Leading International Marathi News Daily
रविवार, १२ जुलै २००९

स्टार आणि सुपरस्टार या संकल्पना हिंदी चित्रपटसृष्टी कायम जपत आली आहे. एकेकाळी ‘स्टार्स’चा दरारा आणि लोकप्रियता त्यांच्या चाहत्यांना ‘हमरीतुमरी’वर आणत असे! आता एकूणच ‘टी.व्ही.’मुळे स्टार घरीच अवतरले आहेत आणि ‘स्टार’ या संकल्पनेचेच अवमूल्यन झाले आहे. या प्रक्रियेवर एक दृष्टिक्षेप!

सुपर हिट्सचे सातत्य, दीड-दोन वर्षाच्या तारखाच शिल्लक नसलेली डायरी, बडय़ा बॅनर्सच्या ऑफर्स, भव्य प्रीमियर शोमधले आकर्षण, ग्लॅमर पाटर्य़ातील सेन्ट्रल पॉइंट, प्रसार माध्यमातून दर्शन-अतिदर्शन, छोटी-छोटी बातों की चर्चा, भरपूर गॉसिपिंग, चाहत्यांची क्रेझ, केवळ ‘नावा’वर प्रत्येक चित्रपटाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ हाऊसफुल्ल, सामाजिक-राजकीय क्षेत्रातही ‘मानाचे पान’.. या सगळ्याची ‘केमिस्ट्री’ म्हणजे स्टार?

 


एक पिक्चर हिट ठरला की पुढचाही व्हायलाच हवा (जितेंद्राचे वारीस, फर्ज, हिम्मत, हमजोली, कारवाँ, जिने की राह, भाई हो तो ऐसा असे हिट होत गेले म्हणून त्याचे स्टारपण मुरत गेले), फ्लॉप मागे लागले की होत्याचे नव्हते व्हायला वेळ तो काय लागतोय (राजेश खन्ना व त्याचे सुपरस्टारपद हा अभ्यासाचा विषय आहे, त्याचे ते साठ ते सत्तरीच्या प्रेक्षकांना झपाटून टाकणारे दिवस कधी संपतील असे कोणी म्हटलेही नसते. पण मेहबूब की मेहंदी, त्याग, मालिक, हमशक्ल, मेरे जीवन साथी, भोला भाला असे एकामागोमाग फ्लॉप झाले व राजेश खन्नाचा स्टारडम इतिहासात जमा होऊ लागला.)
दिलीपकुमार-देव आनंद-राज कपूर यांचे स्टारडम ते खरे हो, हे आजचे अक्षयकुमार, सनी, हृतिक रोशन काय स्टार आहेत का, असे सत्तरीतील चित्रपट रसिक विचारतात. साठच्या दशकापर्यंत ‘सिनेमाचा पडदा’ व ‘स्टार्सचे चाहते’ यांच्यात एकाच वेळी ओढ व अंतर असा अजब खेळ होता. शहरे छोटी होती व मोजक्या चित्रपटगृहांत दिवसाला, ‘फक्त दोन शोज’ असत. ग्रामीण भागात चित्रपटाची रिळे पोहचायला तब्बल दीड-दोन वर्षे लागत. सिनेमा हेच तेव्हा स्वत:च्या भावनिक-मानसिक आनंदाचे सोपे माध्यम होते. चित्रपट निर्मितीचेही प्रमाण कमी होते. त्यामुळे दिलीप-देव-राजचा एकेक आवडता चित्रपट तब्बल पस्तीस-चाळीस वेळा पाहणे तेव्हाच्या सरळमार्गी आयुष्य- एक शिफ्टची नोकरी करणाऱ्यांना शक्य होते. मग ‘दिलीप श्रेष्ठ की राज’ यावर वर्षानुवर्षे वाद घालायला वेळही होता. त्या पिढीचे चित्रपट रसिक (व अगदी सिनेपत्रकार) अजूनही त्याच काळात वावरताहेत व ‘तो सिनेमाचा सुवर्णकाळ होता’ असे बळजबरीने सांगताहेत, यामागे तेव्हाची समाजरचना व सिनेमाची क्रेझ यांच्या नात्याची वीण ही अशी आहे.
सतत, दिलीप-देव-राजची तीच तीच माहिती व किश्श्यांची गंमत ‘रिपीट’ होत राहिल्याने ते जरा जास्तच मोठ्ठे स्टार वाटतात. ‘आजचे माझ्यासारखे तरुण’ मात्र या तिघांच्या अभिनयशैलीत केवढा तरी बचावात्मक पवित्रा व तोचतोचपणा होता असे सांगतील. बदलत्या काळासह काही संदर्भही बदलतात.
दिलीप-देव-राजचा स्टारडम मग इतका मुरला की त्यानंतरच्या पिढीतील कलाकारांची तुलना या तिघांच्या मोठेपणाशी होत राहिली. राजेंद्रकुमार (‘ज्युबिलीकुमार’ म्हणून हिणवला जातो, पण आपले जास्तीत जास्त चित्रपट ‘सिल्व्हर ज्युबिली’ होण्यातच आपले ‘स्टार’डम आहे, या हुशारीला दाद द्यायला हवी) मनोजकुमार (‘भारतकुमार’ म्हणून टीकेचे लक्ष्य ठरला, पण ‘आम आदमी’ला ‘चित्रपटातून देशप्रेमाचे डोस देता येतात’ हे त्याचे शहाणपणच त्याला ‘स्टार’ घडवण्यात यशस्वी ठरले.)
धर्मेन्द्र, जितेंद्र, फिरोझ खान, संजय खान, विश्वजीत, जॉय मुखर्जी असे करता करता राजेश खन्ना आला व ‘अस्सल स्टार’पण काय असते, याचा झंझावात निर्माण झाला. त्याची गाडी जाताना उडणारी माती त्याचे चाहते कपाळाला लावतात, त्याच्या लग्नाची बातमी ऐकून काही युवतींनी त्याला रक्ताने पत्र लिहिले वगैरे कथा-दंतकथा यातूनही ‘स्टार’ वाढतो. राजेशनेच.. आम्हा सिनेपत्रकारांना चित्रपटाच्या सेटवर बोलावून आँखो देखा हाल पाहण्यासाठी स्टुडिओचे दरवाजे उघडले. प्रसारमाध्यमातून स्वत:भोवती ओवाळणी करून घेणे हा ‘स्टार स्वभाव’ आहे.
अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’च्या वादळाने समाजाला आणखी ढवळले. अमिताभच्या आजारपणात देशाच्या काना-कोपऱ्यातून सर्वधर्मीयांनी प्रश्नमाणिक प्रश्नर्थना केली. म्हणजेच एक सुपरस्टार ‘आम जनते’चे भावविश्व व्यापून टाकतो, असा होतो. स्टार-सुपर स्टार हा सरळ रेषेत जाणारा व सहजी मोजता येणारा विषय नाही.
आता काळ बदललाय. मल्टीप्लेक्समुळे सिनेमा सहज झालाय. कधीही जावे तिकिटे मिळताहेत. (पूर्वी अडीच तासांच्या सिनेमाच्या तिकिटासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तीन तास रांग लावावी लागे. आवडत्या हीरोच्या सिनेमापर्यंत पोहोचणे हीदेखील एक संस्कृती होती) उपग्रह वाहिन्या तर ‘चोवीस तास’ हव्या त्या स्टारचे दर्शन घडवतात. (पूर्वी मध्यमवर्गात पालकांची नजर चुकवून फिल्मी मॅगझिनमधला आवडत्या कलाकाराचा फोटो कापून ठेवायची पद्धत होती.) तात्पर्य, स्टार व समाज यातले अंतर काही पावलांवर आले. समाजाला ज्याचे आकर्षण वाटते, तो स्टार ही फूटपट्टी मान्य केली की या सगळ्या बदलाच्या निकषाचे निष्कर्ष व वस्तुस्थिती मान्य करायला हवी.
