Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

कराड- चिपळूण कोकण रेल्वे मार्गाला चालना देणार
सातारा, १२ जुलै/प्रतिनिधी

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुणे कोल्हापूर रेल्वे पॅसेंजर रेल्वेगाडीच्या इंजिनमधून समस्या पाहणी सफर करून धमाल उडवून दिली. रेल्वे मालकीच्या जागांवर खासगीकरणाच्या माध्यमातून दोन मोठे कारखाने आणणार तसेच कराड, चिपळूणला जोडणाऱ्या मार्गाला चालना देऊन लवकरात लवकर तो पूर्ण करण्यात येईल, असे सातारा रेल्वे स्टेशनवर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दीडशे तालुका वसतिगृहे राज्यात उभारणार- हंडोरे
कोल्हापूर, १२ जुलै / विशेष प्रतिनिधी

राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या ३०० इमारतींची बांधकामे सुरू असून यासाठी २ हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात १५० तालुका वसतिगृहे व ३५३ तालुक्यात निवासी शाळा बांधण्यात येणार आहेत. राज्यातील १२ जिल्ह्य़ांत सामाजिक न्याय भवनाचे बांधकाम पूर्ण झाले असून अनेक जिल्ह्य़ातील कामे अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी आज येथे दिली.

कबरीची संरक्षक भिंत काढून घेतल्याने वादावर पडदा
इचलकरंजी, १२ जुलै / वार्ताहर

शिरढोणमधील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील वादग्रस्त कबरीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम मुस्लिम समाज बांधवांनी स्वत:हून काढून घेतल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून दोन समाजातील सुरू असलेल्या वादावर पडदा पडला. विविध संस्थांचे संस्थाप्रमुख दस्तगीर बाणदार,अन्याय निवारण कृती समिती आणि तंटामुक्ती समितीने या प्रकरणी केलेल्या शिष्टाईला रविवारी यश आले.

यशवंतरावांसारखी बंदीची वेळ न येण्यासाठी पवारांनी शहाणपणाने वागावे- मंडलिक
गडिहग्लज, १२ जुलै / वार्ताहर

शरद पवारांनी कोल्हापूरचा स्वाभिमान डिवचला, त्याची किंमत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मोजावी लागली. अनावधानाने बोलल्यामुळे कोल्हापूरच्या जनतेने यशवंतराव चव्हाणांना जिल्ह्य़ामध्ये प्रवेश बंद केला होता. ती वेळ पवारांनी स्वत:वर येऊ देऊ नये, शहाणपणाने वागावे असा सल्ला देतानाच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या जनतेला पवारांच्या वेठबिगारीतून मुक्त केल्याचे समाधान मिळाल्याची भावना खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी व्यक्त केली.

साईनाथ पतसंस्थेच्या दोन लेखापरीक्षकांना कोठडी
मिरज, १२ जुलै / वार्ताहर

साईनाथ पतसंस्थेचे लेखापरीक्षक संतोष ओझा व गिरीश राठी या दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. दीड कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष लेखापरीक्षक यशवंत सावंत यांच्या फिर्यादीनुसार पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांसह १५ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शुक्रवारी पोलिसांनी सन २००४ ते २००८ या कालावधीत पतसंस्थेच्या लेखापरीक्षणात दोष आढळून आल्याने तत्कालीन लेखापरीक्षक संतोष ओझा व गिरीश राठी यांना अटक केली. बोगस कर्जवाटप, ठेव पावतीवर कर्ज घेणे आदी आरोप ठेवण्यात आले असून गहाळ कागदपत्रांचा शोध पोलीस घेत आहेत.

स्वत:च्या मुलींना विष पाजणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडला
शाहूवाडी, १२ जुलै / वार्ताहर

शाहूवाडी तालुक्यातील कडवे पैकी वरीलगांव येथील स्वतच्या दोन मुलींना कीटकनाशक पाजलेली सुनीता अनिल यादव हिचा मृतदेह आज गावाशेजारील विहिरीमध्ये सापडला. पल्लवी (वय ४) व पायल (वय २) या दोन मुलींना तिने कीटकनाशक पाजले होते. या दोघींचा मृत्यू जागीच झाला होता. तर या घटनेनंतर सुनीता ही गायब झाली होती. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले होते. ही घटना गुरुवारी दुपारी ४ च्या दरम्यान घडली होती. तेव्हापासून तिचा शोध सर्वत्र चालू होता. दरम्यान तिने स्वतच्या दोन मुलींना कीटकनाशक पाजून का ठार मारले असावे व स्वत आत्महत्या का केली असावी या पाठीमागचे कारण समजू शकले नाही.

प्रश्नध्यापकांचा उद्यापासून संप
कोल्हापूर,१२ जुलै / विशेष प्रतिनिधी
राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन प्रश्नध्यापकांनी नेट सेट प्रश्न मार्गी लागावा व सहावा वेतन आयोग तात्काळ लागू करावा यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे राज्यातील ४५ हजार प्रश्नध्यापक १४ जुलै पासून बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) च्या वतीने येथे देण्यात आली. या वेळीही दखल न घेतल्यास महाराष्ट्रातील प्रश्नध्यापक महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व संघटना २० जुलैपासून सर्व मंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी तीव्र निदर्शने करणार आहेत.

श्रीराम सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध
फलटण, १२ जुलै/वार्ताहर

सरडे (ता. फलटण) येथील सरडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाचा १७ जागांसाठी १७ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे - रघुनाथ येळे, हणमंतराव शेडगे, पुष्पाताई एजगर, किसन धायगुडे, शत्रुघ्न बेळदार, भिमराव शेंडगे, दादा बेलदार, सदाशिव चव्हाण, विजय धायगुडे, धोंडीबा शेंडगे, पोपट भोसले, शत्रुघ्न जाधव, विष्णु आडके, लताबाई विरकर, विश्वनाथ धायगुडे, महिबुब शेख.

शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचे भूमिपूजन
सोलापूर, १२ जुलै/प्रतिनिधी

दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा सोलापुरात महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सोमवारी १४ जुलै रोजी होत आहे. अध्यक्षस्थान ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे भूषविणार आहेत. लेडी डफरिन चौकातील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेत चव्हाण यांचा पुतळा उभारण्यात येणार असून त्यासाठी शासनाच्या मान्यतेची पूर्तता झाली आहे. या पुतळ्याच्या उभारणीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून चव्हाणप्रेमी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. परंतु प्रत्येक वेळी त्यात अडचण येत होती. मात्र अलीकडे शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण हेच मुख्यमंत्री झाल्यानंतर या पुतळ्याच्या उभारणी प्रस्तावाला चालना मिळाली.

वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम
सांगली, १२ जुलै / प्रतिनिधी
वीर शिवा काशिद प्रतिष्ठानच्या वतीने वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन जाधव यांनी केले आहे. पुण्यतिथी निमित्त सांगलीतील दैवज्ञ भवन येथे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रम आयोजित केला असून त्यास महाराष्ट्र राज्य नाभिक समाज महामंडळाचे संस्थापक हणमंतराव साळुंखे, पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रूपाली काशिद उपस्थित राहणार आहेत. वीर शिवा काशिदांचा जीवन उद्देश व सामाजिक व्यवस्था परिवर्तनाची आवश्यकता या विषयावर प्रश्न. कुमार काळे, अहमदनगरच प्रश्न. संजीव पोफरे, शंकरराव काळे हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांंना सुविधा उपलब्ध करून देणार आहोत, असेही श्री. जाधव यांनी सांगितले.

राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या संचालक मंडळावर चाकोते
सोलापूर, १२ जुलै/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या कार्यकारी मंडळावर सोलापूरच्या नान्नज येथील शरद शेतकरी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांची संचालकपदी निवड झाली. माजी आमदार बाबुराव चाकोते यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नज येथे शरद सहकारी सूतगिरणीची उभारणी केल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कारभार करून या सूतगिरणीला चांगल्या स्थितीत आणले आहे. यापूर्वी वस्त्रोद्योग महासंघाच्या जर्मनीच्या अभ्यास दौऱ्यासाठी चाकोते यांची निवड झाली होती.

किरकोळ कारणावरून सोलापुरात तरुणाचा खून
सोलापूर, १२ जुलै/प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून झालेल्या जबर मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनायकनगरात घडली. याप्रकरणी एका किराणा व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. मुसा वजीर शेख (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भंगार मालाच्या विक्रीचा व्यवसाय करीत असे. त्याचे ज्योतिबा बद्दू राठोड (वय ४५) या किराणा व्यापाऱ्याशी झालेल्या भांडणानंतर राठोड याने मुसा यास बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो मरण पावला.