Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

लोकमानस

असा पॉपचा सम्राट पुन्हा होणे नाही

 

अगदी अनपेक्षितपणे ‘जॅको’च्या निधनाची बातमी आली आणि त्याच्या अनेक चाहत्यांप्रमाणे हेलावून गेलो. देशांच्या सीमा, भाषांची बंधने, धर्माचे अडसर यांच्या पालीकडे असलेल्या ‘संगीताच्या साम्राज्या’चा सम्राट मायकेल जॅकसन होता. बालवयाचा आनंदही न घेता आलेल्या या मुलाने वयाच्या चौथ्या वर्षांपासून गाणी गात लोकांचे मन रिझवण्यास सुरुवात केली होती. ‘गीतं, वाद्यं, नृत्यंच त्रयं संगीतमुच्चते’ या उक्तीनुसार त्याने गीत आणि त्याबरोबरच नृत्य वैविध्यपूर्ण वाद्यांच्या वापराने साकारले. खऱ्या अर्थाने संगीत स्वत:च्या रक्ताच्या थेंबाथेंबात जपले.
भूल देऊन डॉक्टर मंडळी रुग्णाला वेदनांची जाणीव होणार नाही याची काळजी घेतात. पण ते ‘एका वेळी एका’साठी उपयोगी असते. मात्र सामूहिकरीत्या लोकांना त्यांची दु:खे विसरायला लावणारा होता तो मायकेल जॅकसन. स्वत:ला, स्वत:च्या दु:खाला, जगाच्या कटकटींना विसरायला लावण्याचे कसब संगीतात असतेच, ते त्याने पुरेपूर दाखवून दिले. स्टेजवर गेल्यावर बेधुंद होऊन प्रेक्षकांवर असीम आनंदाचे धबधबे ओतणारा हा कलावंत असा ‘ऑफ दि वॉल’ व्हायला नको होता.
त्याच्या अल्बमची नावंसुद्धा त्याच्या चाहत्यांना थरारून टाकतात. ‘बॅड’, ‘ऑफ दि वॉल’, ‘ब्लड ऑन दि डान्स फ्लोअर’, ‘डेंजरस’, ‘हिस्टरी’, ‘थ्रिलर’ या प्रत्येकात ‘मायकेल’टच आहे. अर्थशास्त्रात एखाद्या अर्थशास्त्रज्ञाच्या नावाची ‘स्कूल ऑफ थॉट’ असते, तसा मायकेलसुद्धा ‘युनिव्हर्सिटी ऑफ थॉट’ बनवू शकला. स्वत: गीत लिहून, ते संगीतबद्ध करून त्यावर नृत्य किंवा दृश्य स्वरूपात अप्रतिम नावीन्यपूर्ण कल्पना सादर करणारा हा कलंदर जगभर पसरलेल्या त्याच्या चाहत्यांच्या हृदयात विजेसारखा अनेक वर्षे कडाडत होता, तळपत होता.
त्याची काही काळची गैरहजेरी असह्य झालेले रसिक त्याने नवी गाणी आणावीत म्हणून वाट पाहत होते. त्याचे (शिखरावरच असण्याचे त्याचे स्वप्न असावे म्हणून कदाचित) पुनरागमन होणारही होते.. त्याच्या पन्नास कार्यक्रमांची तिकिटं हातोहात संपली होती यावरून मायकेलचे संगीतसम्राट म्हणून अढळपदच स्पष्ट करतात.
चाहत्यांचे हे प्रेम त्याच्यावरील कुठल्याही आरोपांमुळे वा त्याच्या कर्जबाजारीपणामुळे कमी झाले नव्हते. मूळ बसक्या नाकाच्या मायकेलने नंतर चेहऱ्यात बदल केला; घटस्फोट वगैरे घडामोडींनी तो वैवाहिक जीवन बदलत राहिला; त्याने धर्मातरही केले; त्याची आर्थिक स्थितीही तो बदलत राहिला.. मग या सगळ्यांप्रमाणे अजून एक बदल त्याला करता आला नसता? कडाडणाऱ्या विजेऐवजी कडाडत राहणे त्याला जमले नसते? आपल्यतून जाताना तो हृदयाला चटका लावून गेला. ‘NEVER LAND WILL GET BACK YOU!’
मनोहर निफाडकर, बडोदा

पापाचा घडा भरला
नगरसेवकाचे नगरभक्षक झालेले दीपक मानकर अखेर कायद्याच्या कचाटय़ात सापडले. या सर्व प्रकारामागे गुंड, समाजकंटक प्रवृत्तींना सत्ताधाऱ्यांचे संरक्षण व प्रोत्साहन कारणीभूत आहे. या माणसाचे कारनामे काका, पुतण्या, आबा, कलमाडी, विलासराव वगैरे लोकांना माहीत नव्हते, असे म्हणणे भाबडेपणाचेच नव्हे तर फसवणुकीचा प्रकार ठरेल. या इसमाने भूखंड, सदनिकांबाबत धाकधपटशा, गुंडगिरी केली. गणपती उत्सव, दहीहंडी इत्यादींसाठीची वर्गणी ऊर्फ खंडणी उकळण्यासाठी त्याने कोथरूड, भुसारी कॉलनी, बावधन भागात अनेक कंपन्यांना वेठीला धरले.
प्रभू कुटुंबीयांना धमकी, मारहाण करणारे सोडून प्रभूंवरच गुन्हा दाखल झाल्याबद्दल आर.आर. पाटील, तत्कालीन गृहमंत्री यांनी खुलासा करायला हवा. कारण राजकीय दडपणाशिवाय पोलीस असे कृत्य करणार नाहीत.
रवींद्र ठाकूर देसाई, बिबवेवाडी, पुणे

