Leading International Marathi News Daily

रविवार, १२ जुलै २००९

डॉक्टरांवर कारवाई ; ३१५२ डॉक्टर निलंबित
मुंबई, ११ जुलै/खास प्रतिनिधी
संपावर असलेल्या ‘मार्ड’ च्या निवासी डॉक्टरांबरोबर चर्चा करून विद्यावेतनात निश्चतपणे वाढ देण्याची तयारी वैद्यकीय शिक्षण सचिवांनी आज दाखविल्यानंतरही ही मागणी धुडकावून ३० हजार रुपये विद्यावेतन देण्याची मागणी करत रुग्णांना वेठीस धरणारा संप सुरू ठेवण्याचे ‘मार्ड’च्या नेत्यांनी जाहीर केले. यामुळे या निवासी डॉक्टरांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा आज उगारण्यात आला. एकूण ३१५२ डॉक्टरांना निलंबित करण्यात आले असून या डॉक्टरांना त्यांच्या हॉस्टेलमधून बाहेर काढण्याची कारवाईही करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे तात्कळ कामावर रुजू न होणाऱ्या निवासी डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची तयारी सरकारने केली आहे. यापुढे रुग्णांचे हाल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी यांनी संपकरी डॉक्टरांना दिला आहे.

गोपीनाथ मुंडेच महाराष्ट्र भाजपचे ‘गड’करी
मुंबई, ११ जुलै/प्रतिनिधी

गेल्या दोन-तीन वर्षांचा वनवास संपून पुन्हा महाराष्ट्र भाजपचा गड आता गोपीनाथ मुंडे यांच्याच स्वाधीन करण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला घ्यावा लागला आहे. प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर मुंडे यांची सद्दी संपल्याचे पक्षातील अनेकजण उघड बोलून दाखवत होते. भाजप हा आता सामूहीक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करीत असून गडकरी, तावडे, खडसे यांच्याच पंक्तीतील मुंडे हे एक नेते आहेत, हा प्रदेश भाजपमधील काहीजणांचा दावा लोकसभा निवडणुकीतील झटक्यानंतर पक्षालाच मोडून काढावा लागला आहे.

शांताराम नांदगावकर यांचे निधन
मुंबई, ११ जुलै / प्रतिनिधी

प्रथम तुला वंदितो, रुपेरी वाळूत माडांच्या बनात, दलितांचा राजा भीमराव माझा.., सजल नयन नीत धार बरसती या आणि अशा अनेक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार आणि ज्येष्ठ कवी शांताराम नांदगावकर यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने मुंबईत एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, एक विवाहित कन्या, सून असा परिवार आहे. नांदगावकर यांनी लिहिलेली अनेक चित्रपट, भावगीते रसिकांच्या ओठावर असून त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी आणि भावगीत लेखनातील श्रेष्ठ गीतकार व कवी हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

‘धक्का’ पचविताना!
शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दहावी-बारावीला ‘एटीकेटी’ सवलत देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला आणि ‘केजी टू पीजी’पर्यंतचे शिक्षणविश्व जणू स्तंभित झाले! नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी, अशा संभ्रमावस्थेनंतर आता ‘एटीकेटी’चा धक्का हळूहळू पचनी पडत आहे. हा निर्णय वरकरणी लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा वाटत असला, तरी त्यामधून भविष्यातील शैक्षणिक समस्या निर्माण होतील, असा इशारा दिला जात आहे. तर, काहींनी या निर्णयाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.

मंत्रालय व शासकीय कार्यालये महामुंबई परिसरात हलवावीत
‘लोकसत्ता’ व ‘एमएमआरडीए’ परिसंवादातील सूर

मुंबई, ११ जुलै / प्रतिनिधी

मंत्रालय व राज्य सरकारची इतर कार्यालये, त्याचप्रमाणे इतरही अनेक शासकीय कार्यालये दक्षिण मुंबईतून महामुंबई परिसरात हलविल्याशिवाय मुंबईतील गर्दीची, वाहतूक कोंडीची आणि प्रदुषणाची समस्या समाधानकारकपणे सोडविता येणार नाही, या सूचनेबरोबरच मुंबईतील वाहतुकीच्या समस्या सोडविताना केवळ दक्षिण मुंबई व उपनगरांचा विचार करून भागणार नाही. महामुंबईची संकल्पना आणि ‘आम आदमी’ला केंद्रस्थानी ठेवून विकास साधावा लागेल. ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करून दुमजली रेल्वे चालविणे, वाहनांवर ‘कंजेशन टॅक्स’ लावणे यासारखी कठोर पाऊले उचलली पाहिजे, अशा विविध सूचना ‘लोकसत्ता’ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने संह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या ‘इको फ्रेन्डली गव्हर्नन्स फोकसड् ट्रान्स्पोर्ट’ या परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात सहभागी झालेल्या वाहतूक तज्ज्ञांनी आणि मान्यवरांनी मांडल्या.

वैनगंगेत नाव बुडाली ; ३१ महिलांना जलसमाधी
भंडारा, ११ जुलै / वार्ताहर

वैनगंगा नदीच्या काठावरील टाकळी येथे शेतावर धानाची रोवणी करायला गेलेल्या महिलांपैकी ३५ महिला टाकळीकडून खमारीकडे नावेत बसून येत असताना आज सायंकाळी नाव उलटून झालेल्या अपघातात ३१ महिलांना जलसमाधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघातात चौघींना पोहून जीव वाचवता आला. मृतदेह शोधण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून खमारी येथे १० मृतदेह तर, भंडाऱ्याजवळील कार्धा येथे वैनगंगेत १२ मृतदेह मिळाले.
खमारी हे गाव भंडाऱ्याहून १५ कि.मी. अंतरावर आहे. वैनगंगा पार करून जाणाऱ्यांकरिता हे अंतर १ ते २ कि.मी. पडते. या अपघातग्रस्त ३५ महिला खमारी, सुरेवाडा टोली येथील होत्या. टाकळी येथे धानाची रोवणी आटोपल्यावर सायंकाळी ६.०० च्या दरम्यान त्या त्यांच्या गावाकडे परतत होत्या.

बारावीची एटीकेटी ; विद्यापीठांची लाल फुली
पुणे, ११ जुलै/खास प्रतिनिधी
राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना ‘दिलासा’ देत असल्याचा आभास निर्माण झालेल्या ‘एटीकेटी’ योजनेवर उच्चशिक्षण खाते व विद्यापीठांनी पहिल्याच दिवशी लाल फुली मारली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगासह व्यवसाय शिक्षणाच्या सर्वोच्च संस्थांच्या मंजुरीशिवाय हे पाऊल उचलणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. उच्चशिक्षणाला विश्वासात घेतल्याशिवाय एवढा मोठा निर्णय जाहीरच कसा करण्यात आला, असा सवाल उपस्थित करून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ‘शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्णयाचा आपल्याला आदरच आहे. परंतु, शासनाच्या केवळ एका आदेशाद्वारे उच्चशिक्षणासाठीच्या प्रवेशाची पात्रता बदलता येत नाही. त्यामुळे ‘बारावीनंतर एटीकेटी’च्या प्रस्तावाची यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी करणे, ही अशक्यकोटीतील गोष्ट आहे,’ अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना वस्तुस्थितीचे कथन केले.

पद्मसिंह पाटील यांच्या निवासस्थानांची झडती
उस्मानाबाद, ११ जुलै/वार्ताहर

काँग्रेसचे दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणात अटकेत असणाऱ्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद व तेर येथील निवासस्थानांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज झडती घेतली. २५ जूनला दोन्ही निवासस्थाने सीलबंद करण्यात आली होती. झडतीदरम्यान सीबीआयच्या हाती काय लागले, हे मात्र समजू शकले नाही. सीलबंद घरातील काही खोल्या चावी नसल्याने बराच काळ उघडता आल्या नाहीत. अखेर सोलापूरहून कुलुपे उघडणाऱ्या खास व्यक्तीला तातडीने बोलाविण्यात आले. त्याने कुलूप उघडल्यानंतर झडतीची कारवाई पूर्ण झाली. निवासस्थानाचे कुलूप उघडताना डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी