासगी उद्योजक, तंत्रज्ञ आणि बँका यांच्या पुढाकाराने गोल्डन गेट पूल बांधला गेला. १९३७च्या मे महिन्यात तो वाहतुकीला खुला झाला. भव्य, सुंदर, नारिंगी रंगाच्या या नाविन्यपूर्ण पुलाच्या रचनेने सामान्य लोकांच्याही मनात स्थान पटकावले. हा पूल सॅन फ्रान्सिस्को शहराचे मानबिंदू ठरला. या पुलाचे चित्र असणारे टी शर्ट हातोहात खपायला लागले. आधुनिक तंत्रज्ञान आणि धातुशास्त्राच्या मदतीने बांधलेला हा पूल त्या काळात सर्वात जास्त लांबीचा स्पॅन असलेला पूल ठरला. लोखंडी तारांच्या, जाड, पिळदार केबल वापरून त्यावर लटकावलेल्या पुलाच्या बांधकामाचे (केबल सस्पेंडेड पुलाचे) हे तंत्रज्ञान लवकरच जगभर लोकप्रिय झाले. नंतरच्या काळात गोल्डन गेट पुलाच्यापेक्षा जास्त स्पॅन असलेले पूल बांधले गेले, तरी त्याला असलेला मान जराही कमी झालेला नाही, होणारही नाही.
गोल्डन गेट पुलाप्रमाणेच वांद्रा-वरळी सागरी सेतूच्या संकल्पनेपासूनच अनेक विवाद उपस्थित झाले. अनेकांनी विविध कारणांसाठी या बांधकामाला आक्षेप घेतले. अनेक वर्षे रेंगाळल्याने बांधकामाचा खर्च वाढला. पर्यावरणाला घातक ठरणारे बांधकाम म्हणून पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. असे खर्चिक प्रकल्प सरकारने सार्वजनिक पैशांनी बांधावेत का असे नैतिक पेच काहींना पडले, तर वाहतुकीसाठी या प्रकल्पामुळे फारसा काही फरक पडणार नाही म्हणून वाहतूक क्षेत्रातील अनेकांनी पुलाला विरोध केला. मध्यंतरीच्या काळात बांधकामाच्या बिलाचे पैसे थकल्यामुळे काम थांबविण्याची नामुष्कीही आली. अर्थात अशा मोठय़ा प्रकल्पात असे नाना अडथळे येणे यातही काही आश्चर्य नाही. आता राज्याच्या निवडणुकीपूर्वी हा पूल वाहतुकीला खुला झाला याचा राज्यकर्त्यां पक्षाच्या राजकारण्यांना नक्कीच आनंद वाटला असेल. यथावकाश हे सर्व वाद काळाच्या उदरात विरूनही जातील. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडलेला ताणही काही काळानंतर विस्मृतीत जाईल. मात्र आजच्या घटकेला या भव्य प्रकल्पाबद्दल सामान्य मुंबईकरांना खूप उत्सुकता आहे. सार्वजनिक पैशांमधून बांधकाम झालेले असल्याने हा पूल सर्वाना आपला वाटणे साहजिक आहे.
पूर्ण होत आलेल्या पुलाला भेट देण्याची संधी दोन आठवडय़ांपूर्वी अचानकपणे मिळाली. मुंबईच्या किनाऱ्यावरून दिसणारा हा पूल आकर्षक आहेच. परंतु संध्याकाळच्या वेळी पुलाच्या मध्यावर जाऊन, रस्त्यावर उभे राहून समुद्राचा वारा अंगावर घेणे हा एक छान, सुखद अनुभव होता. पश्चिमेकडे समुद्रात बुडणारा लाल सूर्य आणि मावळतीच्या सुंदर, गूढ, लाल प्रकाशात पूर्वेला मुंबईची उजळून निघालेली स्काय लाइन बघणे ही एक पर्वणीच होती. इतक्या दुरून आपली मुंबईही परदेशातील शहरांप्रमाणेच सुंदर दिसताना बघून मन उल्हसित झाले. आकाशातले निळे-राखाडी, गुलाबी ढग पावसाच्या आगमनाची चाहूल देत होते. समुद्रावरचा थंड वारा मना-शरीराला सुखावत होता.