स्टार मनाने तरुण हवा. देव, अमिताभ, रेखा तिघेही कायम ‘आज’ जगतात. उगाच नाही हो रेखाने ‘जीवन गौरव’ पुरस्कार ‘प्रतिभा गौरव’ नावाने स्वीकारला. तिघांनीही ‘वयाची अट-कटकट’ ओलांडूनही आपले आकर्षण कायम राखले आहे. अमिताभने बोफोर्स प्रकरणातून बाहेर पडल्यावर पत्रकारांशी असा काही ‘दोस्ताना’ केलाय की, एखाद्या स्टुडिओत सर्व वाहिन्यांच्या ओबी व्हॅन दिसल्या की वाटते, नक्कीच अमिताभच्या सेटवर मीडियाला बोलावले असणार. स्टार अनेक पातळ्यांवर घडत असतो, आकार घेत असतो- हे सत्य आजचे कलाकार विसरले आहेत का? अनिल कपूरचा फिटनेस, जॅकी श्रॉफची माणुसकी, श्रीदेवीचा संयम, शिल्पा शेट्टीची दूरदृष्टी, सलमानची वादळे पचवायची तयारी, आमिरची ‘इमेज’ बदलण्याची हुशारी अशी काही उदाहरणे सांगता येतील. आमिरची विश्वासार्हता ही त्याची मोठी मिळकत आहे. आमिर-निर्मित व दिग्दर्शित चित्रपट आहे वा तो चित्रपटात आहे म्हणजे तो पाह्य़लाच हवा, अशी इमेज ही आमिरच्या स्टारपणाची मोठी पावती आहे. ‘गजनी’ गुणवत्तादृष्टय़ा ‘मसालेदार’ होता, पण आमिरमुळे त्याने उत्पन्नाचे विक्रम केले, म्हणजे तो स्टार. सिनेमाच्या जगात अधूनमधून काही आघाडीच्या वितरकांकडून ‘टॉप पाच’ विकले जाणारे कलाकार जाहीर होतात. तेदेखील स्टार कोण आहेत, याचे उत्तर असते. त्यात सलमान, शाहरूख, अक्षय, आमिर, हृतिक हीच नावे हुकमी आहेत. हृतिक वगळता सगळे चाळीशी ओलांडूनही टॉपवर आहेत, तर मग अन्य काय करताहेत? कुठे कमी पडताहेत?
अभिषेक- त्याच्या सामर्थ्यांबद्दल शंका आहे, की तोच अभिनयाबद्दल गंभीर नाही? त्याच्या स्टारपणाला ‘पुश’ देऊ शकणाऱ्या ‘द्रोणा’च्या पब्लिसिटीचा फोकसच स्पष्ट न झाल्याचा त्याला फटका बसला. आता ‘बॅकलॉग’ भरणार कधी व कसा? पिता व पत्नीच्या स्टारडमचा लाभ उठवण्याचा काही प्रयत्न करू शकेल?
तुषार कपूर- आपल्याकडेही अभिनयाची उंची नाही, म्हणजे अन्य मार्गाने आपण स्टार व्हायला हवे, हे पित्याने चलाखीने जमवून आणले. पण याच्याबाबत तेही शक्य नाही.
फरदीन खान- याच्यातील ऐषोरामी वृत्तीच ‘आपल्याला मोठा स्टार बनायचे नाही, जे चाललंय ते ठीक आहे,’ हे सुचवते.
जॉन अब्राहम- इंग्रजी वृत्तपत्रातील माझी एक महाराष्ट्रीय मैत्रीण, याला ‘भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्तम सेक्सी पुरुष’ मानते. एवढय़ा भांडवलावर त्याची ‘बॉडी’ किती काळ आकर्षित करणार? त्या शरीराला वळण हवे व चेहऱ्यावर भाषा हवी. बऱ्याचदा तो हिंदीत बोलतो की आणखी कोणती भाषा बोलतो, हाच प्रश्न पडतो.
रितेश देशमुख- जय महाराष्ट्र! तो महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान असू देत, स्पर्धेच्या जगात ‘हा मराठी आहे’ असले फंडे चालत नाहीत. तुमची मार्केट व्हॅल्यू महत्त्वाची ठरते. टॅलेन्ट हीच तुमची जात असते. याच्या मर्यादा लपत नाहीत.
श्रेयस तळपदे- अजून खूप शिकावे लागणार. प्रत्यक्ष वागण्यात मात्र हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्सचा तडका आलाय. या गुणाचेही कौतुक असू देत.
इमरान हाश्मी- सिनेमात चुंबन असेल तरच हा लक्ष वेधतो. एवढय़ा कमीत-कमी आकर्षणातून स्टार कसा घडेल?
इसके सिवा ‘चिक्कार व चिल्लर’ नटमंडळी आली- गेली. काही ‘नाती-गोती’ आहेत म्हणून येतात. (उदा. धर्मेन्द्रचा भाचा अभय देओल) काही मॉडेलिंगमधून (दिनो मारिओ, मिलिंद सोमण वगैरे), काही पैशाच्या बळावर (शायनी अहुजा तसाच आला म्हणे), कोणी अधिक पैशाच्या हव्यासातून (हरमन बवेजाचा हाच हेतू होता म्हणतात, पण हृतिक रोशनची जरुरत से जादा नक्कल करून कसे होईल?) ..असे बरेच ‘हीरो’ येत-जात आहेत.
चित्रपट निर्मितीचे प्रमाण वर्षभरात १५० चित्रपट असे वाढल्याने त्या गरजेतूनच इतक्या जणांना संधी मिळतेय. शाहरुख, आमिर, हृतिक तिघे मिळून ‘वर्षभरात अवघ्या मोजून चार चित्रपटां’साठी उपलब्ध असताना अन्य चित्रपटांसाठी ‘चेहरे’ आणायचे कुठून? पण स्वत:चे टॅलेन्ट दाखवण्यासाठी या संधीचा सदुपयोग करून घेण्याची ‘अक्कल’ हवी. ती जगातील कोणत्याच मार्केटमध्ये मिळत नाही. ती स्वत:मधील प्रतिभेला हाक देत, यशस्वी स्टारचा अभ्यास करीत, असंख्य गोष्टींचे निरीक्षण करीत येते. नशीब त्यानंतर येते.
माधुरी दीक्षितचे उदाहरण ‘द बेस्ट’ ठरावे.
बरोबर २५ वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट ८४ मध्ये मरीन ड्राईव्हवरील एका तारांकित हॉटेलमधील ‘अबोध’च्या टी-पार्टीत भेटलेली माधुरी दीक्षित आजही आठवते. अगदी शाळकरी मुलगी होती व छान मराठीत बोलली. तेव्हाचा तिचा सूर ‘चित्रपटाचा एक अनुभव तर घेऊन पाहूया, म्हणून राजश्री प्रश्नॅडक्शनचा हा चित्रपट स्वीकारला’ असा होता. ‘ती’ स्टार बनायला आली आहे, असे तिच्या त्या ‘पहिल्या भेटी’त तरी जाणवले नाही. हळूहळू तिला चित्रपट मिळत गेले. तेव्हाची तिची मेहनत, निष्ठा, नृत्यशैली यांची चर्चा होत गेली. (तुमच्याबद्दल काय बोलले जाते, हाही तुम्हाला स्टार बनवण्यातील एक घटक आहे.) अशा गोष्टी आत्मविश्वास वाढवतात, आपण स्टार बनायला हवे ही भावना जागी करतात. माधुरीला एन. चंद्रांचा ‘तेजाब’, सुभाष, घईंचा ‘राम लखन’ व राजीव रॉयचा ‘त्रिदेव’ मिळताच तिचा स्टारपणाकडे प्रवास सुरू झाला. या तीन चित्रपटांनी अनुक्रमे ड्रीमलॅण्ड, मेट्रो व रॉक्सी या ‘मेन थिएटर्स’मध्ये ज्युबिली यश कमावताच माधुरी मॅजिक अवतरले. (‘मेन थिएटर’ व चित्रपटाचे यश हा एके काळी काहीसा भावनिक व थोडासा अंधश्रद्धेचा भाग होता, हे राजेश खन्ना व रॉक्सी, अमिताभ व अलंकार यांच्या नात्यातून अधोरेखित झाले. स्टारपणाच्या अनेक पैलूंत तोही एक) ‘टॉपची तारका’ बनल्यावरही माधुरी बदलली नाही. अशी जमिनीवर पाय असणारीच माणसे पुढची पावले सहज टाकतात. (रॅम्पवरच्या मॉडेल हवेत चालल्यासारख्या वाटतात म्हणूनच अनेकींना सिनेमाच्या जगात यश मिळत नाही?) माधुरीबद्दल निर्माता सुधाकर बोकाडेने एकदा मला चांगले सांगितले, बाह्य चित्रीकरणस्थळी आपल्या कपडय़ांचे लॉन्ड्रीचे बिल देणारी अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीतील ही एकमेव स्टार आहे. अन्यथा, निर्मात्याला धुवायला बरेच स्टार सज्ज असतात.. बोकाडेला काय उत्तर देणार!
ऐश्वर्यात या मटेरियलचे प्रमाण थोडे कमी होते की आपण बराच काळ तिच्यात मॉडेलच बघत राहिल्याने ‘तिच्यात अभिनेत्रीदेखील आहे’ हे दुर्लक्षित राहिले? ‘ऐशनेही बडी बॅनर्सकी पिक्चर्स बडी आशाए जगाती हैं’ हा धडा गिरवला. ऋषी कपूर दिग्दर्शित ‘आ अब लौट चले’, सुभाष घई दिग्दर्शित ‘ताल’ व संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ तिला मिळाला. और उसकी तो निकल पडी. बडय़ा बॅनर्सचे चित्रपट मिळताच तिचा कॉन्फिडन्स वाढला. तिनेही ‘हम दिल दे चुके सनम’मधील नंदिनीच्या भूमिकेत प्रेम, उत्कटता, असोशी, सौंदर्य, नृत्य यात झक्कास रंग भरून ‘आपल्यालाही अदाकारी जमते’ हे दाखवून दिले. स्टार बनण्यासाठी अशा चांगल्या संधीचा सही इस्तेमाल हवा.
स्टार्सचे पीक अफाट आलेय. कोणी भारताच्या कोपऱ्यातून येतेय, कोणी जगाच्या भागातून येतेय, पण त्यात ‘झटपट स्टार बनून पैसे कमवू या’ ही ‘स्टोरी लाइन’ आहे. अगदी ‘आयटेम गर्ल’ म्हणूनही ‘स्टार’ बनण्याची अनेकांची तयारी आहे. मध्यंतरी विद्या माळवदेशी या सगळ्यांवर गप्पा करत असता तिने योग्य विश्लेषण केले. ती म्हणाली की, अख्खा सिनेमा पेलण्याची ताकद आपल्यात नाही हे अनेक नवीन चेहऱ्यांना अगोदरच लक्षात येते. मग ते काय करतात, दोन वा तीन हिरो-हिरॉईनच्या सिनेमात स्वत:ला फिट बसवायचा प्रयत्न करतात, अन्यथा आयटेम डान्सही पुरेसा वाटतो. याना गुप्ताचेच बघा, ‘बाबुजी जरा धीरे चलो’ या एका हिट गाण्यावर तिला देश-विदेशातील स्टेज शोजमधून केवढी तरी मागणी आली व तिने खोऱ्याने पैसा कमावला.. विद्याच्या मतामुळे एक पटलं, पैसेच कमावायचे असतील, तर ‘प्रमुख नायिका’ हे टार्गेटच कशाला हवे?
हृतिक रोशन व प्रियांका चोप्रश्न या दुष्काळात काहीसे आधार वाटतात.
माझ्या मते, गुणवत्तेच्या बाबतीत हृतिक रोशन हा व्यावसायिक चित्रपटातला ‘नसिरुद्दीन शाह’ आहे. खूप विचारी, प्रश्नमाणिक व निष्ठावान! आजच्या ई-कॉमर्स पिढीला असा ‘क्रिएटिव्ह’ व ‘रिझल्ट’ देणारा स्टार आपला वाटतो. शाहरूखच्या ‘मीच सर्वश्रेष्ठ’ या टामटूममुळे हृतिक झाकला जातोय. खरं तर शाहरूख अजूनही ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’च्याच आपल्या भूमिकेच्या ‘झेरॉक्स’ काढतोय (अपवाद ‘स्वदेस’चा) शाहरूख मला ‘नट’ कमी ‘मॉडेल’ जास्त वाटतो. तो कोणतेही रूप धारण करू शकतो. तो साबण विकू शकतो. शीतपेय विकू शकतो, स्वत:ला तर विकतो आहेच. कार्पोरेट युगाचा तो सही फंडा आहे. पण उपग्रह वाहिनीवर ‘चोवीस तास’ कोणत्या ना कोणत्या जाहिरातीतून दर्शन घडवल्याने त्याच्या ‘वाढत्या वयाच्या चेहऱ्याचा’ कंटाळा येऊ शकतो. हृतिक नेमका याच्या उलट. दिलीपकुमारप्रमाणे तो मोजके चित्रपट करतो, मेहनतही तशीच घेतो. (कोहिनूरसाठी दिलीपकुमार आवर्जून वाद्य शिकला, अशा बातम्या स्टारपण घट्ट करतात.) माध्यमापासून व्यवस्थित अंतर ठेवतो. (शाहरूखचा मात्र आपला चित्रपट प्रदर्शित व्हायच्या वेळेस तोल सुटतो.) तेव्हा त्याला गावपातळीवरील वृत्तपत्रातूनही ‘चमका’यचे असते, अशी ‘चमको’ प्रवृत्ती स्टारपणाची लकाकी घालवते.
