Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १० जुलै २००९

विविध


आसाममधील माजुली जिल्ह्यामध्ये गुरुवारी पुरामध्ये अडकलेले हे कुटुंब केळीच्या खांबांची होडी करून सुरक्षित स्थळी जात होते.

मिशिगन लेकच्या तीरी रंगली श्री श्रींची ग्लोबल गुरुपौर्णिमा!
चंद्रशेखर कुलकर्णी, शिकागो, ९ जुलै

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फायदे अनेक असले, तरी मानवी जीवन अध्यात्माशिवाय अधुरेच आहे. अध्यात्माच्या आधारेच प्रगतीचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन ‘आर्ट ऑफ लीव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी येथील मिशिगन लेकच्या तीरी असलेल्या हिल्टन हॉटेलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित एका सत्संग सोहळ्यादरम्यान ‘लोकसत्ता’च्या प्रस्तुत प्रतिनिधीस दिलेल्या खास मुलाखतीत केले.

मुंबई-दिल्ली, नागपूर-दिल्ली ‘दूरांतो’ गाडय़ांची ममतांकडून घोषणा
नवी दिल्ली, ९ जुलै/खास प्रतिनिधी

रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी आज महाराष्ट्रातून मुंबई-दिल्ली आणि नागपूर-मुंबई अशा आणखी दोन ‘दूरांतो’ नॉनस्टॉप सुपरफास्ट गाडय़ा सुरु करण्याची घोषणा केली. आज लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ममता बॅनर्जीं यांनी आपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या तरतुदी केल्या याची माहिती दिली आणि तुम्हाला आणखी काय हवे? असा काहीशा संतापाने प्रतिप्रश्न केला. विश्वस्तरीय रेल्वेस्थानकांच्या यादीत गोवा आणि कालिकत यांचा समावेश करण्यात येत असल्याचीही त्यांनी घोषणा केली.

रेल्वेकडे अवघे ८,३६१ कोटीच ‘सरप्लस’
नवी दिल्ली, ९ जुलै/खास प्रतिनिधी

लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वेने कमावलेल्या तथाकथित ९० हजार कोटी रुपयांच्या नफ्यातील केवळ ८ हजार ३६१ कोटींचाच ‘सरप्लस’ किंवा अतिरिक्त निधी आता रेल्वेपाशी उरला असल्याचे आज लोकसभेत जाहीर करून रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी लालूंच्या दाव्यातील पोकळपणा उजेडात आणला.

दक्षिण कोरियाचे संशोधक बनवित आहेत इलेक्ट्रॉनिक बॉम्ब!
सेऊल, ९ जुलै /पी.टी.आय.

दक्षिण कोरियाच्या संरक्षण सामग्रीविषयक संशोधकांनी इलेक्ट्रॉनिक बॉम्ब तयार करण्याचे काम हाती घेतले असून एका किलोमीटरच्या परिघातील एक रडार, जहाज व दळणवळण यंत्रणाही नष्ट करू शकेल, अशी ताकद या बॉम्बमध्ये असेल असा संशोधकांचा दावा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स बॉम्ब (ईएमपी) असे या प्रकारातील हे बॉम्ब परिसरातील उच्च संरक्षण यंत्रणेचे नुकसान करू शकतील आण्विक शक्तीचाही वापर त्यामध्ये करता येऊ शकेल, अशी ताकद या पद्धतीमधील बॉम्बची आहे. सध्या काही मीटर अंतरापर्यंतच प्रभावी ठरू शकतील, अशी या बॉम्बची जडणघडण करण्यात आली आहे. २०१४ सालापर्यंत आम्ही एक किलोमीटर परिघाचा टप्पा गाठू शकू, असा दक्षिण कोरियाच्या एजन्सी फॉर डिफेन्स डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु एक किलोमीटरचा टप्पा जोपर्यंत गाठू शकत नाही तोपर्यंत हे बॉम्ब प्रभावी वा सामथ्र्यशाली म्हणता येणार नाहीत. सुमारे दहा वर्षांंपासून हे संशोधन सुरू असून उत्तर व दक्षिण कोरियामधील वादामुळे दोन्ही देशांत चांगलाच तणाव असून त्या भीतीपोटी असे बॉम्ब तयार करण्याच्या संशोधनाला गती आल्याचे बोलले जाते.

‘वरुण’प्रश्नी सुषमा अजूनही नाराजच
नवी दिल्ली, ९ जुलै/ पी.टी.आय.

वरुण गांधी यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी दिलेल्या माहितीमुळे आपले समाधान झाले नसल्याचे भाजपच्या नेत्या आणि लोकसभेतील विरोधी पक्षाच्या उपनेत्या सुषमा स्वराज यांनी सांगितले. भाजपचे युवा खासदार वरुण गांधी यांना देण्यात येत असलेल्या सुरक्षेबाबत स्वराज यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. गृहखात्याकडून याबाबत व्यवस्थित तसेच समाधानकारक माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. पी. चिदम्बरम यांनी हा आरोप खोडून काढताना केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसारच वरुण गांधी यांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. तसेच याबाबत स्वराज वा अन्य कोणीही आपणास प्रत्यक्ष भेटून चर्चा केल्यास त्याचे स्वागतच होईल असेही चिदम्बरम यांनी यावेळी सांगितले होते. चिदम्बरम यांनी केलेल्या या आवाहनुसार आज सुषमा स्वराज यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण अद्यापही याप्रश्नी पूर्ण समाधानी नसल्याचे स्पष्ट केले. पी. चिदम्बरम यांनी दिलेल्या माहितीमुळे पदरी निराशाच पडल्याचे वक्तव्य करतानाच या भेटीमध्ये निश्चित कोणत्या प्रकारे चर्चा झाली यांची माहिती देण्यास मात्र स्वराज यांनी नकार दिला. वरुण गांधी यांच्या ुसरक्षेप्रश्नी गृहखात्याला दिलेल्या पत्राबाबत बोलताना स्वराज म्हणाल्या की या पत्रातील मसुदा काय आहे तसेच त्याची तीव्रता किती आहे याची जाणीव गृहखात्याला असेल असे वाटते. गरज पडल्यास या पत्रातील मसुदा जनतेसाठी प्रसिध्द करावा.

तसलिमा नसरिन यांची मायदेशी परतू देण्याची हसिनांकडे मागणी
ढाका,९ जुलै/वृत्तसंस्था

वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तसलिमा नसरिन यांनी मायदेशी परतण्याची परवानगी पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडे मागितली आहे. त्यांच्या मागणीवर शेख हसीना यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बंडखोर लिखाणामुळे मूलतत्त्ववादी संघटनांनी जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे १५ वर्षांपासून तसलिमा नसरिन या बांगलादेशाबाहेर राहत आहेत. ‘ब्लिट्झ’ साप्ताहिकाला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत आणि बांगलादेशमधील राजवटींविषयी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भारतातील राजकीय पक्ष मतांसाठी मुस्लिम मूलतत्त्ववादी संघटनांना पाठीशी घालत आहेत. भारतीय लोकसंख्येतील २५ टक्के असलेल्या मुस्लिम समाजातील मौलवी हे मुस्लिमांनी कोणत्या पक्षाला मते द्यावीत हे ठरवितात, त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास नाही, असे नसरिन यांनी मुलाखतीत म्हटले आहे. भारतामध्ये काही वर्षे नसरिन यांचे वास्तव्य होते. येथील मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधामुळे त्यांना २००७ साली भारतही सोडावा लागला होता. सध्या त्यांचे वास्तव्य पॅरिसमध्ये आहे.
भारत सोडावा लागल्याबद्दल मत व्यक्त करताना नसरिन म्हणाल्या की, इस्लाम विरोधी म्हणवले जाईल म्हणून भारतीय प्रशासनाने मला भारतात राहण्याची परवानगी नाकारली. येथील मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांनी मी इस्लाम भ्रष्ट केल्याचा दावा केला . भाषण स्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य यांना पाठिंबा देण्याऐवजी येथील राजकारण्यांनी माझ्याविरोधात फतवा काढला. मला पाठिंबा दिल्यास इस्लामच्या विरोधात गेल्यामुळे मुस्लिमांची मते हातून जातील असा विचार येथील राजकारण्यांनी केला, असा आरोप त्यांनी केला. बांगला देशामध्ये माझा जन्म झाला असून मायदेशात राहण्याचा मला पूर्ण हक्क आहे. मात्र माझा हा हक्क अनेकवेळा हिरावून घेण्यात आला आहे. माझ्यावर बंदी घालण्याचे कोणतेही कारण मूलतत्त्ववाद्यांनी दिले नाही.

इराकमध्ये दोन आत्मघाती बॉम्बस्फोटात ३४ ठार
मोसूल, ९ जुलै/पीटीआय

इराकमधील ताल अफर भागामध्ये आज घडविण्यात आलेल्या दोन आत्मघाती बॉम्बस्फोटांमध्ये ३४ जण ठार तर ६० जण जखमी झाले. इराकमधील महत्वाची शहरे व गावांमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्यात आल्याच्या घटनेला एक आठवडाही उलटत नाही तोच हे भीषण बॉम्बस्फोट घडविण्यात आले. इराकी सुरक्षा दलासाठी काम करणाऱ्या दोन भावांना उडविण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडविण्यात आले. दहशतवादी हल्ले चढविणाऱ्यांवर खटले सुरू असलेल्या न्यायालयाची इमारत उडवून देणे हे ही या स्फोटामागील उद्दिष्ट होते. याच इमारतीत हे दोन्ही भाऊ काम करीत होते. आत्मघाती हल्लेखोरांनी काही मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट घडविले. या बॉम्बस्फोटांमध्ये ३४ लोक ठार तर ६० जण जखमी झाले. मोसूल येथे बुधवारी कारबॉम्बस्फोटामध्ये १२ जण ठार व तितकेच जण जखमी झाले होते. त्याच्याच दुसऱ्या दिवशी आज ताल अफर भागामध्ये दोन आत्मघाती बॉम्बस्फोट घडविण्यात आले. ज्या दोन भावांना लक्ष्य करण्यासाठी हे स्फोट घडविण्यात आले ते मात्र सुदैवाने बचावले.

अफगाणिस्तानमध्ये मालमोटारीत स्फोट होऊन २५ जण ठार
काबूल, ९ जुलै/ एएफपी

स्फोटकांनी भरलेली एक मालमोटार उलटून त्यानंतर झालेल्या स्फोटात शालेय विद्यार्थ्यांसह २५ जण ठार झाले. ही घटना काबूलच्या दक्षिणेकडील लोगर प्रांतात शहराच्या मुख्य रस्त्यावर घडली.
ही मालमोटार जळाऊ लाकडाने भरली होती आणि ती हेतूपुरस्सर उलटवण्यात आल्यासारखे दिसत होते. घटनास्थळी तेथे अधिकारी पोहोचल्यानंतर दुर्घटनाग्रस्त मोलमोटार हलवण्याचे प्रयत्न सुरु असताना त्यात स्फोट झाले. या स्फोटात २१ अफगाणी नागरिक ठार आणि ४ पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे लोगार प्रांताचे पोलीस प्रमुख गुलाम मुस्तफा मोहसिनी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ठार झालेल्या नागरिकांमध्ये काही शालेय विद्यार्थी आणि प्रौढ पुरुषही होते. ही दुर्घटना घडली त्या मोहम्मद आघा जिल्ह्य़ाचे गव्हर्नरने याबाबत माहिती देताना सांगितले की, १२ जणांची ओळख पटली असून, त्यातील बहुतांश शालेय विद्यार्थी आहेत. या स्फोटात काही दुकानेही कोसळळी. ढिगाऱ्याखाली आणखी काही मृतदेह आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

मुंबई हल्ल्यातील आरोपींवर पाकिस्तानात लवकरच खटला..
इस्लामाबाद, ९ जुलै/वृत्तसंस्था

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी पाकिस्तानात अटकेत असलेल्या सहा गुन्हेगारांवर लवकरच पाकमध्ये खटला चालू होईल, अशी माहिती देशाचे अ‍ॅटर्नी जनरल सरदार लतीफ खोसा यांनी दिली. एकेकाळी भारतावर हल्ल्यांसाठी पाकिस्तानातच दहशतवादी तयार करण्याच्या धोरणापासून पाकिस्तान आता किती विभक्त झाला आहे, हे खटला उभा राहिल्यावर त्यातून दिसून येणार आहे. खटल्याची प्रक्रिया रुळावर आहे आणि लवकरच ती पूर्ण होईल असे खोसा म्हणाले, पण गुन्हेगारांच्या वकीलांनी मात्र सरकारने त्यांच्यावर ठेवलेल्या आरोपपत्राचे दस्तावेज आम्हाला अद्याप मिळालेले नाहीत, तसेच तुरुंगात या सहा जणांना भेटू दिले जात नाही, अशी टीका केली आहे. सरदार खोसा या खटल्याचे वेळापत्रक अजून देऊ शकलेले नाहीत. सध्या हे सहाही आरोपी रावळपिंडी येथील तुरुंगात कडक सुरक्षा व्यवस्थेत अटकेत असून त्यांच्यावरील खटल्याची सुनावणीही इन कॅमेरा व कडेकोट बंदोबस्तात सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २६/११ च्या हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी पाकिस्तानात मोबाइल संचावरून केलेल्या कॉल्सच्या सविस्तर माहितीसह सर्व पुरावे भारताने पाकिस्तानच्या हवाली केव्हाच सुपूर्द केले आहेत. भारत, अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे पाकिस्तानातील या संभाव्य खटल्याच्या घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून असून दहशतवादविरोधी लढाईबाबत पाकिस्तान आतापर्यंत देत असलेल्या आश्वासनाबाबत ते किती प्रामाणिक आहे हे या खटल्यातून दिसून येणार आहे. यापूर्वी पाकिस्तानात कोणत्याही दहशतवाद्यावर कधीही खटला चालविण्यात आलेला नाही.

