Leading International Marathi News Daily
शनिवार, ११ जुलै २००९
  गराज सेलची गंमत
  अलिबाबाचा खजिना
  ...पण बोलणार आहे!
जैसी गोरूवे रुखातली बैसली
  व्ह्यू पॉइंट
किक
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  भिन्नतेचा समंजस स्वीकार
  दीपशिखा!
  लोकसंख्या नियंत्रण
एकत्रित प्रयत्नांची गरज
  काळ सुखाचा
निरीक्षणाचे असेही क्षण
  पाळणाघरातील संगोपकांसाठी पालकशाळा
  चिकन सूप...
एरिकची शिकवण
  ‘ति’चं मनोगत
प्रतिभावंतांची संसारचित्रे
  कवितेच्या वाटेवर...
मी तर प्रेमदिवाणी..
  कमला मेहता अंधशाळा
शतकोत्तरी प्रवास
  ललित
वास्तवातला पाऊस
  काजुल्याचे झाड
  तांबडंलाल पाणी

 

गराज सेलची गंमत
उन्हाळा सुरू होताच अमेरिकेत गराज सेलच्या पाटय़ा झळकू लागतात. यंदा तर मंदीमुळे घरं बदलणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. कुणी नोकरी गेल्यामुळे स्थलांतर करतंय, तर कुणी मोठय़ा जागेतून लहान घरात राहायला जातंय. तर कुणी मधल्या काळात खरेदी केलेल्या अनावश्यक वस्तूंचा साठा बाहेर काढतंय. परिणामी गराज सेल जोरात सुरू आहेत. मॉल क्रांतीनंतर भारतीयांचं अनावश्यक खरेदीचं प्रमाण तुफान वाढलंय. स्थलांतरेही सर्रास होत आहेत. एक्स्चेंज ऑफरचा फोलपणा जाणवू लागलाय. पर्यावरणरक्षणासाठी वस्तूंच्या पुनर्वापराचं महत्त्वही कळू लागलंय. त्यामुळे गराज सेल ही संकल्पना यापुढे भारतातही उपयुक्त वाटू शकते..
एका शनिवारी आम्ही जराशा उशिरानेच उठलो. कामावर जायचं नव्हतं. सुट्टीच्या दिवशी कोण कशाला उठतंय लवकर? बेडरूममधून बाहेर आले तर अमेरिकेत आमच्याकडे आलेल्या माझ्या सासूबाई म्हणाल्या, ‘सकाळपासून खूप मोटारी येत आहेत. शेजाऱ्यांकडे बाहेर काहीतरी वस्तू मांडून ठेवल्या आहेत. त्या पाहून पाहून परत जात आहेत. काय आहे तिकडे?’
‘ते? गॅरेज सेल आहे आज.’ माझ्या एवढय़ा उत्तराने त्यांचं शंकानिरसन झालं नाही. खिडकीच्या काचेजवळ उभं राहून त्यांनी बिनधास्त भारतीय स्टाईल बाहेर पाहिलं आणि उत्सुकतेने तिथे पाहातच राहिल्या. मीही त्या दृश्याचा आस्वाद घेत ‘गॅरेज सेल’

 

किंवा ‘गराज सेल’ ही टर्म त्यांना समजावत राहिले. अमेरिकेसारख्या श्रीमंत म्हणून समजल्या जाणाऱ्या देशात आपल्याला नको असलेल्या वस्तू कचऱ्यात टाकून न देता अशा विक्रीसाठी ठेवल्या जातात आणि शानदार मोटारीतून येऊन लोक त्यांची खरेदीही करतात, हे त्यांना नवे होते. आपल्या घरातल्या वस्तू अशा आपल्याच गॅरेजमध्ये विक्रीसाठी मांडण्याची पद्धत पाहून त्यांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते.
शेवटी कपडे बदलून आम्ही दोघीही सेल लावलेल्या गॅरेजकडे निघालो.
बंगलेवजा घर आणि त्याला लागूनच दोन कार मावतील असे गॅरेज. त्याचे दरवाजे सताड उघडे टाकलेले होते. गाडय़ा गॅरेजबाहेर लावून लॉनवर किंवा गॅरेजमध्ये खुच्र्या टाकून त्या घरची माणसं बसली होती. तिथे गेल्या गेल्या खुर्चीतून उठून ‘हॅलो’ म्हणून हसून आमचे स्वागत झाले. वापरलेले कपडे, जुने-नवे बूट, रोमोट कंट्रोल कार, बाहुल्या, काही हलणारे, डुलणारे टॉईज, खेळातली वाद्ये, लहान-मोठे सँडल्स, अन्न शिजवायची जाड बुडाची भांडी, नव्या चादरींचा सेट अशा काहीबाही वस्तू गॅरेजमध्ये आत आणि त्या बाहेर ड्राइव्ह वेवर विक्रीसाठी मांडून ठेवल्या होत्या. त्यावर किमतींच्या पट्टय़ाही चिकटवलेल्या दिसल्या.
इतके दिवस हाय/बाय इतपतच संपर्क असलेल्या शेजारणीशी मी पहिल्यांदाच जास्त बोलत होते. सासूबाई मात्र गॅरेजभर हिंडून वस्तू पाहात होत्या. त्यांना पाहून विक्रेत्या शेजारणीने मला विचारलं, ‘व्हॅट इज शी लूकिंग फॉर? मे आय नो सो दॅट आय कॅन हेल्प हर बेटर?’ मला माहिती होतं की आम्ही विंडो शॉपिंगसाठी तिथे पोचलो आहोत. पण हे तिला कसं सांगणार? मी सुचेल तसं म्हटलं की, त्या भारतात परत जाणार आहेत. म्हणून पाहात असतील काहीतरी घरात लावायला शोभेसाठी.
ती आत गेली आणि एक मोठ्ठं पेंटिंग बाहेर आणलं. ‘आय कॅन गिव्ह अवे धिस, इफ शी लाइक्स. आय बॉट धिस इन न्यूझिलंड इन वन एक्झिबिशन. व्हेरी ब्युटीफुल! बट इन माय न्यू हाऊस धिस हॅज नो गुड प्लेस.’ मग ती सासूबाईंजवळ गेली आणि म्हणाली, ‘लूक. इंझंट इट नाईस? डू यू लाईक धिस?’
माझ्या सासूबाईंना काय करावं तेच कळेना. त्या नुसत्याच हसल्या. माझ्याकडे वळून मला विचारलं, ‘काय म्हणते आहे ती? कसलं चित्र आहे हे ते समजावून देते आहे का?’
त्यांना काहीच उत्तर न देता मी शेजारणीला सांगून टाकलं, ‘शी सेज दॅट इटस् नाईस. बट टू बिग फॉर हाऊस इन इंडिया.’
मी शेजारणीला पुढे बोलूच दिलं नाही. ‘यू नो, इन इंडिया हाऊसेस आर स्मॉल इन सिटीज. जस्ट लाईक न्यूयॉर्क.’ मी विषयांतर केलं आणि थोडय़ाच वेळात आम्ही तिथून पळ काढला. न जाणो आतून लहान पेंटिंग आणून आमच्या गळ्यात मारलं तर?
तितक्यात एक लहान मुलगा, शाळकरी मुलगी आणि त्यांचे आई-वडील असं कुटुंब गाडीतून उतरले आणि गॅरेजमध्ये शिरले. आई त्या मुलीला म्हणाली, ‘स्विटी, लूक द टॉईज. वुई कॅन बाय वन ऑफ दीज.’ ती मुलगी आनंदली, उडय़ा मारत निळ्या डोळ्यांनी भिरभिरी पाहू लागली. वडील मात्र लगेच बाहेर आले आणि गॅरेज सेलमधल्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड चालले नसते म्हणून की काय पैशाच्या पाकिटात किती कॅश आहे ते पाहू लागले.
आम्ही पुढच्या गॅरेजला पोहोचलो. ‘हॅलो’ म्हणून तिथला विक्रेता शेजारी मोबाईल फोनवर बोलत राहिला. आम्हाला बरंच वाटलं. अगदी मोकळेपणाने आम्ही तिथे विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू पाहिल्या. लाकडी नक्षीकाम केलेला टीपॉय, सीडी ठेवायचा स्टँड, शेजारी उभा करून ठेवलेला गोल्फ गेमचा सेट, गवत कापायचे मशीन, त्याच्या धारदार पाती, त्याचे ऑइल, काही स्पॅनिश जाड जाड पुस्तके, पायाखाली घालायचा छोटा गालिचा आणि अशाच बऱ्याचशा वस्तू मांडलेल्या होत्या. तेवढय़ात एका कारमधून एक माणूस उतरला. तो त्या शेजाऱ्याचा मित्र असावा. त्याने एका बॉक्समधून काचेच्या डिशेस, काटे, चमचे यांचा पूर्ण सेट बाहेर काढला आणि तिथल्या टेबलावर मांडून ठेवला. छोटे चमचे अजूनही प्लास्टिक वेष्टनात होते. ते न वापरलेले दिसले. बाकी माल मात्र वापरलेला दिसत होता. तो मित्र पुन्हा कारपाशी गेला आणि डिकीतून दोन ड्रॉव्हरचे मेटॅलिक कॅबिनेट घेऊन आला आणि विक्रीसाठी त्या गॅरेजमध्ये ठेवले. त्यावर किंमत चिकटवली द्द्र5. आमच्या घरातील फाइल्स ठेवायला मला तसेच कॅबिनेट पाहिजे होते. पण मार्केटमध्ये ते ३५ ते ४० डॉलरला होते. शिवाय अत्यावश्यक नव्हते म्हणून इतके दिवस ती खरेदी मी टाळत होते. मी त्या कॅबिनेटचे ड्रॉव्हर उघडझाप करून पाहिले. बाहेरून एक-दोन रंग गेल्याचे ओरखडे सोडले तर बाकी सर्व काही ठीकठाक होते. मला ते कॅबिनेट आमच्यासाठी एकदम उपयोगी वाटले. इतके स्वस्त असल्यामुळे जरा मोह झाला.
‘‘आई, घेऊया का हे स्टडीमध्ये ठेवायला?’’ मी सासूबाईंना विचारलं.
‘‘नको गं बाई, कशाला वापरलेल्या वस्तू घ्यायच्या? वापरायच्या तर नव्या घेऊन वापरा वस्तू. नाही तर नका वापरू,’’ उत्तर ऐकून मी जरा हिरमुसले.
‘‘अगं, स्वत:च्या वस्तूत आपल्या वासना असतात. त्याच्या मालकीबरोबर काही भावनाही अडकलेल्या असतात त्यात. कोण जाणे ही वस्तू कुणाची? कुठली? का विकायची पाळी आली त्यांना. अशी वस्तू आपण घेतली तर ती वासनाही येईल घरी बरोबर. कशाला हवीय नवी आपत्ती़? पैसे साठव आणि नवंच घे कॅबिनेट.’’
..मी मोह आवरता घेऊन त्या स्वस्त आणि मस्त अशा वस्तू तशाच सोडून बाहेर पडले.
पुढील गॅरेजजवळ जुनाट गाडय़ा उभ्या होत्या. तिथे काही विद्यार्थी आधीच आलेले होते. विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू निरखून पाहत होते. मूव्ही सीडीज, साऊंड स्पीकर्स, शूज, इलेक्ट्रिक वायर्स, डायनिंग टेबल, फोल्डिंग खुर्ची अशा कॉलेज लाइफसाठी उपयुक्त अशा वस्तू पटापट उचलून कॅश पैसे देऊन ते तरुण टाळकं हसत खिदळत बाहेर पडलं.
आम्हाला तिथून किंवा इतरत्र कुठल्याच गॅरेज सेलमधून काहीही विकत घ्यायचं नव्हतं. तरीही घरी परतत असताना आमच्या विभागातील इतर सेल असलेल्या गॅरेजचा पत्ता आणि तिथल्या विक्रीच्या वस्तूंची यादी आम्ही घ्यायला विसरलो नाही. हा प्रकार एकंदरीत आकर्षक वाटतो खरा, पण आमच्यासारख्या पक्कया भारतीय मनोवृत्तीला मात्र इथे खरेदी करणं रुचलं नाही आणि धाडसही झालं नाही.
मीनल गद्रे
जॉर्जिया, अमेरिका