प्रियांकाने ‘नाच कामा’त प्रगती केल्यास तिचे स्टारपद बळकट होईल. भारताच्या संस्कृतीत असंख्य सण, लग्न, बारसे, वाढदिवस या निमित्ताने सतत ‘नाचानाच’ सुरू असते. म्हणूनच त्यांना सिनेमात नाच लागतो. ते लगेचच अशा नृत्यगीताशी रिलेट होतात (हिंदी चित्रपटात गाणी कशाला हवीत, कापा नि दोन तासांचे चित्रपट बनवा अशी मागणी करणाऱ्यांना भारत व त्याची संस्कृतीच समजलेली नाही.) तिच्या हास्यात तिचे सेक्स अपील आहे. (‘फॅशन’ बघा) पण ‘सुपरस्टार’ म्हणून ‘लंबी इनिंग’ खेळण्यासाठी बरेच धडे गिरवावे लागतात.
स्टार ही दीघरेद्योगी मानसिकता आहे. ती रक्ताच्या थेंबाथेंबात मुरवावी लागते. (रेखा.. रेखा.. ओन्ली रेखा तशी आहे.) स्टार हा ध्यास आहे, श्वास आहे. शाहरूखला विचारा, तो क्षणभर स्वत:चे अस्तित्व विसरेल का? त्याने आपली पाठदुखी, आपला मन्नत बंगला या साऱ्याच्या बातम्या केल्या व त्यातूनच त्याचे स्टार मटेरियल अधोरेखित राहिले. स्टार म्हणून महत्त्व वाढवण्याजोगे चित्रपट फारसे निर्माण होत नाहीत, हे स्टार पॉवर ढासळण्यामागचे एक कारण होऊ शकते का?
एखादा ‘कहो ना.. प्यार है’ पुन्हा आल्यावर ही कोंडी फुटेल?
एखादा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व ‘लगे रहो मुन्नाभाई’सारखा ‘क्लास’ सिक्वेल स्टारबद्दल आदर निर्माण करेल? स्टारचा फंडा हा केवढा तरी विस्तारित आहे. केवढे तरी गुंते नि धागे यात उलटसुलट गुरफटलेत. देव आनंदने आपला पुत्र सुनील आनंदला इंट्रोडय़ुस केलेल्या ‘आनंद और आनंद’मध्ये पुत्रापेक्षा स्वत:कडेच जास्त फुटेज घेतले. याचाच अर्थ पुत्रासमोरही आपण ‘स्टार’ असल्याचे तो विसरला नाही.
या दशकात सिनेमाच्या जगात येणाऱ्यांना एक तर स्टार बनण्याची घाई आहे अथवा स्टार बनण्यासंदर्भात त्यांच्या चुकीच्या कल्पना आहेत. एक हिट मुझे स्टार बना देगा, हे सत्य असते, तर विवेक ओबेरॉयही कुछ बन सकता था. हॉट लुक मुझे स्टार बना देगी यह सच होता, तो अमृता अरोराही स्टार झाली असती.
‘स्टार’ची व्याख्या काही गुणीजनांसह बदलू शकते.
सगळे जगच बदलले आहे म्हटल्यावर यातलाही बदल का नाकारावा?
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com