‘बर्गर किंग’ने मागितली हिंदूंची माफी
वॉशिंग्टन, ९ जुलै/वृत्तसंस्था

हिंदूू धर्मियांच्या भावना दुखविणारी जाहिरात स्पेनमध्ये केल्याबद्दल उमटत असलेल्या तीव्र प्रतिक्रिया पाहून अखेर ‘बर्गर किंग’ने आज हिंदू धर्मियांची माफी मागितली. ‘बर्गर किंग’ने हिंदूू देवतेचा अनादर करणारा भाग आपल्या जाहिरातीमध्ये आणल्यामुळे ही जाहीरात तातडीने बदलण्यात यावी अशी मागणी अमेरिकेतील हिंदू समुदायाच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या ‘हिंदू अ‍ॅडव्होकेसी ग्रुप’ संघटनेने काल केली होती. बर्गर किंगने स्पेनमधील आपल्या मुद्रीत जाहिरातीमध्ये मांसयुक्त बर्गरवर हिंदूंमध्ये दैवत समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी मातेला बसवलेले दाखविले आहे. त्यावर ‘पवित्र खाद्य’ अशा आशयाचे स्पॅनिश वाक्यही देण्यात आले आहे. यावर स्पेन आणि अमेरिकेतील हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘बर्गर किंग’ने नमते घेतले. जाहिरात बनवण्यामागे कुणाच्याही भावना दुखावल्या जाव्यात असा आमचा हेतू नव्हता, असे ‘बर्गर किंग’चे प्रवक्ते डेनिस विल्सन यांनी हिंदू संघटनेला कळविले आहे. ज्या देशांमध्ये बर्गर किंगची रेस्टॉरंट्स आहेत त्या सर्व देशांमधील समुदायांचा आदर आमच्याकडून केला जातो. ही जाहिरात केवळ स्पेनमधील स्थानिक परिसरात वापरण्यात आली होती. त्यामागे हिंदूंचा अपमान करण्याचा कंपनीचा हेतू नव्हता, असेही विल्सन यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत टिमोथी रोमर
वॉशिंग्टन, ९ जुलै/पी.टी.आय.

अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत म्हणून माजी डेमोक्रॅटिक काँग्रेस सदस्य टीम रोमर (टिमोथी रोमर) यांच्या नावावर अमेरिकन सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीने शिक्कामोर्तब केले. बराक ओबामा यांनी टिमोथी यांच्या नावाची शिफारस केली होती. बुधवारपासून टीम रोमर भारतीय राजदूतपदाची जबाबदारी स्वीकारतील. रोमर यांनी यापूर्वी अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए.चे प्रमुखपद सांभाळले आहे. अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या ‘ब्लू रिबन कमिशन’वर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली होती.

अमरनाथ यात्रेकरूंना नेणारे हेलिकॉप्टर कोसळून १ ठार
श्रीनगर, ९ जुलै/पी.टी.आय.

अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंची नेआण करणारे एक हेलिकॉप्टर आज सकाळी या देवस्थानाजवळ कोसळून झालेल्या दुर्घटनेत जमिनीवरील एक महिला यात्रेकरू ठार झाली, तर अन्य चार प्रवासी व चालक हे गंभीररित्या जखमी झाले. अमरनाथ यात्रेकरूंसाठी चार वर्षांपूर्वी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली, त्यानंतर झालेला हा पहिलाच अपघात आहे. ३८८० फूट उंचीवरील देवस्थानाकडे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या हिमालयन एव्हिएशन कंपनीच्या या हेलिकॉप्टरमध्ये सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी तांत्रिक बिघाड झाला व ते खाली कोसळले. कोसळताना वेगाने फिरणाऱ्या त्याच्या पंख्याचे पाते लागून मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्य़ातील कलावती ही महिला मृत्युमुखी पडली. कलावती या वेळी यात्रा मार्गावरून पायी चालत जात होती. हेलिकॉप्टरमध्ये या वेळी चार प्रवासी बसलेले होते. त्यातील दोघांना किरकोळ दुखापत झाली. अन्य दोन प्रवासी व चालक यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

न्यायाधीशावर हल्ला करणारे वकील गजाआड
नवी दिल्ली, ९ जुलै / पी.टी.आय.

न्यायालयात आरोपीवर हल्ला होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत पण भर न्यायालयात वकिलानी न्यायाधीशाला मारहाण केल्याची अजब घटना येथे घडली. घटस्फोटाशी संबधित एका खटल्याबाबत सुनावणीदरम्यान हा प्रकार झाला. न्यायाधिशावर हल्ला करणाऱ्या दोन वकीलांना पोलिसांनी त्वरित अटक केली. विकास गुप्ता आणि रेखा शर्मा अशी त्यांची नावे आहेत. येथील रोहिणी न्यायालयात घटस्फोटाशी संबधित या खटल्याचे कामकाज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पंकज गुप्ता यांच्यासमोर चालले होते. यावेळी गुप्ता यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून विकास गुप्ता आणि रेखा शर्मा या दोन वकिलांनी अन्य वकिलांच्या मदतीने न्यायालयात गोधळ घातला आणि गुप्ता यांना धक्काबुक्की केली. या घटनेने येथे एकच खळबळ माजली. पोलिसांनी गुप्ता तसेच रेखा शर्मा यांना अटक केली.

अहमदाबाद परिसरात विषारी दारूच्या बळींची संख्या ८३ वर
अहमदाबाद, ९ जुलै / पी.टी.आय.

ओधार, आमराईवाडी, रायपूर, राखीअल व अन्य भागात विषारी दारूने बाधीत झालेल्या अनेकांना शहरातील विविध इस्पितळात दाखल करण्यात आले असून आतापर्यंत या विषारी दारुने मरण पावलेल्यांची संख्या आता ८३ वर गेली आहे.काल रात्रीपर्यंत या दारुने बाधीत झालेले शंभरपेक्षा अधिक लोकांना उपचारासाठी इस्पितळात आणले गेले. आज सकाळपर्यंत यातील मृतांमध्ये आणखी २५ जणांची भर पडल्याने हा आकडा ८३ इतका झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकारामुळे विविध भागातील रहिवासी व दुकानदारांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधी नारेबाजी केली. काही ठिकाणी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. ओधाव येथील स्थिती आता नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात आले. एकंदर ११ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक सहाय्यक उपनिरिक्षक दगडफेकीमध्ये जखमी झाला आहे. दरम्यान, बेकायदेशीर दारू गुत्त्यांवर पोलीस खात्याने आता राज्यभर धाडी घालणे सुरू केले असून अनेक ठिकाणचे गुत्ते, भट्टय़ा बंद केल्या आहेत.

जी-८ बैठकीत दहशतवादावर चर्चा
एल-अकिला, ९ जुलै/ पीटीआय

जागतिक शांतता आणि सुरक्षेपुढे दहशतवादाचे प्रचंड मोठे आव्हान असून, दहशतवादी कारवायांनी वेढले गेलेले पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन देश, शिखर बैठकीतील चर्चेचे अग्रक्रमाचे विषय असल्याचे जी-८ देशाच्या नेत्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह उपस्थित असलेल्या नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेनंतर ‘दहशतवादाचा मुकाबला’ या विषयावर मंजूर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की, दहशतवाद हा नेहमीच आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी फारमोठे आव्हान ठरला आहे. दहशतवादी कारवाया कोणत्याही स्वरुपाच्या असोत आणि कोणाकडूनही होवो त्या नेहमीच असमर्थनीय राहणार आहेत.

दारूकांड: बळींची संख्या ८६
अहमदाबाद, ९ जुलै / पी.टी.आय.

विषारी दारूने बाधीत झालेल्या अनेकांना शहरातील विविध इस्पितळात दाखल करण्यात आले असून आतापर्यंत या विषारी दारुने मरण पावलेल्यांची संख्या ८६ वर गेली आहे.

दरड कोसळून २४ ठार
यांगोन, ९ जुलै / ए.एफ.पी.

उत्तर म्यानमारमध्ये मुसळधार पावसामुळे फाकंटनजीक लोनखिन येथे दरड पडून २४ खाण कामगार ठार झाले. १३ महिलांसह एकंदर २४ कामगार दरडीखाली गाडले गेले, असे पोलिसांनी सांगितले.