Leading International Marathi News Daily

शनिवार , ११ जुलै २००९

भारतात कृत्रिम पावसाचे यश; एक अनुत्तरित प्रश्न!
अभिजीत घोरपडे
जगभरातील वीस-पंचवीस देशांमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग नियमितपणे हाती घेण्यात येत असून, त्यांच्या यशस्वीतेबद्दल दावे केले जात असले, तरी भारतातील या प्रयोगांचे यश हा अजून तरी अनुत्तरीतच प्रश्न आहे. पावसाळ्यात आकाशात काळे ढग असतानाही पाऊस पडत नाही, तेव्हा या प्रयोगांची भरपूर चर्चा होते. अशा काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे, म्हणजेच कृत्रिम पाऊस! अशाप्रकारे ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडण्याप्रमाणेच गारांचा आकार कमी करण्यासाठीसुद्धा या प्रयोगांचा उपयोग केला जातो. याशिवाय काही प्रदेश पावसापासून मुक्त ठेवायचा असेल, तर या प्रयोगांद्वारे पाऊस आधीच पाडून ढग रिते केले जातात. असे वेगवेगळ्या प्रकारे हवामानात बदल घडवून आणणे म्हणजे ‘वेदर मॉडिफिकेशन’! तहान लागल्यावर विहीर- अग्रलेख

मान्सूनने दगा दिला
शरद पवार यांची कबुली

नवी दिल्ली, १० जुलै/खास प्रतिनिधी

यंदा मान्सून सामान्य असून देशात कुठेही दुष्काळाची स्थिती नाही, अशी ग्वाही देणारे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना यंदा पावसाने दगा दिल्याचे अखेर आज मान्य करावे लागले. पावसाअभावी पेरण्या वाया गेल्यास राज्यांना अतिरिक्त बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील, असेही पवार यांनी आज राज्यसभेत जाहीर केले. यंदा देशभरात सरासरीच्या ९३ टक्के मान्सूनचा पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्याच्या वतीने विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन आठवडय़ांपूर्वी दिले होते.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता ‘एटीकेटी’चा दिलासा
औरंगाबाद, १० जुलै/खास प्रतिनिधी

दहावी-बारावीमध्ये दोन विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्याची संधी मिळणार आहे! ‘ए. टी. के. टी.’च्या या ऐतिहासिक निर्णयाची माहिती शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज पत्रकारांना दिली. या निर्णयामुळे दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. त्यांना अकरावीत या वर्षांपासूनच प्रवेश मिळणार आहे. विखे म्हणाले, ‘‘दहावी आणि बारावीमध्ये नापास झाल्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले होते आणि वर्षही वाया जात होते. या संदर्भात राज्यातील अनेक शिक्षणतज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार हा ऐतिहासिक निर्णय घेतला.’’

‘मराठी माणसाशी प्रतारणा झाल्यानेच मनसेला रामराम’
मुंबई, १० जुलै / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर मनसेत मी फार अस्वस्थ होते. मराठी मतांत फुट पडून मराठी माणसाचेच नुकसान झाले. आपण मराठी माणसाशी प्रतारणा केल्याची जाणीव झाली आणि मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन मनसेच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा श्वेता परुळकर यांनी आज केले. श्वेता परुळकर यांनी गुरुवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज ‘शिवालय’ येथे परुळकर यांनी आपल्या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. या प्रसंगी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, दक्षिण मध्य मुंबईचे विभागप्रमुख अजय चौधरी तसेच परुळकर यांच्या आधी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले दिगंबर कांडरकर आदी उपस्थित होते.

पवार गटाचीच बाजी ; मात्र विरोधकांचा कार्यकारिणीत शिरकाव
मुंबई, १० जुलै / क्री. प्र.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत शरद पवार गटाने बाळ महाडदळकर गटाचा पराभव करून सत्ता आपल्याकडेच राखली. या निवडणुकीचे प्रमुख आकर्षण असलेली कोषाध्यक्षपदाची निवडणूक रत्नाकर शेट्टी यांनी बाळ महाडदळकर गटाचे प्रमुख रवी सावंत यांचा ४० मतांनी पराभव करून जिंकली. संयुक्त चिटणीसपदाच्या निवडणुकीत मात्र पवार गटाला जबरदस्त धक्का बसला. हेमंत वायंगणकर यांनी आपले संयुक्त चिटणीसपद राखण्यात यश मिळविले असले तरीही पवार गटाचे दुसरे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी मात्र पराभूत झाले आहेत. महाडदळकर गटाचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार लालचंद राजपूत निवडून आले आहेत. समिती सदस्यांसाठीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पवार गटाचे ७ उमेदवार विजयी झाले, तर महाडदळकर गटाचे ४ जण जिंकले आहेत.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी जमीन संपादन थांबले
हायकोर्टाचा अंतरिम आदेश
मुंबई, १० जुलै/प्रतिनिधी
भारत-अमेरिका अणू-सहकार्य कराराने जागतिक बाजारपेठेतून अणूतंत्रज्ञान प्राप्त करण्यातील भारताचा वनवास संपल्यानंतर परकीय तंत्रज्ञानाने उभारल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील नियोजित अणूऊर्जा प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याच्या बाबतीत ‘जैसे थे’ परिस्थिती कायम ठेवण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने भूसंपादनाची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु होण्यापूर्वीच थांबली आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय अणुऊर्जा महामंडळ (एनपीसीएल) उभारत असून सुरुवातीस तेथे प्रत्येकी १६५० मेवॉ वीजनिर्मिती करणाऱ्या दोन अणुभट्टय़ा उभारण्यात येणार आहेत. अंतिमत: तेथे एकूण १० हजार मेव्ॉ वीजनिर्मितीचे ‘अ‍ॅटॉमिक एनर्जी पार्क’ उभारण्याची योजना आहे. यासाठी राज्य सरकार जैतापूरच्या परिसरातील माडबन, निवेली, करेल, मिठगव्हाणे आणि वारलीपाडा या पाच गावांमधील एकूण ९६८ हेक्टर खासगी जमीन पहिल्या टप्प्यात संपादित करून ‘एनपीसीएल’ला देणार आहे.

चोवीस तासांत कामावर हजर व्हा!
मार्ड’च्या डॉक्टरांना इशारा
पुणे, १० जुलै / प्रतिनिधी

संपावर गेलेले मार्डचे निवासी डॉक्टर उद्या दुपारपर्यंत पुन्हा कामावर रुजू न झाल्यास त्यांचे प्रवेश रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. नागपूर उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारल्यास त्यांचे प्रवेश रद्द करावेत, असे आदेश दिले होते.

देशात अवघा १०.५% जलसाठा शिल्लक
नवी दिल्ली, १० जुलै/खास प्रतिनिधी

जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरु होऊनही मान्सूनची अनिश्चितता कायम असताना देशातील ८१ प्रमुख धरणांमध्ये आता केवळ १०.५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आज केंद्रीय जलसंपदा मंत्री पवनकुमार बन्सल यांनी ही माहिती दिली. देशात आजच्या घडीला वापरायोग्य ११२३ अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध असून त्यापैकी भूपृष्ठावर ६९३ अब्ज घनमीटर, तर ४३३ अब्ज घनमीटर भूजल साठा असल्याची माहिती बन्सल यांनी दिली. देशातील ८१ प्रमुख धरणांमध्ये ९ जुलै २००९ रोजी १६.००३ अब्ज घनमीटर पाण्याचा साठा उरला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा केवळ ४३ टक्केच असल्याचे बन्सल यांनी सांगितले. या धरणांची पाणी साठविण्याची एकूण क्षमता १५१.७७ अब्ज घनमीटर एवढी आहे. त्यामुळे धरणांमध्ये आता केवळ साडेदहा टक्केच पाणी शिल्लक असून जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उगवूनही पावसाचा पत्ता नसल्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच धरणांमधील पाणी संपले आहे. १४ धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक, २३ धरणांमध्ये ५० ते ८० टक्के, १८ धरणांमध्ये ३० ते ५० टक्के, तर २१ धरणांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाणी उरले आहे.

धरण क्षेत्रात वरूणराजा रुसलेलाच!
ठाणे, १० जुलै/प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यात कालपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० जुलै-२००९ अखेर झालेल्या पावसाची सरासरी अद्याप ५०४ मि. मी. ने कमीच आहे. विशेषत: ठाणे जिल्ह्यातील मोठी धरणे असलेल्या शहापूर व अंबरनाथ या तालुक्यातही आजपर्यंतच्या पावसाची इतर तालुक्यांच्या तुलनेतील सरासरी बरीच कमी असल्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचे संकट अद्यापही कायमच आहे.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी