Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

लाल किल्ला

भिकार सावकार

सध्या गांधी कुटुंबाचे, म्हणजे सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचे, चांगले चालले आहे. राष्ट्रीय राजकारणात त्यांचा दबदबा आणखी वाढला आहे. केंद्रातील सरकारमध्ये त्यांचा शब्द डावलण्याची ताकद नाही. दहा वर्षांपूर्वी रुळावरून घसरलेली काँग्रेसची गाडी पूर्वपदावर आणून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गांधी कुटुंब राजीव गांधींच्या हत्येनंतर वैयक्तिक आघाडीवरही खूपच सावरले आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या दृष्टीने अनपेक्षित आणि आधीपेक्षाही मोठा विजय मिळवून दिला तरी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या वागण्याबोलण्यात अहंकाराचा दर्प नाही. लोकसभा निवडणुकांनंतर त्यांनी अनावश्यक विधानेही केलेली नाहीत. प्रियंका गांधी-वद्रा तर पुन्हा आपल्या खासगी जीवनात मश्गुल झाल्या आहेत.

 


गांधी कुटुंबातील या सदस्यांनी गेल्या पंचवीस वर्षांत जेवढय़ा खंबीरपणे व धीरोदात्तपणे व्यक्तिगत संकटे पचविली, तेवढय़ाच संयमाने ते या यशाला सामोरे जात आहेत. यशामुळे आणखी सावध आणि सतर्क होऊन ते आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या विरोधकांना अर्थातच हे सहन झालेले नाही. गांधी घराण्याचे सर्वात कट्टर विरोधक भाजप आणि लोहियावादी हे संधीची प्रतीक्षा करीत तूर्त शांत बसले आहेत. पण गांधी कुटुंबियांच्या यशामुळे खरी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती युपीएतील ‘घटक’ पक्षांमध्ये. सोनिया, राहुल, प्रियंकांविषयी ईर्षां वाटू लागल्याने गांधी कुटुंबाला वादात ओढण्याची परिस्थिती तयार करण्याची त्यांची धडपड सुरू आहे. असुया दाखविण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. काँग्रेससोबत कधीही सत्तेत नसलेले मुलायमसिंह यादव यांना लोकसभेत रोष व्यक्त करण्यासाठी कोणताही मुद्दा चालतो. शेवटची पाच वर्षे काँग्रेससोबत सत्तेत राहून दोन दशकांनंतर प्रथमच सत्तेबाहेर झालेले लालूप्रसाद यादव भरगच्च लोकसभेतच ‘मतलब निकल गया है तो पहचानते नहीं,’ असे सोनिया गांधींना सुनावण्याचा उतावळेपणा दाखवितात. पुलोदचा अडीच वर्षांचा प्रयोग वगळता सारी कारकीर्द काँग्रेससोबत सत्तेत घालविणारे शरद पवार मात्र असा उतावळेपणा दाखवत नाहीत पण गांधी कुटुंबाला वादाच्या भोवऱ्यात ओढण्याची संधी निर्माण करण्यात तेही गुंतलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा जुगार उधळला गेल्यावर वांद्रे-वरळी सी िलकला स्व. राजीव गांधी यांचे नाव सुचवून त्यांनी सोनिया गांधी यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या राजकीय विरोधकांना वाटत असेलही; पण या प्रकाराने त्यांनी सध्या सर्व वादांपासून दूर असलेल्या गांधी कुटुंबाला सहज वादात ओढले. सागरी सेतूला राजीव गांधींचे नाव सुचवून त्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी भाजप-सेनेला गांधी घराण्याच्या विरोधाचा मुद्दा दिला. लोकसभेच्या १७ जागाजिंकणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात सध्या राज्यात वातावरण नाही. पण प्रत्येक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय महत्त्वाच्या योजना व प्रकल्पाला गांधी घराण्यातील सदस्याचेच नाव का, असा रास्त सवाल उपस्थित करण्याची संधी पवार यांनी विरोधकांना मिळवून दिली. गांधी कुटुंबाबद्दलचा राज्यातील ‘फील गुड’ काहीसा ढवळून निघाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने, शिवसेनाप्रमुख तसेच उद्धव आणि राज ठाकरे यांना दिलेल्या सरकारी सुरक्षेचे पैसे वसूल करा, असे सुचवून वरकरणी निरुपद्रवी वाटणारा वाद निर्माण केला. केंद्रात साहेब महत्त्वाचे मंत्री आहेत आणि शिवसेनाप्रमुखांना कारण नसताना सुरक्षा दिली जात आहे, असे वाटत असेल तर तशी गृहमंत्री चिदंबरम यांच्याशी किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणे पवार यांना सहज शक्य आहे. पण पवारांचा तो उद्देशच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठींच्या माध्यमातून अशी खोडसाळ मागणी करून केंद्रातील गृह मंत्रालय आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा लावून काँग्रेसला वादात ओढायचे आणि दूरून गंमत बघायची, असे त्यांचे धोरण आहे. सुप्त उद्देश पुन्हा गांधी कुटुंबाला, विशेषत राहुल आणि प्रियंका यांना वादात ओढण्याचाच आहे. शिवसेनाप्रमुख, उद्धव आणि राज ठाकरेंकडून सुरक्षेचे पैसे वसूल करा, अशी राष्ट्रवादीने मागणी करताच राहुल आणि प्रियंकाकडूनही सुरक्षेचे पैसे वसूल करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. राऊत यांचा समन्यायी युक्तिवाद शंभर टक्के योग्य आहे. पण राष्ट्रवादीच्या या उचापतींमुळे त्यात पुन्हा गांधी कुटुंब ओढले गेले. पवार आणि राष्ट्रवादीचा उद्देश सफल झाला. लोकसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना-भाजपचा धुव्वा उडाल्यानंतर वांद्रे-वरळी सी िलक आणि झेड सुरक्षेच्या मुद्यावरून गांधी कुटुंबाला वादात ओढून मुंबईत काँग्रेसला खाली खेचून शिवसेना-भाजपला मदत करण्याचा उपक्रम राष्ट्रवादीने हाती घेतलेला दिसतो. मुंबईत अस्तित्वच नसल्यामुळे राष्ट्रवादीचे यात कोणतेही नुकसान होणार नाही. मुंबईबाहेर उर्वरित महाराष्ट्रातही गांधी कुटुंबाविषयी जनतेत रोष निर्माण होऊन काँग्रेसचा आलेख खाली आला तर तो राष्ट्रवादीला हवाच आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा नव्हे तर सोनिया आणि राहुल गांधींचा जलवा असेल, हे उघड आहे. काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीने महाराष्ट्रात लोकसभेच्या १७ जागाजिंकल्या असत्या तर देशात २०६ जागाजिंकूनही काँग्रेसचा साहेबांनी करुणानिधींपेक्षा जास्त मानसिक छळ केला असता, यात काँग्रेसच्या नेत्यांना शंकाच वाटत नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला जे अकल्पित यश मिळाले, त्यामुळे साहेब आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिल्ली आणि मुंबईत हातपाय आणि तोंड बांधले गेले आहे. त्यातून बाहेर पडण्याच्या धडपडीची ही सुरुवात आहे. अशा छोटय़ा मोहिमा आखून मतदानाच्या दिवसापर्यंत गांधी कुटुंब आणि काँग्रेसचा ग्राफ खाली खेचण्याची ही रणनिती दिसते. अवसान पूर्णपणे गळाले असताना आणि खोडय़ा काढण्याच्या कोणत्याही मोठय़ा संधी दृष्टिपथात नसताना सतत ‘प्रयत्नशील’ राहण्याची ही चिकाटी प्रत्येक राजकीय पक्षाने आदर्श ठेवावी अशीच आहे. काँग्रेसपुढे राष्ट्रवादीची आजची स्थिती ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’ अशा प्रकारात मोडणारी असली तरी चरणस्पर्श होताच ते खेचून काँग्रेसला उताणे पाडण्याची संधी राष्ट्रवादी नक्कीच गमावणार नाही.
आपले क्षीण झालेले उपद्रवमूल्य येत्या ऑक्टोबपर्यंत जमेल तसे वाढविण्याचा वरकरणी प्रयत्न करणाऱ्या साहेबांच्या राष्ट्रवादीने आतून दिग्विजय सिंह, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब विखे पाटील या चौकडीचा धसका घेतलेला दिसतो. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्यासाठी हे चौघेही नेते जोरदार लॉबिंग करीत असल्याचा संशय आणि वास राष्ट्रवादीला येत आहे. काँग्रेस स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादी आणखीच दुर्बळ होण्याची भीती सतावत असल्यामुळे साहेबांच्या गोटात अस्वस्थता आहे. स्वबळावर लढण्याचे धाडस करण्यासाठी महाराष्ट्र म्हणजे बिहार नव्हे. १९९९ साली पवारांनी सोनिया गांधींच्या विरोधात विद्रोहाचे शिंग फुंकल्यानंतर सहा महिन्यांतच सत्तेवर आणून महाराष्ट्राने काँग्रेसच्या देशव्यापी पुनरुज्जीवनात निर्णायक भूमिका बजावली होती, याची जाणीव कोणताही धाडसी निर्णय घेण्यापूर्वी सोनिया आणि राहुल गांधींना ठेवावी लागेल. दिल्लीत सत्ता असल्यामुळे मुंबईच्या सत्तेवर पाणी सोडण्याचा अविचार सोनिया वा राहुल गांधींच्या मनाला शिवेल असे वाटत नाही. त्यातच स्वबळावर निवडणूक लढण्याचे कोणतेही संकेत काँग्रेसच्या गोटातून देण्यात आलेले नाही. पवार यांच्या संपर्कात राहणारे काँग्रेसचे नेते तर स्वबळावर लढण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे गेल्या पावणेदोन महिन्यांपासून ठामपणे सांगत आहेत. दिग्विजय सिंह, देशमुख, चव्हाण आणि विखे पाटील यांच्या आग्रहाखातर स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेस घेईल, असे वाटत नाही. ते राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही ठाऊक आहे. पण हे निमित्त साधून विधानसभा निवडणुकीपू्वी या चौघांचा बंदोबस्त केल्याचे समाधान राष्ट्रवादीला हवे आहे.
अर्थात पक्षांतर्गत मतभेदांमुळे उद्भवलेल्या या द्विधा मनस्थितीचा फायदा घेत काँग्रेसश्रेष्ठी राष्ट्रवादीशी साखरपुडय़ाची बोलणी लांबवू शकतात. कोणतीही गोष्ट वेळेवर न करण्याची काँग्रेसची ख्याती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. त्याचाही फायदा कदाचित या वेळी उठविला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणार असल्याची आवई उठवून साहेबांची बार्गेिनग पॉवर आणखी कमी करण्याचा खोडसाळपणाही काँग्रेस करेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त लढय़ाची घोषणा अपेक्षेपेक्षा लवकर झाली तरी वाटाघाटीचा तिढा दीर्घकाळ सुटणार नाही आणि नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी जागावाटपाचे ‘सूत्र’ जाहीर होईल.
अशा स्थितीत आपले निवडून आणायचे किती आणि काँग्रेसचे पाडायचे किती याचे गणित खूपच गुंतागुंतीचे होईल आणि त्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचा याविषयीचा अनुभव फारसा ‘उत्साहवर्धक’ नव्हता. जागावाटपाच्या बोलण्यांत २८८ पैकी १२१ जागा यंदाही कायम राखण्याचे अवघड लक्ष्य राष्ट्रवादीपुढे असेल. १२१ पेक्षा कमी जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी विलीन होणार असल्याच्या खोडसाळ प्रचार निवडणुकीतही कायम राहील. ‘प्रेझेंट टेन्स, फ्युचर नॉट परफेक्ट’ अशी अवस्था झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सध्या कमालीच्या दडपणाखाली आहे. काँग्रेसशी निदान निवडणुकीपुरता तरी ‘दोस्ताना’ सलामत राहावा, पुढचे पुढे बघता येईल, अशी राष्ट्रवादीची ‘किमान’ अपेक्षा आहे. त्यात कुठेही खुट्ट झाले की राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मन खट्टू होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी अपुऱ्या मान्सून पावसाविषयी बोलताना संभाव्य ‘दुष्काळा’वरून आपल्यालाच टोमणा मारला, असा पवार यांचा समज झाला असावा. त्यामुळेच थंड, हिरव्यागार परदेशातून रखरखीत दिल्लीत पोहोचताच त्यांनी संभाव्य दुष्काळाची (राष्ट्रवादीच्या नव्हे) शक्यता ठामपणे फेटाळून लावली.
अर्थात तीन आठवडय़ांनंतर चव्हाण यांच्या भाकितात दम असल्याचे त्यांना संसदेत नाईलाजाने मान्य करावे लागले. ही तर सुरुवात आहे. पुढचे दोन महिने परस्पर कुरघोडीचे असे अनेक क्षण बघायला मिळणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात १६ मे पासून सुरू झालेला हा ‘भिकार-सावकार’चा खेळ दसरा-दिवाळीपर्यंत रंगणार असून बघ्याच्या भूमिकेतील विरोधकांचे ‘पैसा वसूल’ मनोरंजन होणार, यात शंकाच नाही.
सुनील चावके