खतरों के खिलाडी
दहीहंडीचा उत्सव १४ ऑगस्ट रोजी आहे. दरवर्षीप्रमाणे गोविंदा पथके नऊ थर लावून दहीहंडी फोडतील. यात खरेच थ्रिल असेल तर जे राजकीय नेते या कार्यक्रमाचे आयोजन करतात, त्यांची मुले अथवा मुली या खेळात भाग का घेत नाहीत, हातपाय मोडून घेण्याकरिता आमचीच पोरं का लागतात, असा सवाल लालबागचे रहिवासी मनोहर गावडे यांनी केला, तो योग्यच आहे. मधुकर राऊत तसेच सामाजिक संघटनांनी दहीहंडीच्या जीवघेण्या स्पर्धेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. त्याने ‘गोविंदा’मुलांची डोकी फुटण्याचे प्रसंग आठवले. यंदा उंच दहीहंडय़ा लावल्या तर अशा प्रसंगांची पुनरावृत्ती होणार. सर्कशीमध्ये लहान मुलांना काम करण्यास कायद्याने बंदी असताना सरकार दहीहंडी फोडण्याकरिता लहान मुलांना कसे काय परवानगी देते, ते कळत नाही. या प्रकारावर तातडीने बंदी यायला हवी.
शशिकांत नाबर, मुंबई

भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा हवी!
खाद्यपदार्थामध्ये आणि भाज्यांमध्ये बेमालूम भेसळ होत असल्याबद्दल आजकाल वारंवार बातम्या प्रसिद्ध होत असतात. मसाला दूध, देशी तूप आणि फळभाज्या यांमध्ये आरोग्यास घातक रसायने मिसळून लोकांची दिशाभूल केली जाते. देशी तुपामध्ये जनावरांची चरबी मिसळली जाते, हे वाचून आणि टी.व्हीवर पाहून तर धक्काच बसला. हे एकंदर पाहून असे वाटते की, या देशात नफेखोरांना आणि भेसळ करणाऱ्यांना कायद्याची भीतीच राहिलेली नाही. कारण इतक्या वर्षांत कधीही भेसळ करणाऱ्याला सक्त सजा दिल्याचे ऐकिवात नाही. भेसळखोरांना अटक होताच लागलीच त्याची जामिनावर सुटका होते. पुन्हा ते त्यांचा हा भेसळीचा गोरखधंदा चालविण्यास मोकळे होतात. त्यांना राजकीय पुढाऱ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे घडूच शकणार नाही. यासाठी आता अधिक कडक कायदे आवश्यक आहेत. त्याशिवाय समस्या किती गंभीर आहे, हे लोकांना जाणवणार नाही.
बाळकृष्ण चोडणकर, उल्हासनगर

शिष्यवृत्ती निकालाला विलंब घोळ निस्तरण्याच्या व्यापामुळे
‘शिष्यवृत्ती’च्या निकालात अडसर तांत्रिक समस्येचा (२९ जून) ही बातमी वाचली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निकालाच्या विलंबाचे कारण दिले आहे की, गुणपत्रिकांकरिता डेटा एन्ट्री करताना तांत्रिक समस्या उद्भवल्या. त्याचप्रमाणे भारनियमनही आहे. ही दोन्ही कारणे दिशाभूल करणारी आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा १५ फेब्रुवारी रोजी तर बारावी व दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २६ फेब्रुवारी व ५ मार्च रोजी सुरू झाल्या. भारनियमनामुळे शिष्यवृत्तीच्या निकालाला उशीर झाला असे म्हणावयाचे तर बोर्डाचे निकाल कसे लागले? शिष्यवृत्ती परीक्षेपेक्षा या दोन्ही बोर्डाच्या परीक्षांना अनेत पटीने जास्त विद्यार्थी बसतात!
डेटा एन्ट्री करताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्या, हे मत मांडताना त्यांनी आपल्या पदरची चूक राखून ठेवली. या वर्षीच्या माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ. सातवी) परीक्षेतील मराठी माध्यमाच्या भाषा, गणित व बुद्धिमत्ता चाचणी या तिन्ही प्रश्नपत्रिकांत प्रश्न क्र. ३९, १३ व २१ हे प्रश्न चुकीचे होते. त्यासाठी मी, मंदार घोगळे, विद्यार्थी सहाय्यता संघाचे अजित राऊळ, अशोक तोडणकर यांनी राज्य परीक्षा मंडळाशी व शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला. २७ मे नंतर त्यावर तज्ज्ञ शिक्षकांचा विचारविनिमय होऊन, चुकीच्या प्रश्नांना गुणदान देण्याची परिषदेमार्फत कार्यवाही करण्यात आली. त्यामुळेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाला विलंब झालेला दिसत आहे.
दिलीप दळवी, लोअर परेल, मुंबई

मंगेशकरांवर टीका कशासाठी?
लोकमानसमध्ये अनघा गोखले यांनी एकूण मंगेशकर घराण्यावर आग पाखडली आहे. (३० जून) मंगेशकरांची गाण्यावर पकड आहे. रंगभूमी आणि सिनेमांमध्ये त्या काळात मंगेशकर भगिनींशिवाय कोण होतं गाणारं? गाण्यासाठी त्यांनी हालअपेष्टा सोसल्या. ऐश्वर्य त्यांना एका रात्रीत प्राप्त झालं नाही. इतरांनी त्यांच्या गायकीची नक्कलच केली, हे सत्य आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर ज्ञानेश्वरीच्या निरूपणाने कार्यक्रम पुढे नेतात, असे म्हणताना त्यांचे ज्ञानेश्वरीवरील प्रभुत्व मान्यच करावे लागेल.
श्रीकृष्ण पुरंदरे, तळेगाव दाभाडे