पुलाच्या बांधकामावर देखरेख करणारे अधिकारी उत्साहाने माहिती देत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मोठे काम तडीस नेल्याचे समाधान होते. त्याचबरोबर बांधकामाचा दर्जा राखण्यासाठी केलेल्या विविध उपयांविषयी अभिमानही होता. जागतिक दर्जाची नाविन्यपूर्ण रचना आपल्याला प्रत्यक्षात आणता आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. तास-दीडतास त्या पुलावर घालविताना असे वाटले की, हा आनंद सर्व मुंबईकरांना एकदा तरी घेता आला पाहिजे. सार्वजनिक पैशामधून बांधलेल्या या पुलावरून चालत जाण्याची संधी सामान्य मुंबईकरांना आणि पर्यटकांना मिळाली पाहिजे. पण तशी तरतूद नाही हे अभियंत्यांनी सांगितले तेव्हा ही खंत मुंबईकरांबरोबर वाटून घ्यावी असे वाटले.
वरळी-वांद्रा समुद्र सेतू हा मुंबईला मिळालेला एक लॅण्डमार्क ठरेल. गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंटच्या उत्तुंग इमारती, ताजमहाल हॉटेल यांच्या जोडीनेच मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांना या पुलावरून चालायला, अनुभव घ्यायला नक्की आवडेल. मुंबई महानगरातील अशा अनेक महत्त्वाच्या वास्तू आहेत की त्यांचा केवळ मुंबईकरांनाच नाही तर सर्वच भारतीयांना अभिमान वाटतो. अशी नागरी भव्य प्रतीके ही संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. म्हणूनच ती बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या चित्रपटांसाठी आकर्षणस्थळे म्हणून वापरली जातात. अशावेळी सामान्य भारतीयांना या पुलावर जाऊन आनंद उपभोगण्याची संधी नाकारणे योग्य नाही.
काही वर्षांपूर्वी सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट पूल पाहण्यासाठी गेले असताना त्या भव्य आणि उंच पुलावरून चालण्याचा आनंद घेतला होता, त्याची आठवण मुंबईच्या सागरी सेतूवर उभी असताना आली. गोल्डन गेट पुलावर दोन दिशांनी मोटारींसाठी मार्गिका आहेतच, परंतु त्याचबरोबर हा पूल बांधताना पादचारी आणि सायकलस्वार यांच्यासाठीही वेगळ्या मार्गिकांची सोय दोन्ही दिशांनी केली आहे. भांडवलदारांच्या पुढाकाराने आणि पैशाने गोल्डन गेट पूल बांधताना सामान्य माणसांची आठवण ठेवली गेली होती. मात्र मुंबईच्या सागरी सेतूवर सामान्य लोकांनाही चालता यावे याचा विचार केलेला दिसत नाही. सार्वजनिक पैशाने हा पूल बांधतानापादचारी आणि सायकलस्वारांचा विचार केवळ त्यांना वगळण्यापुरताच झाला याचे वैषम्य वाटते.
अनेक बाबतीत आपण अमेरिकेचे अनुकरण करायला धडपडत असतो, पण तेथील समाजासारखा सर्वसमावेशकतेचा आग्रह मात्र आपण धरत नाही. तेथे आपण भारतीय सामाजिक भेदभाव राखतो ते योग्य नाही. वांद्रा-वरळी पुलावर अशी सोय करणे अजूनही शक्य आहे. आवश्यकही आहे. येणाऱ्या काळात इंधनाचे वाढते दर, टोलचा खर्च, पार्किंगची अपुरी आणि खर्चिक व्यवस्था, पर्यावरणाची होणारी हानी आणि पूल बांधूनही रस्त्यावर विविध ठिकाणी होणारा वाहनांचा खोळंबा, लोकांच्या अमूल्य वेळेचा अपव्यय अशा अनेक कारणांमुळे खासगी गाडय़ा कमी कराव्या लागणारच आहेत. त्यावेळी प्रत्येक दिशेला एक मार्गिका बसेससाठी, दोन खासगी मोटारींसाठी तर एक पादचारी आणि सायकलस्वारांसाठी अशी चार मार्गिकांची फेरआखणी करता येईल.
पर्यटकांच्या सोयीसाठी गोल्डन गेट पुलाजवळ सायकली आणि हेल्मेट भाडय़ाने मिळतात तशी व्यवस्थाही मुंबईला करता येईल. सागरी सेतू हे पर्यटनाचे ठिकाण आहे असे मानून पादचारी आणि सायकलस्वारांकडूनही काही टोल घेता येईल. मोटारप्रवाशांनी आणि सामान्यांनीही पुलासाठी टोल देणे हे सामाजिक न्यायाला धरूनच होईल.
सुलक्षणा महाजन
sulakshana.mahajan@gmail.com