Leading International Marathi News Daily

सोमवार, १३ जुलै २००९

दिल्ली मेट्रो रेल्वेचा पूल कोसळून पाच ठार
नवी दिल्ली, १२ जुलै/खास प्रतिनिधी
दक्षिण दिल्लीतील प्रमुख बाजारपेठ लाजपतनगर येथील लेडी श्रीराम कॉलेजपाशी मेट्रोचा पूल आज पहाटे कोसळून घटनास्थळी काम करीत असलेले चार कामगार आणि एका इंजिनिअरसह पाच जण ठार झाले, तर १५ जण जखमी झाले. सुदैवाने अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने मोठय़ा प्रमाणावर जीवहानी टळली. काँक्रीटच्या दोन खांबांदरम्यानची स्लॅब कोसळून हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. पुलाचा भाग कोसळल्याने या भागातील पाईपलाईन फुटून सर्वत्र पाणी साचले.

श्रीधरन यांचा राजीनामा नामंजूर
राजधानी दिल्लीत आज दुर्दैवी रविवारच्या पहाटे मेट्रो रेल्वे पुलाचा आणखी एक अपघात घडून दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे प्रमुख ई. श्रीधरन यांना वाढदिवसाची कटु भेट दिली. या अपघातात एका अभियंत्यासह पाच कामगार जागीच ठार झाल्यामुळे व्यथित होऊन अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत श्रीधरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या बारा वर्षांपासून दिल्ली मेट्रो रेल्वेचे निष्ठेने काम करणारे श्रीधरन यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असून अपघातासाठी जबाबदार ठरलेल्या गॅमन इंडिया या बांधकाम कंपनीविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नक्षलवाद्यांच्या भुसुरुंग स्फोटात ३० पोलीस शहीद
चंद्रपूर, १२ जुलै/प्रतिनिधी

गडचिरोलीपासून अवघ्या ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्हय़ातील मानपूरजवळ नक्षलवाद्यांनी आज दुपारी केलेल्या भुसुरूंग स्फोटात पोलीस अधीक्षक विनोद चौबे यांच्यासह राज्य व केंद्रीय राखीव दलाचे २६ जवान शहीद झाले. या भागात भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी शहीद होण्याची ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी रेड अलर्ट घोषित करून सीमावर्ती भागात शोध मोहीम सुरू केली आहे.

.. हे तर ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’!
पुणे, १२ जुलै / खास प्रतिनिधी

दहावीत अनुत्तीर्ण होऊनही अकरावीत प्रवेश देण्याच्या निर्णयाची ‘एटीकेटी’ म्हणून अवहेलना करणे चुकीचे असून केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ पर्यायाप्रमाणेच राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली ही संधी आहे.. शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘एटीकेटी’चा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पुरवणी परीक्षा आयोजित करण्यासाठी सुरू झालेल्या मोहिमेचे ‘एटीकेटी’ च्या निर्णयामध्ये रूपांतर झाले. (अग्रलेख : एटीकेटी’चा फंडा)

सरकारच्या कारवाईच्या दट्टय़ानंतर सात डॉक्टर कामावर रुजू; संपकरी डॉक्टरांची ‘समातंर’ ओपीडी
मुंबई १२ जुलै / प्रतिनिधी

सरकारने सुरु केलेल्या निलंबन कारवाईला न जुमानता ‘मार्ड’ च्या निवासी डॉक्टरांनी विद्यावेतनाच्या वाढीसाठी पुकारलेला संप आज सहाव्या दिवशीही सुरु ठेवला. मात्र रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून डॉक्टरांनी आज के.ई. एम. रुग्णालयात ‘समातंर बाह्य रुग्ण कक्ष’ (ओपीडी ) सुरु केला.

काँग्रेस संपर्क मोहिमेमध्ये वाद जुंपला
पदाधिकाऱ्यास माजी आमदाराची जातीय शिवीगाळ
औरंगाबाद, १२ जुलै/खास प्रतिनिधी
काँग्रेसच्या संपर्क मोहिमेचा मराठवाडय़ातील प्रारंभ आज वादावादीने झाला! पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रभान पारखे यांना सिल्लोडचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. व्यासपीठावर खुर्ची बळकाविल्याच्या कारणावरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्यासमक्ष हा वाद झाला. या दोन्ही नेत्यांच्या सूचनेनुसार वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. संपर्क मोहिमेचा मराठवाडय़ातील पहिला कार्यक्रम आज औरंगाबादमध्ये होता.

पवन ऊर्जा कंपन्यांतील सेलीब्रेटीजच्या ऐश्वर्यामुळे प्रशासन हतबल !
जयप्रकाश पवार
नाशिक, १२ जुलै

पवन ऊर्जा कंपन्यांनी नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्य़ात बस्तान बसविताना शेतजमिनींच्या बाबतीत जी काही चलाखी केली अन् त्यांच्या या चलाखीत शासकीय यंत्रणेतील घटकांनी पदोपदी संशयास्पद भूमिका वठविली त्या सर्वच व्यवहारांची सखोल चौकशी होणे अगत्याचे आहे. पण, पोलिसांनी नेहमीच्या खाकी शिरस्त्यानुसार गुन्ह्य़ाची उकल करण्याआधीच अमूक अमूक प्रकरणात ‘फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होवू शकत नाही’ असे लेखी स्वरुपात स्पष्ट करीत जागेवरच तडकाफडकी न्यायदानाचे काम केल्याने पुन्हा एकवार पोलिसांची भूमिका वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्राचा आजचा आवाज
हृषिकेश रानडे
पुणे, १२ जुलै/ प्रतिनिधी
‘झी मराठी’च्या ‘आयडीया सारेगमप- महाराष्ट्राचा आजचा सर्वोत्कृष्ट आवाज’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत दाखल झालेले तिघेही स्वरवंत पुण्याचेच असल्याने स्वरांचे हे युद्ध पुणेकर जिंकणार हे ठरलेलेच होते. उत्कंठा होती ती केवळ ‘त्या’ एका नावाची. क्षणाक्षणाला वाढत जाणारी रसिकांची हीच उत्कंठा अन् उत्साहात पुण्यातच रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट आजचा आवाज ठरला हृषिकेश रानडे! प्रसिद्ध गायक व या स्पर्धेचे परीक्षक सुरेश वाडकर यांनी हृषिकेशच्या नावाची घोषणा करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत त्याला शुभेच्छा दिल्या. परीक्षकांनी प्रथम क्रमांकाचे गुण दिलेली अमृता नातू ही मात्र या स्पर्धेची उपविजेती ठरली. तर मधुरा दातार हिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मागील चार महिन्यांपासून सुरू असलेली ही सुरांची मैफल आज महाअंतिम फेरीच्या निमित्ताने उत्साहाच्या एका सर्वोच्च स्थानी पोहोचली होती. तिचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आलेल्या रसिकांनी पुण्याचा गणेश कला क्रीडा रंगमंचचा हॉल खच्चून भरला होता. महाअंतिम फेरीमध्ये परीक्षकांच्या मतांचे महत्त्व पन्नास टक्के व प्रेक्षकांच्या मतांचे महत्त्व पन्नास टक्के होते. त्यामुळे परीक्षकांबरोबरच प्रेक्षकांना जिंकून घेण्यासाठी हृषिकेश, अमृता व मधुरा या तिघांनीही आज पुरेपूर प्रयत्न करीत सवरेत्कृष्ट सादरीकरण केले. तिघांच्याही प्रत्येक गाण्याला रसिकांची भरभरून दाद मिळाली.

शिवसेनाप्रमुख मातोश्रीवर परतले
मुंबई, १२ जुलै/प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अँजिओप्लास्टीनंतर आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना लीलावती इस्पितळातून आज डिस्चार्ज देण्यात आला. बाळासाहेबांना होणारा श्वसनाचा त्रास आता बहुतांश कमी झाला असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना सहा जुलै रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे हे अमेरिकेत होते. तातडीने ते परतले. ठाकरे यांच्या ह्रदयात तीन ठिकाणी ब्लॉक होते. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यापूर्वी १३ वर्षांपूर्वी ठाकरे यांची बायपास झाली होती. ठाकरे यांचे वय व त्यांच्यावर करायचे उपचार याबाबत उद्धव यांच्याशी डॉ. जलील परकार यांनी सल्लामसलत करून अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. याकरिता प्रसिद्ध डॉक्टर मॅथ्यू यांना पाचारण करण्यात आले. ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्यावर आता त्यांचा श्वसनाचा त्रास बहुतांशी कमी झाला आहे. पाच-सहा दिवस देखरेखीखाली ठेवल्यानंतर आज ठाकरे यांना घरी जाण्यास डॉक्टरांनी अनुमती दिली.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी