Leading International Marathi News Daily
शनिवार, ११ जुलै २००९
  सीआरझेडचा फटका - ३
सीआरझेडचा, पर्यावरण सुधारणांचा पुनर्विचारही व्हावा
  ‘‘परिसर-नियोजनाचा मानसशास्त्रीय दृष्टीकोन’’
  ‘होय, पार्किंग विकताच येत नाही!’
  ओझरमच्या फौजदारवाडीतील राणे यांचे प्रशस्त घर
  महानगरपालिका कायद्यातील सुधारणा
गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी
  वास्तुरंग
  मेलबॉक्स
  वरदान विजेचे.. २
वीजवाहक वायर, वायरिंग व घ्यावयाची काळजी

 

ओझरमच्या फौजदारवाडीतील राणे यांचे प्रशस्त घर
आमच्या पणजोबांनी घर बांधले ते ब्रिटिश काळात. सुमारे १५० ते २०० वर्षांचे जुने आहे. घरात पोलीस पाटीलकी, फौजदारकी ब्रिटिश काळापासून होती. त्या वेळी घरात प्रचंड वर्दळ असायची. प्रवेशद्वारावर लाकडामध्ये सुबक गणपती कोरलेला आहे. लाकडी झोपाळा होता. देवघरात सुंदर देव्हारा आहे. गणपती बसविण्याच्या जागी सुंदर मंडपी आहे. गणपती, होळी, जन्माष्टमी हे उत्सव पूर्वापार चालूच आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील तरेळे गावच्या पुढे गोव्याकडे जाताना कासार्डे तिठाजवळ उजवीकडे रस्ता वाघोटणे-विजयदुर्गकडे जातो. तिठय़ावरून पुढे गेल्यावर ओझरम हे गाव लागते. तेथे माझे घर आहे. गावात मोठा धबधबा, लघू पाटबंधारे विभागाने बांधलेले प्रचंड धरण, दक्षिणेकडे शिवगंगा नदी, पश्चिमेस चल्र्याचा डोंगर, जवळ शिरवली गाव, दक्षिणेस कोडोंशी, पूर्वेस

 

कासार्डे, गोवा महामार्ग गाव, मध्यावर निरनिराळी सात देवालये. शिवाय प्रत्येक वाडीवरील निरनिराळी देवालये, विठ्ठल मंदिर, सद्गुरू दत्त मंदिर, हनुमान मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, उंच टेकडय़ा, गर्द झाडी, त्यात रानडुक्कर, भेकरे, ससे, कोल्हे हे प्राणी तर बिबटे वाघ केव्हाही फेरी मारतात. सरपटणारे प्राणी तर खूपच. शिवाय मोरांचा केकारव ऐकायला मिळतोच. या ओझरमच्या उंच सखल भागात ओझरमची फौजदार वाडी आहे. अशा या गावात प्रचंड असे उंच टेकडीवर वहाळाच्या कडेला झाडाझुडपांनी वेढलेले आमचे सुंदर घर आहे. परंपरागत फौजदारकी म्हणून राहत्या वाडीस फौजदार वाडी नाव पडले.
गावरहाटी, गाव व्यवस्थेच्या पूर्वीच्या पद्धतीनुसार गावात बारा बलुतेदार असतात. तसेच घरबांधणी करणारे कुशल हुशार वास्तूतज्ज्ञ त्यात होते. घर बांधायचे झाले तर मापे ७/१२ हात, ९/१३ हात, १८/२५ हात अशी मापे असायची. काही लाकडाची जोड अशी असायची कडे कारागिरानी कशी जोड, कशी चापर मारली ही कळायचेसुद्धा नाही. (चापर मारणे हा शब्दप्रयोग) यावरूनच आला. आमचे घर १८/२५ हाताचे, पणजोबांनी नवीन बांधले. पूर्वी त्यांच्या वडिलांनी बांधले, पण पणजोबांनी बांधलेले घर आजही पाहण्यासारखे आहे.
मुख्य चौथरा १८/२५ हात लांबी रुंदी तो चौथरा दीड फूट लांब, अडीच फूट (१ हात) रुंद असे आहे. चौथरा मजबूत पण रेखीव. प्रवेशद्वारावर कोरलेली गणेशमूर्ती, समोर असलेली ओटी, मोकळ्या जागी हॉल, हा कार्यक्रम, बसणे, उठणे, झोपणे, शिवाय पाऊस पडला तर शेतीची पेडके (बांधलेली तांदूळ, वरी, नाचणी इत्यादी दोरावर बांधलेली एक गठ्ठा) पणजोबांनी ओटी बांधावयास आणलेले खांब. खास बनवून घेतलेले सिमेंट दगड किंवा सालव्याच्या डोंगरातून आणली. या दगडातून बनविलेली उटाळी, त्यावर साग, फणसाचे फूट दीड फुटाचे खांब- चौकटीची आडवी उभी बारे तीसुद्धा फणसाची आहेत. एक माणूस त्यावर सहज झोपेल इतके जाड, आज हे सर्व दुर्मिळ झाले आहेत. झाडांची प्रचंड तोड होत आहे. मूळ घर चौसोपी आहे. मागेपुढे मोठे अंगण, चारही बाजूला मोठय़ा खोल्या, त्यात देवघर, माजघर, स्वयंपाक खोली तसेच ओटय़ावरून आत शिरल्यावर तशीच मोठी खोली. त्यामध्ये इतर कार्यक्रमाच्या वेळी एकांतपणे ओटीवरचा कार्यक्रम पाहण्यासाठी स्त्रियांना एकांत मिळावा म्हणून केलेली सोय आहे. घराच्या बाजूस मोठा गुरांसाठी बांधलेला गोठा आहे. त्यात गुरे बांधणे, जमल्यास शेतीची अवजारे, गवत इतर लाकूडफाटा, वासे, बांबू, लावून केलेली बंदिस्त जागा आहे. समोरच पावसाळीची लाकडे ठेवण्यासाठी खोप आहे. त्यात लाकडे इतर शेतीची अवजारे ठेवली आहेत.
आमच्या पणजोबांनी घर बांधले ते ब्रिटिश काळात. सुमारे १५० ते २०० वर्षांचे जुने आहे. घरात पोलीस पाटीलकी, फौजदारकी ब्रिटिश काळापासून होती. त्या वेळी घरात प्रचंड वर्दळ असायची. प्रवेशद्वारावर लाकडामध्ये सुबक गणपती कोरलेला आहे. लाकडी झोपाळा होता. देवघरात सुंदर देव्हारा आहे. गणपती बसविण्याच्या जागी सुंदर मंडपी आहे. गणपती, होळी, जन्माष्टमी हे उत्सव पूर्वापार चालूच आहेत.
घराच्या चौथऱ्याखालील मोकळ्या जागेत पडवी, व्हरांडा असे म्हणतात. पुढील पडवीत पूर्वी चुलते, आजोबा, पणजोबा असतेवेळी लोकांची वर्दळ होती. त्या वेळी एक भाग पुरा बसण्या उठण्यासाठी होता. मागील पडवीत फारशा पावसाळ्यात घोंगडय़ा, कपडे सुखविणे, काजू भाजणे, खाणे इ. त्यापुढे लागूनच न्हाणीघर आहे. एक पडवीत भात भरडणे, व्हायनात मिरची कुंटणे, तांदूळ सडणे, वरी, बरग सडणे इत्यादी गोष्टी घडायच्या.
आमच्या लहानपणी सर्व घरातील कुटुंबे गावालाच होती. पुरे घर मुलांनी भरलेले असायचे, घरात एवढा मुलांचा गोंगाट असायचा की, बाहेर काय घडले तरी कळायचे नाही. मुले शाळेत जातेवेळी शाळेच्या वाटा भरलेल्या, गजबजलेल्या वाटायच्या. आता परिसरातील घर-कुंपणामध्ये बदल झाले, पूर्वी मोवय, एरंड, धामण, भेंडी, पंगेरा अशा झाडाचे ठोंबे (खुंट) घातले जायचे. करंद, बांबू, वेळू याची शेंडके बांधून कुंपणाला बंदिस्त करत आता सिमेंटचे खांब आले. तारा आल्या, त्याचे कुंपण आले.
दिवाबत्ती : पूर्वी दिवाबत्ती म्हणजे एरंडाचे तेल, भुईमुगाचे तेल, राईच्या तेलात थोडे दिवे. कंदील, पेट्रोमॅक्स कंदील फक्त कार्यक्रम, भजने, पूजा यासाठी. आता आधुनिक पद्धतीने लाईट, टीव्ही, केबल सर्व घरी आले आहेत.
सणासुदी, सोमवार, अमावस्या, पौर्णिमा आमची गावी असलेली अक्का घराचे सौंदर्य राखून आहे. देवघर, ओटी, पडवी, समोर प्रचंड खळे न चुकता गाईचे शेणाने सारवून प्रसन्न वातावरण ठेवते. त्यावर आजोबांनी लावलेल्या पारिजातक, चाफा, कांचन, मोगरा, नंद यांच्या फुलांची रांगोळी पडते आणि आमच्या घराचे सुगंधाचे वातावरण होते आणि रातराणीच्या सुगंधाने रात्रीची झोप कधी लागते हे कळत नाही.
कविवर्य शंकर वैद्यांची कविता आठवते.. ‘‘मी मुंबईत असलो तरी माझे मन ओढ घेते ते माझ्या गावाकडे.’’
‘‘गाव तुटले तरीही
साद घालीत राही
गावच्या चमेलीचा वास
मुंबईत येई..’’
बाबाजी राणे
लेखक संपर्क - ०२२-२८७२७३८४